- अपर्णा मुजूमदार
सुधा सकाळपासून त्रस्त झाली होती. तिला संध्याकाळी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या घरी फेस्टिव्ह पार्टीला जायचे होते. तिला कळत नव्हते की कोणता ड्रेस घालून पार्टीला जावे. तिच्या वॉर्डरोबमध्ये ड्रेसेसची कमतरता होती असे नव्हे, तिचा वॉर्डरोब ड्रेसेसनी खचाखच भरला होता, तरी ती कोणता ड्रेस घालावा, याची निवड करू शकत नव्हती.
एखाद्या खास पार्टीचे आमंत्रण मिळाले किंवा सणासुदीचे दिवस असतील तर मन कसे प्रफुल्लित होऊन जाते, परंतु त्यासाठी ड्रेसची निवड करताना कोणताही ड्रेस पसंतीस उतरत नाही, तेव्हा मात्र मन खट्टटू होऊन जाते. अशावेळी आपल्याला स्वत:चाच राग येतो की काही खास निमित्तांसाठी आपण १-२ ड्रेस का घेऊन ठेवले नाहीत?
जर अशा समस्येतून तुम्हीही जात असाल, तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही, कारण ९० टक्के महिला किंवा तरुणींना अशा प्रॉब्लेममधून जावे लागते. आतापर्यंत जे झाले ते झाले, पण पुढे मात्र या काही गोष्टींची काळजी घेतलीत, तर अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.
वॉर्डरोब ब्लंडर्सपासून वाचा
बहुतेक महिला आपल्या वॉर्डरोबला व्यवस्थित ठेवत नाहीत. त्यांचा वॉर्डरोब अस्ताव्यस्त असतो. उलट तो नीटनेटका ठेवला पाहिजे.
निरीक्षण करा
वेळोवेळी आपल्या वॉर्डरोबचे निरीक्षण करा. निरीक्षण करताना जर एखादा ड्रेस तुम्हाला अनफिट, आउट डेटेड किंवा कमी स्टाइलिश वाटला, जो पुन्हा घालण्याची इच्छा नसेल तर असे ड्रेस लगेच वॉर्डरोबबाहेर काढा. कारण अशा ड्रेसेसमुळे खास प्रसंगी एखादा ड्रेस निवडताना आणखी समस्या निर्माण होते.
मोह करू नका
अनेक महिला अनफिट, आउटडेटेड, अनकंफर्टेबल किंवा कमी स्टायलिश ड्रेस यासाठी वॉर्डरोबमध्ये जमा करून ठेवतात, कारण त्यांच्यासोबत काही आठवणी जोडलेल्या असतात. उदा. हा खूप महागडा आहे, हा आजोबांनी दिला आहे, हा सिंगापूरवरून आणलाय, हा गोल्डन नाइटला घातला होता. या सगळया गोष्टी बाजूला ठेवून तो वॉर्डरोबबाहेर काढा.
अलबम बनवा
तुमच्याजवळ किती ड्रेस आहेत, कोणत्या स्टाइलचे आहेत, कोणत्या कलर किंवा प्रिंटचे आहेत, या गोष्टी आपल्या लक्षात नसतात. यासाठी तुम्ही एक अल्बम बनवा. मोबाइलमध्ये कॅमेरा असल्याने तुम्ही आपल्या प्रत्येक ड्रेसचा फोटो काढून मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. ते पाहून तुम्ही खास प्रसंगी ड्रेसची निवड करू शकता.