या वळणावर, अशा अवेळी

कथा * नीता दाणी

मोबाइलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर अन् नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. दहा मिनिटातच तिच्या लॅण्डलाइन फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता…क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं…पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं.

मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डबा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर अन् एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा करून घ्यायची. टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे. काही मेंदूपर्यंत पोहोचायचे अन् काही कळायचेही नाहीत. झोप येईपर्यंत टीव्ही सुरू असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळीभाजी गरम करून ती जेवायची अन् मग झोप!

पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. दचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, ‘‘कोण आहे?’’ काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कुणीच दिसलं नाही.

कंपाउंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली, तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुणा वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं. अन् ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिने घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती.

संध्याच्या नवऱ्याच्या मृत्युला बरीच वर्षं झालीत. दोन्ही मुलींची लग्नं झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच पण बरीच लांब राहाते. संध्याची नोकरी चांगली आहे. भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा अन् एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर, स्काइपवर बोलणं होतं. पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधी तरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो.

एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं. तिने पत्र घेतलं, कुलूप उघडून ती घरात आली. सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं.

‘‘संध्या, फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणं गरजेचं आहे.

आमच्या चार वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यांनेच वाढवलंय. मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही. पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं. माझा मुलगा वारंवार मला म्हणतो, आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वत:ची सहचरी म्हणून निवडावी. एकटं राहू नये. म्हणूनच या वयात मी असा विचार करू धजलो आहे. दोन वर्षांत मी रिटायर होतोय. भरपूर पेन्शन मिळेल. त्याखेरीज जंगम स्थावर प्रॉपर्टी आहे. देवदयेने आरोग्य उत्तम आहे. नियमित आहार, विहार, विश्राम, व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करताहेत.

सध्या फक्त तुमचाच विचार सतत मनात असतो. लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तिला आनंदी राहाण्याचा, प्रेम मिळवण्याचा अन् आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. उणेअधिक लिहिले असल्यास क्षमस्व!’’

पत्र वाचताना तिचं हृदय धडधडत होतं. हात कापत होते. पत्र वाचून तिने बाजूला सारलं. लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट अन् प्रामाणिक होत्या. त्यामुळे ती भारावली होती.

रात्री जेवण झाल्यावर तिने टीव्ही लावला तेवढ्यात मोबाइल वाजला. तिने म्हटलं, ‘‘क्षमा करा, तुम्हाला वाटतंय तसं घडू शकणार नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी अन् संतुष्ट आहे. मी एकटी नाही, माझं कुटुंब आहे.’’ तिने एवढं बोलून फोन स्विच ऑफ केला. टीव्ही बंद करून अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा झोप लागली.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं आवरून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकली. ती दचकली.

‘‘तुम्ही?’’

‘‘होय मीच! यावंच लागलं मला. तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात? आधी ‘हो,’ आता ‘नाही’ बोलत नाही. फोन उचलंत नाही, आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना?’’

संध्या त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. कशीबशी बोलली, ‘‘माझं चुकलंच, या वयात हे मला शोभणार नाही. मला घरी लवकर जायचंय.’’ पुढे तिला बोलवेना.

‘‘लोक काय म्हणतील या काळजीनेच तुम्ही स्वत:ला असं कोंडून घेताय…मला माहीत आहे.’’

‘‘प्लीज, मला एकटं सोडा. मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाहीए.’’ संध्या चिडचिडून म्हणाली.

घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली. चहाची नितांत गरज होती. पण उठून चहा करून घेण्याचीही शक्ती वाटत नव्हती. त्याक्षणी तिला रडू कोसळलं. ती शेखरशी खोटं बोलली होती. ‘मी एकाकी नाही, माझं कुटुंब आहे.’ खरं तर ती अगदी एकाकीच होती.

एकदा एका पार्टीला संध्या मोकळे केस सोडून, थोडा मेकअप करून गेली होती. तिच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी तिला म्हटलं होतं, ‘‘संध्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. वयाच्या मानाने दहा वर्षांनी तरुण दिसतेस. तब्येतही निरोगी आहे. तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर.’’

संध्या त्यावेळी घाबरली होती. स्वत:च्या प्रशंसेने संकोचली होती. पण दोन चार दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला अन् लग्नाचं प्रपोजल तिच्यापुढे मांडलं.

शेखरने स्वत:ची सर्व माहिती तिला व्यवस्थित दिली. तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो. पत्नीला जाऊन खूप वर्षं झालीत. एकच मुलगा आहे तो डॉक्टर आहे. त्याचं लग्न झालंय. तो दोन मुलांचा बाप आहे. मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे. त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वत:साठी एक जीवनसंगिनी शोधावी.

त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली. शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले. कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची. कधी फोन उचलायचीच नाही. कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे.

मौनातला होकार शेखरला कळत होता, पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता.

संध्याला सासरचे कुणीच नातलग नव्हते. माहेरी वडील अन् दोघे विवाहित भाऊ होते. तिने वहिनीशी शेखरसंदर्भात चर्चा केली. तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळली. कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता. वडील तर संतापून म्हणाले, ‘‘अगं, तुझं वय मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचं आहे. लग्न अन् संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू? रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर. या वयात नव्या बंधनात अडकण्याची अवदसा कशी आठवली तुला?’’

घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या अन् म्हणाली, ‘‘तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचरी निवडा…मी अशीच एकटी बरी आहे.’’

त्यानंतरही शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याचे फोन येणं बंद झालं होतं. दिवस उलटत होते. आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या रूक्ष, कोरड्या वागण्याने शेखर दुखावले गेले का? की शेखरचंच मन बदललं? तेच बरं म्हणायचं…आता या वयात कुठली नाती नकोतच.

पण दुसरं मत म्हणे, स्वत:हून तू फोन कर. फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले अन् एक दिवस शेवटी तिने एक मिस कॉल दिलाच. त्यावेळीही तिचं हृदय जोरात धडधडत होतं.

तिच्या मोबाइलवर ताबडतोब मेसेज आला, ‘‘मी फार काळजीत आहे, सध्या फोन करू शकत नाही.’’

तिने उलट मेसेज पाठवला, ‘‘काय झालं? कसली काळजी?’’ पण उत्तर आलं नाही.

दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्याप्रमाणे कामाला लागली. उगीचच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं. अचानक एकदा मोबाइलची घंटी वाजली. फोन शेखरचा होता. त्याने सांगितलं की त्याचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदतकार्यासाठी गेला असताना स्वत:च गंभीर आजारी झाला. उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलाय. आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. मधल्या काळात फार काळजी वाटत होती. धावपळ फार झाली. वेळ मिळत नव्हता. तुम्ही कशा आहात? स्वत:ची काळजी घ्या. बाय, फोन ठेवतो. हॉस्पिटलला जायचंय. त्यानंतर संध्याला फोन आला नाही. तिनेही केला नाही.

एकदा सायंकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली. डोळ्यांपुढे अंधारी आली अन् एक किंकाळी फोडून ती वाहनासहित जमिनीवर आदळली. पुढे काय झालं ते तिला कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा ती इस्पितळात होती.

तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला. दोघीतिघी लगेच आल्या. तिच्यावरचे उपचार जाणून घेतले. औषधं आणली अन् तिला घरी घेऊन आल्या. तिला खायला घातलं, गोळ्या दिल्या. रात्री व सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळच्या टेबलवर मांडून ठेवल्या अन् मग त्या परत गेल्या. ‘‘आठ दिवस रजा घे. आम्ही सर्व सांभाळू,’’ असं बजावून त्या गेल्या.

संध्याच्या सर्वांगाला भरपूर मुका मार लागला होता. वेदनाशामक गोळी व झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली. सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं. सर्वांग ठणकत होतं. सणसणून ताप भरला होता. अंथरुणातून उठवत नव्हतं. पण फोन वाजत होता. तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला.

‘‘हॅलो संध्या, कशा आहात तुम्ही?’’ त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली. तिला एकदम भरून आलं. ‘‘ताप आलाय, झोपून आहे, अपघात झाला.’’ दाटल्या कंठाने तिने म्हटलं अन् फोन तिच्या हातातून गळून पडला.

तिने कसाबसा चहा करून घेतला. दोन बिस्किटं अन् चहा संपवून तापाची अन् अंगदुखीवरची गोळी घेऊन ती पडून राहिली. गोळी अन् तापाची गुंगी यामुळे किती वेळ गेला ते तिला कळलं नाही पण दारावरच्या घंटीच्या आवाजाने तिला जाग आली.

दरवाजा उघडला अन् दारातल्या व्यक्तिला बघून ती एकदम दचकली, बावरली अन् लाजलीही. झोपेतून उठून आल्यामुळे साडी अन् केस अस्ताव्यस्त होते.

कशीबशी म्हणाली, ‘‘तुम्ही…?’’

‘‘आता तरी येऊ द्या,’’ शेखरने म्हटलं.

ती पटकन् दारातून बाजूला झाली. तिच्या हातापायावरच्या मुक्या माराच्या खुणांकडे बघत तो म्हणाला, ‘‘जबरदस्त अॅक्सिडेंट झालाय…अरे? तुम्हाला भरपूर तापही आहे?’’ तिच्या कपाळाला अन् मनगटाला हात लावून त्याने म्हटलं.

‘‘तुम्ही अशाच गाडीत बसा. डॉक्टरकडे जाऊन येऊ.’’ त्याच्या शब्दाला संध्याला नाही म्हणवेना.

शेखरचे डॉक्टर छान होते. त्यांनी संध्याला अधिक परिणामकारक औषधं दिली. कशी अन् केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं.

शेखरने  तिला घरी आणून सोडली. तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वत: सांजा तयार केला. तिला दुधाबरोबर खायला घातला. गोळ्या दिल्या. संध्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं.

‘‘आता शांतपणे पडून राहा, झोप लागेल तुम्हाला. झोपून उठल्यावर खाण्यासाठी काही तरी करून ठेवतो अन् लॅचचं दार ओढून घेऊन मी जातो. काहीही गरज भासली तर ताबडतोब फोन करा. संकोच करू नका.’’ एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला. बायकोविना इतकी वर्षं काढली होती. त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता.

शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं, तिची काळजी घेणं, त्याचा तो ओझारता स्पर्श पुन:पुन्हा आठवत होता. तिच्या एकाकी, नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता.

संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली. एक दिवस तिच्या मुलीचा स्वप्नाचा फोन आला. तिच्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उधाण आलं. नातवाच्या, लेकीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली.

त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं. ‘‘आई, हा शेखर कोण आहे?’’ स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम दचकली.

‘‘कलीग आहेत.’’ संध्याने तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

‘‘तुझ्या मोबाइलवर त्यांचे कॉल्स बघितले.’’

संध्याने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिचं बावरलेपण, हातांची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोखून बघत राहिली.

एकदा रात्री अकरा वाजता संध्याच्या मोबाइलची रिंग वाजली. तिने पटकन् मोबाइल उचलला अन् ‘‘सध्या नातू, मुलगी आलेली आहेत,’’ असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधीच शेखर बोलला,

‘‘फारच छान! मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वत: येऊन तिच्याशी बोलतो.’’

‘‘नको…नको.’’ संध्या घाबरली. तिने फोन स्विच ऑफ केला.

आईचा चेहरा अन् थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारलं, ‘‘एवढ्या रात्री कुणाचा फोन होता, ममा?’’

उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली.

‘‘काय झालं, ममा? तू अशी बावरलेली, अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?’’ संध्याने मानेनेच नकार दिला.

संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला. स्वप्नाला सांगावं का? तिची प्रतिक्रिया काय असेल? आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का? सगळं ऐकून घेतल्यावर ती अन् स्वप्ना सहज मोकळेपणाने आपसांत बोलू शकतील का? संध्याची फार तडफड होत होती. आपल्या भावना, आपली नवी मैत्री, त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कुणाशी तरी शेयर करायची इच्छा होती पण समाजाची भीती, मुलींचा तुटकपणा यामुळे ती फार तणावात होती.

स्वप्नाने पुन:पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं. पण तिचा कठोर चेहरा अन् एकूणच आविर्भाव बघून ती घाबरी झाली.

‘‘ममा, तुला कुणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करतंय. तुला कळत नाहीए, तू फार साधी, सरळ आहेस. तुझी नोकरी, घर, पैसा बघून तुला कुणी तरी जाळ्यात ओढायला बघतंय. आता त्याचा फोन आला तर मला दे. चांगली फायर करते त्याला.’’

‘‘अगं पण बाळा, आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत. माझ्या नोकरी, प्रॉपर्टीशी त्यांना काहीच देणंघेणं नाहीए…’’

‘‘पण ममा, आता या वयात तुला हे नवं खूळ काय सुचतंय? अगं, किती तरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहताहेत पण म्हातारपणी कुणी लग्न करत नाहीत. ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील? किती चेष्टा करतील ते…अन् शिवाय, आम्ही आहोत ना तुला? काही दु:ख, त्रास असेल तर आम्हाला सांग ना…कुणातरी बाहेरच्याला काही तरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची?’’ स्वप्ना संतापून बोलत होती. अधिकच रागाने बोलली, ‘‘अन् हे जर राहुलला, तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटतेय तर त्याला काय वाटेल?’’

संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यांत पाणीच आलं.

स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली, ‘‘आई, मी लवकरच पुन्हा येईन, रिटायरमेंटनंतर तू माझ्याकडेच राहायचंस…ठरलं…’’

संध्या फक्त उदास हसली.

‘‘मी कोमललाही सांगितलंय. तीही इथे येणार आहे.’’

‘‘बरं!’’

स्वप्ना गेली अन् घर एकदम रिकामंरिकामं, उदास झालं. स्वत:ला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली. शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती.

कोमल, तिचा नवरा नीरज अन् मुलगी रेखा घरी आले अन् संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाउन निघालं. अधूनमधून संध्या रजा टाकायची, मग सिनेमा, बाहेर भटकणं, शॉपिंग, हॉटेलिंग असा भरगच्च कार्यक्रम असायचा. संध्या आनंदात होती.

‘‘आई, हे शेखर कोण आहेत?’’ कोमलने खट्याळपणे हसत विचारलं.

संध्या एकदम स्तब्ध झाली, कोमेजली. आता कोमलही कठोरपणे बोलेल.

‘‘मला स्वप्नाताईने सांगितलं होतं.’’

संध्या कासावीस झाली. बोलणं सुधरेना.

‘‘ममा, अगं, ही तर फारच छान गोष्ट आहे. आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब असतो. पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही. अशावेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल. स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल. ते माझ्याकडे लागलं. तू शेखर अंकलना अन् त्यांच्या मुलाला घरी बोलावून घे. नीरजनाही त्यांना भेटायचं आहे.’’

संध्या लेकीकडे डोळे विस्फारून बघतंच राहिली. कोमलनेच शेखरला फोन करून सायंकाळी घरी येण्याचं आमंत्रण दिलं.

सुर्दैवाने शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता. त्या संध्याकाळी संध्या, नीरज, कोमल, शेखर व डॉ. अमोल अशी सर्व एकत्र जमली. मोकळेपणाने गप्पा झाल्या. चहा, फराळ आटोपला.

डॉ. अमोल म्हणाला, ‘‘माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलंय. आता त्यांनाही सुख मिळावं, प्रेमाचं, हक्काचं माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी इथे आलोय..’’

संध्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोमल अन् नीरजला शेखर अंकल अन् डॉ. अमोल एकदम पसंत पडले होते. त्यांच्याकडून या नात्याला होकार होताच.

डॉ. अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘मावशी, आता मनात कुठलाही किंतू बाळगू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आयुष्याच्या या वळणावर माझे बाबा तुझी वाट बघताहेत. त्यांना सोबत कर. मी अन् माझ्या दोघी बहिणी कोमल अन् स्वप्ना…सतत तुमच्या मदतीला असू.’’

‘‘खरंय आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हसा बरं? आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यातच सामावला आहे.’’ नीरजने म्हटलं. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली. शेखरही सुखावला. सगळेच आनंदात होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें