सुंदर नातं मैत्रीचं

कथा * सुधा काटे

वडिलांच्या आकस्मिक मृत्युची बातमी कळताच सीमाला ताबडतोब जावं लागलं. त्यांचं तेरावं आटोपून ती परत स्वत:च्या घरी परतल्यावर तिने लॅपटॉप उघडून फेसबुकवर लॉग इन केलं. फ्रेण्ड रिक्वेस्टवर क्लिक केलं अन् जे नाव समोर आलं, ते बघताच ती दचकली.

‘‘अगंबाई, हा तर शैलेश!’’ ती उद्गारली. इतकी वर्षं मध्ये गेल्यामुळे शैलेश तसा विस्मरणात गेला होता. पण ते नाव समोर आलं आणि तिला शैलेशबरोबर घालवलेले दिवस पुन्हा जसेच्या तसे आठवले.

दोघंही एकाच कौलेजचे विद्यार्थी होते. शैलेश अभ्यासात फार हुशार होता. शिवाय तो उत्तम गायक आणि वादक होता. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सीमा अन् तो नेहमीच गात असत. त्या दोघांमुळेच यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कॉलेजला नेहमीच बक्षीसं मिळायची. गाण्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने दोघं वरचेवर भेटायची.

एकदा सीमा आजारी पडली. आठ दिवस ती कॉलेजला जाऊ शकली नाही तेव्हा काळजी वाटून शैलेश तिचा पत्ता शोधत थेट घरीच येऊन धडकला.

अशक्तपणामुळे अजून पुढले आठ दिवस सीमा कॉलेजला जाऊ शकत नव्हती म्हणून त्याने स्वत:च्या नोट्स तिला दिल्या. अभ्यासही करवून घेतला. त्यामुळे सीमाला पेपर सोपे गेले अन् फर्स्टक्लास मिळाला. हा हुशार, कलाकार मुलगा अत्यंत कनवाळू अन् सज्जन आहे हे सीमाला जाणवलं.

हळूहळू त्यांची ओळख मैत्रीत बदलली. कॉलेजात ती दोघं आता सतत बरोबर असायची, त्यांच्याबद्दल कॉलेजात चर्चा चालायची. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ती आपल्यातच दंग असायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण प्रेमाला अजून अभिव्यक्ती नव्हती. फक्त ते त्यांना एकमेकांच्या डोळ्यांत दिसायचं. प्रेमाचा उच्चार झाला नव्हता.

तरीही प्रेमाची धुंदी होतीच. एकमेकांच्या आवडीनावडीचा विचार प्रामुख्याने केला जायचा. टळटळीत उन्हाच्या दुपारीही एकमेकांच्या संगतीत चांदणं पसरल्याचा भास व्हायचा. लोकांची पर्वा तर करण्याचा प्रश्नच नव्हता.

मनातल्या मनात भविष्यकाळाची स्वप्नं रंगवताना ती पूर्ण होतील की नाही हा विचारच त्या वेड्या वयात मनात येत नाही. प्रेमाची साद मनात, शरीरात भिनत असते. बाहेरच्या जगात शिशिर ऋतू असो की कुठलाही ऋतू असो, प्रेमिकांच्या मनात कायम वसंत फुललेला असतो. श्रावणसरीत चिंब भिजायला मन आसुसलेलं असतं. प्रेमाचे सप्तरंग सर्वत्र दिसत असतात.

शिक्षण पूर्ण झालं अन् शैलेश आपल्या घरी निघून गेला. तो दूर उत्तर प्रदेशात, बनारसला राहात असे. एकमेकांना पत्र पाठवायची असं दोघांचं ठरलं होतं. वर्षभर पत्रांची आवकजावक होतीही. पण त्यानंतर त्याची पत्रं येणं बंद झालं. सीमाने किती तरी पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर आलं नाही. त्या काळात मोबाइल किंवा इंटरनेट नव्हतंच. साधे लॅण्ड लाइन फोनही सर्रास नसायचे. हळूहळू सीमानेही पत्रं पाठवणं बंद केलं. आता  शैलेशला विसरणं भाग आहे हे सत्य स्वीकारावंच लागलं.

सीमा सुशिक्षित होती. चांगल्या घराण्यातली होती. तिची विचारसरणी स्वच्छ होती. नातं नेहमी दोन्ही बाजूंनी जोपासलं जातं हे तिला कळत होतं. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपण त्याच्या गळी पडायचं नाही हेही तिला कळत होतं. त्यामुळेच तिने शैलेशला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. हळूहळू तो विस्मरणात गेला. कधी तरी ते नाव ऐकलं तर एक चेहरा अंधुकपणे डोळ्यासमोर तरळून जायचा बस्स! याहून अधिक काहीच नाही.

काळ सतत पुढे सरकत असतो. सीमाचं लग्न झालं. दोन मुलंही झाली. सुनील शिकलेला, मनाचा सज्जन अन् भरपूर कमावणारा होता. पण धंद्यात इतका गुंतलेला की बायकोसाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. सीमाला पैशाला तोटा नव्हता. सुनीलचा जाचही नव्हता. पण ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. बरंच काही असूनही ‘काहीतरी’ मिसिंग आहे असं तिला वाटायचं.

१५ वर्षांनंतर फेसबुकवर शैलेशशी संपर्क झाला अन् सीमाच्या मनात प्रचंड घालमेल झाली. आता पुन्हा नव्याने संबंध कशाला सुरू करायचा या विचाराने तिने रिक्वेस्ट न करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी चार पाच दिवस गेले अन् त्याचा मेसेज आला. भेटण्याची खरोखर इच्छा असली तर नियतीही ती भेट घडवून आणण्यात हातभार लावते. यावेळी तिने मेसेजचं उत्तर दिलं. चार दोन मेसेज झाले तेव्हा तिला कळलं शैलेश पुण्यात स्थायिक झालाय. बायकोमुलांसह राहातोय. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.

मग संवाद सुरू झाला. पहिल्यांदा शैलेशचा आवाज ऐकून ती रोमांचित झाली. तिचा कंठ दाटून आला. त्याच्या ‘तू कशी आहेस?’ या प्रश्नाला तिला उत्तर देणं जमेना.

कशीबशी बोलली, ‘‘मी बरी आहे. तुला अजून आठवण आहे माझी?’’

‘‘म्हणजे काय? मी तुला विसरलोच नव्हतो तर आठवण आहे का या प्रश्नाला काय अर्थ आहे?’’ तिच्या हृदयाची धडधड वाढली. कानशिलं गरम झाली.

‘‘असं जर होतं, तर पत्रं पाठवणं का बंद केलंस?’’

‘‘अगं. तुझं एक पत्र आईच्या हातात पडलं. तिने त्यावरून आकाशपाताळ एक केलं. यापुढे तुला पत्र पाठवणार नाही असं माझ्याकडून वचन घेतलं. मला  स्वत:ची शपथ घातली. मी तिचा एकुलता एक मुलगा ना? मला ऐकावंच लागलं. काय करणार?’’

सीमाला तक्रारीला जागा नव्हती. कारण त्याने ‘तुझ्याशी लग्न करेन, आपण एकत्र राहू’ असं तिला कधीच म्हटलं नव्हतं. तिनेही आपलं प्रेम या शब्दात व्यक्त केलं नव्हतं. तरीही दोघांमध्ये एक अतूट नातं होतं.

चला, बोलण्यामुळे निदान परिस्थिती काय होती ते तर कळलं. बोलली नसती तर अढी मनात राहून गेली असती.

काळानुरूप सगळी सृष्टीच बदलत असते. शरीरात बदल होतात. बुद्धी परिपक्व होते पण मन मात्र तसंच राहातं. प्रत्येक माणसाच्या आत एक लहान मूल दडलेलं असतं. संधी मिळाली की ते कोणत्याही वयात आपलं अस्तित्त्व दाखवायला लागतं.

त्यांच्या गप्पा फोनवर चालायच्या. मर्यादा सांभाळून दोघंही बोलायची. मधल्या इतक्या वर्षांच्या गॅपनंतरही दोघांना जुने दिवस, जुने प्रसंग आठवत होते. गप्पा मारताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळत होता. काही गोष्टी सीमा विसरली होती त्याची आठवण शैलेशने करून दिली. काही गोष्टी शैलेशच्या लक्षात नव्हत्या, त्याची सीमाने त्याला आठवण करून दिली. जुने दिवस आठवताना खूप मजा वाटायची.

मध्येच सीमाला वाटायचं आता आपण विवाहित आहोत. दोन मुलं आहेत. जुन्या, कॉलेजमधल्या मित्राशी असे संबंध ठेवणं गैर तर नाही ना? अजून तिने याबद्दल नवऱ्यालाही सांगितलं नव्हतं. हे असं पुढे किती काळ सुरू राहील?

मनाच्या अशा दोलायमान अवस्थेतच पाचसहा महिने निघून गेले. हे नव्याने निर्माण झालेलं नातं असंच जपलं जावं, ते ओझं ठरू नये असं दोघांनाही वाटत होतं. सुरुवातीला रोमांचक, थ्रीलर वाटणारं संभाषण आता दिलासा देणारं, आधार देणारं ठरलं होतं. ऐकलेली एखादी बातमी एखादा चांगलासा विनोद शेयर केल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटायचं.

एकदा शैलेशने सांगितलं की ऑफिसच्या कामासाठी त्याला लवकरच दिल्लीला जावं लागणार आहे. त्यावेळी तो सीमाला नक्कीच भेटेल. तिच्या नवऱ्याला व मुलांना भेटायलाही त्याला आवडेल.

हे ऐकून सीमा एकदम आनंदली. पण लगेच तिला वाटलं, फोनवर भेटणं, बोलणं इथवर ठीक आहे. पण प्रत्यक्ष भेटणं? भेटावं की न भेटावं? ती थोडी भांबावली. दुसरं मन म्हणालं, भेटायला काय हरकत आहे? आता तुम्ही दोघंही विवाहित आहात. नवथर वय कधीच ओलांडलं आहे. जबाबदारीने वागणं सहज जमायला हवं. चांगले मित्र म्हणून भेटायला काय हरकत आहे?

‘‘सुनीलना काय वाटेल?’’ पहिल्या मनाने शंका काढली.

दुसरं मन म्हणालं, ‘‘काय वाटायचंय? विवाहित स्त्रीला मित्र असू नयेत असं त्यांनी कधीच म्हटलं नाहीए. त्यांना तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर तू स्वत:च्या मानसिक गरजेसाठी शैलेशचा आधार घेतला म्हणून ते रागावणार नाहीत. एकदा शैलेशला भेटून बघ. मग मुलांशी अन् सुनीलशीही त्याची ओळख करून दे.’’

ही गोष्ट सीमाला पटली. ती उत्सुकतेने शैलेशच्या येण्याची वाट बघू लागली.

त्या दिवशी सकाळीच सुनील बिझनेस मीटिंगसाठी कोलकात्याला गेला होता. मुलं शाळेत गेली होती अन् शैलेशचा फोन आला. शैलेशने तिला कनॉट प्लेसच्या एका कॉफी हाउसमध्ये भेटायला बोलावलं होतं. ती घरी एकटी असताना त्याने घरी यावं हे तिलाही जरा विचित्र वाटत होतं. त्यामुळे बाहेर सार्वजनिक ठिकाणी भेटणं एकंदरीतच सोयीचं होतं.

शैलेशला इतक्या वर्षांनंतर भेटताना आपल्याला भावना अनावर होतील का? तो कसा रिअॅक्ट होईल वगैरे मनातल्या शंकांचं प्रत्यक्ष भेटीत निरसन झालं. खूप प्रेमाने त्याने सीमाला रिसीव्ह केलं. एवढ्या वर्षांत तो फारसा बदलला नव्हता. केसांमध्ये थोडी रुपेरी झणक जाणवत होती. पूर्वीसारखाच मोकळेपणाने वागतबोलत होता. तीही मनमोकळी झाली.

कॉलेज सोडल्यापासूनची सर्व माहिती त्याने दिली. त्याची नोकरी, पत्नी, मुलंबाळं…संसारात अन् नोकरीत तो सर्वार्थाने सुखी होता पण तरीही सीमाची त्याच्या मनातली जागा कुणीच घेऊ शकणार नव्हतं.

हे ऐकून सीमाला मनातून खूप बरं वाटलं. स्वत:विषयीच्या गर्वाने मन भरून आलं.

शैलेशने विचारलं, ‘‘तुझं गाणं म्हणणं अजून चालू आहे?’’ दुखऱ्या जखमेला धक्का लागावा तशी मनातल्या मनात सीमा कळवळली. पण वरकरणी सहज बोलावं तसं बोलली, ‘‘छे: रे, मला वेळच मिळत नाहीए. सुनील त्यांच्या धंद्यात बिझी असतात अन् त्यांना गाण्याची फारशी आवडही नाहीए.’’

‘‘त्यांना वेळ नसेल, आवडही नसेल, पण तुला तुझी आवड पूर्ण करू नकोस असं कधी म्हणाले का ते? तुझ्याजवळ पैसा आहे. गाडी, ड्रायव्हर आहे, मुलं अगदी लहान नाहीत, तू तेवढा वेळ सहज काढू शकतेस…’’ शैलेश म्हणाला.

हे शब्द, हे प्रोत्साहन खरं तर सीमाला सुनीलकडून अपेक्षित होतं. त्याने तिच्या गाण्याबद्दल, आवाजाबद्दल कधीच प्रशंसोद्गार काढले नव्हते. पण तिने तरी कधी मोकळेपणाने आपल्या या गुणाविषयी, आवडीनिवडीविषयी त्यांना सांगितलं होतं?

तिने एक नि:श्वास सोडला. मनातच ठरवलं यापुढे आपण गायचं, क्लासला जाऊन अधिक चांगलं शिक्षण घ्यायचं. लोकांपुढे आपली कला मांडायची.

तिला विचारात हरवलेली बघून शैलेश म्हणाला, ‘‘आपला दोघांचा एक अल्बम काढूया. आपल्या मॅच्यूरिटीला साजेशी गाणी निवडू. मित्र म्हणून, सहकारी म्हणून आपण भेटत जाऊ. पुढल्यावेळी मी माझी पत्नी व मुलांनाही आणेल. तुझा नवरा व मुलंही असतील, कौटुंबिक पातळीवरची मैत्री या वयाला अधिक भावते. आपण फोनवर बोलतो तेव्हा या बाबतीत अधिक चर्चा करू.’’

सीमाला शैलेशच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं, आत्तापर्यंत तिच्या मनात रिक्त असलेली ‘चांगल्या मित्राची’ जागा शैलेशने घेतली होती. जगण्याला एक चांगला उद्देश, एक नवी दिशा मिळाली होती.

निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा सीमाने मोकळ्या मनाने शेकहॅण्ड केला. ‘गाणं सुरू करते’ म्हणून खात्री दिली. शैलेशच्या मनात तिची खास जागा आहे ही भावना सुखावणारी होतीच. त्यामुळे आता तो दूर असला तरी त्यांच्यात दुरावा नव्हता.

अल्लड वयातली प्रेमभावना आता नव्हती. त्यावेळी ते प्रेम अव्यक्त होतं. पण आज व्यक्त झालेली मित्रत्त्वाची भावना अधिक बोलकी आणि अर्थपूर्ण होती. हे नातं अभिमानाने मिरवण्याचं होतं. आपुलकीने जपायचं होतं. हे नातं मित्रत्त्वाचं होतं. मैत्रीचं होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें