आनंदी जीवनासाठी बना स्मार्ट वूमन

* रिता गुप्ता

रक्षिता ही एकत्र कुटुंबातील धाकटी सून. कुटुंबाचा रेडिमेड कपडयांचा मोठा व्यवसाय आहे, सुशिक्षित असल्यामुळे लग्नानंतर तिने व्यवसायातही मदत करायला सुरुवात केली. जिथे तिच्या दोन भावजया घरीच असायच्या तिथे ती रोज तयार होऊन दुकानात जायची आणि व्यवसायाला हातभार लावायची, पण तिचे आर्थिक स्वातंत्र्य तिच्या भावजयांइतकेच होते. ती एका कर्मचाऱ्यासारखे काम करायची आणि तरीही तिला मोबदला दिला जात नव्हता.

रक्षिताला या व्यवस्थेत कोणताही दोष दिसत नाही आणि ती केवळ घराबाहेर पडण्याच्या हक्काच्या आनंदातच समाधानी आहे. घरातल्या महिलांना उत्पन्न, बचत, बँक खाती जाणून घेण्याची गरज आहे, असा साधा विचारही तिचे सासरे, भावजया किंवा तिचा नवरा करू शकत नाहीत. काही महिला स्वत:च असे मानतात की, घरातल्या आर्थिक बाबींमध्ये लक्ष देणे हे त्यांचे काम नाही.

शर्मा यांना कोविड झाला आणि वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सर्व काही इतके अचानक घडले की त्यांची पत्नी जीवनात अचानक आलेल्या या धक्कादायक बदलामुळे गोंधळून गेली. आर्थिकदृष्टया शर्मा दाम्पत्य संपन्न होते. त्यांच्या निधनानंतरही भरपूर बँक बॅलन्स, पेन्शन आणि विमा अशी भक्कम आर्थिक तरतूद होती, पण खंत या गोष्टीची होती की त्यांच्या पत्नीला यातले काहीच माहीत नव्हते.

मुलांवर अवलंबित्व

मुलगा मोठा झाल्यानंतर आणि स्वत: निवृत्त झाल्यानंतर शर्मा यांनी पत्नी उर्मलाला आर्थिक स्थिती, बँक आणि ऑनलाइन व्यवहार समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण उर्मलाला वाटले की, पती सर्व काही पाहात असताना उगाचच आपण लक्ष का घालायचे?

आता शर्मा या जगात नसल्यामुळे त्या उर्मला अचानक पूर्णपणे त्यांच्या मुलावर अवलंबून आहेत. त्या एकटया राहण्याइतक्या सक्षम नाहीत. आता पै-पैसाठी मुलावर अवलंबून राहणे त्यांना त्रासदायक ठरत आहे, पण पर्याय नाही.

उर्मला यांच्या बरोबर विरुद्ध, कांचन बाजपेयी आहेत. उशिरा का होईना, पण त्या सर्व शिकल्या आणि स्वत:चा आत्मसन्मान जपत त्या एक स्वावलंबी जीवन जगत आहेत. कधी गरज भासलीच तर त्यावेळी त्या मुलांची किंवा इतर कोणाची तरी मदत घेतात. उर्मलाप्रमाणेच त्याही गृहिणी होत्या आणि त्यांना आर्थिक ज्ञान शून्य होते.

बाजपेयी यांच्या मृत्यूच्या १० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा पत्नीच्या अज्ञानामुळे रुग्णालयाचे बिल भरण्यापासून ते इतर गोष्टींकरता लागणाऱ्या पैशांसाठी त्यांना नातेवाईक आणि मित्रांवर अवलंबून राहावे लागले. नंतर बरे झाल्यावर त्यांनी ठरवले की, आपल्याला आपल्या पत्नीला सर्व काही शिकवायचेच आहे.

६० वर्षीय कांचन बाजपेयी यांना एटीएममधून पैसे कसे काढायचे एव्हढेच माहीत नाही तर विविध ऑनलाइन पोर्टलवरून व्यवहार कसे करायचे हेही माहीत आहे. कुठे, किती पैसे कोणत्या बँकेत आहेत, वारसदार कोण आहे, कोणत्या खात्यातून खर्चाचे पैसे काढायचे आहेत, इत्यादी सर्व माहीत आहे. या आर्थिक सजगतेमुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताही निर्माण झाली असून मुलांच्या घरात अडगळीचे सामान बनून पडून राहण्याऐवजी त्या स्वत:च्या घरात स्वत:च्या इच्छेनुसार राहातात.

आर्थिक गुलामगिरी

आर्थिक स्वावलंबन प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे असते. नोकरी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण तरीही आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर असलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. हा लेख मुळात त्या महिलांसाठी आहे ज्या श्रीमंत असूनही आर्थिक गुलामगिरीचे जीवन निवडतात.

बहुतेक महिला आर्थिकदृष्टया वडील, पती किंवा मुलावर अवलंबून असतात आणि तरीही त्यांची विचारसरणीच अशी काही असते की या प्रवलंबित्वाचे त्यांना जराही वाईट वाटत नसते. खरंतर हे गुलामगिरीचेच प्रतीक आहे, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.

गरजा आणि त्रास कधीच सांगून येत नाहीत. प्रत्येक परिस्थितीसाठी पती-पत्नीने सुरुवातीपासूनच योजना आखून महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या भविष्याची तयारी करावी, पतीने आपल्या कुटुंबाला केवळ घरगुती कामासाठीचा माणूस समजू नये. बरेच लोक त्यांची आर्थिक माहिती मित्र, नातेवाईकांना देतात, पण त्यापासून स्वत:च्या कुटुंबाला अनभिज्ञ ठेवतात. दरम्यानच्या काळात वाईट प्रसंग ओढावल्यास पैसे कुठून येणार, हे घरातील महिलांना समजत नाही.

पावला-पावलावर फसवणूक

रामकली घरात ब्लाऊज शिवायच्या. त्या ओळखीतल्या काही शिंपयांना ब्लाऊज शिवून ग्राहकांसाठी देत असत. त्यांची कमाई चांगली होती. त्या स्वत: कमावलेले पैसे टेम्पो चालक असलेले पती रणबीर यांच्या हातात देऊन निश्चिंत व्हायच्या. एके दिवशी रणबीर यांचा टेम्पो चालवताना अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रामकली यांना रुग्णालयाचे बिल कसे आणि कुठून भरायचे, हेच समजत नव्हते.

त्यांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली मात्र काही हजार रुपयांशिवाय काहीही सापडले नाही. रणबीर बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांनी पैसे कुठे ठेवले हे विचारता येत नव्हते. वेळेवर पैसे जमा न झाल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी उशीर झाला. शिलाई मशीन सोडून त्यांनी घरातील जवळपास सर्व वस्तू विकल्या आणि कसेबसे उपचार पूर्ण करून कायमचे अपंगत्व आलेल्या आपल्या पतीला घरी घेऊन आल्या.

नंतर असे समजले की, रणबीर यांनी त्यांची आणि रामकली यांची सर्व कमाई व्याजावर मित्राला दिली होती, ज्याने संपूर्ण रक्कम हडप केली होती. या फसवणुकीनंतर, जेव्हा रामकली यांनी पुन्हा ब्लाऊज शिवणे सुरू केले तेव्हा त्यांनी स्वत:हून आपल्या कमाईचा हिशोब ठेवण्यास सुरुवात केली.

दोष कोणाचा?

बिल गेट्स यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की, जर तुमचा जन्म गरीब कुटुंबात झाला असेल तर तो तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब राहून मेलात तर मात्र तो तुमचाच दोष आहे.

त्याच धर्तीवर एखादी महिला आर्थिकदृष्टया सक्षम असूनही स्वत:चा मूर्खपणा आणि अज्ञानामुळे इतर कोणावर अवलंबून राहून जगत असेल तर ती तिची चूक आहे. अशा अनेक महिला आपल्या आजूबाजूला दिसतील ज्या आर्थिकदृष्टया सक्षम असूनही आपल्या पतीच्या निधनानंतर असहाय्यपणे इतरांवर अवलंबून असतात. सर्व काही असूनही त्यांचे असे परावलंबित्व पाहून दु:ख होते. अनेकदा गृहिणी तर कधी नोकरदार महिलाही पतीच्या सल्ल्याला न जुमानता आर्थिक ज्ञानापासून गाफील राहणे पसंत करतात. हे चुकीचे आहे. अगदी सुरुवातीपासूनच पतीचा सहाय्यक बनून सर्व माहिती ठेवायला हवी. बदलत्या काळानुसार स्वत:ला अपडेट करत राहायला हवे.

सरला माथूर वयाच्या ७२ व्या वर्षीही खूप सक्रिय आहेत. पती माथूर काही वर्षांपूर्वी खूप आजारी पडले तेव्हा सरला यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्यांसह बँक, पोस्ट ऑफिस, पेन्शन, वैद्यकीय विमा अशा सर्व आर्थिक बाबींचा ताबाही स्वत:कडे घेतला. वेगळया राहणाऱ्या मुलांच्या घरी गेल्यावरही त्या त्यांच्यावर अवलंबून राहात नाहीत. घरात सुरुवातीपासूनच पती-पत्नीमध्ये सामंजस्य होते.

हे कटू सत्य आहे की, पती-पत्नीपैकी एकाचे आधी निधन होते. वय कमी असल्यामुळे बहुतेक पत्नी राहाते. अशावेळी एकतर पती निधनाचे दु:ख आणि दुसरे म्हणजे परावलंबित्व, असे दुहेरी संकट कोसळते. त्यामुळेच काळाची गरज ओळखा. एक हुशार महिला बना आणि स्वत:च्या अटींवर जीवन जगण्याची कला अवगत करा. आर्थिक स्वातंत्र्य ही सुखद, आनंदी, जीवनाची गुरुकिल्ली आहे.

स्मार्ट वाइफ यशस्वी करेल लाइफ

– शैलेंद्र सिंह

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.

भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.

एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.

भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’

यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’

भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.

एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला  दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.

बचतीमुळे सुधारते जीवन

महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.

दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.

जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.

स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख

सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.

पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.

स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें