सॅनिटायझर असल्ल आहे की बनावट

* नसीम अन्सारी कोचर

डॉक्टरांच्या मते चांगल्या सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोना विषाणूचा दुष्परिणाम आणि भीती खूपच कमी होण्यास मदत होते. कोरोना विषाणूने दहशत पसरवायला सुरुवात केल्यानंतर बाजारात सॅनिटायझरचा जणू पूर आला आहे. शेकडो कंपन्या सॅनिटायझर विकत आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजतच नाही की, कोणते सॅनिटायझर अस्सल आहे आणि कोणते बनावट.

कंपन्यांकडून फसवणूक

कोरोना महामारीच्या वाढत्या संक्रमणामुळे सॅनिटायझरची मागणीही वाढली. त्यामुळे सरकारने याला ड्रग लायसन्स म्हणजे अंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या परवान्याच्या कक्षेतून बाहेर काढले. याचा अर्थ कोणतीही कंपनी सॅनिटायझर तयार करून विकू शकते. याचाच फायदा घेऊन महामारीसारख्या संकटातही नफा मिळविण्यासाठी काहींनी लोकांचे आरोग्य आणि जीवाशी खेळ करत बनावट किंवा भेसळयुक्त सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी आणले. मेडिकल दुकानांपासून ते रस्त्याच्या कडेला आणि अगदी किराणा दुकानांतही असे हँड सॅनिटायझर मिळत आहेत, जे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. असे सॅनिटायझर विकण्यासाठी दुकानदारांना ५० टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते, तर नामांकित कंपन्यांच्या सॅनिटायझरसाठी ते १० ते २० टक्क्यांपर्यंतच मिळते.

दिल्लीतील रमेश नगर बाजारातील एक किराणा दुकानदार सांगतात की, ज्या एजंटने त्यांच्या दुकानात नवीन सॅनिटायझर विक्रीसाठी दिले आहे त्याने माल संपल्यानंतर पैसे देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे मला कसलीच चिंता नाही. शिवाय याची किंमत नामांकित कंपन्यांच्या सॅनिटायझरपेक्षा कमी आहे. त्यामुळे ते मोठया प्रमाणावर विकले जात आहे.

माल विकल्यानंतरच पैसे द्या, असे दुकानदारांना आमिष दाखवण्यात आल्याने ते उघडपणे बनावट माल दुकानासमोर ठेवून त्याची प्रसिद्धी करीत आहेत.

डॉक्टरांच्या मते अशा सॅनिटायझरमुळे मोठे नुकसान होऊ शकते. स्वस्तातील हँड सॅनिटायझरच्या बाटलीवर उत्पादकाचे नाव किंवा पत्ता यापैकी कशाचीच माहिती नसते. प्रत्यक्षात बाटलीवर उत्पादकाच्या नावासह पत्ता, बॅच नंबर आणि एक्सपायरी म्हणजे ते कधीपर्यंत वापरता येईल याची अंतिम तारीख लिहिणे बंधनकारक आहे. खराब सॅनिटायझरचा दीर्घ काळ केलेला वापर त्वचेला रुक्ष बनवतो. त्वचेची जळजळ, सालपटे निघणे असे रोगही होऊ शकतात. अशा सॅनिटायझरचा वापर करण्यापेक्षा साबण लावून २५ सेकंद हात स्वच्छ धुणे अधिक चांगले ठरते.

सावधानता गरजेची

सॅनिटायझर नेहमी मेडिकल दुकानातूनच विकत घेण्याचा प्रयत्न करा. स्वस्तात मिळते म्हणून छोटे दुकान किंवा रस्त्यावरून खरेदी करू नका. मेडिकल दुकानातून विकत घेतलेल्या सॅनिटायझरचे बिल अवश्य घ्या. सॅनिटायझरच्या बाटलीवर कंपनीचा परवाना, बॅच नंबर इत्यादींची नोंद आहे का, हे नीट पाहून घ्या. बिल असल्यास दुकानदारावर कायदेशीर कारवाई करता येते.

सॅनिटायझरमधील फरक ओळखण्याचे ३ प्रकार आहेत. त्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी कुठल्याही खर्चाशिवाय सॅनिटायझरची पडताळणी करू शकता.

टिश्यू पेपरने तपासणी

तुम्ही टॉयलेटमध्ये वापरला जाणारा टिश्यू पेपर, लिहिलेले घासले तरी जाणार नाही असे बॉलपेन आणि वर्तुळ काढण्यासाठी एक नाणे किंवा बाटलीचे झाकण घ्या. टिश्यू पेपर गुळगुळीत जमिनीवर ठेवा. तुम्ही जेथे टिश्यू पेपर ठेवला आहे ती जमीन खडबडीत नाही ना, हे पाहून घ्या. आता टिश्यू पेपरवर बाटलीचे झाकण किंवा नाणे ठेवा आणि बॉलपेनच्या मदतीने वर्तुळाकार आकार काढा. बॉलपेनने काढलेले वर्तुळ स्पष्ट दिसेल याकडे लक्ष द्या. त्यानंतर या वर्तुळाच्या आत सॅनिटायझरचे काही थेंब टाका. ते थेंब वर्तुळाबाहेर पसरणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर थोडा वेळ तो टिश्यू पेपर तसाच ठेवा. थोडया वेळाने जर बॉलपेनने काढलेल्या वर्तुळाची शाई सॅनिटायझरशी एकरूप झाली किंवा त्याचा रंग इकडे तिकडे पसरला तर समजून जा की, सॅनिटायझर अस्सल आहे.

पिठाद्वारे करा सॅनिटायरची तपासणी

१ चमचा गव्हाचे पीठ एका ताटलीत काढून घ्या. तुम्ही मक्याचे किंवा अन्य कुठलेही पीठ घेऊ शकता. या पिठात थोडे सॅनिटायझर मिसळा. त्यानंतर ते मळून घ्या. सॅनिटायझरमध्ये पाणी जास्त असल्यास म्हणजे ते बनावट असल्यास सर्वसाधारणपणे पीठ मळताना त्यात पाणी जाताच ते जसे चिकट होते तसेच सॅनिटायझर टाकलेले हे पीठही गमासारखे चिकट होईल. याउलट सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्यास पीठ चिकट होणार नाही. ते पावडरसारखेच राहील आणि थोडयाच वेळात त्याच्यावर टाकलेले सॅनिटायझर उडून जाईल.

हेअर ड्रायरने तपासा सॅनिटायरची गुणवत्ता

हा प्रकारही खूपच सोपा आहे. यासाठी एका भांडयात एक चमचा सॅनिटायझर टाका. दुसऱ्या एका भांडयात थोडे पाणी घ्या. त्यानंतर ड्रायरने भांडयातील सॅनिटायझर ३० मिनिटांपर्यंत सुकवा. लक्षात ठेवा, ड्रायर आधी गरम करून त्यानंतरच त्याचा वापर करा. हाच प्रयोग दुसऱ्या भांडयातील पाण्यासोबतही करा. सॅनिटायझरमध्ये पुरेशा प्रमाणात अल्कोहोल असेल तर सॅनिटायझर लवकर उडून जाईल. पाण्यासोबत मात्र असे होणार नाही. अल्कोहोल ७८ डिग्री सेल्सिअसमध्येच उकळू लागते. म्हणूनच ते आधी उडून जाईल. पाणी मात्र १०० डिग्री सेल्सिअसला उकळू लागते. त्यामुळे ते खूप नंतर सुकून जाईल. जर सॅनिटायझरमध्ये पाणी जास्त असेल तर ते उडून जायला वेळ लागेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें