सदैव खावे : ताजे अन् नवे

कथा * डॉ. नीरजा श्रावस्ती

दाराची घंटी वाजली म्हणून भानूने दार उघडलं. दारात त्याची मामेबहीण पम्मी म्हणजे प्रमिला एका हातात स्ट्रोलर सूटकेस अन् दुसऱ्या हातात भली मोठी पर्स घेऊन हसतमुखाने उभी होती.

‘‘अगं, अचानक कशी आलीस?’’

‘‘आत तर येऊ दे, मग सांगते,’’ म्हणत पम्मी सरळ ड्रॉइंगरूममध्ये आली अन् बॅग एकीकडे ठेवून सोफ्यावर बसली.

मोठ्याने, जरा रागीट सुरात भानूने बायकोला हाक मारली, ‘‘घंटी वाजलेली ऐकली नाहीस का? कोण आलंय बघ.’’

भानूचा आवाजाचा टोन अन् बोलायची पद्धत प्रमिलाला खटकली. बायकोला असं बोलायचं?

‘‘मामामामी कसे आहेत?’’

‘‘मजेत! तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवलेत आईने.’’ पम्मीने बॅगेतून लाडूचा डबा काढून भानूला दिला अन ती चप्पल काढून स्वयंपाकघरात गेली.

नमिताने कणिक तिंबून ठेवली होती अन् ती धुतलेले हात नॅपकीनला पुसत होती. पम्मीने सरळ तिला मिठीच मारली.

‘‘अरेच्चा? पम्मी? एकटीच आलीस?’’

‘‘हो, परवा माझा इथे एका कंपनीत इंटरव्ह्यू आहे. शिवाय पुढल्या आठवड्यात अजून दोन इंटरव्ह्यू आहेत.’’

‘‘मामामामी बरे आहेत?’’

‘‘एकदम मजेत! वहिनी, अगं तू आठ दिवस त्यांच्याकडे राहून काय आलीस, आईबाबा तुझ्या प्रेमातच पडले आहेत. प्रत्येक बाबतीत तुझंच उदाहरण देतात.

‘सून असावी तर नमितासारखी’ असं प्रत्येकाला सांगतात. काय जादू केली आहेस गं त्यांच्यावर?’’ हसून प्रमिला म्हणाली. तिच्या प्रसन्न हसण्याकडे नमिता बघतच राहिली.

‘‘आता चहा वगैरे ठेवशील की स्वत:चं कौतुकच ऐकत बसशील?’’ आत आलेला भानू खेकसला तशी नमिता पटकन् चहाकडे वळली.

‘‘पम्मी, तू फ्रेश हो, तोवर चहा नाश्ता होतोय.’’ भानूने म्हटलं. तशी खालच्या आवाजात त्याला दमात घेत पम्मीने म्हटलं, ‘‘दादा, हाऊ रूड यू आर. ही काय पद्धत झाली बायकोशी बोलायची? लग्नाला अजून दोन महिनेच होताहेत.’’

‘‘पायातली वहाण पायातच हवी,’’ म्हणत भानू निर्लज्ज हसला.

प्रमिला स्नान करून येतेय तोवर नमिताने चहाचा थर्मास अन् स्टफ टोस्ट आणि खेकडा भजी तयार ठेवली होती.

‘‘वहिनी, अगं, किती फास्ट कामं करतेस तू? माझी अंघोळ होईतो इतकं सगळं तयारही केलंस?’’ कौतुकाने पम्मीने म्हटलं. स्वत:च्या बशीत तिने दोन टोस्ट अन् दोन तीन भजी घेतली अन् टोमॅटो सॉसबरोबर चव घेत मनापासून खाऊ लागली. ‘‘व्वा! मस्तच आहे हं! दादा, तू घे ना…’’

‘‘मला नको…काल दूध नासलं होतं त्याचंच काही तरी केलं असेल.’’

‘‘दादा, अरे, पनीर दूध नासवूनच तयार करतात. तुला ठाऊक नाही का?’’ पम्मीने म्हटलं.

‘‘घ्या ना हो, थोडं चाखून तर बघा,’’ नमिताने विनवणी केली.

‘‘छे:छे: शिळ्या वस्तूंपासून केलेले प्रकार मला आवडतच नाहीत,’’ तिरसटून भानूने म्हटलं.

‘‘तू ही ना दादा, अगदी आजोबांसारखाच आहेस. तुझे बाबाही असेच आठमुठे. जग बदललं पण हे बदलायला तयार नाहीत.’’

बोलता बोलता पम्मीने स्टफ टोस्टला सॉस लावून एक घास दादाच्या तोंडात कोंबलाच, नमिता थोडी घाबरूनच नवऱ्याची प्रतिक्रिया बघत होती. पण त्याला बहुधा चव आवडली अन् त्याने आपल्या हाताने आपल्या बशीत दोन टोस्ट अन् चार भजी वाढून घेतली.

दुसऱ्यादिवशी सकाळी आपलं सर्व आवरून प्रमिला भानूबरोबर इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडली. तिला तिथे सोडतानाच भानूने बजावलं होतं की इंटरव्ह्यू आटोपल्यावर फोन कर. मी घ्यायला येतो. कंपनी मोठी होती. उमेदवारही बरेच होते. प्रमिलाचा नंबर येईतो चार वाजले होते. प्रमिला इंटरव्ह्यू आटोपल्यावर सरळ रिक्षाने घरी पोहोचली अन् तिने भानूला फोन करून घरी पोहोचले हे सांगितलं. त्याच्याकडून भरपूर रागावूनही घेतलं.

‘‘कसा झाला इंटरव्ह्यू?’’ नमिताने विचारलं.

‘‘फारच छान झाला. पण वहिनी अजून तू सकाळच्या साडीतच आहेस? अगं, जरा आवरून जवळच्या पार्कांपर्यंत जाऊन येत जा. येताना भाजी, फळं, दूध वगैरे आणून टाकावं. बाहेर पडलं की लोकांशी ओळखी होतात. आता इथे तुझे सासूसासरे नाहीएत. दोघंच आहात. जरा मोकळेपणाने राहा ना?’’ नमिता म्हणाली.

‘‘नाही पम्मी, तुझ्या दादांना वाटतं मी गावंढळ आहे. ते मला सोसायटीतल्या बायकांत मिसळू देत नाहीत,’’ नमिताच्या डोळ्यांत बोलता बोलता पाणी तरळलं.

‘‘ते माझ्यावर सोपव…चल पटकन् कपडे बदल…थोडं भटकून येऊ.’’

‘‘अगं पण तुझे दादा?’’

‘‘तो कुठे सात वाजेतो येतोय.’’

‘‘पण त्यांना आवडणार नाही.’’

‘‘ते मी बघते. चल आवर पटकन्,’’ प्रमिलाच्या आग्रहाने पटापट आवरून नमिता व प्रमिला घराबाहेर पडल्या.

थोडं फिरून, थोडी भाजी घेऊन त्या घरी परतल्या तरी भानू आलेला नव्हता.

नमिताने सायंकाळी खाण्यासाठी कटलेट केले होते. भानू आल्यावर तिने खारी शंकरपाळी, चहा व कटलेट आणून टेबलवर मांडले…भानूने येताना समोसे व जिलेबी आणली होती.

‘‘कसा झाला तुझा इंटरव्ह्यू?’’ त्याने विचारलं.

‘‘फारच छान! सिलेक्शन होईल माझं. अजून दोन ठिकाणी इंटरव्ह्यू आहेत. त्या कंपन्याही चांगल्या आहेत. १५ दिवसांत सगळेच निकाल कळतील. पुढल्या महिन्यात जॉइन करावं लागेल. तोपर्यंत दादा, मी इथेच तुझ्या डोक्यावर बसणार आहे. वहिनीशी माझं छान जमतं. मी तुझ्याशीही जमवून घेईन,’’ मिश्किल हसंत प्रमिला म्हणाली.

भानूचं लक्ष नमिताकडे गेलं, ‘‘हे काय? तो खेकसला.’’

‘‘इतकी सुंदर साडी नेसून तू स्वयंपाकघरात वावरत होतीस? लॉण्ड्रीचा खर्च का वाढवते आहेस? साडी खराब होईल ना? महाग वस्तूंची काळजी घ्यावी लागते.’’

फिरून आल्यामुळे टवटवीत दिसणाऱ्या नमिताचा चेहरा खर्रकन उतरला. बायकोला कारण नसताना सतत रागावणाऱ्या या दादाचा प्रमिलाही राग आला.

नमिता पटकन् साडी बदलायला उठली, तिला हात धरून सोफ्यावर बसवत प्रमिला म्हणाली, ‘‘दादा, अरे सांडायला ती काय लहान बाळ आहे का? मुळातच तिचं काम अत्यंत व्यवस्थित आहे. छान साडी नेसून किती मस्त दिसतेए ती. एक सेल्फी काढूयात.’’ तिने भानूलाही नमिताच्या शेजारी बसवलं अन् नमिताच्या डोक्याला आपलं डोकं टेकवून छानसा सेल्फी घेतला.

‘‘बघ किती छान आलाय,’’ सेल्फी दाखवत तिने म्हटलं.

‘‘छान आहे…पण मला भूक लागलीए. मी समोसे खाणार?’’ म्हणत भानूने समोसा खायला सुरुवात केली. ‘‘तू खा.’’ त्याने पम्मीला खूण केली.

‘‘नंतर…आधी कुरकुरीत चविष्ट कटलेट खाणार. वहिनी फारच छान आहेत हं कटलेट. खरंच, आज आत्याबाई असायला हवी होती. तिलाही छान छान पदार्थ करायची, खायला घालायची अन् स्वत:ही खायची खूप हौस होती.’’

बायकोचं कौतुक सहन न होऊन भानूने विचारलं, ‘‘काय आहे हे?’’

‘‘मसूर डाळ, हरभरा डाळीचे कटलेट आहेत,’’ नमिता हळूच म्हणाली.

‘‘काहीही उद्योग करतेस. अगं डाळीला डाळीसारखंच वापर…मध्येच संपली तर मी पुन्हा आणून देणार नाही. बजेटचा विचार करत जा.’’

‘‘कालची डाळ थोडी उरली होती, त्यातच भाज्या, बटाटे वगैरे घालून नवा प्रकार केलाय.’’

‘‘दादा, न संतापता खाऊन बघ, समोशाची चव विसरशील.’’ प्रमिलाने दोनतीन कटलेट त्याच्या बशीत घातले.

त्याने ते खाल्ले हे बघून नमिता खूप सुखावली. त्याला कटलेट आवडले हे त्याच्या चर्येवरूनच कळत होतं.

‘‘वहिनीच्या हातात जादू आहे हे पटलं ना?’’ पम्मीने त्याला चिडवलं. तो हसला पण तोंडाने कबूल केलं नाही.

प्रमिलाचे दोन इंटरव्ह्यू आणखी झाले. निकाल समजायला आठदहा दिवस होते. हा काळ पम्मी अन् नमिताने खूप एन्जॉय केला. नमिताला पतीने बळजबरीने सलवार सूट घेऊन दिले. त्यावर मॅचिंग बांगड्या, अंगठ्या, ब्रोच, क्लचर्स अशाही बऱ्याच वस्तू प्रमिलाने नमिताला घेऊन दिल्या. एक सुंदरसा अॅप्रनही घेऊन दिला ज्यामुळे नमिताला स्वयंपाकघरात वावरताना सोयीचं व्हावं.

‘‘आता ही घरात सलवार सूट घालून वावरणार? अगं, थोरले काका काकू आले तर? तुला माहीत नाही, ते कसले कडक आहेत ते.’’

‘‘अरे, पण त्यांच्यासाठी वहिनीने सतत साडीत का वावरायचं? अन् इतका चांगला पोषाख आहे. अंगभर कपडे आहेत. पदरासारखी ओढणी आहे. हातपाय मोकळे राहातात. यात वाईट काय आहे? तू साडी नेसून दिवसभर राहा स्वयंपाकघरात, मग समजेल,’’ प्रमिलाने दादाला ऐकवलं.

‘‘जाण्यापूर्वी माझ्या बायकोला पूर्णपणे बिघडवून ठेवणार आहेस तू,’’ तिच्या पाठीत कृतक रागाने एक धपका घालत दादा म्हणाला.

‘‘तरी आभार मान माझे, नाही तर सरळ ‘जिन्स-टॉप’ किंवा ‘ट्राउझर-शर्ट’ घालायला लावले असते तिला. पण काही म्हण वहिनी, तुझी फिगर इतकी छान आहे की ट्राउझर किंवा जीन्समध्येही खूपच छान दिसशील तू.’’ नमिताकडे बघत प्रमिला म्हणाली.

प्रमिलाच्या येण्याने नमिताला खूपच आधार मिळाला होता. खरं तर ती नवी नवरी होती पण भानू कायम तिला टोचून बोलायचा. कौतुक कधीच करत नव्हता. नव्या घरात, नव्या वातावरणात तिरसट नवऱ्याबरोबर जमवून घेताना तिची दमछाक होत होती.

हे सगळं प्रमिलाच्याही लक्षात आलं होतं. तिला नमिताचे गुण लक्षात आले होते. तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारी नमिता किती दबून राहाते. किती बावरलेली असते, हे बघून तिला वाईट वाटायचं.

भानूदादा नमिताला अजिबात वेळ देत नाही. सतत अपमान करतो, टोचून बोलतो हे सगळं बदलायला हवं. लग्न म्हणजे गुलामी नाही तर परस्पर प्रेम, सामंजस्य अन् सहकार्य, एकमेकांविषयीचं कौतुक अन् आदरही हे सगळं दादाला कळायलाच हवं.

‘‘वहिनी, तुझी ‘खानाखजाना’ सीरियल सुरू झालीय,’’ नमिताला हा कार्यक्रम आवडतो हे पम्मीला कळलं होतं. नमिता कार्यक्रम बघता बघता काही नोट्स घेत होती ते बघून तिने म्हटलं, ‘‘वहिनी, मी तुला कॉम्प्युटर शिकवते, गूगलवर तुला ढिगाने शेफ अन् त्यांच्या रेसिपीज भेटतील. तू ट्राय कर.’’

‘‘नको ग…बाई! कुठे काही चुकलं तर भानू ओरडतील,’’ घाबरून नमिताने म्हटलं.

‘‘काही होत नाही गं! ये…मी आहे ना तुझ्याबरोबर…’’ अन् मग सुरू झालं लेसन नं.१,…२…,३.

चार-पाच दिवसांनंतर नमिताने स्वत:च कबूल केलं, ‘‘उगाचच घाबरत होते मी.’’

‘‘हळूहळू अजूनही खूप काही शिकशील तू?’’ पम्मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या मोबाइलवर एसएमएस आला. वाचताच ती आनंदाने ओरडली,

‘‘वहिनी, मला नोकरी मिळाली. आठ दिवसांत मला रिपोर्ट करायला हवंय.’’ तिने नमिताला गरगर फिरवून सोफ्यावर बसवलं.

‘‘खरंच ग! किती आनंदाची बातमी आहे. खरंच, तुझ्या मेहनतीला फळ आलं,’’ नमिताने पम्मीच्या गालावर थोपटून शाबासकी दिली.

भानू घरी नसताना पम्मीने सोसायटीतल्या बायकांना दोन तीन ग्रुप्समध्ये दुपारी घरी चहाला बोलावून घेतलं. नमिताला छानछान पदार्थ करायला लावले.

नमिताच्या पाककलेने सगळ्याच खूष होत्या. चकितही होत्या. ही मुलगी इतकी हुशार अन् गुणी आहे हे त्यांना आता समजलं होतं. रोज सायंकाळी नमिता बाहेर जायची. त्यांच्या आपसात भेटीही व्हायच्या. नमिताने स्वयंपाकाच्या पाककृतींवर आधारीत टीव्ही कार्यक्रमांतून घरबसल्या बक्षींसही मिळवली होती. हल्ली तिचा आत्मविश्वास वाढला होता. नमिताला काळजी पडली होती की पम्मी गेल्यावर तिचं कसं होणार?

प्रमिलाच्या तल्लख मेंदूतून एक अफलातून आयडिया निघाली. तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ चांगला लेखक आहे. त्याची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. अनेक चांगले प्रकाशकही ओळखीचे आहेत. जर त्यांची मदत घेतली तर? नमिताच्या रेसिपीजचं छानसं पुस्तक तयार होऊ शकतं.

तिने नमिताला सांगितलं, ‘‘मी जयंतला घरी जेवायला बोलावते. त्याच्याशी चर्चा करूयात. रविवारी रात्री.’’

‘‘पण पम्मी, भानू त्या दिवशी लखनौला जाताहेत, ते इथे नसणार.’’

‘‘मग तर छानच झालं. आपण दादाला सरप्राइज देऊयात. पुस्तक तयार झाल्यावरच त्याला दाखवू.’’

पम्मीने जयंतला फोन करून घरी जेवायला बोलावलं. नमिताची त्याच्याशी ओळख करून दिली. त्याच्याकडून कशा तऱ्हेच्या मदतीची अपेक्षा आहे हेही सांगितलं.

नमिताच्या हातचा स्वयंपाक खरोखरच खूप चविष्ट असतो, हे जयंतलाही लक्षात आलं, ‘‘वहिनी, तुम्ही तुमच्या रेसिपीज तुमच्या पद्धतीने लिहून मला द्या. त्यांना पुस्तकाच्या भाषेत मी व्यवस्थित बांधतो. आपण छान पुस्तक तयार करू,’’ जयंत म्हणाला.

 

‘‘जयंत, मी तर नावही शोधून ठेवलंय या पुस्तकासाठी. ‘सदैव खावे : ताजे अन् नवे,’ अरे, उरलेल्या अन्नापासून ताजा अन् नवा पदार्थ बनवण्याच्या १०० तरी पाककृती आहेत वहिनीजवळ. अन् अजून अशा तऱ्हेचं पुस्तक बाजारात आलेलं नाहीए,’’ पम्मी म्हणाली.

‘‘खरंच, कन्सेप्ट चांगला आहे. आयडिया नवी आहे. वहिनी, तुम्ही ८०-८५ रेसिपीज लिहून काढा. आपण त्यांचे छानसे फोटोही काढू. पुढलं काम माझं,’’ जयंत म्हणाला.

‘‘पदार्थ छान झाला आहे की नाही हे खाऊन ठरवण्याचं काम माझं,’’ पम्मी म्हणाली.

‘‘वहिनी, आता तुझं पुस्तक नक्की होतंय,’’ पम्मी व नमिताचा निरोप घेऊन जयंत निघून गेला.

भानूचे थोरले काका बरेच आजारी होते. म्हणून त्याला अधूनमधून लखनौला जावं लागत होतं. त्याच काळात जयंत त्याच्या ओळखीचा फोटोग्राफर नमिताकडे पाठवत होता. तिच्या रेसिपीजचे सुंदर फोटो तयार होत होते. गुपचुप पुस्तक तयार करताना खरं तर नमिताची भरपूर त्रेधा उडाली होती पण तिला मजा वाटत होती. हुरूप होता अन् आत्मविश्वास वाढला होता.

मधल्या काळात पम्मीचं ट्रेनिंग सुरू झालं होतं ,तिने कंपनीत जॉइन केलं होतं. अजून ती दादाच्या घरातच राहात होती. त्यातच लखनौवाले थोरले काकाकाकू पंधरा दिवस भानूच्या घरात राहून गेले होते. नमिताने अगदी आदर्श सुनेप्रमाणे त्यांची सेवाचाकरी केली होती. साडी, जोडवी, बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, भांगातले कुंकू अशी गौरीसारखी नटून ती सकाळपासून कामाला लागत होती. तिच्या हातचे विविध पदार्थ खाऊन काकाकाकू तृप्त अन् खूष झाले होते. काकू अन् काका एरवी फार खडूस म्हणून प्रसिद्ध होते पण नमिताचं मात्र ते मनापासून कौतुक करायचे. फारच गुणी अन् संस्कारवान सून आहे म्हणायचे. त्यामुळे भानूही सुखावला होता.

काकूंचा जाण्याचा दिवस जवळ आला असतानाच पम्मीला ट्रेनिंग संपवून जॉब सुरू करण्याचा आदेश मिळाला. तिला राहाण्यासाठी कंपनीकडून घरही मिळालं होतं. तेवढ्यात जयंतचा फोन आला. तो पुस्तकांचा गठ्ठा घेऊन त्यांच्याकडेच येत होता.

जयंत घरी आला तेव्हा भानू घरीच होता. पम्मीने त्याची ओळख करून दिली. त्याच्या हातातला पुस्तकांचा भारा बघून भानूने हे काय आहे असं विचारलं.

‘‘बघा बरं तुम्हीच,’’ म्हणत नमिताने एक पुस्तक त्याच्या हातात दिलं. सुंदर रंगीत, आकर्षक मुखपृष्ठ, ‘सदैव खावे : ताजे अन् नवे’ लेखिकेचे नाव : नमिता भानूदास गोरे..चकित झाला भानू…आश्चर्याने नमिता, जयंत आणि पम्मीकडे बघत होता. जयंतने एक पाकिट नमिताला दिलं. ‘‘उघडून बघा,’’ म्हणाला. उघडल्यावर त्यातून नमिताच्या नावाचा प्रकाशकाने दिलेला २० हजार रुपयांचा चेक निघाला.

‘‘दादा, कसं आहे पुस्तक? ‘सदैव खावे ताजं अन् नवे…’ वहिनीच्या हातच्या पदार्थांचं कौतुक तर काकाकाकूंनी केलंच आहे. विशेष म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना तुझ्या बॉसच्या बायकोने लिहिली आहे. ती फॅन आहे वहिनीची.’’ पम्मीच्या या वाक्याने तर भानूची विकेटच गेली. नमिताने वाकून नमस्कार करत पुस्तकाची एक प्रत काकाकाकूंना दिली. सगळेच खूप आनंदात होते. जयंतला त्यांनी जेवायला थांबवून घेतलं. नमिताने छानसा स्वयंपाक केला होता. जेवणं आनंदाने पार पडली.

‘‘खरं श्रेय पम्मीला आहे. तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. जयंतनेही खूप मदत केली. अन् भानू तुमचंही सहकार्य मोलाचं होतं. तुमच्या क्रिटिसिझममुळेच माझे पदार्थ परफेक्ट होतात,’’ नमिताच्या या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें