सांझ की दुलहन- अंतिम भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(अंतिम भाग)

आत्तापर्यंत आपण वाचलंत : राजन आपल्या राधिका वहिनीशी खूप मोकळेपणानं बोलायचा. त्यानं एक दिवस त्याच्या भावी वधूबद्दल आपल्या कल्पना वहिनीला सांगितल्या. राधिका काळजीत पडली की ही अशी स्वप्नं सुंदरी प्रत्यक्षात कशी अन् कुठं भेटणार? अनेक मुली बघितल्या गेल्या.

शेवटी दूरच्या कुणा नातलगानं सुचवलेली मुलगी राजनला पसंत पडली. खरोखर स्वप्न सुंदरीच होती ती. या परीकडून घरकाम करणं कसं करवून घ्यायचं हे राधिकेला समजेना. सुंदरी घरात आली अन् घरातलं वातावरण बिघडायला लागलं. राजनला हे सगळं माहीत नव्हतं किंवा तिच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. सुंदरी जरा अधिकच आधुनिक विचारांची होती.

तिचा मित्र, खरं तर प्रियकर कायम घरात ठाण मांडून बसलेला असे. शेवटी राजनला हे असह्य झालं अन् त्यांनी घटस्फोट घेतला.

राजनचं आयुष्यच भकास झालं. त्याच्या मनातून सुंदरी अजूनही जात नव्हती. दुसरं लग्नं करायला घरातून दबाव येत होता. पण राजनला लग्न करायची इच्छा नव्हती. पण शेवटी त्यानं लग्न केलंच. कमी शिकलेली, दिसायला सामान्य, गरीब घरातली मुलगी राजनची पत्नी म्हणून घरात आली. तिनं घरातली कामं राधिकेच्या बरोबरीनं हातात घेतली. सासऱ्यांची सेवा करून त्यांना जिंकून घेतलं. राजनचंही मन तिनं जिंकून घेतलं. एकूण घरात आता आनंदाचं वातावरण होतं…

– आता पुढे वाचा

दुसऱ्या लग्नानंतर आता राजन खरंच सावरला होता. आनंदात होता. इतके दिवस त्याच्या मनांत सुंदरी ठाण मांडून बसली होती. ज्यामुळे तो अनुशी आलिप्तपणेच वागत होता. पण आता त्याला तिच्याबद्दल खरोखरच प्रेम वाटत होतं. जे प्रेम सुंदरीला तो देत होता, तेच प्रेम तो आता अनुवर उधळत होता. सुंदरीला त्याच्या प्रेमाची किंमत नव्हती, पण अनु मात्र राजनच्या प्रेमाला प्रतिसाद देत होती.

त्या रात्री दोघांच्या हसण्याबोलण्याचे आवाज राधिकेला ऐकू येत होते. तिला खूप समाधान वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी राधिका उठली. नेहमीप्रमाणे अनु उठून खाली आली नव्हती. राधिकेनंच चहा केला. बाबांना त्यांच्या खोलीत नेऊन दिला अन् चहाचा टे्र राजनच्या खोलीच्या दाराबाहेर ठेवून तिनं दारावर टकटक केलं, ‘‘चहा तुमची वाट बघतोय.’’ तिनं सांगितलं अन् ती खाली येऊन कामाला लागली. अनुनं चहाचा ट्रे खोलीत घेतला. चहा तयार करून कप राजनच्या हातात देत म्हणाली,

‘‘मला थोडी फार खरेदी करायची आहे. तुम्ही याल माझ्याबरोबर?’’

‘‘येईन की?’’

राधिकेला सांगून, तयार होऊन अनु व राजन बाहेर पडले. ती दोघं परतली तेव्हा राधिका रात्रीचा स्वयंपाक आवरून त्यांची जेवणासाठी वाट बघत होती. बाबा आज सगळ्यांच्या बरोबर डायनिंग टेबलवर जेवायला होते. खूप आनंदात सगळ्यांचं जेवण झालं. राधिकेच्या सुरगणपणाचं अनुनं तोंड भरून कौतुक केलं. मागचं सगळं आवरायलाही मदत केली. बाबा त्यांच्या खोलीत, अनुराजन त्यांच्या खोलीत झोपायला गेले. राधिका आपल्या खोलीत एकटीच होती. शिबू धंद्याच्या कामानं टूरवर गेलेला.

आठ वर्ष झाली होती राधिकेच्या लग्नाला. अजून घरात लहान बाळ आलेलं नव्हतं. शिबू घरी नसायचा. तिला फार एकटं एकटं वाटायचं. खरं तर डॉक्टरांनी बाळ होणारच नाही असंही सांगितलं नव्हतं. राधिकेला बाळ नसण्याचं वाईट वाटायचं. तसं शिबूला वाटत नव्हतं. तो त्याच्या व्यवसायात रमला होता. राधिका मात्र बाहुल्या गोळा करून त्यांना नटवण्यात स्वत:ला रमवत होती. कधी खरंखुरं बाळ तिच्या घरात येईल? निदान राजन अनुला तरी लवकर बाळ व्हावं. आपलंच बाळ समजून आपण त्याला वाढवू…विचार करताना राधिकेला कसला तरी आवाज आला. मांजर आली असेल का? पण मांजरीला यायला खिडकी किंवा झोरोका नाहीए अन् दारं तर सगळीच बंद केली होती. ती स्वत:च्या खोलीबाहेर आली. राजनच्या खोलीला लागून असलेला गच्चीचा दरवाजा उघडा होता.

‘‘म्हणजे? राजन भाऊजी गच्चीवर गेलेत?’’ तिनं मनाशीच म्हटलं, ‘‘की गच्चीचं दार बंद करायला विसरलेत? टॉर्च घेऊन वर जाऊन बघावं का?’’

गच्चीवरून बोलण्याचा आवाज येत होता. ‘‘ही दोघं गच्चीवर गप्पा मारताहेत वाटतं.’’ राधिकेला हसू फुटलं. ‘‘चला, एकदाचा संसार मार्गी लागला म्हणायचा,’’ तिनं जोरात विचारलं, ‘‘गच्चीवर आहात का भाऊजी?’’

‘‘वहिनी, मी आहे अनू, खोलीत गरम होत होतं, म्हणून गच्चीवर आलेय.’’

‘‘ठिक आहे. झोपायला जाताना गच्चीचं दार नीट लावून घ्या.’’

‘‘हो वहिनी, मी बघते सगळं…तुम्ही अजून झोपला नाहीत?’’

‘‘नाही गं! झोप येत नाहीए.’’

‘‘शांत पडून राहा. लागेल झोप.’’

राधिकानं बाबांच्या खोलीत डोकावून बघितलं. त्यांना गाढ झोप लागली होती.

सगळं ठीकठाक आहे. मग ती का अशी अस्वस्थ आहे? काय खटकतंय? आपल्याला मूल नसणं? शिबूचं तिच्यापासून, घरापासून दूर राहणं? की आणखी काही कारण आहे?

रात्री बराच वेळ राधिकेला झोप लागली नाही. उशिरा केव्हा तरी लागली, ती मात्र गाढ झोप होती. पण सकाळी पुन्हा लवकरच झोप उघडली. डोळे अन् अंग जड वाटत होतं. ती उठून खोलीबाहेर आली. राजनची खोली उघडी होती. तिनं अनुला खालूनच मोठ्यानं हाक मारली, ‘‘अनु खाली ये गं! बाबांना चहा करून दे.’’

तिची हाक ऐकून राजन खोली बाहेर येऊन म्हणाला, ‘‘वहिनी, अनु इथं नाहीए, ती खालीच असेल.’’

‘‘अनु, खालीच आहेस का तू?’’ पुन्हा राधिकानं हाक दिली. पण तिला अनुची चाहुल लागेना. बाथरूममध्ये असेल का? पण बाथरूममध्ये बाबा गेलेत. अनु स्वयंपाकघरातही नव्हती. बाहेर बागेतही बघून आली राधिका…इतक्या सकाळी कुठं जाणार?

राधिकानं पुन्हा हाक दिली, ‘‘भाऊजी, माझ्या जावेला खाली पाठवा…चेष्टा पुरे झाली.’’

‘‘वहिनी, मी चेष्टा करत नाहीए. खरंच अनु खोलीत नाहीए…’’

‘‘नाहीए?’’

तेवढ्यात बाथरूममधून बाहेर आलेले बाबा म्हणाले, ‘‘सूनबाई, काल तू बाहेरचं दार लावायला विसरलीस का?’’

‘‘बाहेरचं दार उघडं आहे? गच्चीवरचं दार ही उघडं…? अनु घरात नाहीए

बाबा…हे…हे सगळं काय आहे? भाऊजी अनु घरात नाहीए…’’

‘‘रात्री तुमचं काही भांडण झालं का?’’

‘‘छे काहीच नाही…’’

खोलीत अनुचं सामानही नव्हतं. घरातली तिजोरी उघडी अन् रिकामी होती.

सून घर सोडून निघून गेली होती. फारच हुशार निघाली.

राधिकाला एकदम रात्रीचा प्रसंग आठवला. अनुचं गच्चीवर असणं, कुणाशीतरी बोलणं, तुम्ही झोपा म्हणणं…सगळं काही आधी ठरवल्याप्रमाणे होतं. अचानक घडलेलं नव्हतं. ‘‘ही तर भलतीच हुशार निघाली.’’ राधिका स्वत:शीच बोलली.

एव्हाना राजनलाही सगळं लक्षात आलं होतं. तो डोकं धरून बसून होता.

सगळ्या घरात भयाण शांतता दाटून होती. कुणाला काही बोलणं सुधरत नव्हतं. राधिकेनंच राजनला दुसऱ्या लग्नासाठी भरीला घातलं होतं. बाबांनी त्याच्या मागे ‘लग्न कर, लग्न कर’चा धोशा लावला होता. अन् राजननं या दोघांच्या म्हणण्याला मान देत लग्नाला अन् मुलीला होकार दिला होता. दोष कुणाचा होता? राधिकेला राजनचा संसार बहरलेला बघायचा होता. बाबांना वाटे शिबूला मूलबाळ नाही. निदान राजनचं प्रतिरूप घरात रांगावं, दुडदुडावं. राजनचा भाबडेपणा की त्यानं अनुला जवळ घेतलं. तिलाही तो स्वत:प्रमाणे भाबडीच समजला. अनु भाबडी नव्हतीच. तिनं या तिघांना व्यवस्थित गुंडाळलं होतं. सगळं सगळं घेऊन गेली ती…काहीही उरलं नाही.

रात्री फोन आला, ‘‘मी दुसरं लग्न करते आहे. तुमच्या घरातल्या त्या कोंदट वातावरणात माझा जीव गुदमरत होता. नवं आयुष्य सुरू करायचं तर पैसा हवा…तो मी घेऊन आले आहे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी मी तुमच्या कुटुंबातली सुन होते.’’

बाबांना धक्काच बसला…राधिकाही अवाक् झालेली. इतका विश्वासघात? आमचं चुकलं कुठं?

राजन या दोघांच्यामध्ये मूकदर्शक होता. वहिनी अन् बाबा काय म्हणाले ते त्यानं ऐकलं नाही. पुन्हा एक वाईट स्वप्नं बघितलंय त्यानं. रडायचं अन् गप्प व्हायचं. पुन्हा रडायचं अन् पुन्हा गप्प व्हायचं. आधी सुंदरीच्या सौंदर्यावर भाळला नंतर अनुच्या समंजस अन् सोशिवपणावर! दोघींनीही त्याचा विश्वासघात केला. का? त्याला समजतच नव्हतं. जगायचं कसं? मरता येत नाही म्हणूनच जगतो माणूस. घरात तर कुणीच कुणाशी नजरेला नजर भिडवत नव्हतं. सगळे एकमेकांची नजर टाळत होते. प्रत्येक जण स्वत:ला गुन्हेगार समजत होता. एकमेकांना दोष देण्यापेक्षा आपलंच चुकलं ही भावना प्रबळ होती.

बाबांना तर हा धक्का पचवणं फारच जड जात होतं. घराबाहेर, समाजात, नातलगांमध्ये, मित्रांमध्ये चर्चेचा एकच विषय होता. दुसरी सूनही घर सोडून गेली? घरातल्यांचाच दोष असणार. काही तरी नक्कीच असणार, नाहीतर एवढ्या चांगल्या मुलाच्या बाबतीत असं का घडावं? बाबांनी घराबाहेर पडणं थांबवलं होतं. घरातही ते कमीच बोलायचे.

इकडे शिबू धंद्याच्या वाढत्या व्यापात घराबाहेर जास्त वेळ राहत होता. राधिकेला द्यायला त्याला वेळ नव्हता. राधिका कधी प्रेमानं जवळ आली तरी तो तिला दूर लोटायचा. ‘‘मी फार दमलोय…उद्या बोलूयात…’’ असं म्हणायचा. दुसऱ्या रात्री थकवा अजून वाढलेला असायचा. मग राधिकेच्या जवळ जाण्याचं धाडस होत नसे त्याला.

बिचारी राधिका! मोडक्या शिडाची नाव वल्हवायचा प्रयत्न करत होती. त्या नावेला भोकंच भोकं पडली होती. ती बुजवताना तिचं वय वाढत होतं.

बाबा घराबाहेर काय?खोलीबाहेरही पडत नव्हते. स्वत:च्या एकटेपणांतच गुंग असायचे.

राजन आपल्या खोलीच्या खिडकीतून रस्त्याकडे बघंत कुणास ठाऊक कुणाची वाट बघत असायचा. संध्याकाळ उलटून रात्र व्हायची. घरात काय चाललेले आहे, त्याला गंधवार्ताही नसे. राधिका घरात पसरलेल्या या भयाण शांततेत चार शब्द बाबांशी तर चार शब्द राजनशी बोलायचा प्रयत्न करायची. त्या घरात तिचं स्थान नक्की काय होतं?

बाबांनी तिला बजावलं होतं, ‘‘तू माझी नाही तर या घराची सून आहेस. या घराला जे तू देशील, त्याहून जास्त तुला मिळेल,’’ शिबू रूपयांनी ठासून भरलेली बॅग राधिकेला द्यायचा अन् म्हणायचा, ‘‘हे घर तुझं आहे. हवं तसं चालव. मी तुला कधीही काही म्हणणार नाही. पण हे घर आनंदानं ठेवणं ही तुझी जबाबदारी.’’

ते पैसे बघून राधिकेच्या मनांत यायचं या पैशांनी घरातला आनंद विकत घेता येईल का? बाबांचा झालेला अपमान, त्यांचा दुखावलेला सन्मान परत घेता येईल का? अन् घराण्याचा कुलदिपक राजनची उध्वस्त झालेली स्वप्नं विकत मिळतील का? काय करू मी या कागदांच्या तुकड्यांचं?

शिबूनं कायम तिच्याकडे भावाचा अन् बाबांचा आनंदच मागितला होता. पण राधिकेचा आनंद कशात आहे हे त्यानं कधी विचारलं नाही किंवा समजूनही घेतलं नाही. भकास दिवस अन् एकलेपणानं भारवलेल्या रात्री ती कशा काढते हे त्याला कधी समजलंच नाही. स्वत:च्या यशाच्या मार्गावर पुढे पुढे जाताना आपलीच माणसं मागे मागे राहिली आहेत हे त्याच्या लक्षातच आलं नाही. जे काही त्यानं धरून ठेवलं होतं, ते हातातून सुटलं तर तो स्वत:च विखरून पडेल. महत्त्वाकांक्षा असावी पण त्यासाठी थोरला लेक, मोठा भाऊ, बायकोचा नवरा ही नाती विसरावी लागतात हे कुणी सांगितलं?

राजन पण आपला पगार राधिकेला द्यायचा. ‘‘वहिनी, हे घे, सांभाळ…मी काय करू याचं? मी हा पैसा सांभाळू शकत नाहीए.’’

‘‘अजून किती जबाबदाऱ्याचं ओझं माझ्यावर टाकणार आहात? या कागदाच्या कपट्यांनी आनंद विकत घेता येत नाही. मी तरी यांचं काय करू? माझ्या इच्छा, अपेक्षा, आनंद सगळं सगळं चिणलं गेलंय…मला नकोय आता जबाबदाऱ्या.’’

आज प्रथमच राधिका इतकं बोलली होती. तिची वेदना, व्यथा आजा प्रथमच त्याला कुठंतरी जाणवली होती. तिची चिडचिड, तिची अगतिकता कशामुळे होती? तिचा आक्रोश आमच्यामुळे होता की तिचा काही प्रॉब्लेम होता? तिनं तरी मन कुणाजवळ मोकळं करावं? राजन विचार करत होता.

राधिकेच्या खोलीवरून जाताना त्याला खोलीतून हंदके ऐकायला आले. तो थांबला.

‘‘वहिनी…’’

‘‘आले…आले…’’ म्हणाली राधिका. पण ती बाहेर येण्यापूर्वीच तो तिच्या खोलीत शिरला. प्रथमच तो या खोलीत आला होता. खोली बऱ्यापैकी अव्यवस्थित होती. काचेच्या मोठ्या शोकेसमध्ये अगणित बाहुल्या मांडून ठेवलेल्या होत्या. खोलीतलं ड्रेसिंगटेबल झाकलेलं होतं. वहिनी कधीच ते वापरत नसावी.

पलंगावरची चादर नीट करत राधिकेनं विचारलं, ‘‘कसे काय आलात भाऊजी?’’

‘‘असंच! वाटलं यावं, आलो,’’ तेवढ्यात बेडवरची बोलकी बाहुली बोलली, ‘‘मम्मा, आय लव्ह यू’’ राधिकानं तिचं बटन दाबून तिला गप्प केलं.

‘‘बोलू देत ना, छान वाटतय.’’ राजननं म्हटलं, ‘‘एक विचारू वहिनी?’’

‘‘विचारा, काय विचारताय? मला ठाऊक आहे तुम्ही काय विचारणार आहात ते?

भाऊजी, या घरानं, या घरातल्या आनंदानं माझ्याकडे पाठ फिरवली आहे. घर, घर नाही, धर्मशाळा वाटते. जिथं लोक राहतात पण त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. परक्यासारखेच असतात सगळे, कोण केव्हा रडलं, कोण केव्हा हसलं, कुणाला ठाऊक नसतं. कोण अश्रू गाळतं, रात्र जागवतं अन् कोणाची संध्याकाळ डोळ्यातल्या पाण्यानं झाकोळते हे कुणीही समजून घेत नाही.’’

‘‘वहिनी…शिबू दादा…?’’ काहीही न बोलता तो तिथून निघून गेला.

किती तरी वेळ वहिनींचे अश्रूंनी भरलेले डोळे अन् शब्द त्याचा पाठलाग करत होते. ‘‘या घरात मी एक जिवंत, हाडामांसाची, भावना असणारी स्त्री आहे हे कुणाला माहीत आहे? प्रत्येकजण स्वत:तच मग्न आहे. स्वत:तच गुंतलाय. माझं आहे कोण? कुणाला काळजी आहे माझा कुणाला वेळ आहे माझ्यासाठी?

संध्याकाळ दाटून आली होती पण आज राजननं खोलीची खिडकी उघडली नव्हती, संध्याकाळही जणू आज तिकडे फिरकलीच नाही, वारंवार त्याला राधिकाचा कोमजलेला चेहरा डोळ्यांपुढे येत होता. राजनहून फक्त दोन महिने मोठी होती ती. पण जबाबदाऱ्यांनी तिला अकाली म्हातारं करून टाकलंय. मोठेपणाच्या जाणिवेनं ती इतकी जखडली गेलीय की स्वत:चं जगणंच विसरली आहे. घरातली तीन मोठी बाळं, सासरा, नवरा, दिर यांना सांभाळते आहे. मनातून स्वत:च्या लहानग्या बाळासाठी झिरते आहे.

काळोख वाढला तसे बाबा खोलीतून बाहेर आले. हल्ली ते उजेडात बाहेर जाणं टाळतातच. ते फिरायला बाहेर पडले आणि राधिका रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.

फिरून आल्या आल्या बाबा म्हणाले, ‘‘सूनबाई, जेवायला वाढ. मी लवकरच झोपणार आहे.’’ राधिकानं त्यांना जेवायला वाढलं. ते आपल्या खोलीत गेले. मग राधकिनं राजनलाही जेवू घातलं. आपलं जेवण आटोपलं अन् स्वयंपाकघर आवरून ती आपल्या खोलीकडे निघाली. तेवढ्यात लक्षात आलं. गच्चीचं दार उघडं आहे. राजन गच्चीवर असेल बहुधा. ‘‘भाऊजी…’’ तिनं हाक मारली. उत्तर आलं नाही तशी ती स्वत:च वर निघाली. गच्चीवर चांदणं होतं. राजन आपल्याच सावलीशी खेळल्यासारखा काही तरी शोधत होता.

‘‘काय शोधताय? काय हरवलंय?’’ राधिकानं विचारलं. आज खूपच दिवसांनी ती गच्चीवर आली होती. मधल्या काळात अनुबरोबर कधी कधी गच्चीवर यायची.

अचानक राधिकेला बघून राजन बावचळला…‘‘माझी अंगठी…बोटातून निघून कुठं तरी पडलीय, ती शोधतोय…’’

‘‘असेल इथंच कुठं तरी,’’ राधिकाही अंगठी शोधू लागली. ती जिन्याच्या पायऱ्यांवर अंगठी शोधत होती अन् तिला सापडलीही, ‘‘बघा, सापडली अंगठी.’’

‘‘अरेच्चा! मी कधीचा शोधतोय, मला नाही मिळाली.’’

‘‘ही घ्या…’’ राधिकेनं पायरीवरूनच वर उभ्या असलेल्या राजनला अंगठी द्यायला हात पुढे केला. अंधारात तिचा पायऱ्यांचा अंदाज चुकला अन् तिचा तोल गेला. राजननं तिला सावरायचा प्रयत्न केला. त्याचाही तोल गेला. घाबरून त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघंही त्यामुळे सावरली…पडता पडता वाचली अन् राधिकेच्या चेहऱ्यावरच्या उदास रेषा जणू पुसल्या गेल्या. कोरड्या केसांच्या बटांमधून दिसणारे शुष्क डोळे आनंदानं उजळले. पुरूष स्पर्श विसरून गेलेला देह एकाएकी सजीव झाला.

गेली इतकी वर्षं फक्त इतरांकरता कष्टकरणारी, स्वत:च सुखदु:ख विसरून दुसऱ्यांसाठी जगणारी राधिका बघत आला होता राजन. आज तिच्यात त्याला प्रथमच चैतन्यमय स्त्रीत्त्वाचा प्रत्यय आला. इतकं आकर्षण इतकी ओढ आहे तिच्या देहात, चेहऱ्यात…इतकं समर्पण, इतका आवेश, पूर्वी कधीच न वाटलेल्या या भावना, त्यालाही स्वत:ला सांभाळणं, साधेना. एकमेकांच्या मिठीत जणू सारी धरती, सारं आकाश सामावलं होतं. तिच्या देहाची थरथर, चेहऱ्यावरचे संपूर्ण समर्पणाचे भाव, डोळ्यातला आनंद अन् मादकता हे सगळंच अद्भूत होतं. त्यानं मिठी अधिक घट्ट केली. ‘‘या डोळ्यातला हा आनंद मी कधीच मावळू देणार नाही. घरातला, संसारातला सगळा सगळा आनंद मी तुला देईन. मी वचन देतो तुला…’’

तेवढ्यात खालून कुणी तरी हाक मारलेली ऐकू आली…‘‘वहिनी…’’

‘‘अरे  हा तर सुंदरीचा आवाज वाटतोय…’’

‘‘मी सुंदरी…दरवाजा उघडा.’’ पुन्हा हाक आली.

‘‘हे काय नवंच? आज तर राजननं खिडकीही उघडली नव्हती. मग सुंदरी कुठून आली? राजनची पहिली बायको? नाही…नकोय…आता कुणी नको…’’

बाबांचा खणखणीत आवाज ऐकू आला, ‘‘आता कुठल्याही सुंदरीला आमच्या घरात थारा नाही.’’

दारावर थापा ऐकू येत होत्या. राजन आणि राधिकानं ऐकल्या. पण दुर्लक्ष केलं. राजन म्हणाला, ‘‘सुंदरी आता घरात येणार नाही. सायंकाळची दुलहन रात्री घरी येत नाही. माझी सांझ की दुलहन मला भेटली.’’ दोघांची मिठी अधिकच घट्ट झाली.

कुठून तरी रेडिओवरच्या गाण्याचे सूर अलगद तरंगत आले, ‘‘कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं तो निकल आए जनमों के नाते, घनी थी उलझन,  बैरी अपना मन, अपना ही होके सहे दर्द पराए…दर्द पराए…कही दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए मेरे ख्यालो के आंगन में कोई सपनों के दीप जलाए…’’                                      समाप्त

सांझ की दुलहन – दूसरा भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(भाग दूसरा)

पूर्व कथा : राजन त्याच्या वहिनीशी, राधिकाशी खूपच मोकळेपणानं बोलायचा. त्यानं त्याच्या मनातील भावी पत्नीबद्दलचे विचार राधिकाला सांगितले. त्याच्या स्वप्नातली सुंदरी कशी अन् कुठं शोधायची ते राधिकाला समजेना.

शेवटी एकदाची ती स्वप्नं सुंदरी सापडली, खूप थाटात लग्न झालं. पण घरात नव्यानं प्रवेश करणाऱ्या नववधूनं सुरूवातीपासूनच आपले रंग दाखवायला सुरूवात केली. घरातलं वातावरण तंग झालं होतं. पण स्वप्नसुंदरीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राजनला ते काही कळत नव्हतं. खूप शिकलेली आहे. होस्टेलला राहिल्यामुळे मोकळ्या स्वभावाची आहे हे त्यानं मान्य केलं होतं…

आता पुढे वाचा :

सुंदरी रात्री घरी परतली, तेव्हा रात्रीचे नऊ वाजून गेले होते. बाबांनी सहजच खिडकीतून बघितलं तर सुंदरी कुणा मुलाच्या हातात हात घालून खिदळत कारमधून उतरताना दिसली.

बाबांना कसंबसं झालं. त्यांचं घराणं सात्विक शालीन माणसाचं, सुसंस्कारी माणसांचं होतं. असा थिल्लरपणा तिथं अपेक्षितच नव्हता. सगळीकडे नववधूच्या या वागण्याची चर्चा होणार याची त्यांना कल्पना आली. कारण सगळ्यांच्या खिडक्यांमधून दिवे लागलेले अन् माणसं उभी होती. चकित होऊन बघत होती.

पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. सुंदरीला घरी सोडून तो तरूण जायला निघाला तसं बाबांनी त्याला थांबवलं.

‘‘नाव काय रे बेटा तुझं?’’

‘‘अनुभव…’’

‘‘चांगल्या घरातला दिसतोस…सुंदरीला कधीपासून ओळखतोस?’’

‘‘आम्ही एकत्र शिकत होतो.’’ तो जायला निघाला बाबांनी त्याला थांबवलं. अत्यंत शांत, संयम सुरात ते म्हणाले, ‘‘तुला आमच्या घराण्याचीही रीत कळायला हवी. आता फक्त सुंदरीशीच तुझा संबंध नाही तर तिच्या कुटुंबाशीही आहे. तुझी क्लासमेट होती सुंदरी, पण आता ती विवाहित आहे. कुणा दुसऱ्याची पत्नी आहे. आमच्या घराण्याची सून आहे, त्यामुळे तिचं असं सतत तुझ्याबारेबर भटकणं बरोबर नाही.’’

अनुभव काहीही न बोलता निघून गेला. इकडे सुंदरी आपल्या खोलीत येऊन राजनवर भडकली. ‘‘बाबांना हा भोचकपणा कुणी सांगितलाय? विनाकारण त्याला बोलले. घराण्याची रीत, मर्यादा याचं स्तोम माजवतात. काय करू मी या मर्यादेचं लोणचं घालू? सगळा दिवस घरात बसून राहू? मला नाही जमणार…माझा मित्र मला घरापर्यंत सोडायला आला तर बिघडलं कुठं?’’

राजननं तिला शांतपणे समजावलं, ‘‘प्रश्न मित्राचा नाहीए. संस्काराचा आहे. तो फक्त तुला सोडून निघून जातो. त्यानं आमच्याशी कुणाशी ओळखही करून घेतली नाही…’’

त्याला पुढे बोलू न देता सुंदरीनं म्हटलं, ‘‘राजन, तूही असं बोलतोस? मला हे मान्य नाही.’’

मग तर हे नित्याचंच झालं. आता कोणीच या विषयावर काहीच बोलत नव्हतं.

एवढ्यावरही भागलं नाही. ही सांझ की दुलहन आता आणखी उशीरा घरात येऊ लागली. राजनला कळेना काय करावं? निदान बाबांना त्रास नको म्हणून तो सरळ वेगळं घर घेऊन राहू लागला.

राजन दिवसभर ऑफिसमध्ये काम करायचा. इकडे सुंदरी आपल्या मित्रांबरोबर बाहेर वेळ घालवायची. कधी कधी तर दोघं एकाच वेळी घरात प्रवेश करायची. तिला काहीही म्हणणं व्यर्थ आहे हे राजनला कळून चुकलं होतं. तिच्या चुका त्याला कळत नव्हत्या असं नाही पण तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. आज नाही उद्या तिला समजेल, ती सुधारेल या भाबड्या आशेवर जगत होता.

एकदा तर तो घरात असतानाच सुंदरी व अनुभव त्याच्या खोलीत एकत्र होते. तो बघत होता. एवढंच म्हणाला, ‘‘यात तुला काय मिळतं?’’

‘‘जे तुझ्याकडून मिळत नाही ते! कारण तो माझं प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम!’’

‘‘माझ्याकडून काय कमी पडलंय तुला? अन् तुमचं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न कशाला केलंस?’’

वडील म्हणाले, ‘‘आधी लग्न करून आमच्या घरातून चालती हो, मग हवं ते कर.’’ निर्लज्जपणे सुंदरी उत्तरली.

‘‘अन् तुझ्या मर्जीचे फटकारे मला बसताहेत.’’ पहिल्यांदाच राजन गरजला.

‘‘हो! कारण तू मला बांधून ठेवलं आहेस.’’

‘‘बंधन तुला नकोय, खरे ना?’’

‘‘म्हणजे तू आम्हाला अंधारात ठेवलंस, आमचा विश्वासघात केलास. तुला सुखी ठेवण्यासाठी काय केलं नाही मी? माझी स्वप्नं सुंदरी म्हणून पायघड्या घालून घरात आणली तुला. तुझं स्वांतत्र्य म्हणून बाबांचं घर सोडून वेगळं घर केलं. वडिल, भाऊ, वहिनी सगळ्यांना सोडलं…केवळ तुझ्यासाठी. पण तरी तू नाखुश आहेस. चूक माझीच झाली की मी वेड्यासारखा तुझ्यावर प्रेम करतोय पण तुला मी आवडतो की नाही, तुला माझी गरज आहे की नाही याचा मी विचारच नाही केला.’’

‘‘खरंय, मला तुझी गरजच नाहीए. तुझ्या आधी अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी त्याच्या प्रेमात आहे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तुझ्याबरोबर मी माझ्या अटींवर राहीन,’’ निर्लज्जपणे सुंदरी किंचाळली.

राजन तरीही तिच्यावर प्रेम करत होता. कधी तरी तो राधिकेकडे जायचा. स्वत:च्या घरी जात नसे. पण सुंदरीनं त्याला घरी का आला नाहीस असंही कधी विचारलं नाही. त्या दिवशीही तो ऑफिसमधून सरळ राधिकेकडे गेला आणि स्फुंदून रडायला लागला.

‘‘काय झालं भाऊजी?’’

त्यानं सगळी हकीगत सांगितली. मग म्हणाला, ‘‘यावर उपाय काय?’’

‘‘काय उपाय सांगणार भाऊजी? तुमच्या मर्जीनं सगळं घडलंय…मला तेव्हाही शंका होती, पण तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्व सांभाळून घ्याल…’’

‘‘खरंय वहिनी, चूक माझीच आहे. माझी कल्पना सुंदर होती, सौम्य आणि कोमल होती, म्हणूनच ती पटकन् मोडली. सुंदरी फार कठोर आहे. माझ्या कल्पनेतल्या सुंदरीशी ती कुठेच जुळत नाही. मी अशी कल्पनाच करायला नको होती. ती चूक मी केली. त्याचं प्रायश्चित्त पण आता भोगतोय. माझ्या डोळ्यांदेखत ती दोघं माझ्या शयनमंदीरात एकत्र झोपतात अन् मी मूर्खासारखा बघत असतो. मी कोर्टात जाऊन काय सांगू? माझी बायको बदफैली आहे असं सांगू?’’

‘‘तर मग काय असेच बघत बसणार?’’

‘‘मी काय करू तेच मला समजत नाहीए.’’

‘‘हाकलून लावा तिला. घराबाहेर काढा. घरातली अब्रू स्वत:च चव्हाट्यावर जाऊन नाचतेय तर तिला घरात ठेवावी कशाला? ती चवचाल आहे, निर्लज्ज आहे, तर तुम्ही स्वत:ला त्रास का करून घेता? सरळ घटस्फोट द्या तिला.’’

‘‘पण वहिनी…’’

‘‘पण बीण काही नाही. एवढं सगळं सोसूनही जर आयुष्य असंच जाणार असेल तर या आयुष्यातून मुक्त व्हा. आज तुमचं वय तरूण आहे. उत्तम नोकरी, बंगला, गाडी सगळं आहे, मग कशाला त्या अप्सरेच्या मागे धावताय? अप्सरा कधी कुणाची पत्नी झालीय का? ती तुमच नाही हे स्वत:च तिनं सांगितलंय…तुम्ही असे हताश होऊ नका. हार मानू नका. ज्या वळणावर तुम्ही उभे आहात, तिथून पुढे जाणारे अनेक रस्ते आहेत. आता मागे वळून बघू नका. जुनं आयुष्य आठवू नका. सोडा तिचा नाद अन् चांगलं सुखाचं आयुष्य जगा. नव्या वाटेवर सोनेरी पहाट उगवेल.’’

राजनला पुन्हा रडू आलं. राधिकानं त्याला शांत केलं, धीर दिला…सुंदरीपासून घटस्फोट घ्यायला राजी केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी पोहोचल्यावर त्यानं घराचा दरवाजा उघडला अन् सुंदरीच्या खोलीच्या दारावर जोरजोरात घक्के मारायला सुरूवात केली. जोरजोरात हाका मारू लागला. सुंदरीनं संतापून दार उघडलं, ‘‘काय चाललंय? दरवाजा तोडायचाय का?’’

‘‘माझ्या घरातून बाहेर निघ…हे धंदे इथं चालणार नाहीत.’’ केवढ्यांदा गरजला राजन. त्यानं धक्का देऊन सुंदरीला बाजूला ढकललं.?खोलीत शिरून अनुभवची मानगूट धरून त्याला खोलीबाहेर काढलं अन् घराबाहेर हाकलून दिलं. सुंदरी ओरडत होती, पण तिलाही समजलं की आता तिला कुणा एकाचीच निवड करावी लागणार आहे. तिनं अनुभवसकट राजनचं घर सोडलं. सायंकाळपर्यंत तो आपल्या दुर्देवाच्या तुकड्यांना गोळा करत होता. सगळं घर स्वच्छ करून त्यानं हात झटकले. एक अध्याय संपला होता.

कोर्टात फक्त इतकंच बोलला, ‘‘ही माझ्यासाठी नाहीए. ज्याच्याबरोबर राहायचं आहे तिला, त्याच्याबरोबर राहू दे. तो तिचा हक्क आहे. तिचे भ्याड आईबाप तो हक्क तिला देऊ शकले नाही…पण मी देतोय…तो हक्क आणि ते स्वातंत्र्य. ती पूर्णपणे मुक्त आहे.’’

घटस्फोट घेऊनही बरेच दिवस झाले. पण राजन अजून गुमसुम होता. राधिका त्याचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. पण तो लग्नाचा विषय काढला की, ‘‘अजून नाही…’’ एवढंच बोलायचा.

कठोर कल्पनेचं कटुसत्य त्याच्या आयुष्याला इतकं कडवट करून गेलं होतं की अजून तो ती चव विसरू शकत नव्हता. त्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग होता. दुसरं लग्न करून नव्यानं आयुष्य सुरू करणं.

‘‘भाऊजी, खरंच सांगते, तुम्ही पुन्हा लग्न करा. छान आयुष्य जगा. ती मजेत आपलं आयुष्य जगतेय अन् तुम्ही तिच्यासाठी झरताय? का?’’

‘‘मी आयुष्य जगत नाहीए…आयुष्य मला जगवतंय…’’ ‘‘मुळीच नाही.’’ राधिका हसून म्हणाली.

‘‘हे आयुष्य तुम्ही स्वत: निवडलंय. ते ही सुंदरीच्या दु:खात. फेकून द्या ती दु:खाची काळी हिडिस चादर…असं प्रेतासारखं आयुष्य जगू नका. घाण सुटलीय सगळीकडे…ते प्रेत, पुरा, नदीत वाहवून द्या…पण त्यातून मोकळे व्हा…या दुर्गंधीनं सगळ्यांपासूनच तुटताय तुम्ही…आत्ताच सावध व्हा. अजून वेळ गेलेली नाही…नव्यानं आयुष्य सुरू करा.’’

सगळी रात्रं राजननं विचारात घालवली. सुंदरी अजूनही त्याच्या मनांतून गेली नव्हती. दुसरीचा विचार मनात येणार कसा? त्याचा निर्णय होत नव्हता. वहिनीचं म्हणणं पटत होतं. तिची कळकळ त्याला समजत होती. पण दुसरं लग्नं करायचं म्हटलं अन् तिही तशीच निघाली तर? नकोच ते…! पण वहिनी म्हणाली तेही खरंच, तो सगळ्यांपासून दुरावला होता. त्यानंच स्वत:ला दु:खाच्या कोषात बंद करून घेतलं होतं. खरं तर सुंदरीचा आगाऊपणा, अति मॉडर्न असणं राधिकेला मंजूर नव्हतं. पण केवळ त्याच्या हट्टापायी ती घरात आली होती. आता वहिनी निवडेल तिच्याशी लग्न करायचं…शालीन, साधी, घर सांभाळणारी, समजूतदार…अगदी वहिनीसारखीच… पण अशी मिळेल का?

सगळी रात्र झोपेविना गेली. सकाळी त्यानं तारवटलेल्या डोळ्यांनीच घराला कुलुप घातलं अन् तो बाबांच्या घरी पोहोचला.

राधिक त्यावेळी बाबांना सकाळचा चहा देत होती. एवढ्या सकाळी त्याला बघून घाबरलीच! ‘‘काय झालं भाऊजी? आजा इतक्या सकाळी?’’

‘‘खूपच दिवसात तुझ्या हातचा चहा घेतला नव्हता. म्हटलं, चहा घ्यावा,

बाबांजवळ बसून गप्पा माराव्यात. आज अनायसे सुट्टी आहे…’’ राजननं म्हटलं.

आज राजन मोकळेपणानं बोलतोय. त्याचा मूड बदलला आहे. नेहमीच्यापेक्षा ताजातवाना अन् प्रसन्न वाटतोय हे राधिकेला जाणवलं. तिनं चहाचा कप त्याला दिला अन् खुर्ची ओढून घेत आपला चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ बसली.

बाबांनाही बरं वाटलं. तेही खूप दिवसांनी अगदी मोकळेपणानं हसले. ‘‘खरचं छान झालं…मला तर वाटतं तू आता ते घर सोडून इथंच आमच्यात राहायला ये. शिब्बूही सतत बाहेर असतो. एकटी राधिकाही कंटाळते..’’ ते मनापासून बोलले.

‘‘नाही बाबा, त्या सुंदरीमुळे मी तुम्हाला खूपच दुखावलंय. मला शिक्षा मिळायलाच हवी.’’

‘‘नाही भाऊजी, तुम्ही मर्जीनं गेला नव्हता. फक्त तिच्यासाठी वेगळे झाला होता. कारण तिच्यावर तुम्ही प्रेम करत होता. त्यावेळी ते योग्यही होतं. पण या घराची दारं तुमच्यासाठी नेहमीच उघडी होती. अजूनही आहेत. बाबांना तर तुमच्या आठवणीनं सतत रडायला येतं. बाबांना वाटायचं ती हडळ आहे, चेटकीण आहे. तुम्हाला खाऊन टाकेल.’’ राधिकेचे डोळे भरून आले.

आपल्यावर ही माणसं आजही इतकं निर्व्याज प्रेम करताहेत हे बघून राजनही भावनाविवश झाला. ‘‘तुमच्या मर्जीबाहेर मी नाही.’’  त्यानं दाटल्या कंठानं म्हटलं.

राजनच्या निर्णयानं बाबा आनंदले. त्यांनी सगळ्या नातलगांना कळवलं की राजन दुसऱ्या लग्नाला कबूल झाला आहे. साधीशी, शालिन मुलगी शोधा.

पुन्हा खूप मुली सांगून येऊ लागल्या. यावेळी बाबा अन् राधिका खूपच सावध होते. मुलगी बघायला गेले की बाबा तिला बरेच प्रश्न विचारायचे. घरी आल्यावर त्यावर बराच विचार व्हायचा, चर्चा व्हायची. होस्टेलवाली तर अजिबात नको होती. घरगुती असावी, कुलीन, शालीन, फार शिकलेली नसली तरी चालेल पण प्रेमळ अन् सांभाळून घेणारी हवी.

खूप प्रयत्नांती शेवटी एक मुलगी पसंत केली गेली. बऱ्याच मागास भागातली होती. गरीब घरातली होती. जेमतेम दहावीपर्यंतचं शिक्षण झालेलं. रंगरूप अगदी बेताचं. तरीही बाबांना ती पसंत पडली. राजननंही होकार दिला.

लग्नाची तारीख ठरली. राधिकेनं विचारलं, ‘‘भाऊजी, नवरीचा शालू पसंत करायचा ना?’’

उदासपणे राजन म्हणाला, ‘‘तूच कर पसंत वहिनी, नवरी तू निवडली आहेस ना?’’

यावेळी लग्न अगदी साधेपणानं झालं. चोवीस तास सनई वाजली नाही. वधूनं उंबऱ्यावरचं माप ओलांडलं, अगदी जपून. तांदूळ अगदी हलकेच विखुरले. राजनंनं एका झटक्यात ते गोळा केले. पण सुंदरीच्या आठवणीनं त्याचे डोळे भरून आले होते.

नवी सून शांतपणे घरात वावरत होती. सगळ्यांचे स्वभाव, आवडीनिवडी समजून घेत होती. सासऱ्यांची काळजी घेत होती. जावेला बरोबरीनं घरकामात मदत करत होती.

राजन आपली कामं आपणच करत होता. त्यानं यावेळी अनूला, नव्या नवरीला आधीच सांगितलं, ‘‘जे काही विचारायचं आहे, ते वहिनीला विचारून कर.’’

नव्या नवरीनं हुशारीनं सर्वांची मनं जिंकली. सुंदरीच्या कटु आठवणीतून सगळेच मुक्त झाले. बाबा, शिब्बू, राधिका सगळे तिच्यावर खूष होते. राजनलाही तिनं जिंकून घेतलं.

घरातली बरीचशी जबाबदारी आता राधिकेनं अनुवर सोपवली होती. एक दिवस तिजोरी उघडत तिनं म्हटलं, ‘‘अनू, आता हे सगळं तुझं आहे. नीट सांभाळायचं.’’

‘‘अजून अनु नवी आहे. एवढी जबाबदारी तिच्यावर सोपवू नकोस…थोडा वेळ जाऊ दे…’’ बाबांनी म्हटलं, त्यांना वाटत होतं, राजनला राग तर येणार नाही ना?

‘‘जबाबदारीच समर्थ बनवते माणसाला. मीही आले तेव्हा नवीच होते…शिवाय एकटी…पण सांभाळलंच ना? आता तर आम्ही दोघी आहोत.’’ राधिकेनं अनुला जवळ घेत म्हटलं. बाबांना खूप आनंद झाला.                                                                    – क्रमश :

सांझ की दुलहन – पहिला भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(पहिला भाग)

‘‘कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए, मेरे खयालों के आंगन में…’’ गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला अन् म्हणाला, ‘‘वहिनी, माझा ब्रेकफास्ट…मला लवकर जायचंय आज.’’

त्याच्याकडे बघत हसून राधिकेनं म्हटलं, ‘‘काय भाऊजी? विशेष खुशीत दिसताय?

हल्ली रोजच ‘सांझ की दुलहन’ आठवतेय तुम्हाला?’’

‘‘काही नाही गं, रेडियोवर ऐकलं अन् सहज गुणगुणलो.’’

‘‘एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं त्याचं काय कारण असतं माहीत आहे?’’

‘‘मला नाही माहीत,’’ काहीशा बेपवाईनं राजननं उत्तर दिलं.

‘‘याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठांवर येतं, तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते.’’

‘‘काही तरीच काय वहिनी…तू ही ना…’’

‘‘ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न.’’

‘‘नाहीए गं कुणी, असती तर सांगितलंच असतं ना?’’

‘‘खरं?’’

‘‘अगदी खरं!’’ हसून राजननं म्हटलं अन् तिच्याकडे बघत म्हणाला, ‘‘एक सांगू?’’

‘‘सांग ना.’’

‘‘वहिनी, मला ना, सांझ की दुलहनच पाहिजे.’’

‘‘आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कुणी नवरी बघितलीच नाहीए?’’

‘‘खूप खूप सुंदर! उतरून येणाऱ्या सायंकाळसारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात समावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानांमधून डोकावणाऱ्या कवडशांसारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी…अतिशय सुंदर…!!’’

‘‘म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचंय.’’

‘‘कविता नाही वहिनी. ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुळाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना? मला तिच हवीय, हुंडा नाही, मानपान नाही, काही नको.’’

‘‘म्हणजे तुम्ही शोधताय?’’

‘‘नाही, अजून तसं काहीच नाही.’’

‘‘मग?’’

‘‘आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते.’’

‘‘असं  मग काय म्हणते? सांगा की…’’

‘‘काही नाही. फक्त येते अन् जाते, उद्या येते एवढं वचन देते.’’

‘‘भाऊजी, स्वप्नं बघायला लागलात…चांगला संकेत आहे. बाबांना सांगते,’’

नाश्त्याची बशी त्याच्या हातात देत राधिका हसून बोलली.

राधिकेचा दीर राजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ अन् खूप प्रेमळ. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध. कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना, भेटलेल्या कोणी, आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अन् वर सहजपणे म्हणेल, ‘‘त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो…केली!’’

‘‘असे बरे भेटतात तुम्हाला चालता चालता?’’ राधिका म्हणायची.

‘‘भेटतात खरे!’’

‘‘भाऊजी मग ‘ती’ का नाही भेटत?’’

‘‘ती अशी नाही भेटायची वहिनी.’’

‘‘मग कशी भेटायची?’’

‘‘त्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चालता चालता साधी सामान्य माणसं भेटतात. पण वहिनी, ‘ती’? ती स्पेशल आहे ना?’’

इतके दिवस सगळे त्रस्त होते. राजन लग्नाला होकात देत नव्हता. लग्न करणारच नाही म्हणायचा. पण आज मात्र त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली होती.

राजन ऑफिसला निघून गेला अन् राधिका विचार करू लागली की इतका निर्मळ मनाचा अन् भाबडा आहे हा मुलगा, त्याला हवंय तसं पवित्र सौंदर्य आजच्या काळात असेल का? कुठं अन् कशी शोधावी त्याच्या आवडीची ‘सांझ की दुलहन’?

तेवढ्यात तिचा नवरा शिबू खोलीतून बाहेर आला. ‘‘कसला विचार करतेस?’’ त्यानं विचारलं.

‘‘इतकी सुंदर अन् पवित्र कुठं मिळेल?’’

‘‘काय घ्यायचंय तुला? कसली खरेदी?’’

‘‘भाऊजींसाठी नवरी…सांझ की दुलहन’’

‘‘उगीच चेष्टा करू नकोस.’’

‘‘अहो, एवढ्यात सांगून गेलेत, त्यांना कशी नवरी हवी आहे ती. स्वप्नातल्या सांजवेळेसारखी सुंदर, आज तर तुमचा भाऊ अगदी कवीच झाला होता.’’

‘‘भाऊ कुणाचा आहे? अन् लाडका दीर कुणाचा आहे?’’ राधिकेकडे हसून बघत शिबूनं म्हटलं, ‘‘चला, काही तरी बोलला एकदाचा.’’

‘‘काहीतरी नाही, बरंच बोललेत.’’

‘‘तर मग शोध ना जे काही हवंय त्याला ते.’’

‘‘कुठून आणायची अशी परी? तिचे चोचले असणार? ते कुणी पुरवायचे?’’

‘‘दीर भावजय आहेत ना चोचले पुरवायला. त्यानं बघून ठेवलीय का?’’

‘‘नाही.’’

‘‘मग?’’

‘‘अजून कल्पनेतच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल म्हणालेत.’’

‘‘मग एखाद्या कवीला गाठा, कविता लिहून घ्या अन् द्या त्याला दुलहन म्हणून.’’

‘‘अहो पण निदान आता लग्नाला होकार तरी दिलाय ना? प्रयत्न करायलाच हवेत.’’

‘‘तर मग करा प्रयत्न. येडाच आहे…मी निघालो कामावर?’’ अन् शिबू निघून गेला. हा आणखी एक येडा. सतत काम काम. थांबायचं नाव नाही. सतत उंच आकाशात भराऱ्या जमीनीवर येणं ठाऊकच नाही. कुणी अडवणारं नव्हतं. शिबूनं आपल्या कामाचा पसारा एवढा वाढवालाय की आता त्याला स्वत:साठी वेळ देता येत नाहीए.

राधिका त्या उंच उडणाऱ्या पक्ष्याकडे बघत होती. आता कधी तरी रात्रीच तो खूप उशिरा घरी परतणार…सायंकाळी परतणारे पक्षी वेगळेच असतात. शिबू चांगला होता, पण बायकोची काळजी घेणं त्याला जमत नव्हतं. त्याचा तो पिंडच नव्हता.

तेवढ्यात बाहेरून सासरे म्हणाले, ‘‘सूनबाई, दूधवाला आलाय.’’

‘‘हो बाबा…’’ तत्परतेनं पातेलं घेऊन राधिका बाहेर धावली. दूध घेतलं अन् म्हणाली, ‘‘बाबा, तुम्हीही नाश्ता करून घ्या.’’

‘‘मांड टेबलवर, आलोच.’’

त्यांना वाढता वाढता राधिकेनं म्हटलं, ‘‘बाबा, एक सांगायचं होतं…’’

‘‘बोल ना?’’

‘‘राजन भाऊजी लग्न करायला तयार झालेत.’’

‘‘अरे व्वा! कशी हवीये मुलगी?’’

‘‘खूप खूप सुंदर हवी आहे.’’

‘‘एवढंच ना? अगं वाटेल तेवढ्या सुंदर मुली आहेत. त्यानं फक्त पसंत करावी, बार उडवून देऊ. सूनबाई, तू ही आघाडी सांभाळ. मी ती सांभाळतो.’’ बाबांनाही एकदम उत्साह आला होता.

‘‘कधीपासून दुसऱ्या सुनेची वाट बघत होतो शिवाय…’’

‘‘शिवाय काय बाबा?’’

बाबा काहीच बोलले नाहीत.

राधिकाला कळत होतं. तिच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. अजून घरात बाळाची चाहूल लागली नव्हती. बाबांची तिच खंत होती.

बाबांकडे एक नातलग आले होते. ते म्हणाले, ‘‘अहो, मुलगी तुम्ही बघा, होकार द्यालच. एकदा त्यांच्या घरी जाऊन या.’’

बाबांनी त्या नातलगानं दिलेली माहिती राधिकेला दिली. राधिका सगळ्या घरादाराची काळजी घेते. सगळ्यांना आनंद वाटावा म्हणून झपाटते. तिच्या मनांत शंका आली. राजन खूपच भाबडा आहे अन् ही मुलगी हॉस्टेलला राहिलेली. घरात जमवून घेईल का?

रात्री उशिरा शिबू आल्यावर तिनं विषय काढला.

शिबूनं समजूत काढली, ‘‘होस्टेलला राहणारी प्रत्येक मुलगी लवंगी मिरची नसते गं! स्मार्ट असेल, कारण तिथलं वातावरणच तसं असतं…तू काळजी करू नकोस.’’

बाबांनी फर्मान काढलं, ‘‘आज सगळे अमुक अमुक ठिकाणी जाणार आहेत. राजन, तुलाही यावं लागेल.’’

राजननं काहीही न विचारता ‘हो’ म्हटलं. ‘खरंच किती साधा आहे, कुठं जाणार, कशाला जाणार एवढंही विचारलं नाही,’ राधिकेच्या मनात आलं.

त्यांच्या घरी गेले. मुलगी समोर आली…खरोखरच अप्रतिम लावण्य होतं. बघताच राधिका म्हणाली, ‘‘भाऊजी, सांझ की दुलहन, हीच आहे.’’

हसून राजननं संमती दिली.

इतर काही ठरवायचं नव्हतंच. पण बाबांनी ठामपणे एवढं मात्र सांगितलं, ‘‘आम्हाला काहीही नको, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, त्याचा राग मानू नये. आमच्या घरात मोठी सून आहे. सगळं घर ती कौशल्याने सांभाळते. तिच्यामुळेच घरात शांतता, सौख्य, समाधान अन् आनंद आहे. नव्या सुनेनं ते सौख्य, तो आनंद, समाधान कायम ठेवावं.’’

राधिका विचार करत होती, या सुंदरीनं स्वत:च्या हातानं कधी ग्लासभर पाणीही घेतलं नसेल…किती नाजूक आहे ही…नखशिखांत सौंदर्य आहे.

घरी आल्यावर एकदाच राधिकेनं म्हटलं, ‘‘एवढं हे सौंदर्य, हे लावण्य आपण सांभाळू शकू? ती छान काम करेल?’’

‘‘नाही केलं तर आपण करू,’’ सहजपणे राजन उद्गारला.

‘‘तिचे नखरे, कोडकौतुक, चोचले झेपतील आपल्याला?’’

‘‘मी करेन ना सर्व,’’ राजन म्हणाला.

शिबूनं म्हटलं, ‘‘राधिका, नको काळजी करूस.’’

बाबांनीही म्हटलं, ‘‘सूनबाई, सगळं राजनवर सोपव. ती अन् तो बघून घेतील.’’

दिवसभर कामानं क्षीणलेली राधिका अंथरूणावर पडली, पण झोप लागत नव्हती. एकच गोष्ट मनात येत होती, राजन फार सरळ मनाचा अन् भाबडा आहे. ही सुंदरी त्याला समजून?घेईल का?

लग्नघरात जोरात तयारी सुरू झाली. राधिकेलाच सगळं बघायचं होतं. प्रत्येक जण तिलाच हाक मारायचा. पायाला चक्र लावून ती फिरत होती. नवरानवरीच्या पोषाखाबद्दल चर्चा झाली.

बाबांना गंमत वाटायची. ते म्हणायचे, ‘‘मॉडर्न युग आहे, चालू द्या.’’

नवरीच्या साड्या खरेदी केल्यावर राजननं राधिकेला विचारलं, ‘‘वहिनी, तुझी साडी मी पसंत करू की दादा करेल?’’

‘‘तुमच्या दादानं यापूर्वी कधी काही पसंत केलं होतं तर आत्ता करतील?’’ राधिकेनं म्हटलं. तिच्या मनात आलं की शिबूनं तर एवढ्या वर्षांत कधी म्हटलं नाही की ही साडी तुला शोभून दिसतेय की या साडीत तू किती सुंदर दिसतेस…आतासुद्धा त्याला खरेदीला चल म्हटलं तर ‘‘तुम्हीच जा’’ म्हणाला अन् कामावर निघून गेला. नकळत तिचे डोळे पाणावले.

‘‘वहिनी, काय झालं?’’

‘‘काही नाही…चला माझी साडी निवडूयात.’’

दुकानदारानं बऱ्याच साड्या दाखवल्या, जरीची सुंदर काळी साडी राजननं निवडली.

‘‘नाही भाऊजी, लग्नात काळा रंग अशुभ मानतात.’’

‘‘कुणी सांगितलं?’’

दुकानदारही म्हणाला, ‘‘मॅडम हा रंग तर सध्या फॅशनमध्ये आहे. तुमच्या गोऱ्या रंगावर ती खूप खुलून दिसेल.’’

शेवटी एक काळी अन् एक हिरवीगार अशा दोन साड्या राजननं वहिनीसाठी खरेदी केल्या.

घरी परतताना राजन म्हणाला, ‘‘तुझं दु:ख मला कळतंय वहिनी. मी मात्र सुंदरीला सुखात ठेवणार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत हे मी बघेन अन् आलेच अश्रू तर ओठांनी टिपून घेईन.’’

‘‘भाऊजी, तुम्ही खरोखर खूप चांगले आहेत.’’ उदास हसून राधिका म्हणाली.

‘‘वहिनी, तिला एकदा घरात येऊ दे, ती तुझी मैत्रीण म्हणूनच वागेल. तू तिची थोरली ताई असशील.’’

राधिकेला तर आता त्या संध्यासुंदरीचा हेवाच वाटायला लागला. पण ती खुशीत होती. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. सगळे राधिकेच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत होते. त्यामुळे ती सुखावली होती. थोरली जाऊ म्हणून कामं करत मिरवतही होती. बाबांनी तीन दिवस सतत सनई चौघडा लावला होता. सनईच्या सुरातच नव्या सुनेनं उंबरठ्यावरचं तांदळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. कुणीतरी म्हणालं, ‘‘सूनबाई तांदूळ उधळेल अन् राजननं ते गोळा करायचे.’’

राधिकेच्या मनात आलं तिला आधीच सांगायला हवं होतं, माप हळूच ढकलं…पण तो बोलली नाही.

काही दिवसातच राधिकेच्या मनातली शंका खरी ठरली. सुंदरी खरोखर राणीच होती. सकाळी दहा वाजता झोपून उठायची. बाबांना चोरून राजन तिला चहा करून द्यायचा.

बाबांनी सुंदरीला म्हटलं, ‘‘राधिकेला घरकामात मदत करत जा,’’ तरी ती असहाय्यपणे म्हणाली, ‘‘मला येत नाहीत कामं करायला…मी कशी करू? काही बिघडलं तर?’’

राधिकानं बाबांना सांगितलं, ‘‘असू देत बाबा, ती झोपूनच उठते किती उशीरा.’’

तिचं स्वर्गीय सौंदर्य कोमेजून जाऊ नये म्हणून राधिका तिला स्वयंपाकघरात येऊच देत नसे. तिच्या ते पथ्यावरच पडायचं. तिचे सगळे नखरे राधिका सहन करत होती.

सुंदरी घरात आल्यावर राधिकेला मैत्रीण मिळाली नाही, उलट ती अधिकच एकटी झाली. कारण आता राजनही सतत सुंदरीभोवती असायचा. पूर्वी राधिका आपलं सुखदु:ख त्याच्याजवळ बोलायची. स्वयंपाकघरात ती काम करत असताना तो तिच्याबरोबर गप्पा मारायचा. पण आता तो सुंदरीजवळ असायचा. आपलं सगळं वागणं राधिका सहन करते, तिच्या चुकाही ती सावरून घेते. तिला कधी कुणासमोर उघडं पडू देत नाही हे सुंदरीच्या लक्षात आलं होतं. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. घरातलं वातावरण बिघडत होतं. राधिका जिवाचा आटापिटा करून सगळं सांभाळत होती. वातावरण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करत होती. पण सुंदरीनं जणू घरातली शांतता भंग करण्याचा, घरातले नियम, मर्यादा मोडण्याचा चंगच बांधला होता. रोज मैत्रिणीबरोबर पार्टीला जायचं.

एक दिवस बाबांनी यावर आक्षेप घेतला.

‘‘मी करते त्यात वाईट काय आहे? माझ्या मैत्रीणींबरोबरच असते ना?’’ तिनं बाबांनाच उलट विचारलं.

‘‘राजनला विचारत जा.’’

राजननं हो म्हटलं.

तिचा घराबाहेर राहण्याचा वेळ वाढत होता. बाबांनी म्हटलं, ‘‘राजन, अरे इतकी सूट देणं किंवा तिनं एवढं स्वैरपणे वागणं बरोबर नाही. शेवटी ती घरातली सून आहे. तुझी वहिनीही आहे ना घरात? ती कधी अशी वागली नाही.’’

‘‘ठिक आहे बाबा, तिच्या मैत्रिणीबरोबरच जाते ना? तुम्ही नका टेंशन घेऊ…मी आहे?’’

‘‘तुला ठाऊक आहे का, यावेळी होस्टेलची मुलंही बरोबर आहेत?’’ बाबा जरा रागानंच म्हणाले.

पहिल्यांदाच, आयुष्यात पहिल्यांदाच राजननं बाबांना प्रत्युत्तर दिलं, ‘‘बाबा, ती होस्टेलमध्ये राहून शिकली आहे. मोकळ्या वातावरणात वाढली, वावरली आहे. तिला एकदम कसं नको म्हणू? हळूहळू समजेल तिला. मी समजावेन.’’

बाबा बोलले नाहीत. पण ते दुखावले गेले आहेत हे राधिकेच्या लक्षात आलं.

चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ आली. कोमलपणे म्हणाली, ‘‘बाबा, सध्या नवी आहे ती. एखादं बाळ झालं की आपसूक घरात राहील. बघा तुम्ही…’’ तिनं चहाचा कप बाबांच्या हातात दिला. दोघंही एकमेकांकडे बघून हसली.          (क्रमश:)

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें