पेरले तेच उगवले

कथा * डॉ. नीहारिका

‘‘तू जेव्हा किंचाळतेस ना त्यावेळी अगदी जंगली मांजरीसारखी दिसतेस. केस थोडे अजून पिंजारून घे.’’ सौम्य दातओठ खात ओरडला.

‘‘अन् तू? थोबाड बघितलंस कधी आरशात? ओरडून ओरडून बोलतोस तेव्हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोस.’’

मी आणि सौम्य अगदी खालच्या पातळीवर येऊन भांडतो तेव्हा आपण सभ्य आहोत, चांगल्या वस्तीत राहातो वगैरे गोष्टींना अर्थ उरत नाही. फक्त आमचा मुलगा क्रिकेट खेळायला किंवा अभ्यासाला केव्हा बाहेर पडतो याचीच आम्ही वाट बघत असतो. पूर्वी आमच्यापैकी कुणी एक रेडिओ किंवा टीव्ही किंवा रेकॉर्डप्लेअर ऑन करत असे. हेतू हा की भांडणाचा आवाज आसपासच्या घरात ऐकू जाऊ नये. पण आता तर आम्ही त्या आवाजाच्या वरचढ आवाजात भांडतो. लोकांना पूर्वी आम्ही आदर्श नवराबायको वाटत असू पण आता मात्र त्यांच्या नजरेत उपहास दिसतो.

आमचा प्रेमविवाह. मी अठरा वर्षांची होते अन् सौम्य छत्तीसचा. त्यांची बायको एका अपघातात निवर्तली होती. त्यांची दोन्ही मुलं आजोळी होती अन् सौम्य अगदी उमदेपणाने, मजेत आयुष्य जगत होता. त्यांच्यात काय नव्हतं? हसरा, देखणा चेहरा, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, शायरी, नाटक, कविता, सिनेमाची आवड, बेभानपणे मोटरसायकल चालवणं…माझं अल्लड वय, स्वप्नाळूवृत्ती अन् सिनेमाची आवड, सिनेमातलं जग खरं मानून चालण्याचा भाबडेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या प्रेमात पाडायला पुरेशा होत्या. मी पूर्णपणे सौम्यमय झाले होते. त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं. त्याचं वागणं, बोलणं नाटकी, बेगडी आहे हे मला कबूलच नव्हतं. त्याच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही अन् तो प्रेम करतोय माझ्यावर हा माझा फार मोठा सन्मान आहे हेच मला खरं वाटत होतं.

आईबाबांना सौम्य अजिबात आवडला नव्हता. ‘‘छत्तीस वर्षांचं वय आहे. या वयाला चांगली नोकरी, जबाबदार वागणूक, समाजात आदरसन्मान मिळवतो माणूस. हा तर इतका थिल्लर वागतो. नातेवाईकही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तो तुला काय सांभाळणार आहे? सगळं आयुष्य कसं काढशील त्याच्याबरोबर?’’ आई वेगवेगळ्या पद्धतीने मला समजावत होती.

मीच उलट म्हणायची, ‘‘तो चांगला हसतो, हसवतो यात वाईट काय आहे? उलट कौतुक केलं पाहिजे. किती बेदरकारपणे आयुष्य जगतोए तो…’’

वडील फार अपसेट होते. दिवसदिवस वाचलेल्या पेपरमध्ये काय बघत बसायचे कुणास ठाऊक.

मी, आई, दोघं धाकटे भाऊ गप्प होतो. बाबांना प्रचंड टेन्शन आलं होतं.

‘‘शालिनी…’’ बाबांनी हाक मारली.

नेहमीची शालू हाक नव्हती. याचा अर्थ त्यांना खूपच हाय टेन्शन आलेलं आहे.

‘‘शालिनी इथे बैस. माझं बोलणं नीट ऐकून घे. मी काय म्हणतो ते समजून घे. मी चौकशी केली आहे. सौम्य चांगला मुलगा नाहीए. त्याच्या पहिल्या बायकोने याच्या बेताल वागण्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलं आजोळी पोहोचवून हा इथे उनाडतोय. त्यांची काळजी घेत नाही, पैसे पाठवत नाही. गुंड मित्रांकरवी सासूसासऱ्यांना धमकी दिलीय, तोंड उघडलं, पोलिसात गेलात तर घरात चौघांचे मुडदे पडतील म्हणून. घाबरून आपली नातवंडं अन् स्वत:च्या जिवाच्या भीतीने ते लोक गप्प बसलेत.

‘‘असा निष्ठूर अन् बेजबाबदार पुरुष तुला कसा अन् काय सुख देणार? कमवत नाही, मुजोर आहे. पुन्हा तुझ्या अन् त्याच्या वयात अंतर किती जास्त आहे. जोडीदार इतका मोठा नसावा. शांतपणे विचार कर. प्रेम करणं चांगलं, पण ते डोळसपणे करावं. आंधळं प्रेम काय कामाचं? तुला चांगल्या शाळेत घातलं. चांगले संस्कार दिले अन् तू अशी विवेक सोडून का वागते आहेस? नीट विचार कर, एकदा नाही दहादा विचार कर अन् मग निर्णय घे.’’

खरं तर बाबा अत्यंत धीराचे. ठामपणे बोलणारे, दृढपणे वागणारे. पण मला समजावताना भावनाविवश झाले होते. त्यांची हतबलता बघून मी अधिकच उद्धट अन् उद्दाम झाले होते. मी क्षणाचाही विचार न करता ओरडून बोलले.

‘‘माझा निर्णय झालाय, बाबा. एकदा, दहादा, शंभरदा विचार केला तरी मी लग्न सौम्यबरोबरच करणार आहे. तुम्ही होकार दिलात तरीही अन् नकार दिला तरीही…’’ मी खरं तर मर्यादेच्या बाहेर गेले होते, पण विवेकच नव्हता तर काय करणार?

‘‘ठीक आहे. तर मग माझाही निर्णय ऐकून घे. आजपासून तुझा अन् आमचाही काही संबंध नाही. मी, आई, दोघं भाऊ तुझे कुणीही नाही. मी मरेन तेव्हा संपत्तीतला तुझा वाटा घ्यायला फक्त ये. नाऊ गेट लॉस्ट!’’ बाबा नेहमीसारखेच खंबीर झाले होते.

मी तरी कुठे घाबरले होते? मीही म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुमची संपत्ती नकोय मला, मी कधीही इकडे फिरकणार नाही. बाय…’’ धाडकन् दरवाजा आपटून मी घराबाहेर पडले.

त्याच रात्री एका देवळात आम्ही लग्न केलं. सौम्यचे चार मित्र फक्त होते. माझं नाव सौम्यने शालिनीऐवजी सौम्या केलं. मिसेस सौम्या सांगताना मला स्वत:चाच अभिमान वाटत होता.

लग्नानंतरचे काही दिवस खूपच छान होते. अगदी सिनेमांत दाखवतात तसे किंवा कथाकादंबरीत वर्णन असतं तसे…प्रेमाचे, सुखाचे, लवकरच बाळाच्या येण्याची चाहूल लागली. माझ्यासाठी ती एक अद्भूत घटना होती. आई होण्याच्या कल्पनेनेच मी मोहरले, पण सौम्याला दोन मुलं आधीची होती. त्याला या प्रसंगाची अपूर्वाईच नव्हती. अजिबात उत्साह नव्हता. मीही या गोष्टीकडे समजुतीनेच बघत होते. मुळात मी समजूतदारच होते. पुरुषाचं, त्यातून दोन मुलं असलेल्या बापाचं मानसशास्त्र वेगळं…माझ्यासारख्या अल्लड तरुणीचं मानसशास्त्र वेगळं. त्यामुळे मी आई होण्याच्या माझ्या आनंदात कुठेही कमतरता केली नाही. पूर्ण उत्साहाने मी माझं गरोदरपण एन्जॉय केलं.

दिवस भरल्यावर बाळ जन्माला आलं. कळा सोसताना ब्रह्मांड आठवलं. आईशी संबंध तुटला होता पण त्या क्षणी सौम्यने आपल्याजवळ असावं असं फार वाटत होतं. माझी काळजी न करता तो इस्पितळातल्या लेडी स्टाफशी हास्यविनोद करण्यात गुंतला होता. त्याच्या या दिलखुलास वागण्यावरच तर मी भाळले होते. तक्रार कुणाजवळ अन् काय करणार?

आईपणाच्या जबाबदारीत मी पूर्णपणे गुरफटले होते अन् सौम्य मात्र मोलकरीण, मला अन् बाळाला तेलपाणी करणारी बाई, मला भेटायला येणाऱ्या शेजारणी किंवा माझ्या मैत्रिणींना हास्यविनोदात चिंब भिजवण्यात गर्क होता. त्याचा हा जिव्हाळा माझ्या बाळापर्यंत मात्र पोहोचत नव्हता. माझं बाळ म्हणायचं एवढ्यासाठी की सौम्यने आधीच सांगितलं होतं, हे बाळ फक्त तुझं अन् तुझंच आहे. माझी आधीची दोन मुलं आहेत. बिचारी आजोळीच आयुष्य कंठताहेत.

सौम्यचं हे सरड्याप्रमाणे रंग बदलणं बघून मी चकित झाले. आमच्या प्रेमात असण्याच्या दिवसांत त्याने चुकूनही कधी बायकोमुलांचा उल्लेख केला नव्हता. आताच त्याला त्या बिचाऱ्या, आईवेगळ्या पोरांची आठवण येत होती. इथूनच माझ्या प्रेमाच्या आरशाला तडा गेला होता.. दिवसेंदिवस नवेनवे तडे वाढतच होते. ज्या दिवशी मी त्याला त्याच्या मित्राशी बोलताना ऐकलं, ‘‘ही मूर्ख बाई आपल्या बापाची सगळी इस्टेट सोडून रिकाम्या हाताने माझ्या पैशांवर मजा मारायला आली आहे,’’ त्या दिवशीच प्रेमाच्या दर्पणाचा चक्काचूर झाला. सौम्य सांगत होता, ‘‘हिचं रूप अन् तारुण्य याचा मोह पडला मला. अन् मी लग्न करण्याचा मूर्खपणा करून बसलो, एरवी अशा अनेक पोरींना फिरवून, वापरून सोडून दिलंय मी.’’

त्यानंतर आमच्यात फक्त भांडणं अन् भांडणंच होती. घर सोडलं नाही मी पण माझ्यासाठी अन् माझ्या बाळासाठी एक साधीशी नोकरी करून आमच्यापुरतं कमवत होते. लग्नाला आठ वर्षं झाली होती.

गर्भाशयाला कॅन्सरचा धोका असल्याचं निदान झालं अन् ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला. गर्भाशय काढण्याचं मेजर ऑपरेशन…जवळ कोणीही नाही जो आधार देईल, धीर देईल. माझा सात वर्षांचा मुलगा माझा हात घट्ट धरून बसला आहे. माझे अन् त्याचेही हात घामेजले आहेत. त्याच्या गोड, कोवळ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली आहे. आईला काय झालंय? त्याला कळत नाहीए. वडील कधीच त्याचे नव्हते. माझ्या मनात येतंय, माझं बरंवाईट झालं तर माझ्या बाळाला कोण बघणार? सौम्यच्या आधीच्या बायकोला निदान माहेर होतं. ती मुलं आपल्या आजोळी आहेत. माझ्या बाळाला तर तेही नाही. कुठे जाईल तो? काय करेल?

नर्स, वॉर्डबॉय सगळ्यांची धावपळ सुरू आहे. ऑपरेशनच्या आधीची ही सगळी लगबग बघून मीही खूप घाबरले आहे. सौम्यने यावेळी येऊन धीर द्यावा असं फार वाटतंय. पण तो बाहेर नर्सेसबरोबर थट्टा, विनोद करतोय. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय.

‘‘मॅडम, मला हे सगळं बघवत नाही. मी तर ऑपरेशनच्या नावानेच घाबरतो. पण तुम्ही सगळ्या हुशार अन् देखण्या पऱ्या इथे आहात म्हणून बरंय, नाही तर या नरकात माझा जीवच गेला असता.’’

मी खोलीच्या दाराकडे बघत होते. स्टे्रचर घेऊन नर्स व वॉर्डबॉय आले. पण सौम्य नाही. बाळाने माझा हात सोडला अन् मला मिठी मारली. तो गदगदून रडू लागला.

‘‘बाळा, रडू नकोस. तू तर शूरवीर आहेस. शूर शिपाई आहेस. मला काही झालं नाहीए. बघ, मी पटकन् बरी होऊन येतेय…’’ मी त्याला थोपटत धीर दिला.

‘‘चला, चला, घाई करा मॅडम, उशीर होतोय. डॉक्टर आम्हाला ओरडतील,’’ सिस्टर म्हणाली.

मी स्ट्रेचरवर आडवी झाली. ‘‘चला,’’ मी म्हटलं. ‘‘का हो, माझे मिस्टर कुठे आहेत?’’ माझ्या प्रश्नाला उत्तर वॉर्डबॉयने दिलं.

‘‘ते आम्हा सगळ्या स्टाफसाठी मिठाई घ्यायला गेलेत. म्हणत होते, आज त्यांचा मुक्ती दिवस आहे. येतील एवढ्यात.’’

स्टे्रचर ढकलत त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं. तिथे आले अन् माझं अवसानच संपलं. एका अनामिक भीतीने मनात ठाण मांडलं. भीतीची शिरशिरी थेट मनात शिरली. पांढऱ्या टोप्या अन् अॅप्रन…हातात रबरी मोजे. चेहरे कुणाचेच दिसत नाहीएत. ते डोळे फक्त बघताहेत माझ्याकडे. काय बघतात? माझी असहायता? माझा मूर्खपणा? माझा आजार?  ते माझा आजार दूर करतील की माझं अस्तित्वच मिटवून टाकतील? मला एकाएकी आई, बाबा, दोघां भावांची फार फार आठवण आली.

तेवढ्यात मला अंधुकसा चेहरा दिसला, सौम्यचा. एका नर्सच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. त्याचा आवाज मात्र माझ्या कानात शिरला. ‘‘अरे, युटरस काढायचंय…युटरस नाही म्हटल्यावर बाईचं बाईपणच संपलं ना? बायको काय कामाची मग? म्हणजे मी मुक्त झालो…स्वतंत्र झालो…तसा मी बंधमुक्त…मला बंधनं आवडत नाही. मी आज या झाडावर तर उद्या दुसऱ्या झाडावर…मी स्वतंत्र…मी मुक्त हा:हा:हा:’’

आई, बाबा, मला क्षमा करा. तुम्ही मला शिकवलंत, संस्कार दिलेत पण मीच कमी पडले. मी बाभळीचं रोप लावलं, त्याला फळं कशी येणार? मी जे पेरलं तेच उगवलंय…मला क्षमा करा…

दुरून कुठून तरी अस्पष्ट ऐकलं मी. ‘‘डॉक्टर, डॉक्टर बघा, पेशंट बेशुद्ध होतेय…अजून क्लोरोफॉर्म दिलाच नाही…बी.पी. लो, खूपच लो झालंय…डॉक्टर हरी अप.’’

अन् पलीकडे अंधार…दाट अंधार पसरला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें