नवजात बाळाच्या या समस्यांमुळे घाबरून जाऊ नका

* डॉक्टर व्योम अग्रवाल

रात्री ३ च्या सुमारास मला अंजनीचा फोन आला. अतिशय घाबरलेल्या आवाजात सुरुवातीलाच तिने अपरात्री फोन केल्याबद्दल माझी माफी मागितली. त्यानंतर रडत म्हणाली की, मागच्या अर्ध्या तासापासून तिचे ५ दिवसांचे बाळ खूपच अस्वस्थ आहे. त्यानंतर अचानक जोरात ओरडून मोठयाने रडू लागली. ५ मिनिटांपूर्वी त्याने शी-शू केली आणि आता निपचित पडलेय, असे तिने मला सांगितले.

बाळाच्या मूत्रमार्गात अडचण, संसर्ग किंवा त्याला मूत्रपिंडाचा त्रास झाला असावा, अशी तिला भीती होती. मी तिची समजूत काढत सांगितले की, नवजात बाळाबाबत असे होतेच. यामागचे कारण कदाचित असे असते की, बाळाचे त्याच्या मूत्र विसर्जनावर नियंत्रण नसते. त्यामुळे त्याचा मूत्रमार्ग अचानक बंद होतो, जेणेकरून त्याचे मूत्र सतत टपकत राहत नाही. सर्वसामान्यपणे बाळ २ महिन्यांचे होइपर्यंत असा त्रास होतोच. त्यामुळे घाबरण्याची किंवा बाळाची तपासणी करून घेण्याची गरज नसते. अंजनीला याबाबतची माहिती आधीच असती तर ती आणि तिच्या कुटुंबावर (आणि माझ्यावरही) रात्रीच्यावेळी यावर चर्चा करण्याची वेळ आली नसती.

बाळाचा जन्म कुटुंबात आनंद घेऊन येतो. विशेषत: पहिल्यांदाच आई होणाऱ्या तरुणीसाठी हा क्षण आणि अनुभव अविसमरणीय असतो. आजी, वहिनी, नणंद अशा घरातल्या अनुभवी बायका नव्या आईला बाळाची काळजी कशी घ्यावी, हे शिकवत असतात. बाळाच्या आजारावर सोपे उपाय सांगतात. विभक्त कुटुंबात आपल्या माणसांचे सल्ले मिळू शकत नाहीत, कारण आपली माणसे सोबत राहत नसतात. शिवाय त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला योग्यच आहे, हेही अनेकदा ठामपणे सांगता येत नाही.

बाळांमधील सामान्य समस्या

२४ वर्षांच्या अनुभवातून माझ्या हे लक्षात आले आहे की, नवजात बाळाला घरी घेऊन जाणाऱ्या बहुतेक मातांना एकसारख्याच समस्या जाणवतात. त्यावेळी डॉक्टरांशी लगेचच संपर्क न झाल्यामुळे किंवा माहितीच्या अभावामुळे त्या अस्वस्थ होतात. आईपणाच्या उंबरठयावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या महिलांना येणाऱ्या अशाच काही समस्यांबाबत माहिती करून घेऊया.

शरीरावर लाल पुरळ : काही दिवसांपूर्वी एक बाळ श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे जन्मानंतर ३ दिवस आमच्याच रुग्णालयात होते. चौथ्या दिवशी बाळाला स्तनपानासाठी आईकडे देण्यात आले. काही वेळानंतर बाळाची आजी रागाने ओरडत आली आणि जाब विचारू लागली की, बाळाला कोणते औषध दिले? त्याला अॅलर्जी झालीय. अंगावर पुरळ उठलाय.

आमच्या डॉक्टरांनी लगेचच जाऊन बाळाची बारकाईने तपासणी केली. नंतर त्याच्या नातलगांना समजावले की, बहुसंख्य बाळांच्या अंगावर जन्मानंतर दुसऱ्याच दिवसापासून लाल पुरळ येते. याला इरिदेमा टॉक्सिकम म्हणतात. बाळ पहिल्यांदाच हवेच्या संपर्कात आल्यामुळे त्याला होणारी ही एक प्रकारची अॅलर्जी असते. ती बाळासाठी अपायकारक नसते. ६-७ दिवसांत आपोआप ही अॅलर्जी बरी होते.

हिरव्या रंगाची शी : सर्वसामान्यपणे जन्मल्यानंतर पहिले २ दिवस बाळाला हिरव्या, काळया रंगाची शी होते. पुढील काही दिवस हा रंग बदलत राहतो आणि १० दिवसांपर्यंत सामान्य रंग येतो. बाळाला यकृताचा रोग असल्यास त्याला पांढरट रंगाची शी होते. बाळ फक्त स्तनपानावरच असते तेव्हा त्याने दिवसातून अनेकदा शी केली तरी त्यात चिंता करण्यासारखे काहीच नसते. त्यामुळे आईने घाबरून जायचे नसते.

बऱ्याचदा बाळाला जुलाब होणे आणि त्याचा बदललेला रंग पाहून आई खूपच काळजीत पडते. पण प्रत्येक वेळी स्तनपानानंतर शी करणे हे तितकेच सामान्य आहे जितके ३-४ दिवस पोट साफ न होणे. मी प्रत्येक आईला समजवतो आणि न विचारताही सल्ला देतो की, ही घाबरण्याची गोष्ट नाही. पण जर बाळ थकल्यासारखे दिसत असेल, दूध पीत नसेल किंवा कमी शी करू लागले असेल तर मात्र बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घ्यायलाच हवा.

स्तनपान : एके दिवशी एका नवजात बाळाच्या आईने मला विचारले की, बाळ फक्त स्तनपानावर आहे, तरीही दिवसातून १५-२० लंगोट खराब करते. मी विचारल्यावर तिने सांगितले की, ती एका स्तनातून दूध पाजायला सुरुवात करते आणि ५ ते १० मिनिटांनंतर दुसऱ्या स्तनातले दूध पाजते. तिने सांगितले की, ती असे एका स्तनातील दूध संपले म्हणून करत नाही तर बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे थकवा येत असल्याने करते.

प्रत्यक्षात हेच बाळाला जास्त शी होण्यामागचे कारण आहे. आईच्या स्तनात सुरुवातीचे दूध साखरेसारखे असते आणि त्यानंतरचे चरबीयुक्त असते. चरबीमुळे पोट भरते, तर साखरेमुळे शी जास्त होते. बाळाच्या आरोग्यासाठी हे दोन्ही त्याच्या पोटात समान मात्रेत जाणे गरजेचे असते. म्हणूनच तिला मी समजावले की, एका वेळेस बाळाला एकाच स्तनातले दूध पाजावे. अगदीच गरज भासली तरच दुसऱ्या स्तनातले दूध पाजावे. २ दिवसांनंतरच तिचा फोन आला की, बाळामध्ये बरीच सुधारणा जाणवत आहे.

दूध ओकणे : क्वचितच असे एखादे बाळ असते जे दूध ओकत नाही. काही सामान्य बाळे तर नाकातूनही दूध बाहेर टाकतात. बाळाचे वजन नीट वाढत असेल, दूध पिताना ते श्वास कोंडल्यासारखे करत नसेल, शी-शु व्यवस्थित होत असेल, दूध ओकल्यावरही त्याला लगेचच भूक लागत नसेल, पोट फुगल्यासारखे वाटत नसेल आणि त्याने ओकलेले दूध हिरव्या रंगाचे दिसत नसेल तर त्याने दूध ओकून टाकणे, ही सामान्य बाब आहे. मात्र जर बाळाचे वजन वाढत नसेल तर समजून जावे की, काहीतरी गडबड आहे आणि लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

झोपण्या-उठण्याची सवय : बाळाच्या जन्मानंतर काहीसा थकवा आलेल्या आईला सर्वात जास्त याचा त्रास होत असतो की, बाळ दिवसा दूध पिऊन झोपते, पण रात्री प्रत्येक १०-२० मिनिटांनंतर उठते आणि भूकेने रडू लागते. याचा संबंध गर्भावस्थेतील आईच्या उठण्या-झोपण्याच्या चक्राशी जोडलेला असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर दिवसा आई चालते तेव्हा बाळ झोके मिळाल्यासारखे आईच्या पोटात शांत झोपते. रात्री आई झोपल्यावर बाळ उठते. फिरू लागते. पाय वरखाली करू लागते. जास्त सक्रिय होते. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या दिवसरात्रीच्या या सवयी बदलण्यासाठी किमान २ महिने लागतात.

त्यामुळेच रात्री बाळ जगत राहते. जागेपणी त्याला दोनच कामे येतात. रडणे आणि दूध पिणे. हेच त्याच्या रात्रीच्या जागण्याचे आणि रडण्याचे कारण असते. त्यामुळे आईने दिवसा आराम करावा, जेणेकरून रात्री जागून बाळाला व्यवस्थित दूध पाजता येईल.

अधूनमधून बाळाला थोपटणे, खोलीत सौम्य प्रकाश, सुमधुर हळू आवाजातले संगीत बाळाला रात्री झोपण्यासाठी मदत करते. काहीही झाले तरी बाळाचे रात्रीचे रडणे म्हणजे त्याला भूकच लागली आहे, असे समजू नये. आई आणि बाळाच्या सुदृढ आरोग्यासाठी ६ महिन्यांपर्यंत बाळाला फक्त आईचेच दूध पाजायला हवे.

नवजात मुलींमध्ये रक्तस्त्राव : आपल्या मुलीचे डायपर बदलताना तिच्या योनीमार्गातुन रक्त येत असल्याचे सरीनच्या लक्षात आले. त्यामुळे ती घाबरली. नवजात मुलीमध्ये जन्माच्या पहिल्या आठवडयात मासिक पाळीच्या वेळेसारखा रक्तस्त्राव होऊ शकतो. तो ५-६ दिवसांनंतर थांबतो. हा रक्तस्त्राव  काही थेंबाइतकाच असतो. तो काही दिवसांनंतर स्वत:हूनच थांबतो. जन्मानंतर आईचे हार्मोन्स बाळाच्या शरीरापासून वेगळे झाल्यामुळे असे घडते. यात चिंता करण्यासारखे काहीच नसते.

प्रत्येक आईला एवढाच सल्ला द्यावासा वाटतो की, बाळाबाबत एखादी समस्या आल्यास स्वत:च डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करू नका. बाळाला लगेच बालरोगतज्ज्ञाकडे घेऊन जा.

असा द्या नवजात बाळाला ममतेचा कोमल स्पर्श

* चाईल्ड स्पेशालिस्ट शालू जैन यांच्यासोबत शिखा जैन यांनी साधलेल्या संवादावर आधारित

बाळ लहान असेल आणि रडत असेल तर आईला हे समजून घेणे खूपच कठीण जाते की, त्याला नेमके काय हवे आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ होण्याऐवजी आईला हे स्वत:लाच समजून घ्यावे लागते की, बाळाला कोणत्या वेळी काय हवे असते. मात्र यासाठी तिच्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, जेणेकरुन मुलाचे संगोपन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. बाळाच्या बाबतीत आईमध्ये कशाप्रकारचा आत्मविश्वास हवा, हे समजू घेऊया :

अंघोळ घालणे

बऱ्याच माता पहिल्यांदा बाळाला अंघोळ घालायला घाबरतात, परंतु पुरेशी खबरदारी घेतल्यास आणि बाळाला अंघोळ घालण्याची योग्य पद्धत समजून घेतल्यास त्याला अंघोळ घालणे तितकेसे अवघड नाही. चला, बाळाला अंघोळ कशी घालायची, याची माहिती करुन घेऊया :

* बाळाला टबमध्ये अंघोळ घालणे सोयीचे ठरते. फक्त याकडे लक्ष द्या की, टब खूप खोलगट नसेल.

* बाळाला नेहमी कोमट पाण्यानेच अंघोळ घाला. पाणी किती कोमट आहे, हे तपासण्यासाठी तुमच्या हाताचा कोपर पाण्यात घाला. जर पाणी गरम वाटत नसेल तर तुम्ही बाळाला त्या पाण्याने अंघोळ घालू शकता.

* सर्वप्रथम बाळावर थोडेथोडे पाणी शिंपडल्यासारखे करा. त्याच्या अंगावर एकदम पाणी ओतू नका. हळूहळू ओता.

* बाळाच्या डोक्यावर कधीही पाण्याची सरळ धार सोडू नका. यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.

* अंघोळ घालून झाल्यानंतर बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळा, त्यानंतर लोशन लावा.

बाळाचे खूप जास्त रडणे.

बऱ्याच वेळा जेव्हा लहान मुले रडायला सुरवात करतात तेव्हा ती काहीही करुन शांत व्हायचे नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत बऱ्याच माता अस्वस्थ होतात. अशावेळी त्या त्यांच्या नातेवाईकांना बाळाला रडण्यापासून थांबवण्यासाठी काय करायला हवे, असे विचारतात. बाळ जर ३ महिन्यांपेक्षा लहान असेल तर, काही वेळा तो कारण नसतानाही रडू शकतो. अशावेळी त्याला मांडीवर घेतल्यामुळे त्याला बरे वाटेल आणि तो शांत होईल. परंतु मांडीवर घेऊनही तो शांत होत नसेल तर त्याला भूक लागणे, डायपर खराब होणे यासारखे त्रासही होत असण्याची शक्यता असते.

अनेकदा भूक लागल्यावरही बाळ रडू लागते. त्याला खायला भरवल्यानंतर काही वेळातच तो पुन्हा रडू लागतो, कारण त्याचे पोट खूपच लहान असते. त्याला थोडया थोडया वेळानंतर भूक लागू शकते. म्हणून त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या.

याव्यतिरिक्त या गोष्टींचाही विचार करा :

* बाळाचे डायपर पूर्ण भरते तेव्हा ते ओले होते. त्यामुळे बाळाची झोप उडते आणि ते रडू लागते. ओल्या डायपरमध्ये बाळाला खूपच अस्वस्थ वाटते, म्हणून अधूनमधून त्याचा डायपर तपासा आणि बदलत रहा. तो बदलल्यानंतर बाळ शांत होईल

* कधीकधी खराब डायपरमुळे, बाळाच्या त्वचेवर पुरळ उठते, ज्यामुळे त्याला दुखू लागते आणि खाजही सुटते. यामुळे तर बाळ रडत नाही ना, हेही तपासा.

* बऱ्याचदा बाळाला कंटाळा येतो आणि त्याला आईच्या मांडीची ऊब हवीहवीशी वाटते. त्यासाठीही तो रडू लागतो. अशावेळी त्याला प्रेमाने मांडीवर घ्या आणि डोक्यावरुन हात फिरवत रहा. यामुळे. त्याला शांत वाटेल आणि तो रडायचे थांबेल.

बाळाचे रात्रभर जागे राहणे

नवजात बाळ अनेकदा दिवसा झोपून काढते आणि रात्री जागे राहते. बऱ्याचदा दिवसा जागे राहूनही ते रात्री झोपत नाही. अशावेळी आईवडिलांनाही त्यांच्याबरोबर जागे रहावे लागते, जे अत्यंत त्रासदायक ठरते. बाळाला भूक लागली असेल किंवा त्याला काही हवे असेल तरीही ते झोपत नाही आणि रात्रभर जागे राहते.

अशा परिस्थितीत या गोष्टींकडे लक्ष द्या

बाळाला रात्री अनेकदा उठून दूध पाजावे लागते, कारण बाळ फक्त थोडेच दूध पिते, म्हणून त्याला थोडया थोडया वेळाने दूध पाजा. ब्रेस्टपंपाच्या मदतीने, आपले दूध काढून ठेवा आणि वेळोवेळी बाळाला प्यायला द्या, जेणेकरून तुम्हालाही आराम मिळेल आणि बाळही उपाशी राहणार नाही.

* बाळाला जर एखादे खेळणे किंवा चादर घेऊन झोपायची सवय असेल तर ती वस्तू मिळेपर्यंत ते जागत राहते.

* बाळाची दररोजची झोपेची वेळ ठरवून ठेवा व त्याला त्याचवेळी झोपवा.

* तुमच्या सवडीनुसार त्याला झोपवायचा प्रयत्न करू नका. यामुळे त्याला झोप येणार नाही

खेळणीही असावीत खास

बाळाच्या जन्मानंतर, आईवडिलांसह नातेवाईकांकडूनही भेटवस्तूंच्या रुपात बाळाला भरपूर खेळणी मिळतात. बाळाची संपूर्ण खोली खेळण्यांनी भरुन जाते, त्यातील काही खूपच आकर्षक तर काही उपयोगाची नसतात. अशावेळी आईला माहीत असते किंवा तिला ते माहिती असायलाच हवे की, आपल्या बाळासाठी कोणते खेळणे योग्य आहे.

* बाळाच्या पाळण्यावर रंगीबेरंगी अस्वल, हत्ती, लहान घोडे टांगलेले झुंबर लावणे चांगले असते. त्याच्याकडे पाहून बाळाला गंमत वाटते. आनंद होतो. शिवाय त्याकडे बघून बाळ एकाग्रतेने पहायलाही शिकते. हुशार माता पाळण्यावर असे झुंबर लटकवतातच.

याव्यतिरिक्त, मुलांच्या वयानुसार अनेक खेळणी बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जे कोणते खेळणे खरेदी कराल ते मऊ असावे, त्याचे कोपरे उघडलेले किंवा कडक नसावेत. ते मुलायम कपडयाने तयार केलेले असावे, ज्यामुळे बाळ त्या खेळण्यासोबत आनंदाने खेळू शकेल.

याकडे विशेष लक्ष द्या

बाळाने अन्न ओकून टाकणे : जन्मल्यानंतर ३ महिन्यांपर्यंत बाळाची लाळ गळत राहते. विशेषत: जेव्हा त्यांना काही भरवले जाते तेव्हा ते पटकन खाल्लेले ओकून टाकतात किंवा उलटी करतात. त्यामुळे आई घाबरुन जाते. यासाठी बाळाची नव्हे तर आईने स्वत:च्या सवयी बदलायला हव्यात. जसे की दूध पाजल्यानंतर लगेचच काही माता बाळासोबत खेळायला लागतात, त्यांना वर उचलून धरतात, यामुळे बाळ प्यायलले दूध ओकून टाकते. म्हणूनच दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन त्याला ढेकर येईल, असा प्रयत्न करा, जेणेकरून प्यायलेले दूध त्याला पचेल आणि ते तो ओकून टाकणार नाही.

* अनेकदा थंड दूध भरवल्यामुळेही बाळ ते ओकून टाकतो, कारण त्याला थंड दूध आवडत नाही.

मुलांना घामोळे आल्यास : उन्हाळयात मुलांना बऱ्याचदा उष्णता, घामामुळे पुरळ, घामोळे येते. परंतु थोडीशी काळजी घेतल्यास घामोळे येणार नाही. जसे की :

* बाळाला विविध प्रकारची टॅल्कम पावडर लागू नका. फक्त तांदळाच्या स्टार्चपासून तयार केलेली बेबी पावडरच वापरा, जेणेकरून त्याला पुरळ, घामोळे येणार नाही.

* घामोळे आलेली जागा दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा किंवा स्पंज करा.

मालिश करताना असावा आत्मविश्वास : आत्मविश्वास असलेल्या माता न घाबरता आपल्या नाजूक बाळाची मालीश योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप करतात. जसे की :

* मालिश करताना बाळाच्या पायांपासून सुरुवात करा. त्यासाठी आपल्या हातांना तेल चोळा आणि आपल्या बाळाच्या मांडीवर त्याने मालीश करत खाली त्याच्या पायापर्यंत मालीश करा.

* बाळाचे हात, छाती आणि पाठीची मालिश करा.

* मालिश करताना बाळ रडू लागल्यास त्याला उचलून घेऊन गप्प करा.

* बाळाची मालीश त्याने दूध प्यायल्यानंतर किंवा झोपायच्या वेळी करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें