* चाईल्ड स्पेशालिस्ट शालू जैन यांच्यासोबत शिखा जैन यांनी साधलेल्या संवादावर आधारित
बाळ लहान असेल आणि रडत असेल तर आईला हे समजून घेणे खूपच कठीण जाते की, त्याला नेमके काय हवे आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ होण्याऐवजी आईला हे स्वत:लाच समजून घ्यावे लागते की, बाळाला कोणत्या वेळी काय हवे असते. मात्र यासाठी तिच्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, जेणेकरुन मुलाचे संगोपन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. बाळाच्या बाबतीत आईमध्ये कशाप्रकारचा आत्मविश्वास हवा, हे समजू घेऊया :
अंघोळ घालणे
बऱ्याच माता पहिल्यांदा बाळाला अंघोळ घालायला घाबरतात, परंतु पुरेशी खबरदारी घेतल्यास आणि बाळाला अंघोळ घालण्याची योग्य पद्धत समजून घेतल्यास त्याला अंघोळ घालणे तितकेसे अवघड नाही. चला, बाळाला अंघोळ कशी घालायची, याची माहिती करुन घेऊया :
* बाळाला टबमध्ये अंघोळ घालणे सोयीचे ठरते. फक्त याकडे लक्ष द्या की, टब खूप खोलगट नसेल.
* बाळाला नेहमी कोमट पाण्यानेच अंघोळ घाला. पाणी किती कोमट आहे, हे तपासण्यासाठी तुमच्या हाताचा कोपर पाण्यात घाला. जर पाणी गरम वाटत नसेल तर तुम्ही बाळाला त्या पाण्याने अंघोळ घालू शकता.
* सर्वप्रथम बाळावर थोडेथोडे पाणी शिंपडल्यासारखे करा. त्याच्या अंगावर एकदम पाणी ओतू नका. हळूहळू ओता.
* बाळाच्या डोक्यावर कधीही पाण्याची सरळ धार सोडू नका. यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.
* अंघोळ घालून झाल्यानंतर बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळा, त्यानंतर लोशन लावा.
बाळाचे खूप जास्त रडणे.
बऱ्याच वेळा जेव्हा लहान मुले रडायला सुरवात करतात तेव्हा ती काहीही करुन शांत व्हायचे नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत बऱ्याच माता अस्वस्थ होतात. अशावेळी त्या त्यांच्या नातेवाईकांना बाळाला रडण्यापासून थांबवण्यासाठी काय करायला हवे, असे विचारतात. बाळ जर ३ महिन्यांपेक्षा लहान असेल तर, काही वेळा तो कारण नसतानाही रडू शकतो. अशावेळी त्याला मांडीवर घेतल्यामुळे त्याला बरे वाटेल आणि तो शांत होईल. परंतु मांडीवर घेऊनही तो शांत होत नसेल तर त्याला भूक लागणे, डायपर खराब होणे यासारखे त्रासही होत असण्याची शक्यता असते.