मुलांना जरूर द्या सेफ्टी टीप्स

* पूनम अहमद

नेल्सन मंडेला एकदा म्हणाले होते की हिंसा आणि भय यांच्या तावडीत लहान मुले सर्वात अधिक सापडतात. अशात आपले हे कर्तव्य असते की आपण त्यांना हिंसा आणि भयापासून मुक्त असे जीवन प्रदान करावे. परंतु आज मुलांना सुरक्षित वातावरण देणे खूप कठीण झाले आहे. दररोज घडणारे बालशोषण, रेप, किडनॅपिंग या घटनांमुळे आजचे पालक चिंतित झालेले दिसून येतात.

टीव्हीवरील अशा घटना पाहून ३५ वर्षीय स्नेहाला असे वाटले की तिच्या १० वर्षीय मुलीला केवळ गुड टच आणि बॅड टच सांगणे पुरेसे नाही. तिने आपल्या मुलीला एक पासवर्ड दिला आणि सांगितले जर तुला कधी कोणी आमचे नाव घेऊन काही खायला दिले आणि त्यांच्यासोबत येण्यास सांगितले तर तिने त्या व्यक्तिस पासवर्ड विचारला पाहिजे. तिने आपली मुलगी सुरक्षित राहावी म्हणून आपला पती आणि मुलीबरोबर असे अनेक कोडवर्ड बनवले.

स्नेहाप्रमाणेच आज अनेक मातापिता हे करत आहेत. ते आपल्या मुलांना अलर्ट राहून कोणत्याही संकटांचा सामना करण्याचे ट्रेनिंग देत आहेत. सर्वत्र पसरलेल्या असामाजिक तत्त्वांशी सामना करण्यासाठी हे आवश्यकच बनले आहे.

मुलांना असे तयार करा

मुले निरागस असतात. ती सहज कोणावरही विश्वास ठेवतात. मुलींची आई असलेली नमिता सांगते, ‘‘जर कोणी अनोळखी व्यक्ती मुलांना चॉकलेट ऑफर करत असेल तर मुले ते घेतात. मी माझ्या मुलींना समजावून सांगितले आहे की त्यांना जे काही हवे आहे ते मी त्यांना आणून देईन. त्यांना कुणा अनोळखी व्यक्तिकडून घेण्याची काही गरज नाही. मी त्यांना जास्त निगेटिव्ह गोष्टी सांगत नाही, कारण त्यांच्या मनात भीती बसू शकते.’’

टीचर पारुल देशमुख यांनी आपल्या मुलाला गरज भासल्यास आपली ताकद लावण्यास सांगून ठेवले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे, ‘‘मी माझ्या मुलाला सांगून ठेवले आहे की जर तुला कोणी जबरदस्तीने पकडायचा प्रयत्न केला तर तू जोरात ओरडले पाहिजेस. मी घरी याची प्रॅक्टिसही करून घेतली आहे. त्याला हेही सांगितले आहे की त्या व्यक्तिचा हात जोरात चाव आणि जसे त्या व्यक्तिचे लक्ष हटेल तसे तिथून पळून जा.’’

७ वर्षीय मुलाचे बिजनेसमन पिता दीपक शर्मा म्हणतात, ‘‘मी एक व्हिडिओ पहिला होता, ज्यात मुलांना डेंजर पॉईंट्स दाखवून हे समजावले जाते की जर कोणी या भागांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर जोरात ओरडले पाहिजे आणि तिथून पळून गर्दी असलेल्या ठिकाणी गेले पाहिजे. या घटनेविषयी कुणा विश्वसनीय व्यक्तिला सांगितले पाहिजे. मी हा व्हिडिओ माझ्या मुलालाही दाखवला आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याला याची आठवण करून देत असतो.’’

शिक्षण व्यवस्थेत हे सामील असो वा नसो, आजचे मातापिता सेल्फ डिफेन्सचे महत्त्व जाणतात.

दोन मुलांची आई असलेल्या राधा श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे, ‘‘आर्ट, म्युझिक आणि डान्स क्लासप्रमाणे शाळेत सेल्फ डिफेन्स क्लासेससुद्धा असले पाहिजेत आणि ५ वर्षं वयापासून याचे ट्रेनिंग मुलांना दिले गेले पाहिजे.’’

कराटे की भरतनाट्यम

९ वर्षीय इशिताच्या आईवडिलांना यापैकी इशिताला कराटे शिकवणे जास्त महत्त्वाचे वाटले. तिच्या आईने सांगितले, ‘‘इशिताने भरतनाट्यम शिकावे म्हणून ती ८ वर्षांची होण्याची आम्ही वाट पाहत होतो. पण जेव्हा आम्ही तिला घेऊन क्लासमध्ये आलो, तेव्हा आम्हाला समजले की तिथे कराटेही शिकवले जाते. आमची इच्छा होती की तिने दोन्ही शिकावे. पण वेळेअभावी आम्ही आजच्या काळाची गरज पाहून सेल्फ डिफेन्सला प्राधान्य दिले. माझ्या असे लक्षात आले आहे की कराटे शिकणारी मुले अधिक अलर्ट असतात.  फिटनेस प्रति त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो. नंतर भविष्यात वेळ मिळाल्यावर  इशिता डान्स शिकेलही पण आता कराटे शिकणे जास्त महत्त्वाचे आहे.’’

वेळोवेळी बोला

जेव्हा जेव्हा आईवडिलांना वेळ मिळतो, त्यांनी मुलांशी बोलले पाहिजे. त्यांना शाळेविषयी विचारले पाहिजे. ६ वर्षीय  गरिमाची आई म्हणते, ‘‘ते दिवस आता गेले, जेव्हा आपण मुलांशी फक्त अभ्यास आणि होमवर्क याविषयीच बोलत होते. त्यांना टीचर्स, चपराशी, बस ड्राइव्हर यांच्याविषयीही विचारले पाहिजे. त्यांना कोणाविषयी असहजता वाटते का याविषयी जाणून घेतले पाहिजे.  त्यांना कोणालाही न घाबरण्याविषयी सांगून त्यांना बोल्ड बनवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.’’

मुलांशी गप्पा मारून आईवडिलांनी घरात एक प्रकारचे निरोगी वातावरण ठेवले पाहिजे. त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की काहीही झाले तरी आईवडील त्यांना समजून घेतील. यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. आपल्या मुलाचे आरोग्य आणि सुरक्षा प्रत्येक आईवडिलांची प्राथमिकता असली पाहिजे. आईवडील हे २४ तास मुलांसोबत राहू शकत नाहीत, पण ते त्यांना अतिआवश्यक सुरक्षेसंदर्भात सूचना करून सजग तर नक्कीच करू शकतात.

आईवडिलांनी जेवढा शक्य होईल तेवढा मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांना गुड टच आणि बॅड टच विषयी जरूर सांगावे. मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवावा. आजचा दिवस कसा होता यासंबंधित प्रश्न विचारावेत. आईवडिलांवर विश्वास ठेवून ते प्रत्येक गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतात हे मुलांच्या मनावर सतत बिंबवत राहावे.

घाणेरड्या काकांपासून मुलाला वाचवा

– गरिमा पंकज

दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेकडे लक्ष द्या. शाहदरातील विवेक विहार परिसरात ९ वर्षीय मुलीची भाडेकरू छेड काढायचा. निरागस मुलीला हे समजतच नव्हते की तिच्यासोबत काय घडत आहे. तिला ते आवडत नव्हते, पण काही समजतही नव्हते. एके दिवशी जेव्हा वर्गात टीचरने गुड टच आणि बॅड टचबाबत सविस्तर सांगितले, तेव्हा मुलीच्या ते लक्षात आले आणि तिने तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती दिली. तिने सांगितले की त्यांच्या घरातील भाडेकरू काका तिला कुठेही हात लावतात, जे तिला आवडत नाही. ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी भाडेकरूला अटक केली. अशाप्रकारे एक मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली.

ईस्ट दिल्लीतील शाळांमध्ये ऑगस्ट, २०१८ पासून जानेवारी, २०१९ पर्यंत बलात्कार आणि विनयभंगाच्या २०९ घटना समोर आल्या. मुलांसोबत लैंगिक शोषणाच्या घटना घरात, बाहेर, शाळेत, शेजारीपाजारी कुठेही घडू शकतात. काही मुले तर अशी असतात जी लैंगिक अत्याचारानंतर लाजेने किंवा मार मिळेल या भीतिने कोणाला काहीही सांगत नाहीत. बहुसंख्य घटनांमध्ये शोषण करणारी व्यक्ती तिच असते जिच्यावर मुलाच्या घरातल्यांचा पूर्ण विश्वास असतो. सुमारे ३० टक्के गुन्हेगार बाहेरचे असतात आणि ६० टक्के कुटुंबातील मित्र, बेबीसीटर, शिक्षक किंवा शेजारी असतात.

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलांसोबत लैंगिक गैरवर्तनाच्या घटना मुख्यत्वे ५ आणि १२ वर्षांच्या वयात घडतात. त्यावेळी ते आपली वेदना सांगू शकण्याइतके सक्षम नसतात, कारण प्रेम आणि शोषण यात फरक करण्याची समज या वयात नसते. यामुळेच मुलांच्या बाबतीतील बहुतांश गुन्हे समोर येत नाहीत आणि ते सिद्धदेखील होऊ शकत नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत जाते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें