विध्वंस

कथा * राधिका साठे

आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येऊ लागलं होतं. गेला आठवडाभर ज्या ऑफिसमधून कामं बंद पडली होती, ती ऑफिसं आता सुरू झाली होती. रस्त्यांवरून सुसाट वेगानं धावणाऱ्या गाड्या रडत-खडत, उखडलेल्या, खचलेल्या रस्त्यांवरून चालू लागल्या होत्या. रस्त्याच्या कडेला हॉकर्सनी पुन्हा आपली दुकानं मांडायला सुरूवात केली होती. रोज मजूरी करून पोट भरणारे मजूर आणि घरकाम करणाऱ्या मोलकरणीही पुन्हा रस्त्यांवर दिसू लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात चेन्नईत चक्रीवादळानं केलेला विध्वंस सगळीकडे आपली छाप ठेवून होता. अजूनही अनेक भागांमधलं पाणी ओसरलं नव्हतं. खोलगट भागातल्या वस्त्या अजूनही पाण्याखाली होत्या. एयरपोर्ट अजून सुरू झाला नव्हता. मधल्या काळात रस्त्यांवर कंबरभर पाणी होतं. नेटवर्क बंद होतं. फोन, वीज, जीवनावश्यक वस्तू काही म्हणता काहीच नव्हतं. गाड्यांच्या इंजिनात पाणी भरल्यामुळे लोक गाड्या तिथंच टाकून जीव वाचवून पळाले होते. काही ऑफिसमधून सायंकाळी निघालेले लोक कसेबसे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी पोहोचू शकले होते. कॉलेज, होस्टेल्स आणि युनिव्हसिर्टीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना लष्कराच्या मदतीनं बाहेर काढलं गेलं.

चेन्नई तसंही समुद्र किनाऱ्यालगत वसलेलं शहर आहे. इथं अनेक सरोवरंही आहेत, पण त्याच्यावर अतिक्रमणं करून रस्ते आणि बिल्डिंगांची बांधकामं उभी केली गेली. या सात दिवसात त्या सरोवरांनी जणू आक्रोश करून आपला कोंडून घातलेला श्वास मोकळा केला असावा असं सगळं दृष्य दिसत होतं. शहराची पार दुर्दशा झाली होती.

गरीबांच्या वस्त्या झोपडपट्ट्या खोलगट भागात असल्यामुळे त्यांची परिस्थिती फारच वाईट होती. कुठंतरी कशीबशी रात्र काढल्यावर सकाळी उपाशी पोराबाळांचा अन्नासाठी अक्रोश सुरू झाल्यावर त्यांनी समोर दिसलेल्या दुकानावर हल्लाच चढवला. भूक माणसाला चोर आणि आक्रमक बनवते.

रात्रीचे अकरा वाजले होते. जिथं जागा मिळेल तिथं लोक जीव वाचवण्यासाठी उभे होते. पाऊस कोसळत होता अन् सगळीकडे पाणी तुंबायला सुरूवात झाली होती. ऑफिसातून पायी चालत निघालेली रिया पाऊस पाण्यात अडकली होती. एका स्टोअर्सच्या पार्किंगला ती कशीबशी उभी होती. अजून काही लोक तिथं होते. तेवढ्यात दारू प्यायलेले काही तरूण तिथं आले. तरूण मुलगी बघून ते काही बाही बरळायला लागले. इथं आपण सुरक्षित नाही हे रियाला कळलं. पण तिथून अजून कुठं निघून जाणं तिला शक्यही नव्हतं. तिथं असलेली इतर माणसंही हे सगळं कळून काहीच न कळल्याचा आव आणून उभी होती. कारण दारू ढोसलेल्या गुंडांशी लढणं त्यांना शक्य नव्हतं. कोसळणारा पाऊस, उसळणारा समुद्र आणि समोर हे मानवी देहाचे लांडगे…रिया फार घाबरली होती.

आता त्या मुलांपैकी एक तर रियाच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. रियानं स्वत:ला अधिकच आक्रसून घेतलं. ती आकाशच्या जवळ सरकली.

गर्दीत उभ्या असलेल्या आकाशला रियाची कुचंबणा कळली. तो त्या मवाल्यांना म्हणाला, ‘‘भाऊ, का त्रास देताय तुम्ही यांना. आपणच या परिस्थितीमुळे त्रस्त आहोत…आणि तुम्ही एका असहाय मुलीला त्रास का देत आहात?’’

एवढं बोलायचा अवकाश…त्या पोरांची टाळकी सटकलीच! एक जण बोलला, ‘‘तू कोण लागतोस रे हिचा?  आणि कोण आहे तुझी? फार काळजी घेतो आहेस तिची?’’ मग त्यानं चक्क तिला हातच लावला, वर निर्लज्जपणे म्हणाला, ‘‘हात लावल्यानं झिजणार आहे का ती? बोल, काय करशील? अजून हात लावेन…मिठीत घेईन…बघूया काय करतोस ते?’’

इतके लोक होते तिथं, पण जिवाच्या भीतिनं कुणी एक समोर येईना. सगळे गुपचुप उभे होते. मनातून सगळेच घाबरलेले होते.

रिया खूपच घाबरली. ती थरथर कापत होती. आकाशच्या मागे दडून उभी राहिली. तोच तिचा एकमेव आधार होता.  आता तर त्या बेवड्यांना ऊतच आला. ते आणखी चेकाळले.

घाबरलेल्या रियाला धीर देत आकाशनं म्हटलं, ‘‘तुम्ही घाबरू नका. मी आहे तोवर तुम्ही सुरक्षित आहात.’’

रियाला रडू फुटलं, त्यातल्या एकानं आता आकाशवर हल्ला चढवला. आकाश पूर्ण शक्तिनिशी त्याचा प्रतिकार करू लागला.

तेवढ्यात गर्दीतले काही लोक आकाशच्या मदतीला धावले. काहींनी रियाभोवती कडं करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. आकाशला मदत मिळाल्यामुळे आता त्या दारूड्यांना ही लढाई जड जात होती. त्याच्यामुळे आज त्यांची शिकार हातातून निसटल्याचा संताप आता त्यांना अनावर झाला होता.

ते अर्वाच्च शिव्या देत होते. तेवढ्यात एकानं सुरा काढला अन् आकाशच्या छातीवर सपासप वार केले. तेवढ्यात लष्कराचे जवान तिथं पोहोचले अन् त्या गुंडांनी पोबारा केला. सुरीहल्ला बघून गर्दीतले लोक अवाक्च झाले. जवानांनी ताबडतोब नावेत घालून आकाशला इस्पितळात हलवलं. पण फार जास्त रक्त वाहून गेल्यामुळे आकाशची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

आकाश मुळचा मुंबईचा. त्याचं कुटुंब मुंबईतच होतं. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. मुंबईच्या ऑफिसनं सहा महिन्यांसाठी त्याला चेन्नईला पाठवलं होतं. मी ही त्याच कंपनीत काम करत असल्यामुळे आमची ओळख होती. कंपनीत बातमी आली अन् आम्ही सगळेच प्रथम अवाक् झालो. खूप हळहळ वाटली. कंपनीतल्या आणखी एका सहकाऱ्यासोबत मी मुंबईला त्याच्या घरी भेटायला गेले. कुठल्या तोंडानं अन् कोणत्या शब्दांत मी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करणार होते.

मुंबईला आकाशच्या घरात हाहाकार उडाला होता. मुलं केविळवाणी कोपऱ्यात रडत बसली होती अन् त्याची तरूण बायको तर पार उध्वस्त झाली होती. तिची स्थिती बघवत नव्हती. मी मनातल्या मनात विचार करत होते, चांगल्या कामाचं खरं तर बक्षीस मिळतं मग आकाशला ते का मिळालं नाही? त्याला व त्याच्या कुटुंबाला कुठल्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा मिळाली? एका असहाय मुलीला गुंडापासून वाचवण्याचं हे बक्षिस? अखेरीस का?

दगडालाही पाझर फुटेल असा आकांत त्या घरात चालला होता. त्याच्या पत्नीच्या अश्रूंमध्ये सगळं शहर वाहून जाईल असं वाटत होतं. चेन्नईतलं लोकजीवन आता हळूहळू मार्गावर येत होतं. पण मुंबईतल्या आकाशच्या घराची परिस्थिती कधी अन् कशी बदलणार होती? चेन्नईतल्या गुदमरलेल्या सरोवरांनी आपला हक्क हाहाकार माजवून मिळवला होता. पण आकाशची बायको कुणाजवळ हक्क मागणार? तिच्या झालेल्या नुकसानांची भरपाई कोण, कशी करणार? पत्नीला तिचा पती आणि मुलांना त्यांचा पिता परत मिळू शकेल का?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें