(पहिला भाग)
कथा * पूनम अहमद
सगळ्या खोलीत रक्ताचा सडा पडलेला अन् रक्तात लडबडलेले मृतदेह…मुलं, मोठी माणसं, स्त्रिया सगळेच आपल्या माणसांकडून मारले गेले होते. वर जाणाऱ्या जिन्यावर रक्तात भिजलेल्या बुटाचे ठसे होते. एवढे कठोर हृदयाचे पोलीस…पण समोरचं दृश्य पाहून तेही हादरले. वर ही प्रेतं अन् आईच्या ओढणीने गळफास घेतलेला हसन.
मुंबईच्या ठाणे भागातल्या या मुस्लिमबहुल वस्तीत, कासारवडावलीत लहानलहान बोळ्यांच्या दुतर्फा दुकानं होती. अधूनमधून लोकांची घरं होती. कुणाची दुमजली, कुणी तिमजली घराचा मालक. एकूण वातावरण जुनाट अन् मुस्लिम वस्तीत असतं तसंच. स्त्रिया मुली बुरखा घालूनच बाहेर पडायच्या. लोक आर्थिकदृष्ट्या सधन होते पण राहाणी अन् विचारसरणी जुनीच होती. मुलींना फारसं शिकवत नसत. त्यांची लग्न लवकर केली जात. मुलं मात्र शिक्षण पूर्ण करून बऱ्यापैकी नोकरी करत होती.
शौकत अली अन् आयेशा बेगमना तीन मुली होत्या. सना, रूबी अन् हिबा. तिघींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर होतं. धाकटा हसन हिबाहून पाच वर्षं लहान होता. आयेशाला तर लेकाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं व्हायचं. तो वंशाचा दिवा म्हणून त्याचे लाडच लाड व्हायचे. हसनची काळजी एखाद्या राजपुत्राप्रमाणे घेतली जायची.
रूबी थोडी विकलांग मतिमंद अशी होती. तिला शाळेत घातलीच नव्हती. पण सना अन् हिबाला दहावीपर्यंत शिकवून त्यांची शाळा बंद केली होती. वडिलांची म्हणजे शौकत अलींची इच्छा होती, मुलींना पुढे शिकवावं पण आईने सक्त विरोध केला. ‘‘त्यांची लग्नं करण्याचं बघा, पैसा हसनच्या शिक्षणावर खर्च करायचा. हसन म्हणजे म्हातारपणीची काठी आहे. त्याची काळजी घ्यायला हवी,’’ या फाजील लाडामुळे खरं तर हसन बिघडला होता. शौकत एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करत होते. कुटुंबाचा खर्च अगदी आरामात भागेल एवढं त्यांना उत्पन्न होतंच. रूबीला उपचारांमुळेही फारसा फायदा झाला नव्हता. मुळात तिला बोलता येत नसे. उठणं, बसणं, चालणं, झोपणं या क्रियाही करताना मदत लागायची. खुणा करून ती थोडंफार सांगू शकायची. पण एकंदरीतच तिची परिस्थिती अवघड होती. हसन तिला फार त्रास देत असे.
जसजसा हसन मोठा होत होता त्याचं वागणं बिघडत होतं. पण त्याला कुणी काही म्हटलेलं आयेशाला खपत नव्हते. ती पटकन् त्याला पाठीशी घालायची.
घराच्या जवळच एक दर्गा होता. तिथे एका कोपऱ्यात एक बाबा दिवसभर बसून असायचा. तो झाडफूंक करतो, भूतं उतरवतो, त्याला सिद्धा प्राप्त आहे असं लोकांना माहीत होतं. त्याच्याकडे दु:खावरचा उतारा घ्यायला खूप लोकांची गर्दी असायची. हसनला कधी बरं वाटत नसलं तर आयेशा त्याला पटकन् बाबाकडे न्यायची. तिचा त्याच्यावर फार विश्वास होता.
एकदा तिने बाबाला म्हटलं, ‘‘बाबा, हसनला काही धर्माच्या चार गोष्टी सांगा. तुमच्या पायाशी बसून त्याला जर धर्माबद्दल ज्ञान मिळालं तर त्याच्यासोबत आमचंही भलं होईल. मी रोज पाठवते त्याला तुमच्याकडे.’’
हसन आता बाबाकडे यायचा. त्याचे मित्र कमी झाले होते. बाबा काय सांगायचा कुणास ठाऊक, पण हसन थोडा शांत झाला होता. त्याच्या मनात कुठल्या विषवृक्षाची बिया पेरल्या जाताहेत याची अजिबात कल्पना नसलेली आयेशा मात्र आनंदात होती.
शौकतमियांना जेव्हा कळलं की हसन त्या बाबाकडे जातो तेव्हा ते भडकले, ‘‘तिथे बसून वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यास कर, वेळ सत्कारणी लागेल,’’ त्यांनी हसनला म्हटलं.
आयेशा उसळून म्हणाली, ‘‘असे कसे काय आहात हो तुम्ही? अभ्यासासोबत तुमचा मुलगा धर्माबद्दलही जाणून घेतोए, धर्माच्या मार्गाने जातोए म्हणताना तुम्हाला आनंद व्हायला हवा. बिचारे ते बाबा…चांगल्या गोष्टीच सांगता ना?’’
शौकत गप्पच झाले. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांच्याही मनात मजहब, धर्म याविषयी अनामिक भीती होती.
काही वर्षं उलटली. सनासाठी स्थळं येऊ लागली. आयेशाने लेकाला म्हटलं, ‘‘आता सनाच्या लग्नाचं बघायला हवं.’’
तो ताडकन् उत्तरला, ‘‘अम्मी, तुझ्या मुलीच्या लग्नाशी माझा काहीही संबंध नाही. अब्बूच्या त्या लाडक्या आहेत, त्यांनी बघून घ्यावं. मला इतरही कामं आहेत.’’
शौकतना हे ऐकून धक्काच बसला. हताश होऊन ते उद्गारले, ‘‘शाब्बास बेटा, हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून…आयेशा, ऐकलंस ना?’’
आयेशाचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना, ‘‘हसन? अरे तुझ्या बहिणी आहेत, तुला किती प्रेमाने सांभाळलंय त्यांनी…किती माया करतात तुझ्यावर?’’
‘‘तर मी काय करू? त्यांनी करायला हवं होतं. अन् हे बघ. या असल्या फालतू गोष्टी माझ्याशी बोलायच्या नाहीत. मी काही तरी वेगळं, मोठं काम करण्यासाठी जन्म घेतलाए. अशा बारीकसारीक गोष्टींमध्ये मला अडकवू नकोस.’’ रागारागांत आरडाओरडा करून पाय आपटत तो निघून गेला.
पहिल्यांदाच आयेशाचा चेहरा फटफटीत पांढरा झाला होता. मुलगा इतकं काही बोलेल, असे वागेल याची तिला कल्पनाचा नव्हती. ‘‘तुझ्या अति लाडानंच तो बिघडला आहे, अजूनही लक्ष दे,’’ शौकतने तिची समजूत काढली.
काही तरी चुकलंय हे कळलं तरी काय चुकलंय हे आयेशाला समजलं नाही. काय करावं हेही समजेना.
भिवंडीहून सनासाठी रशीदचं स्थळ आलं. तो बँकेत नोकरीला होता, समजतूदार, सुसंस्कृत, शांतवृत्तीचा रशीद शौकतना आवडला. त्याच्या घरीही सना सर्वांना पसंत पडली.
लग्नाची तारीख ठरली. एवढ्यात हसनचं वागणं बदलल्याची जाणीव सनाला झाली. एकदा दुपारी ती थोडी विश्रांती घेत आडवी झाली होती. हसन येऊन तिला चिकटून झोपला. तिने चमकून विचारलं, ‘‘काय रे, काय झालं?’’
‘‘काही नाही, माझ्या ताईजवळ झोपू शकत नाही का?’’ सना हसली. बहीण सासरी जाणार म्हणून बहुधा त्याला प्रेम वाटायला लागलं, तिच्या मनांत आलं.
हसनने मग तिच्या अंगावरून हात फिरवत काही बाही बोलायला सुरूवात केली. सना पटकन् उठून बसली. तिला काही तरी विचित्र जाणवलं. मनात आलं हसनला एक थोबाडीत द्यावी, वयात येण्याच्या काळातच मुलींना वेगळे स्पर्श कळायला लागतात. पण ती त्या क्षणी गप्प राहिली. तिथून उठून जायला निघाली.
‘‘बाजी, कुठे जातेस, थांब ना…’’ हसन म्हणाला. तशी ती म्हणाली, ‘‘नाही, अम्मीने काही कामं सांगितली होती. मला कामं आटपायला हवीत,’’ त्याच्या डोळ्यात तिला खटकणारं असं काही जाणवत होतं. नंतरच्या काळातही हसनचं येऊन मिठी मारणं, चिकटणं, इथे तिथे स्पर्श करणं तिला फार खटकत होतं, कडेखांद्यावर खेळवलेल्या धाकट्या भावाविषयी आपल्या मनात असं येतंय, याचाही तिला त्रास व्हायचा.
आयेशा म्हणायची, ‘‘बस, भाऊ आहे तुझा, त्याला प्रेम वाटतंय तुझ्याविषयी.’’
मधली रूबी मतिमंद विकलांग होती त्यामुळे हिबा अन् सनामध्ये अधिक जवळीक होती. हिबालाही हसनच्या अशा वागणुकीचा प्रत्यय आला होता पण तीही तोंड मिटून गप्प होती. दोघी मिळून मधलीला जपायच्या. आई सतत हसनमध्ये गुंतल्यामुळे मुलींच्या वाट्याला उपेक्षाच आली होती. दोघी बहिणींनी शेवटी विचारांती निर्णय घेतला की हे सांगायला हवं.
आयेशाचा विश्वास बसेना. पण मग तिच्याही ते लक्षात आलं. घरात लग्नाची गडबड होती. उगीच कुणाला काही कळून गोंधळ व्हायला नको म्हणून सगळं दाबून टाकायचं ठरवलं. पण आयेशा सतत हसनच्या मागावर राहायची. तो आईवर चिडायचा, ओरडायचा पण आयेशाने मुलींना त्याच्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं.
घराबाहेर हसन शांत अन् सभ्य मुलगा होता. पण घरात मात्र वाह्यात अन् बिघडलेलाच होता. सनाचं लग्न छान झालं. ती सासरी गेली अन् हीबा एकटी पडली.
कॉलेजच्या वेळाव्यतिरिक्त हसन जमाल बाबाजवळच बसायचा. धर्माच्या लंब्याचौड्या गप्पा करायचा. बाहेर लोकांना वाटायचं किती शांत, अमनपसंद, मजहबी मुलगा आहे, खरं काय ते घरातल्यांना ठाऊक होतं.
सनाच्या प्रयत्नांनीच हीबाचं लग्न जहांगीरशी झालं. तोही फार चांगला होता. सासची माणसंही छान होती. दोघी मुली चांगल्या घरी पडल्यामुळे शौकत अन् आयेशा फार समाधानी होती.
सनाने रूबीसाठीही एक चांगला पर्याय शोधला होता. माहितीतली एक घटस्फोटित स्त्री तिने दिवसभर रूबीच्या परिचर्येसाठी नेमली होती. रात्री ती आपल्या घरी जायची. दोन लहान मुलांना घेऊन ती एकटीच कामं करून जगत होती. तिलाही काम व पैसे मिळाले. रूबीची काळजी ती प्रेमाने घ्यायची. रात्री रूबी अन् आयेशा एकत्र असायच्या.
हसनला बी. कॉम झाल्यावर एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी लागली. सगळ्यांनाच बरं वाटलं. नोकरीनंतरचा वेळ जमाल बाबाकडे जायचा. जमाल बाबाने त्याला सांगितलं, ‘‘तू खुदाचा बंदा आहेस,’’? ‘‘खास माणूस आहेस.’’ हसनला ते पटलं.
बाबा लबाड, भोंदू होता. गोष्टी मोठमोठ्या अन् पोटात पाप…‘‘खुदाच्या मर्जीने मी तुमची दु:खं दूर करायला आले आहे…तुमचं मन माझ्यापाशी मोकळं करा, लोकांना काही तरी आधार हवाच असतो.’’
म्हणायला बाबा स्वत: पैसे घेत नव्हता. त्याच्यासमोर एक चादर अंथरलेली असायची. लोक त्यावर पैसे, धान्य वगैरे ठेवायचे. रात्री बाबा आपल्या खोलीत जाऊन पैसे मोजायचा. त्याचं दुसऱ्या शहरात दुमजली घर होतं. बायको व तीन मुलं होती. तो पैसे घेऊन गावी जायचा. तसं लोकांना वाटे हा काम करून पैसा मिळवतो. इकडे या लोकांना वाटायचं सहा महिन्यांसाठी बाबा नवीन ज्ञान, सिद्धी मिळवण्यासाठी गेलाय. एकूण मूर्खांच्या या बाजारात बाबा मालामाल झाला होता अन् मान, सन्मान मिळवून होता.
बाबांच्या सगळ्या शिष्यात हसनएवढा मूर्ख कोणीच नव्हता. हसनसाठी बाबा बोलेल ते प्रमाण होतं.
एकदा त्याने म्हटलं, ‘‘बाबा, नोकरीत मन रमत नाही…’’
‘‘मग सोड ना नोकरी.’’
‘‘अन् काय करू?’’
‘‘स्वत:चा व्यसाय कर. तुझ्याजवळ तर भरपूर गुण आहेत. कौशल्यं आहेत, तुला नोकरीची गरज काय?’’
‘‘पण व्यवसाय धंदा करायला पैसा कुठे आहे माझ्यापाशी?’’
‘‘का? तुझे अब्बू आहेत, बाजी आहेत, त्यांचे नवरे आहेत, ते करतील ना तुला मदत? शेवटी तू घरातला एकुलता एक मुलगा आहेस…’’
ही गोष्ट हसनला एकदम पटली. त्याने विचार केला, बहिणींकडून पैसा घ्यायचा तर त्यांना आधी खूश केलं पाहिजे. त्यांच्या मनातला त्याच्याविषयीचा राग अन् तिरस्कार दूर करायला हवा. अर्थात् त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण काम हमखास होईल. आत तो घरात अधिक वेळ देऊ लागला. बहिणींशी फोनवर बोलू लागला. त्यांना नवल वाटायचं. हसनने रशीद अन् जहांगीरशीही मैत्री वाढवायला सुरुवात केली. सना अन् हीबाने आपसात चर्चा केली.
‘‘हसन थोडा बदललाय ना?’’
‘‘खरंच, खूप बदलला आहे. पण कारण काय?’’
‘‘वाढत्या वयाबरोबर समजूत वाढली असेल, आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असेल.’’
‘‘तसं असेल तर चांगलंच आहे. हे टिकून राहू दे.’’ मधल्या काळात सनाला दोन मुली एक मुलगा झाला होता. हिबालाही दोन मुली एक मुलगा होता. हसनला मुली सांगून येत होत्या. झोया नावाची एक देखणी, कुललशीलवान मुलगी पसंत केली गेली. लग्न झालं. हसनचं आयुष्य थोडं बदललं; पण डोक्यातून अजून बिझनेसचं भूत गेलं नव्हतं.
झोयाच्या लाघवी स्वभावाने तिनं आल्या आल्या सगळ्यांना आपलंसं केलं होतं. हसनही तिच्याशी छान वागत होता. त्याचं चिडणं, संतापणं कमी झालं होतं. शौकत अन् आयेशाही मुलांचं सगळं आनंदात चाललेलं पाहून निवांत झाली होती.
अजूनही हसन त्या बाबाकडे कधीमधी जातच होता. त्याच्या डोक्यात काय शिजत होतं त्याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याने दोघी बहिणींना फोन करून सांगितलं की, ‘‘येत्या शनिवारी तुम्ही दोघी, जहांगीर व रशीद अन् सगळी बच्चा कंपनी लंचला या. रात्रीचं जेवणही एकत्रच करू.’’
मधल्या काळात मुलींनी माहेरपणाला येणं बंदच केलं होतं. हे आमंत्रण मिळाल्यामुळे त्याही आनंदल्या. हसनने स्वत: स्वयंपाकघरात झोयाला खूप मदत केली. उत्तम स्वयंपाक तयार झाला. सहा मुलं खूप खेळत खिदळत होती. घरात कितीतरी वर्षांनी इतका आनंद, उत्साह, उल्हास होता.
हसनने म्हटलं, ‘‘माझ्या असं मनात आहे की दर शनिवारी अन् रविवारी लंच आपण एकत्रच घेऊयात.’’
रशीदने म्हटलं, ‘‘याचा अर्थ असा की शनिवारी रात्री मी व जहांगीर सोडून इतर सर्व इथेच राहातील.’’
जहांगीरनेही म्हटलं, ‘‘काही हरकत नाही. या एकत्र भोजनाच्या आनंदासाठी एवढं करायला काहीच हरकत नाही.’’
आणखी काही महिने गेले. झोयाला सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव शान ठेवलं. बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव सर्व बहीणभाऊ व कुटुंबियांनी साजरा केला. बहीणभावांचं प्रेम बघून आईवडील कृतार्थ व्हायचे.
पुन्हा एक शनिवार आला. जेवणं आटोपली. हसन गप्प गप्प होता. मुलांची दंगामस्ती सुरू होती. सनाने विचारलं, ‘‘ काय झालंय? कसली काळजी आहे? असा गंभीर अन् गप्प का?’’
‘‘काही नाही, बाजी.’’
हिनानेही म्हटलं, ‘‘काही तरी आहेच.’’
शौकत अन् आयेशाही तिथेच होती. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर म्हणाला, ‘‘बाजी, मला काही पैसा हवेत. मला स्वत:चा व्यवसाय करायचा आहे.’’
‘‘अरे? इतकी चांगली नोकरी आहे तुला. हे व्यवसायाचं काय मध्येच?’’
‘‘मी नोकरी सोडतोय…मला पैशांची फारच गरज आहे. कुठून, कशी व्यवस्था करू तेच मला कळत नाहीए.’’
शौकत रागावून म्हणाले, ‘‘ही बिझनेसची कल्पनाच अगदी भिकार आहे. आपण नोकरी करणारी माणसं…आपल्या घरात कुणीच, कधीही व्यवसाय केलेला नाही. इतका पैसा आणायची कुठून? कर्ज काढलं तर फेडणार कसं? मुळात कर्ज देणार कोण? नकोच तो व्यवसाय. शिक्षणाच्या हिशेबाने तुला चांगली नोकरी मिळाली आहे. मुकाट्यानं तीच सुरू ठेवायची.’’
‘‘अब्बू, मी सगळा विचार केलाय. मी पैन् पै फेडेन ना?’’ तो उदास चेहऱ्यानं कपाळावर हात ठेवून बसून राहिला.
किती वर्षांनी मुलगा जरा माणसात आला होता. घरात आनंद, उल्हास वाटत होता. अन् आज तो पुन्हा उदास बसलेला बघून आयेशाला वाईट वाटलं. ती प्रेमळपणे म्हणाली, ‘‘हा विचार मनातून काढून टाक रे बेटा, आपल्याकडे एवढा पैसा नाहीए.’’
हिबाने सहजच विचारलं, ‘‘किती पाहिजेत?’’
‘‘२५-३० लाख.’’
‘‘काय?’’ सगळेच दचकले.
‘‘एवढे पैसे कुठून आणायचे, हसन?’’ सनाने काळजीने विचारलं.
झोया बिचारी गुपचूप बसून होती, तिचा नवरा खरं तिला आजतागायत समजलाच नव्हता. तो कधी काही बोलायचा, कधी कधी एखाद्या धर्मगुरूसारखं मोठमोठ्या गोष्टी करायचा, कधी अगदीच मवाली, बेजबाबदार माणसासारखा वागायचा.
हसन म्हणाला, ‘‘झोयाचे सर्व दागिने विकले तरी पैसा उभा राहाणार नाही. बाजी, तुम्ही मला काही रक्कम द्या. मी तुमची पैन् पै परत करेन. लवकरात लवकर!’’
सनाने आश्चर्याने अन् काळजीने विचारलं, ‘‘हसन, अरे आम्ही पैसा आणायचा कुठून?’’
‘‘तू रशीद आईंशी बोल. ते मला कर्ज मिळवून देतील. बँकेत आहेत ना ते?’’
हिबा म्हणाली, ‘‘मी नाही मदत करू शकणार. अजून माझ्या दोन नणंदा लग्नाच्या आहेत. जहांगीर एकटाच मुलगा आहेत घरातला. त्यांच्यावरच सगळी सगळी जबाबदारी आहे.’’
‘‘तर मग तुझे दागिने दे मला.’’
हिबा दचकली, घाबरून म्हणाली, ‘‘दागिने कसे देऊ? हसन काय बोलतो आहेस?’’
‘‘बाजी, तुमच्या भावाने आयुष्यात प्रथमच तुमच्याकडे काही मागितलं आहे. मी वचन देतो की तुमची पैन् पै मी परत करेन. तुम्ही समजून का घेत नाही?’’ अन् मग एकाएकी धमकी दिल्यासारखा आवाजात म्हणाला, ‘‘जर तुम्ही मला मदत केली नाही तर फार वाईट होईल.’’
शौकत अलींनी दरडावून म्हटलं, ‘‘हसन, बिझनेसचं हे भूत डोक्यातून काढून टाक. अरे, बहिणींकडून पैसा घेऊन व्यवसाय करशील? काही गरज आहे का? या घरच्या त्या माहेरवाशिणी आहेत. त्यांना संकटात टाकू नकोस.’’
हसन प्रचंड संतापला, ‘‘कायम तुम्ही मुलींचीच कड घेतली. सतत त्यांचंच कौतुक केलंत. माझ्यासाठी कधी काही केलंत का? मुलीच तुमच्यासाठी सर्वस्व आहेत.’’ रागाने पाय आपटत हसन घराबाहेर निघून गेला. (क्रमश:)