नात्याचे नाव बदलणे गरजेचे आहे

* मधु शर्मा कटिहा

गुरूग्राममध्ये राहणाऱ्या रंजनाच्या मुलाचे लग्न होते. नवरी मुलीला निरोप देताना तिला मिठी मारत आईने सांगितले, ‘‘आता एका आईशी नाते तोडून तू दुसऱ्या आईला आपलेसे करणार आहेस. आजपासून रंजनाजी याच तुझ्या आई आहेत. आता तू त्यांची मुलगी आहेस.’’

रंजनाने ताबडतोब त्यांना थांबवत म्हटले, ‘‘नाही, मी तुमच्याकडून आईचा हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. हीची आई तुम्हीच असाल. आतापर्यंत मला मुलीचे प्रेम मिळतच आहे, आता सुनेचेही प्रेम मिळायला हवे. आईसोबतच आता मला सासू म्हणवून घ्यायलाही आवडेल. सासू-सुनेचे सुंदर नाते अनुभवण्याची वेळ आली आहे. मी या सुखापासून वंचित का राहू?’’

प्रश्न असा आहे की या नात्याचे नाव बदलण्याची किंवा इतर कोणत्याही नात्याशी तुलना करण्याची गरजच काय? सासू हा शब्द इतका भयंकर का झाला की तो केवळ उच्चारताच डोळयासमोर प्रेमळ स्त्रीच्या जागी एक क्रुर, खाष्ट, अर्ध्या वयाच्या बाईचे चित्र उभे राहते. सून हा शब्द इतका परका का झाला की त्यात आपलेपणा येण्यासाठी त्यावर मुलगी नावाचे आवरण चढवावे लागते. कारण स्पष्ट आहे की काही नात्यांनी त्यांच्या नावांचा अर्थ गमावला आहे.

अहंकार आणि स्वार्थाच्या दलदलीत रुतल्याने एकमेकांप्रतिचे वागणे इतके रुक्ष झाले आहे की नात्यातील केवळ एकच बाजू समोर येत आहे. त्या नात्याचे सुखद पैलू शोधण्यासाठी दुसऱ्या नात्याच्या नावाचा आधार घ्यावा लागत आहे. पण केवळ नाव बदलल्याने नातेसंबंध उज्ज्वल होऊ शकत नाही. यासाठी वागणूक आणि विचारातील परिवर्तन आवश्यक आहे.

का बदनाम आहे सासू-सुनेतील नाते

परस्पर मतभेदांमुळे सासू-सुनेचे नाते बदनाम आहे. त्याला सुंदर रूप देण्यासाठी, ते काळाबरोबर बदलले पाहिजे हे समजून घ्यायला हवे. सध्या बहुतांश सुना नोकरी करतात आणि सासूदेखील पूर्वीसारख्या घरातच राहणाऱ्या नाहीत. आता या नात्यात माय-लेकीच्या प्रेमाव्यतिरिक्त परस्पर सामंजस्य आणि मैत्रीची गरज भासू लागली आहे. जर काही गोष्टी लक्षात घेऊन त्या एकमेकींशी चांगले वागल्या तर या नात्याचे नाव बदलण्याची गरजच भासणार नाही.

सासू हा शब्द खटकतो का

‘सासू’ हा शब्द सर्वांचा आवडता व्हावा आणि सासू-सुनेचे नाते प्रेम भावनेतून फुललेले मधुर नाते म्हणून ओळखले जावे यासाठी सासूने खालील काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे :

* सुनेवर मनापासून प्रेम करण्यासोबतच तिच्यात आपली मैत्रीण पाहाण्याचा प्रयत्न करावा.

* एक स्त्री या नात्याने सुनेच्या भावना चांगल्याप्रकारे समजून घ्याव्यात.

* बुरसटलेल्या प्रथा बाजूला सारत जुनाट प्रथापरंपरा आणि व्रतवैकल्यांचे ओझे तिच्यावर लादू नये.

* वर्तमानात कपडयांचे वर्गीकरण विवाहित किंवा अविवाहित असे होत नाही. त्यामुळे ड्रेसबाबत तिच्यावर असे कोणतेही नियम लादणे टाळावे.

* घरातील सुनेकडे मशीन म्हणून न पाहाता संवेदनांनी परिपूर्ण व्यक्ती म्हणून पाहायला हवे.

* हे खरे आहे की प्रत्येक व्यक्तिचे स्वत:चे वेगळे विचार असतात. कोणत्याही विषयावर मतभेद असतील तर सासूने टोमणे मारण्यापेक्षा प्रेमाने आपले म्हणणे सांगावे आणि सुनेचे विचार ऐकून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे संघर्षाला जागाच उरणार नाही.

* सुनेपासून काहीही न लपवता तिला कुटुंबातील एक घटक समजून सर्व गोष्टी सांगाव्यात.

* सुनेसोबत अधूनमधून फिरायला जाणे हे नात्यातील प्रेम वाढवण्यास मदत करेल.

सून शब्द नावडता का आहे

एकदा सून बनल्यावर मुलीचे जग बदलते. तिच्याकडे कर्तव्यांची मोठीशी यादी दिली जाते. नवीन वातावरणात रुळण्याचे आव्हान स्वीकारत तिला नात्यांमध्ये नवे रंग भरायचे असतात. सून शब्द नावडता वाटू नये म्हणून तिलाही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात  :

* सासरच्यांप्रती मनात आपुलकी ठेवूनच सासरी प्रवेश करा.

* तेथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीत सासरची तुलना माहेराशी केली तर पदरी निराशा येईल.

* आजकाल सुशिक्षित मुली परिस्थिती समजून घेत संसारासंबंधीचे निर्णय स्वत: घेऊ इच्छितात. पण एखाद्या बाबतीत निर्णय घेताना सासू-सुनेत मतभेद  झाल्यास सून या नात्याने काही आपले तेच खरे करून तर काही सासूने सांगितलेले मान्य करून मधला मार्ग काढावा.

* आपल्या पतिचे कुटुंबातील इतर व्यक्तींशीही नाते आहे आणि त्यांच्याप्रती त्याची काही कर्तव्ये आहेत, हे सत्य विसरू नका. अर्थात ‘माझा नवरा फक्त माझा आहे,’ या विचाराचा त्याग करून ईर्षेपासून दूर राहा.

* सोशल मिडियाच्या या युगात सून मोबाइल किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिचे नातेवाईक, मित्रपरिवाराच्या संपर्कात असते. पण तिने सासरची प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगू नये. छोटया-मोठया समस्या ताणून धरण्यापेक्षा त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नात्यांमध्ये असा आणा गोडवा

नणंद, मोठी भावजय आणि छोटी भावजय इत्यादी नात्यांची तुलना बहिणीशी केली जाते. पण केवळ बहीण म्हटले म्हणून त्या नात्यात गोडवा येत नाही. ही नाती निभावून नेण्यासाठी संयमाने वागणे आवश्यक आहे. एकमेकींच्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपल्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा आणता येईल. शिवाय या नात्यांना मैत्रीच्या भावनेची फोडणी दिल्यास त्यातील गोडवा अधिकच वाढेल.

खऱ्या नावाचा सुगंध दरवळू द्या

रक्ताची नाती आणि स्वत: निर्माण केलेली नाती यापैकी कोणते नाते हृदयाजवळ असेल, हे त्या व्यक्तिच्या वागणुकीवर अवलंबून असते. आजकाल तणाव तर आई, मुलगी आणि बहिणींमध्येही पाहायला मिळतो. अशावेळी या नात्यांशी तुलना करून कुठलेही संबंध चांगले असल्याचे भासवणे हे आता अतार्किक वाटू लागले आहे. म्हणूनच एखाद्या नात्याला त्याच्या खऱ्या नावानिशी स्वीकारण्यात काय गैर आहे. सद्भावना आणि प्रेमाची शिंपडण केलेले कुठलेही नाते फुलाप्रमाणेच सौंदर्य आणि सुगंधाने परिपूर्ण होईल. याउलट फक्त नाव बदलल्यास ते सुगंध आणि कोमलता नसलेल्या कृत्रिम फुलासारखे होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें