नवजात बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्या

* गरिमा पंकज

नवजात बाळाची त्वचा अतिशय पातळ आणि नाजूक असते, कारण त्वचा इतक्या लवकर संरक्षणासाठी आवश्यक असलेले अडथळे पूर्णपणे विकसित करू शकत नाही. त्यासाठी सुमारे वर्षाचा कालावधी लागतो. वातावरण, तापमानातील बदलांचा थेट परिणाम बाळाच्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्याच्या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच बाळासाठी चांगली बेबी केअर उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय योग्य तापमान आणि मॉइश्चरायझरचा पुरेसा वापर या बाबींचाही विचार करावा लागेल. बाळाच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अॅलर्जी किंवा संसर्गाचा धोका कमी करणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते.

त्वचेवर उद्भवणाऱ्या सामान्य समस्या

सुरकुत्या, त्वचेवर लालसरपणा आणि कोरडेपणा यासारख्या समस्या नवजात बाळामध्ये सामान्य असतात. त्याच्या त्वचेत काही समस्या दिसल्यास घाबरू नका. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर तो नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची त्वचा नवीन वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही समस्या नैसर्गिकरित्या उद्भवू शकतात, ज्या काळानुरूप बऱ्या होतात. अनेकदा वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मऊ केस असतात. याउलट उशिरा जन्मलेल्या बाळाची त्वचा अनेकदा कोरडी आणि सालपटे निघाल्यासारखी दिसते. मात्र काही आठवडयांतच त्याच्या त्वचेची ही समस्या दूर होऊ लागते, पण जर काळानुरूप नवजात बाळाच्या त्वचेवर उद्भवलेल्या समस्या बऱ्या होत नसतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जन्मखुणा

रक्त पुरेसे परिपक्व न झाल्यामुळे बाळाच्या त्वचेवर छोटे लाल डाग दिसू शकतात. या खुणा चेहरा आणि मानेच्या मागे येतात. बाळ रडू लागल्यानंतर त्या प्रकर्षांने जाणवतात, पण या सर्व खुणा वर्षभराच्या आत स्वत:हून निघून जातात. जन्माला आल्यानंतर बाळाच्या त्वचेवर खरचटल्यासारखे किंवा रक्ताचे डाग दिसू शकतात, तेही काही आठवडयांत बरे होतात.

काही विशेष खबरदारी घ्या

बाळाची त्वचा निरोगी आणि मुलायम राहावी यासाठी दैनंदिन जीवनात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते :

बाळाला अंघोळ घालणे : नवजात बाळाची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि कोमल असते. त्यामुळे त्याला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. त्याला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते. जन्माला आल्यानंतर पहिले काही आठवडे बाळाचे खराब डायपर बदलणे आणि स्पंज बाथ पुरेसा असतो. वर्षभरानंतर त्याला प्रत्येक २-३ दिवसांनी अंघोळ घालायला हरकत नाही. यामुळे किटाणूंपासून संरक्षण होण्यासह त्याला प्रसन्न वाटेल. अंघोळ घालण्यासाठी टपात ३-४ इंच पाणी भरणे गरजेचे असते. बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी पाणी जास्त गरम नाही ना? हे तपासून पाहा. त्याला कोमट पाण्यात २-३ मिनिटे अंघोळ घालणे पुरेसे ठरते. यादरम्यान शाम्पू किंवा साबण त्याच्या डोळयात जाणार नाही, याची काळजी घ्या.

सतत अंघोळ घातल्यास बाळाची त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणूनच तुम्ही बाळाला अंघोळीनंतर एखादी चांगली बेबी पावडर आणि मॉइश्चरायझर लावू शकता. लोशन लावत असाल तर ते त्याच्या ओल्या त्वचेवर लावा. त्वचेवर ते घासून लावण्याऐवजी हळूवारपणे लावा. बाळाच्या त्वचेसाठी वापरली जाणारी उत्पादने जसे की, लोशन, साबण, शाम्पू इत्यादीची निवड करण्यापूर्वी ते मुलायम आणि पेराबिन फ्री असतील याकडे लक्ष द्या. शक्य झाल्यास त्याच्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खास बेबी स्किन केअरचीच निवड करा.

मालिश : बाळाची मालिश करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. नैसर्गिक तेलाने केलेली मालिश त्याच्या त्वचेला पोषण देते. बाळाची मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, राईचे तेल, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरता येईल. हे तेल खूपच गुणकारी असते. बाळाची सुगंधित आणि केमिकल असलेल्या तेलाने मालिश करणे टाळावे, अन्यथा त्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. मालिश करण्यापूर्वी बाळाला दूध पाजलेले नसावे आणि ज्या खोलीत मालिश केली जाईल तिचे तापमान सामान्य असेल याकडे लक्ष द्यावे.

डायपरसंबंधी काळजी : बाळाच्या शरीरावर डायपरमुळे चट्टे पडू शकतात. डायपर खूप वेळापर्यंत बाळाला घालून ठेवल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. बाळ सतत डायपर ओले करू शकते. त्यामुळे वेळेवर डायपर न बदलल्यास त्याला रॅशेश होऊ शकतात. बाळाच्या त्या भागाच्या आसपासची त्वचा लाल आणि सालपट निघाल्यासारखी दिसते. त्वचेला खाज येऊ शकते. यापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या लवकर ओला डायपर बदला. डायपर खूप घट्ट असेल किंवा बाळाच्या त्वचेला एखाद्या खास ब्रँडच्या डायपरमुळे अॅलर्जी झाली असेल तर तुम्ही डायपर लगेचच बदलायला हवा, अन्यथा यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

बाळाचा गुप्तांगाचा भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. बाळाचा डायपर बदलताना तो भाग गरम पाण्याने स्वच्छ करून व्यवस्थित पुसून नंतरच नवीन डायपर घाला. त्याच्यासाठी असा डायपर निवडा जो मुलायम आणि जास्त शोषून घेणारा असेल. जास्तच लालसर चट्टे येऊ लागल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंक ऑक्साईड असलेले डायपर रॅश क्रीम लावू शकता.

सूर्य किरणे : बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्याचा थेट सूर्यकिरणांशी संपर्क येऊ देऊ नका. यामुळे त्याला सनबर्न होऊ शकते. तुम्हाला बाहेर जायचे असल्यास आणि त्यावेळी बाळाचा उन्हाशी संपर्क येणार असल्यास त्याला संपूर्ण हातांचे शर्ट, पॅन्ट आणि टोपी घाला. उघडया राहणाऱ्या भागावर बेबीसेफ सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. तो थोडा मोठा झाल्यावर त्याला काही वेळ कोवळया उन्हात नेता येईल. यामुळे त्याच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघेल.

सुती कपडे घाला

बाळाला अगदी सहज लालसर चट्टे येतात, कारण त्याची त्वचा जिथे दुमडते तिथे त्याला घाम खूप जास्त येतो. त्यामुळे त्याला सुती कपडे घालायला हवे. हे कपडे नरम असतात आणि घाम अगदी सहज शोषून घेतात. सिंथेटिकच्या कपडयांमुळे बाळाला अॅलर्जी होऊ शकते. त्याचे कपडे धुण्यासाठी नेहमी सौम्य साबण किंवा पावडर वापरा. आजकाल बाजारात बाळाचे कपडे धुण्यासाठी खास तयार करण्यात आलेले साबण, पावडर उपलब्ध आहेत.

तापमानाकडे लक्ष द्या

बाळाच्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी वातावरण, तापमानाकडे लक्ष देणे गरजेचे असते. तापमान कमी किंवा जास्त असल्यास बाळ व्यवस्थित झोपू शकणार नाही. याचा परिणाम त्याच्या शारीरिक विकासावर होईल. त्यामुळे तुम्हाला तापमानातील बदलांकडे लक्ष द्यावे लागेल. विशेष करून जास्त गरम होत असल्यास किंवा जास्त थंडीच्या दिवसात बाळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

स्किन अॅलर्जीपासून बाळाचे करावे रक्षण

* पारुल भटनागर

मुलांची स्किन विशेषकरून नुकत्याच जन्मलेल्या बाळाची स्किन खूप नाजूक असते. अशक्त असल्यामुळे ते खूप लवकर अॅलर्जी व इन्फेक्शनच्या संपर्कातही येऊ लागते. त्यासाठी त्यांना विशेष काळजीची आवश्यकता असते.

याविषयी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसचे डॉक्टर सुमित चक्रवर्ती बाळाला अॅलर्जीपासून वाचवण्यासाठी काही विशेष टीप्स सांगत आहेत :

स्किन अॅलर्जी काय आहे

जेव्हा बेबीची स्किन अॅलजर्न अर्थात अॅलर्जी तयार करणाऱ्या तत्वांनी प्रभावित होते किंवा मग शरीर जेव्हा एका अॅलर्जीद्वारे ट्रिगर रासायनिक हिस्टामाइनचे उत्पादन करते तेव्हा स्किन अॅलर्जी होते.

मुलांमध्ये साधारणपणे ही अॅलर्जी डायपरद्वारे, खाण्यातून, साबण व क्रीमने, हवामानात आलेल्या बदलावामुळे व बऱ्याच वेळा कपडयांमुळेही होते. याचा प्रभाव विशेषकरून सेंसिटिव स्किनवर सर्वाधिक पडतो, ज्यास विशेष काळजीची आवश्यकता हवी असते.

कशा-कशा स्किन अॅलर्जी

एक्जिमा : हा नेहमी ३-४ महिन्यांच्या बाळांमध्ये बघायला मिळतो. यात शरीराच्या कुठल्याही अंगावर लाल रंगाचे चट्टे बघायला मिळतात. ज्यामुळे एवढी खाज येते की बाळाला ते सहन करणे अवघड होते.

कारण : हा आजार नेहमी एकतर आनुवंशिकपणे किंवा मग कपडे, साबण, अस्वच्छता व बदलत्या हवामानामुळे होतो. अशा स्थितीत आपणास जेव्हा ही आपल्या बाळाच्या स्किनवर लाल रंगाचे चट्टे बघावयास मिळाले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

काय करावे : आपल्या मुलाच्या स्किनला रोज माईल्ड सोपने स्वच्छ करा. स्किन जास्त वेळेपर्यंत ओली ठेवू नये नाहीतर तिला अॅलर्जी होण्याचे चान्सेस वाढतात.

डायपर पुरळ : बाळाने साउंड स्लिप घ्यावी यासाठी पेरेंट्स त्याला नेहमी डायपर घालून ठेवतात, परंतु बऱ्याच काळासाठी डायपर परिधान केल्याने बाळाच्या त्वचेवर सूज येते आणि पुरळ उठते.

कारण : दीर्घ काळापर्यंत डायपर चेंज न करणे, जास्त ओला डायपर, आवश्यकतेपेक्षा जास्त टाइट डायपर पुरळ उठण्याचे कारण बनतो.

काय करावे : प्रत्येक दोन-तीन तासांनी डायपर बदलावे आणि चेंज करण्यापूर्वी स्किन व्यवस्थितपणे स्वच्छ करावी. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्यानुसार डायपर पुरळावर क्रिमपण लावावे. जर मुलाला डायपर घालण्यास त्रास होत असेल तर त्याची त्वचा उघडीच ठेवावी.

बग बाइट रॅशेज : बहुतेकदा उन्हाळयात डास किंवा बैड बग्जमुळे मुलांच्या त्वचेवर चट्टे आणि त्यांना खाजल्यामुळे त्यांच्या त्वचेलाही खाज येते, ज्यामुळे मुले शांत झोपत नाहीत.

कारण : बऱ्याचवेळा अस्वच्छतेमुळे घरात किडे होतात, यांपासून वाचण्यासाठी आपले घर रोज व्यवस्थित स्वच्छ करावे.

काय करावे : त्वरित डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरुन अँटीबायोटिक मलममुळे चट्टे आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. मुलाला अधिक घट्ट कपडे घालण्याचे टाळावे.

हिट रॅशेज : उन्हाळयात मुलांच्या त्वचेवर विशेषत: त्यांच्या चेहऱ्यावर, मान, अंडरआर्म आणि मांडीच्या जवळ गर्मीमुळे रॅशेज येतात, ज्यांत खाज सुटल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो.

कारण : शरीरावर घाम साचणे व कपडे घालणे हिट रैशेजचे कारण बनते.

काय करावे : मुलाला थंड जागेवर ठेवावे. त्याला घट्ट कपडे परिधान करू नयेत.

गजकर्ण : हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे, जो सामान्यत: टाळू व पायांवर परिणाम करतो आणि स्पर्श केल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.

कारण : हे घाणेरडे टॉवेल्स, कपडे, खेळणी व घाम एका जागी साचल्याकारणाने होते.

काय करावे : जेव्हाही मुलाला त्रास होत असेल तेव्हा त्याला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अँटीफंगल क्रीम लावावे आणि या गोष्टीची विशेष काळजी घ्या की क्रीम लावण्यापूर्वी प्रभावित जागेला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या.

डोक्यावर पापुद्रा जमणे : जन्माच्या वेळेस बाळाच्या डोक्यावर पापुद्रा असतो. जी साधारण गोष्ट आहे. परंतु बऱ्याच वेळा कालांतरानेसुद्धा मुलांमध्ये अशीच समस्या बघावयास मिळते, जी खूप त्रासदायक असते.

कारण : शरीराच्या तेलाच्या ग्रंथींमध्ये जास्त तेल तयार झाल्यामुळे ही समस्या बाळाला होते.

काय करावे : स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

त्वचेची निगा राखण्यासाठी टीप्स

या गोष्टींची काळजी घेत नवजात बालकांना त्वचेच्या संसर्गापासून वाचवता येते.

* बाळाला अंघोळीनंतर बेबी क्रीम लावायला विसरू, कारण यामुळे स्किन कोरडी होत नाही.

* नवजात बालकासाठी साबण आणि शम्पू डॉक्टरांच्या सल्यानुसारच खरेदी करा.

* जर कुटुंबातील कोणा सदस्याला स्किन अॅलर्जी असेल तर त्यापासून बाळाला दूरच ठेवावे.

* अस्वच्छ हातांनी बाळाच्या त्वचेला स्पर्श करू नये.

* फक्त मऊ फॅब्रिकचे कपडेच घालावेत.

* खाण्या-पिण्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

* बेबीला कव्हर करून ठेवावे, जेणेकरून किटक चावण्याची भीती राहणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें