आवडीला बनवा कमाईचे साधन

* पूनम पांडे

बऱ्याचदा जागा कमी असल्यामुळे आपली आवड जोपासण्यासाठी घराच्या छतावरच बागकाम केले जाते. याद्वारे निसर्गावरील आपले प्रेमही जोपासले जाते. कुंड्यांमध्ये आवडीची फुलझाडे किंवा भाज्यांची लागवड करण्यासोबतच इतरही अनेक रोपटी लावली जातात. अशाच प्रकारे एका महिलेने आवड जोपासत आपल्या घराचे संपूर्ण छत हिरव्यागार नर्सरीत रुपांतरीत केले. मीना नावाच्या या महिलेला तेव्हा आश्चर्य वाटले जेव्हा छतावर लावलेल्या कुंड्या त्यांच्या कमाईचे साधन ठरल्या. प्रत्यक्षात घडले असे की, एके दिवशी दुपारी शेजारी राहणाऱ्या तरुणाने त्यांच्याकडे येऊन कडिपत्ता मागितला.

उदार मनाच्या असल्यामुळे छतावर जाऊन हवा तेवढा कडिपत्ता तोडून घे, असे त्यांनी तरुणाला सांगितले. छतावर गेल्यानंतर त्याने पाहिले की, तेथील काही कुंड्यांमध्ये कडिपत्ता लावला आहे. योग्य किंमत देऊन ती छोटी छोटी रोपटी विकत घेण्याची तयारी त्याने दाखवली. त्याच्या तोंडून रोपटयांसाठीची चांगली किंमत ऐकून महिलेला आश्चर्य वाटले. तरुणाने सांगितले की, कडिपत्त्याचा वापर विविध पदार्थ तसेच औषधींच्या रुपातही केला जातो. याची पाने खूपच सुवासिक असतात.

म्हणूनच पोहे, डाळ, भाज्या तसेच अन्य अनेक पदार्थांमध्ये कडिपत्ता वापरला जातो. त्याच दिवसापासून महिलेने छतावर जास्तीत जास्त रोपटी लावण्यास सुरुवात केली आणि फक्त २ महिन्यांमध्येच आश्चर्य घडले. विविध प्रकारच्या रोपटी, झाडांनी त्यांचे छत बहरले.

याची माहिती सर्वत्र पसरताच काही जण फोटोग्राफी कार्यशाळेसाठी काही तासांसाठी छत भाडयावर घेऊ लागले. त्या महिलेवर निसर्गाच्या रुपात जणू लक्ष्मी प्रसन्न झाली, कारण आता त्यांचे छत त्यांना उत्पन्न मिळवून देऊ लागले होते.

रोपटयांची लागवड

काही झाडे अशीही असतात ज्यांची अतिशय कमी खर्चात लागवड करून त्यांना कमाईचे माध्यम बनवता येते. काही शोभेची रोपे वरचेवर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रदर्शनांमध्ये मोठया प्रमाणावर विकली जातात. त्यांची लागवड करणे खूपच स्वस्त असते. मातीत रोवताच काही दिवसांतच ती बहरतात.

नर्सरीचा व्यवसाय कोणीही करू शकतो. तसे तर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पैसे आणि योग्य नियोजनाची गरज असते. पण यासाठी लागणार पैसा आणि मेहनत ही इतर व्यवसायांच्या तुलनेत तशी कमीच असते.

तर चला, माहिती करून घेऊया कशी सुरू करायची घराच्या छतावर नर्सरी.

सर्वप्रथम छतावर किती जागा आहे याचे मोजमाप घेऊन त्यानुसार कुंड्या इत्यादींची खरेदी करा. सुरुवातीला रिकाम्या बाटल्या, डबे, मडक्यात रोपटी लावा. ती तग धरू लागली की त्यानंतर कुंड्यांमध्ये वाढवून तुम्ही ती विकू शकता.

नर्सरीसाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपयुक्त व्यवस्थेचे नियोजन करणे. याचा अर्थ कमी जागेत जास्तीत जास्त रोपटी उगवतील आणि अशी व्यवस्था असेल जिथे मोठया कुंड्यांमध्ये भाजीपाल्याच्या बिया टाकून रोपटी विकसित केली जातील. जवळपास सर्वच नर्सरी चालवणारे अशीच व्यवस्था करतात.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास जर एखाद्या मोठयाशा ड्रममध्ये योग्य नियोजनानुसार धने, बडीशेप, ओवा इत्यादीचे उत्पादन घेता येईल. रूम फ्रेशनर म्हणून याची मोठया प्रमाणावर विक्री होते.

रोपटयांची निवड करताना

नर्सरीसाठी रोपटी निवडताना काही विशेष गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्वात आधी असा घाऊक विक्रेता शोधा जो कमीत कमी किमतीत तुम्हाला भरपूर रोपटी देईल आणि ती वाढविण्यासाठीचा सल्लाही देईल. घाऊक विक्रेते शेकडो एकर जमिनीवर हा व्यवसाय करीत असतात. त्यामुळे ते अशा छोटया उद्योजकांसाठी अनेकदा खूपच उपयोगी ठरतात. त्यांच्याकडून खत आणि बियाही कमी दरात मिळतात.

अशा प्रकारे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले तर नर्सरीसाठी रोपटी, बिया, कुंड्या, माती खरेदीपासून ते सिंचनापर्यंत तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही.

सर्वसामान्यपणे या कामासाठी १० ते १२ हजारांची गुंतवणूक पुरेशी आहे. पण जर तुम्हाला नवनवे प्रयोग करायची आवड असेल तर तुम्ही तुमच्याकडील जमवलेल्या पैशांचा वापर यासाठी करू शकता किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करू शकता. बँका लघू उद्योगांसाठी कर्ज देतात. इतरही अनेक योजनांअंतर्गत पालिका, ग्रामपंचायत तसेच काही संस्थाही लघू उद्योगांसाठी कर्ज देतात.

आवश्यक सामग्री जमा केल्यानंतर नियोजनानुसार काम सुरू करणे हे नर्सरीसाठी उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल असते. रोपटयांसाठी योग्य ग्राहक शोधणे आणि त्यासाठी योजना आखणे हेही फायदेशीर ठरते. यासाठी काही खर्च होत नाही. याशिवाय नर्सरीसाठी विजेची सोय, व्यवस्थित माहिती घेऊन बिया पेरणे, रोपटयांची निवड करणे आणि कमी पाण्यात तग धरून राहणारी जास्तीत जास्त रोपटी लावणे गरजेचे असते, कारण अशी रोपटी हातोहात विकली जातात.

हा उपाय अचानक मोठा फायदा करून देतो. मागील ५ वर्षांच्या आकडेवारीनुसार लग्न, वाढदिवस, सेवानिवृत्ती, सत्कार सोहळे, राष्ट्रीय समारंभ इत्यादी वेळी नर्सरीतून लाखोंच्या संख्येने रोपटयांची खरेदी करण्यात आली. यात कमी पाणी लागणाऱ्या रोपटयांना अधिक मागणी होती.

गुरुग्राममधील एका नर्सरी मालकाने डझनाहून अधिक जुन्या बाटल्या कापून त्यात शोभेची झाडे लावून ठेवली होती. त्यांना आठवडयातून एकदा पाणी घातले तरी पुरेसे होते. अचानक एका मंगल कार्यालयाचा प्रतिनिधी आला आणि १० पट जास्त किंमत देऊन ती झाडे विकत घेऊन गेला.

बियांची निवड

सर्वात आधी हे ठरवायला हवे की, नर्सरीद्वारे तुम्हाला नेमके काय करायचे आहे. जसे की, तुम्हाला रोपटी विकायची आहेत किंवा बिया, तुळस, बेल अथवा भाज्या किंवा फक्त विदेशी रोपटी विकायची आहेत, हे निश्चित करा.

तुम्ही लिंबाच्या प्रजाती, आंबा, पेरू, डाळिंब, गवती चहा, तुळस, भोपळा, दुधी भोपळा, मिरच्या, टोमॅटो, कडिपत्ता, पालक, गोंडा, सदाबहार, जीनिया इत्यादी लावू शकता. काही वेलीही लावा, ज्या कुठल्याही मोसमात मिळतात. आता तर या वेलींजवळ उंचावर उगवणारी विदेशी रोपटीही चांगल्या प्रकारे वाढीस लागतात. तुम्ही बी पेरून त्याद्वारे छोटी रोपटी उगवून ती विकायचा विचार करीत असाल तर त्यासाठी आधी यासंदर्भातील सर्व माहिती व्यवस्थित मिळवा. त्यानंतर बिजाची निवड करा.

जर तुम्ही केवळ रोपटी विकून पैसे कमवू इच्छित असाल तर मोठे शेत असलेल्या एखाद्या शेतकऱ्याशी करार करा. दरमहा त्याच्या शेतातून रोपटी आणून ती आपल्या छतावर लावून त्याची देखभाल करा व ग्राहकानुसार विका. हे तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

नर्सरी तयार झाली तरी रोपटयांसाठी सतत कसदार माती तयार करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते. शेवटी रोपटे मातीवरच अवलंबून असते. अगदी कमी किमतीत माती सहज उपलब्ध होते. हे जमीन खरेदी करण्याइतके महागडे नाही. यासाठी एकापेक्षा एक कितीतरी सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. सोबतच याकडे नेहमी लक्ष द्या की, निवडण्यात आलेल्या कुंड्या पुरेशा मोठ्या असतील. यामुळे बीज अंकुरित होताना त्याला कुठलीच अडचण जाणवणार नाही.

तुमचा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा असे वाटत असेल तर तुम्हाला रोपटयांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागेल. चांगल्या आणि उच्च गुणवत्तेच्या बिजासाठी शेणखत किंवा पालापाचोळयाचे खत गरजेचे असते. हे यासाठी आवश्यक आहे की, जर कधी कीड वगैरे लागली तर कुंड्यांमधील माती बदलावी लागते. त्यावेळी हे काम अवघड होत नाही. अगदी ४-५ मिनिटांत कुंड्यांमधील माती बदलता येते.

सर्वात मुख्य काम आहे मार्केटिंग

नर्सरी व्यवसायाची शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी मार्केटिंग म्हणजे बाजाराचा शोध घेणे ही आहे. यासाठी तुम्ही सर्वात आधी तुमच्या स्थानिक बाजारात ग्राहक शोधा. विविध ठिकाणी तुमच्याकडील रोपटी आणि बिया तुम्हाला विकता येतील. अशा कितीतरी संस्था आहेत ज्या रोपटी आणि बिया खरेदी करीत असतात.

दरवर्षी जून ते ऑगस्टदरम्यान लाखो खासगी संस्था झाडे लावतात. प्रत्येक जिल्ह्यातील शेकडो सरकारी संस्था वृक्षारोपण किंवा बिया पेरण्याचे काम करतात.

प्रत्येक नगरातील नगरपालिकेला दरवर्षी पावसात कमीत कमी १ ते २ लाख रोपटी लावायची असतात. त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे. ही संख्या दुप्पट किंवा चौपटही असू शकते. तुम्ही जर यासंदर्भात वर्तमानपत्रातील माहितीकडे लक्ष दिले किंवा स्वत: सरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये जाऊन थोडीशी मेहनत घेतली तर वर्षभराची गुंतवणूक तुम्ही केवळ या ४ महिन्यांत सहज परत मिळवू शकता.

तुम्हाला जर तुमच्या कामासाठी जवळपासच बाजार मिळत असेल तर यामुळे तुमचा वाहन खर्चही वाचेल आणि त्यामुळेच उत्पन्नही अधिक वाढेल. तुमचे वागणे मैत्रीपूर्ण असेल तर शेजारी, ओळखीतले आणि मित्रही ग्राहक संख्या वाढविण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

निसर्गाच्या नियमांवर धार्मिक रंग कसे आले

* नसीम अंसारी कोचर

आपण कधी पाहिले आहे काय की मुंग्यानी त्यांच्या आवडत्या देवांची मंदिरे बांधली? मुर्ती बनवली आणि पूजा केली, किंवा मशिदी बांधल्या आणि प्रार्थना केल्या? मुंग्या आणि वाळविंच्या वारुळामध्ये, मधमाश्यांच्या पोळयामध्ये एखादी खोली देवासाठीही असते का? आपण कधीही माकडांना उपवास करतांना किंवा उत्सव साजरे करतांना पाहिले आहे काय? अंडी घालण्यासाठी पक्षी किती कार्यक्षमतेने आणि स्वेच्छेने सुंदर-सुंदर घरटे बनवतात, परंतु या घरटयांमध्ये ते देवासारख्या कोणत्याही गोष्टीसाठी उपासनास्थान बनवत नाहीत? देवासारख्या गोष्टीचे भय मानवाशिवाय पृथ्वीवर दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला नाही. देवाची भीती हजारो वर्षांपासून मानवजातीच्या मनात सतत भरवली जात आहे.

या पृथ्वीवर जवळपास ८७ लाख प्राण्यांच्या वेगवेगळया जाती आहेत, या लक्ष्यावधी प्राण्यांपैकी एक मनुष्यदेखील आहे. हे लक्ष्यावधी जीव एकमेकांपेक्षा भिन्न आकाराचे-वर्तुणूकीचे आहेत, परंतु त्यांच्यात एक गोष्ट समान आहे की त्या प्रत्येकामध्ये दोन जाती आहेत, एक नर आणि एक मादी. निसर्गाने या दोन जातींना समान कार्य दिले आहे की ते एकमेकांवर प्रेम आणि सहवासाद्वारे त्यांच्या प्रजातीला पुढे वाढवत राहावेत आणि पृथ्वीवर जीवन चालवत राहावेत.

जीवशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आढळणाऱ्या लक्ष्यावधी प्राण्यांचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी बरेच शोध, संशोधन आणि प्रयोग केले आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाला त्याच्या संशोधनात असे आढळले नाही की मानव वगळता या पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्याने देवासारख्या शक्तीवर विश्वास ठेवला असेल.

देवाच्या सामर्थ्याची जाणीव होण्यासाठी, त्याच्या नावावर धर्मांची स्थापना केली गेली. धर्माच्या नावाखाली मंदिरे, मशिदी, शिवालय, गुरुद्वार, चर्च बनवले गेलेत. यांमध्ये पूजा, भक्ती, नमाज, प्रार्थना यासारख्या गोष्टी सुरू झाल्या. या गोष्टी करण्यासाठी महंत, पुजारी, मौलवी, पाद्री, पोप यांना येथे बसवले गेले आणि त्यानंतर हेच लोक धर्म आणि ईश्वराची भीती दाखवून संपूर्ण मानवजातीला आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागले. अल्ला म्हणतो की पाच वेळा नमाज वाचा नाहीतर तुम्ही नरकात जाल. देव म्हणतो की दररोज सकाळी स्नान करून उपासना करा अन्यथा नरक प्राप्त होईल, यासारख्या हजारो तर्कविहीन गोष्टी मानवी जगात पसरवल्या गेल्या. हिंसाचाराद्वारे त्यांची भीती मनात भरवली गेली. स्वयंघोषित धर्माचे कंत्राटदार एवढे शक्तिशाली झाले आहेत की त्यांना हे प्रश्न कोणी विचारण्याची हिंमतच केली नाही की देव कधी आला? तो कसा आला? कुठून आला? तो कसा दिसतो? सर्व गोष्टी फक्त तुम्हालाच का सांगून गेला, सर्वांसमोर येऊन का सांगितल्या नाहीत?

मानवजातीने स्वत:घोषित धार्मिक आचार्यांच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला, त्यांनी जसे सांगितले तसे केले. धर्माचार्यांनी अनेक नियम तयार केले. असे जगा, असे जगू नका, हे खा, ते खाऊ नका, असे कपडे परिधान करा, असे कपडे घालू नका, येथे जा, तेथे जाऊ नका, याच्याशी प्रेम करा, त्याच्याशी करू नका, हा आपला आहे, तो परका आहे, आपल्या माणसावर प्रेम करा, इतरांचा द्वेष करा. धार्मिक आचार्यांनी मानवजातीला या पृथ्वीवर भयंकर युद्धात झाकले आहे यात शंका नाही. कोणत्याही धर्माची मुळे शोधा, त्या धर्माचा उदय लढाईतूनच झाला आहे, हजारो वर्षांपासून धर्माच्या नावाखाली भयंकर लढाई चालू आहे. आजही पृथ्वीच्या वेगवेगळया भागात अशा लढाया चालू आहेत. यहुदी, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू हे हजारो वर्षापासून धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली लढवले जात आहेत.

आपण या पृथ्वीवर असणाऱ्या इतर कोणत्याही सजीव प्राण्याला धर्म आणि ईश्वराच्या नावाखाली भांडतांना पाहिले आहे का? ते भांडत नाहीत, कारण हे दोन शब्द (देव आणि धर्म) त्यांच्यासाठी अस्तित्त्वात नाहीत, ते निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमांवर आनंदाने, प्रेमळपणे, आयुष्य पुढे सरकवत जगत आहेत.

पुरुषापेक्षा शारीरिक दृष्टया दुर्बल असलेल्या स्त्रीवर धर्माने सर्वात जास्त अत्याचार आणि दडपशाही केली आहे. जर तिने तिच्यावर लादलेले नियम पाळण्यास नकार दिला तर तिच्या नवऱ्याला तिचा छळ करण्यास उद्युक्त केले गेले. त्याला सांगण्यात आले की हे तुझ्या बायकोकडून करवून घे नाहीतर देव तुला शिक्षा करेल. तू नरकात जाशील. आणि पुरुष त्याच्या प्रियशीचा छळ करू लागला. त्या महिलेवर अत्याचार करू लागला, जी त्याच्या मदतीने या पृथ्वीवर मानवी जीवनाची उन्नती करण्याची जबाबदारी निभावते.

वेश्याव्यवसाय ही धर्माची देणगी आहे

निसर्गाने पुरुष आणि स्त्रीला हे स्वातंत्र्य दिले होते की तरुण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीनुसार जोडीदाराची निवड करावी, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत आणि सृष्टीच्या प्रगतीसाठी आपले योगदान द्यावे. धर्माने मानवजातीला वेगवेगळया मंडळात बांधले. हिंदू मंडळ, मुस्लिम मंडळ, ख्रिश्चन मंडळ, पारशी, जैन इत्यादी. या मंडळामध्येही अनेक मंडळ तयार केली गेली आहेत. माणूस विभक्त होत गेला.

प्रत्येक परिघावर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्माचार्यांनी वीरांची किंवा राजांची निवड केली आणि त्यांना सर्व अधिकारांनी सुसज्ज केले. या अधिकारांपैकी एक म्हणजे स्त्रीचा आनंद लुटणे, धार्मिक लोकांनी लैंगिक समानतेचा नैसर्गिक कायदा नाकारला आणि पुरुषाला स्त्रीच्या वरचा दर्जा दिला.

धर्माचार्यानी राजांना आणि वीरांना समजावून सांगितले की स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे. रंगमहालामध्ये, अंत:पुरामध्ये या उपभोगाच्या वस्तू जबरदस्तीने गोळा केल्या जाऊ लागल्या. एक-एक राजाजवळ शेकडो राण्या होऊ लागल्या. नवाबांच्या अंत:पुरामध्ये सेविका जमू लागल्या. या बहाण्याने धर्माचार्यांनी त्यांच्या भोगविलासाचे सामानदेखील गोळा केले.

देवदासी प्रथा सुरू झाली. स्त्री नगरवधू बनली. इच्छा नसताना सर्वांसमोर नाचवली जाऊ लागली. प्रत्येकाने तिचा जबरदस्तीने उपभोग केला. देवदासींचा छळ एक प्रथा बनली. कालांतराने महिला कलावंतीण, वेश्या म्हणून वाडयां/खोल्यांमध्ये डांबली गेली आणि आता हॉटेलमध्ये वेश्या किंवा बार नर्तकीच्या रूपात दिसते. महिलेच्या या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? फक्त धर्म.

विधवापण ही धर्माची देणगी आहे

पुरुष जोडीदाराच्या मृत्यूनंतर धर्मगुरूंनी धर्म आणि देवाची भीती दाखवून महिलेला दुसरा जोडीदार निवडण्यास बंदी घातली. पुरुष कोणत्याही कारणास्तव मरण पावला असेल, यासाठी महिलेला दोषी ठरविण्यात आले. तिला शिक्षा देण्यात आली. तिच्याकडून कपडे हिसकावले गेले. केस काढून टाकले गेले. शृंगारावर बंदी घालण्यात आली.

तिला तुरूंगाप्रमाणे तिच्याच घरात राहायला भाग पाडले गेले. तिला उघडया जमिनीवर झोपायला विवश केलं. ज्याने इच्छा केली तिच्यावर बलात्कार केला. तिला नीरस-कोरडे अन्न दिले गेले. स्त्रीच्या इच्छेविरूद्ध ही सर्व हिंसक कृत्ये धर्मगुरुंनी देवाची भीती दाखवून पुरुष समाजाकडून करवून घेतली. विधवेला वेश्या बनविण्यातही ते मागे राहिले नाहीत.

या पृथ्वीवरील कोणत्याही इतर प्राण्याच्या जीवनात असे होतांना पाहिले गेले आहे काय? काही कारणास्तव नराच्या मृत्यूनंतर, मादी इतर नराबरोबर प्रेमक्रीडा करत सृष्टीच्या नियमाला गतिशील ठेवते. मादीच्या मृत्यूनंतर पुरुषही असेच करतो. त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तेथे फक्त प्रेम असते.

सती आणि जौहर प्रथा धर्माच्या देणगी आहेत

धर्माचार्यांनी सर्वप्रथम त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी लढाया करविल्या. त्यात लाखो माणसे मारली गेली. लूटमार झाली, विजयी राजे आणि त्यांच्या सैन्याने हरवलेल्या राजांच्या आणि त्यांच्या कुळातील स्त्रियांवर अत्याचार केले. सैनिकांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केले. त्यांना ठार मारले, त्यांना दासी बनवून नेले. धर्माचार्यांनी या कृत्याचे कौतुक केले. यास योग्य कृत्य म्हणून सांगितले. या कृत्यावर कोणत्याही धर्माचार्यांनी कधी बोट ठेवले नाही. छळ, शोषण, अत्याचार आणि कैदी बनविणे जाण्याच्या भीतीने महिलांनी आपल्या राजाच्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सती व जौहरचा मार्ग स्वीकारला. धर्माचार्यांनी या कृतीलाही योग्य ठरविले. महिलांनी आपल्या पुरुष सैनिकांच्या प्रेतांबरोबर स्वत:ला जाळून संपवण्यास सुरूवात केली. एकत्रितपणे गोळा होऊन आगीत उडी मारून जौहर करु लागली.

जरा विचार करा की त्यांनी किती त्रास सहन केला असेल. जर आपले बोट जळले, फोड आले तर ते खूप दुखवते आणि त्या संपूर्ण शरीरासह अग्नीत जळत राहिल्या, कोणत्याही धर्माचार्याला त्यांची वेदना जाणवत नव्हती, ही त्या काळातील सर्वात पवित्र धार्मिक कृती असल्याचे म्हटले जाते.

बालविवाहदेखील धर्माचीच देणगी

धर्माच्या कंत्राटदारांनी आपापल्या धर्मांची व्याप्ती निश्चित केली आणि त्यांनी स्त्री-पुरुषांच्या इच्छा-अनिच्छेला नियंत्रित केले. पुरुष आणि स्त्रियांनी त्यांचा धर्म सोडून इतरांच्या धर्मात प्रवेश करू नये. इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपला जोडीदार बनवू नये, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविवाह प्रथा सुरू केली गेली. नवजात बालकांचेदेखील विवाहसोहळे सुरू केले गेले जेणेकरुन तरुण झाल्यानंतर, ते त्यांच्या पसंतीनुसार किंवा आवडीनुसार त्यांच्या प्रेमाचे जोडीदार निवडू नयेत.

बुरखा प्रथेच्या मुळाशी धर्म

आपण कधीही एखाद्या सिंहिनीला तिचा चेहरा लपवत फिरत असल्याचे पाहिले आहे किंवा मादी कबुतराला बुरखा ओढलेले पाहिले आहे? जर निसर्गाचा असा हेतू असता की स्त्री जातीने आपले तोंड पुरुषापासून लपवावे तर त्याने सर्व प्राण्यांसाठी काही ना काही व्यवस्था केली असती. भले पानांचा पदर राहिला असता, पंखांचा मुखवटा राहिला असता तरी मादी पक्षीने त्यातून आपले तोंड लपवले असते. परंतु हे कोठेही दिसत नाही. असे केवळ मानवी जगातच दिसून येते की स्त्री बुरखा घालण्यास विवश आहे. तोंड आणि शरीर लपविण्यासाठी तिला भाग पाडले जाते, का? कारण धर्माचार्यांनी असे म्हटले आहे की जर स्त्रीने पुरुषापासून बुरखा केला नाही तर हे पाप आहे, ती नरकात जाईल.

नुकतीच भारताचे क्रेंद्रशासित राज्य अंदमान येथे एक घटना घडली. अंदमानच्या सेंटिनेल बेटात ६० हजार वर्ष जुनी एक प्राचीन आदिवासी जमात राहते. निसर्गाच्या नियमांचे पालन करत तेथील स्त्री-पुरुष आजही या पृथ्वीच्या इतर प्राण्यांसारखेच जीवन जगतात. तेथे धर्म, देव, धार्मिक कट्टरता, कपडे, दागदागिने यासारख्या गोष्टींसाठी स्थान नाही. तेथे स्त्री-पुरुष एकसारखेच कपडयांविना जंगलात फिरत असतात. शिकार करून त्यांना त्यांचे भोजन मिळते आणि मोकळेपणाने सहवास करून ते आपले आयुष्य जगतात.

तेथे पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. तेथे कोणीही मोठे किंवा लहान नाही. या बेटावर पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी आहे. पण ख्रिस्ती धर्माच्या एका अनुयायाने त्यांच्या आयुष्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हेतू हा होता की त्यांच्यामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार करणे. आपल्या तर्कहीन गोष्टींमध्ये अडकवून देवाचा आणि धर्माचा धाक त्यांच्यात बसवू शकेल.

त्याने फुटबॉल, मेडिकल किट इत्यादी वस्तूदेखील आपल्याबरोबर त्यांना मोहात पाडण्यासाठी नेल्या, जसे ख्रिस्ती मिशनरी सहसा आपला धर्म पसरवण्यासाठी करतात. जॉन एलन चाऊ नावाच्या या अमेरिकन नागरिकाने या बेटावर पोहोचून आदिवासींशी संपर्क साधला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदिवासींना त्याचा घृणास्पद हेतू कळला. जॉन एलन चाऊ घेरला गेला आणि त्यांच्या बाणांनी घायाळ झाला.

या एका घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की ज्यांना निसर्गाचे नियम समजतात ते आजही ते नियम बदलू इच्छित नाहीत, परंतु धर्म आणि देव यासारख्या तर्कविहीन गोष्टी निर्माण करणारे निसर्गाचे नियम पायदळी तुडवून चुकले आहेत, त्यांचे मूळ रूप एवढे खालावले आहे की पुन्हा त्यात सुधार होण्यासाठी एखाद्या प्रलयाचीच प्रतीक्षा करावी लागेल. मानवांमध्ये बुद्धिमत्तेचा विकास हा पृथ्वीवरील इतर प्राण्यांपेक्षा जास्त आहे, परंतु विध्वंसक कार्यात याचा अधिक उपयोग केला गेला आहे. याउलट, जर आपण स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या संदर्भात निसर्गाचे नियम अधिक खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे परिणाम बरेच चांगले राहीले असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें