गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  खीर

तांदळाची खीर

 साहित्य

  • 1 वाटी बासमती तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1 वाटी साखर
  • काजू, बदाम, पिस्ते, मनुका, केशर, वेलची पावडर
  • 2 चमचे तूप.

 कृती

एक वाटी बासमती तांदूळ (इतर कोणतेही घेऊ शकतो ) स्वच्छ धुवून अर्धा तास  पाण्यात भिजवायचे मग त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून ते कणीदार जाडसर वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. त्या दुधाला एक उकळी आली कि वाटलेले तांदूळ त्यात घालून सतत ढवळत राहावे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. तांदूळ मऊ होऊ लागल्यावर त्यात आवडीनुसार साखर घालावी व ढवळत राहावे. भात पूर्ण मऊ झाला कि गॅस बंद करून त्यात वेलची-जायफळ पूड घालावी. केशर टाकावं. काजू ,बदाम, पिस्त्याचे पातळ काप एकत्रित करावे. शेवटी 2 चमचे तूप पसरावं. ही खीर गरम किंवा थंड कशीही छान लागते .

# टीप: तांदळाची खीर जसजशी थंड होते तशी ती सुकत जाते घट्ट होत जाते , त्यामुळे आपण त्यात सोयीनुसार गरम किंवा थंड दूध घालून  पुन्हा थोडी पातळ करून सर्व्ह करू शकतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  आमरस

 साहित्य

  • 3 हापूस वा रायवळ आंबे
  • अर्धा कप घट्ट साईचं दूध
  • वेलची पावडर.

कृती

3 हापूस आंब्यांचा रस काढून घ्यावा. रस मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप घट्ट साईचं दूध आणि वेलची पावडर एकत्रित करून घ्यावं. शक्यतो साखर वापरू नये. आवडतं असल्यास साखर आणि थोडंसं तूप घ्यावं. गरमागरम पुरीसोबत वा पुरणपोळी सोबत आस्वाद घ्यावा.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  पंचामृत

 यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा वापर जेवणात करतात. म्हणजेच कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.

साहित्य

 

  • 5-6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धी वाटी दाण्याचं कूट
  • अर्धी वाटी तिळाचं कूट
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • अर्धी वाटी किसलेला गूळ
  • पाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या
  • ७-८ कढीपत्त्याची पानं
  • मोहरी-हिंग-हळद
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.

कृती

एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला. जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला. चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या. जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. यामध्ये कडुलिंबाची फुले घाला.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें