आरोग्य परामर्श

* प्रतिनिधी

प्रश्न – माझे वय २५ वर्षे आहे आणि मला कोणताही आजार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून मला खूप पांढरा स्त्राव होत आहे. हे का होत आहे हे मला समजत नाही. काळजी करण्यासारखे काही आहे का?

उत्तर- स्त्रियांमध्ये योनीतून स्त्राव होणे सामान्य आहे. यावरून असे दिसून येते की शरीराच्या आत असलेल्या ग्रंथी चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि हार्मोन्स तयार करण्याची प्रक्रिया देखील सामान्य पद्धतीने सुरू आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सुषमा यांच्या मते, पांढर्‍या स्रावाची अनेक कारणे आहेत जसे की-

* शारीरिक बदल- कधी कधी शारीरिक बदलांमुळेही पांढरा स्त्राव होतो.

* मासिक पाळी येण्यापूर्वी – मासिक पाळी येण्यापूर्वी सतत पांढरा स्त्राव येणे सामान्य आहे.

* गर्भधारणा- गरोदरपणात किंचित गंध असलेले पांढरे पाणी येणे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान, स्त्रीच्या शरीरात हार्मोनल बदल होत राहतात, त्यामुळे कधीकधी पांढरा स्त्राव जास्त असू शकतो.

* टेन्शन घेणे- अनेक वेळा स्त्रिया तणावाच्या बळी ठरतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. तणावामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळे योनीतून स्त्राव सुरू होतो.

ही सर्व कारणे शरीरातील किंवा हार्मोनल बदलांमुळे आहेत जी लवकर बरी होतात. पण जास्त प्रमाणात असल्यास पांढरा स्राव हा चिंतेचा विषय बनतो. डॉक्टर सुषमा म्हणतात, “जेव्हा डिस्चार्जमध्ये बदल दिसून येतो तेव्हा योनीतून स्त्राव चिंतेचा विषय बनतो. बदल अनेक प्रकारचे असू शकतात जसे-

* डिस्चार्जच्या रंगात बदल – जर तुमच्या स्रावाचा रंग पांढर्‍याऐवजी हलका पिवळा किंवा लाल झाला असेल आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागली असेल तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. डॉक्टर सुषमा सांगतात की हा संसर्ग बुरशीजन्य, बॅक्टेरिया किंवा लैंगिक संक्रमित रोगांमुळे देखील होऊ शकतो.

* जळजळ आणि खाज सुटणे – जर तुम्हाला जास्त स्त्राव सोबत जळजळ आणि खाज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही काही संसर्गाचे बळी आहात, अशा परिस्थितीत तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

* कपडे खराब होतात – डिस्चार्ज झाल्यामुळे तुमचे कपडे खराब झाले असतील, तुम्हाला खूप ओले वाटत असेल, तर ही चिंतेची बाब आहे, अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे.

* प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना तुम्हाला पांढरा स्राव होत असेल तसेच प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त प्रमाणात पांढरा डिस्चार्ज संसर्गामुळे होतो, त्यामुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रायव्हेट पार्टवर कधीही साबण किंवा शैम्पू वापरू नका कारण यामुळे त्वचेची पीएच पातळी बदलू शकते. प्रायव्हेट पार्ट धुण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा किंवा योनीमार्गाचा वापर करा.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४५ वर्षांची गृहिणी आहे. माझा नवरा कपडयांचा एक मोठा व्यापारी आहे आणि तो माझ्यापेक्षा ४ वर्षांहून मोठे आहेत. आमचा २२ वर्षांचा १ मुलगा आणि १९ वर्षांची १ मुलगी आहे. काही काळापूर्वीच फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी आमची युरिन, मल आणि रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, इतर सर्व अहवालांमध्ये तर कुठली काही कमतरता नव्हती, परंतु आम्हां सर्वांमध्ये व्हिटॅमिन-डी फारच कमी प्रमाणात मिळालं. आमचे खाणे-पिणे चांगले आहे, घरात हिरव्या भाज्या आणि फळे रोज येतात, प्रत्येकजण ते आनंदाने खातात, परंतु तरीही आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे. कदाचित असे तर नाही की हा चाचणी अहवालच चुकीचा असावा? निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आवश्यक असते? त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कोण-कोणते साधे उपाय करू शकतो? शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर : गेल्या एका दशकात देशाच्या विविध भागात व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी बरेचसे मोठे अभ्यास झाले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की निरोगी दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये केल्या गेलेल्या या विस्तृत अभ्यासात ५० ते ९४ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी असमाधानकारक आढळून आली आहे. आपल्या कुटुंबातदेखील ही कमतरता मिळणे यासाठी अनैसर्गिक म्हटले जाऊ शकत नाही.

तपासणी केल्यावर भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या या कमतरतेमागील अनेक कारणे आढळली आहेत. बहुतेक भारतीय शाकाहारी आहेत आणि शाकाहारी आहार, ज्यामध्ये भाज्या, कडधान्य (डाळी), अन्न, फळे यांचा समावेश आहे, व्हिटॅमिन डीच्या बाबतीत हे अत्यंत कमकुवत आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे शरीराच्या यंत्रणेद्वारे स्वत:च त्याचे उत्पादन करणे. जेव्हा सूर्याची अतिनील प्रकाश किरणे आपल्या त्वचेला वेधून त्यात असलेल्या ७ डायहायड्रोकोलेस्ट्रॉलवर आपला प्रभाव टाकतात तेव्हा त्याच रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ३ तयार होतो. हे खरं आहे की आपल्या देशावर सूर्य देवाची पूर्ण कृपा आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणे आपल्या त्वचेपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, आमचा गव्हाळी सावळा रंग, जो त्यामध्ये असलेल्या मेलेनिन रंगद्रव्यामुळे आहे, उरलेल्या अतिनील प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. तिसरे, आपल्या जीवनशैलीत आपल्याला उघडया उन्हात उठा-बसायलाही वेळ मिळत नाही.

शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, तूप, लोणी, पनीर आणि खुंबी तर मांसाहारींसाठी अंडयातील पिवळे बलक, मासे आणि डुकराचे मांस हे व्हिटॅमिन डी ३ चे नैसर्गिक स्त्रोत आहेत. परंतु शरीराची व्हिटॅमिन डी ३ ची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ चे पूरक आहार घेणे नेहमी आवश्यक असते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची मुख्य उपयोगिता हाडांमध्ये कॅल्शियम साठा करून ठेवण्यात आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम कमी होतो, ज्यामुळे मुलांमध्ये रिकेट्सची समस्या उद्भवते आणि प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होतात.

प्रश्न : सामाजिक अंतर, मुखवटा घालणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याव्यतिरिक्त कोविड १९पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो? अशा काही युक्त्या आहेत काय ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवू शकतो? काही होमिओपॅथी डॉक्टर म्हणतात की ऑर्सीनिक आणि कॅफर औषधे घेतल्यास आपण स्वत:मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करू शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर असे काही व्हिडिओदेखील चालू आहेत की दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पीत राहिल्याने कोरोना विषाणू जवळ येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे?

उत्तर : लॉकडाऊन असूनही शक्य तितके शरीर आणि मन स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्याच्या सर्व सामान्य उपायांकडे लक्ष द्या. घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा खोलीतच उठता-बसतांना साधे व्यायाम करा. रात्री ७-८ तासांची झोप घ्या. निरोगी संतुलित आहार घ्या..

अशी काही कामे करत राहा की मन प्रसन्न आणि आल्हाददायक राहील. घरामध्ये खेळले जाणारे खेळ, टीव्हीवरील विनोदी चित्रपट आणि मालिका, मुले व कुटुंबियांसह मनातील गोष्ट, घरातील वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या छोटया-छोटया गोष्टींनी मन निरोगी ठेवू शकता. नेहमीच टीव्हीवर कोविड १९शी संबंधित नकारात्मक बातम्या पाहत राहणे अजिबात चांगले नाही.

घरात कोणी धूम्रपान करत असेल तर त्यावर बंदी घाला. जर तुम्हाला अल्कोहोलची आवड असेल तर ते घेऊ नका. हे ते सुपरिचित उपाय आहेत, ज्याद्वारे शरीराची अंतर्गत बायोकेमिस्ट्री निरोगी राहते आणि ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अर्थात इम्युनिटीवरदेखील अनुकूल परिणाम होतो.

जिथपर्यंत होमिओपॅथ डॉक्टरांच्या दाव्यांची बाब आहे, तर आतापर्यंत त्यांचे कोणतेही वैज्ञानिक पुष्टीकरण झालेले नाही. म्हणून त्यांच्यापासून काही फायदा होत असेल हे सांगणे कठीण आहे. जिथपर्यंत दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पिण्याचे उपाय आहेत, त्यांच्या बाजूनेही कोणतेही ठोस पुरावे तर उपलब्ध नाहीत, परंतु जर कोणाची इच्छा असेल तर ते अवलंबण्यात काही नुकसानदेखील नाही.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मी २२ वर्षांची आहे. माझी समस्या अशी आहे की, जेव्हा मी आर्टिफिशियल दागिने घालते तेव्हा माझ्या त्वचेवर पुरळ उठते. यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे?

आर्टिफिशियल दागिने घालण्यापूर्वी स्कीन क्रीमचा वापर करा. दागिने काढल्यानंतर दागिन्यांचा स्पर्श झालेली जागा डेटॉलने धुवा.

  • मी २५ वर्षांची आहे. काही दिवसांपासून भुवयांवरील केस गळत आहेत. कृपया असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे हे केस गळणे थांबेल?

तुमच्या भुवयांचे केस गळण्याचे कारण तणाव हे असू शकते. जास्त तणावामुळे केस गळू लागतात. म्हणून तणावात राहणे बंद करा. जेवणातील झिंक, आयर्न, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळेही भुवयांचे केस गळू लागतात. यावर उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल बोटांवर घेऊन भुवयांची गोलाकार दिशेने मालीश करा. ३० मिनिटांपर्यंत तेल तसेच लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

  • मी १८ वर्षांची आहे. माझे केस खूपच तेलकट आहेत. शाम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेलकट होतात. शाम्पू करण्यापूर्वी मी केसांना खोबरेल तेल लावते. खोबरेल तेल लावणे योग्य आहे का?

तुमच्या समस्येचे कारण हेदेखील असू शकते की, केसांना शाम्पू केल्यानंतरही तुमच्या केसांमधील तेल चांगल्या प्रकारे निघून जात नसेल. केसांना पोषण मिळावे यासाठी तेलाऐवजी हेअर टॉनिक लावा. यामुळे केस निरोगी होतील आणि तेलकटही होणार नाहीत. केस तेलकट दिसू नयेत यासाठी शाम्पूत लिंबाच्या रसाचे काही थेंब घातल्यानंतरच केसांना शाम्पू करा. केस धुतल्यानंतर केसांची २ ते ३ इंच त्वचा सोडून कंडीशनर लावा.

  • मी १९ वर्षांची आहे. माझा रंग सावळा आणि केस काळे आहेत. एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार मी केसांना बरगंडी कलर लावला. पण यामुळे माझा रंग अधिकच सावळा दिसू लागला. मला वाटते की, बरगंडी कलर मला शोभत नाही. कृपया सांगा की, केसांचा हा रंग कसा आणि किती लवकर काढता येईल? शिवाय माझा चेहरा आणि केसांवर कोणता रंग शोभून दिसेल, हेदेखील सांगा?

केसांना लावलेल्या रंगामुळे तुम्ही घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांना नैसर्गिक रंगाची डाय लावा आणि केसांना चांगले कंडिशनिंग करा. नेहमी चांगल्या क्लॉलिटीचाच शाम्पू वापरा, जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही. तुमच्या सावळया रंगावर वाईन आणि वॉलनट कलर चांगला दिसेल. सर्व केसच कलर करणे मुळीच गरजेचे नाही. वाटल्यास तुम्ही हेअर कलरने केसांच्या काही बटा रंगवू शकता.

  • मी १८ वर्षांची आहे. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी मी मसुर डाळीचा लेप लावते तेव्हा माझ्या चेहऱ्यावर पुळया येतात. पुळया आणि चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी काही उपाय सांगा?

तुमच्या समस्येवरुन हे लक्षात येते की, तुमची त्वचा खूपच संवेदनशील आहे. यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा पुळया येतात. तुम्ही त्वचेवर लेप लावू नका. कारण लेप सुकल्यावर तो घासून काढताना त्वचेच्या ज्या भागाला तेलाची गरज असते तेथून ते निघून जाते. त्यामुळे अशा भागावर कडुलिंब आणि तुळशीच्या पानांचा लेप लावा. तुम्ही ताजी पाने कुटून त्याचाही फेसपॅक बनवू शकता. अॅलोवेरायुक्त क्रीमचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. यामुळे पुळया कमी होतील आणि हळूहळू तेथील डागही निघून जातील.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा कधी चेहऱ्यावर क्रीम लावते तेव्हा चेहऱ्यावर व्हाईटहेड्स येतात. कृपया ते काढून टाकण्याचा उपाय सांगा?

व्हाईटहेड्सची समस्या चेहऱ्याची रंध्रे, तेलकटपणा तसेच अस्वच्छतेमुळे उद्भवते. व्हाईटहेड्स त्वचेच्या आतील रंध्रांमध्ये तयार होतात, ज्याला पुरेसा प्रकाश मिळत नाही आणि त्याचा रंग सफेद असतो. आपल्या त्वचेत नैसर्गिकरित्या तेलकटपणा असतो, जो त्वचेचा मुलायमपणा आणि त्वचेचे मॉईश्चर कायम ठेवतो. त्वचेवर जास्त तेलकटपणा असेल तर त्यामुळे त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम्स अशा असतात ज्या त्वचेला आणखी तेलकट करतात. ज्यामुळे त्वचेवर पुळया येऊ लागतात. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ऑईल फ्री क्रीमचाच वापर करा. व्हाईटहेड्स घालवण्यासाठी मेथीच्या पानांत पाणी घालून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर चोळा. विशेष करुन जिथे व्हाईटहेड्स असतील तिथे ही पेस्ट लावा. यामुळे व्हाईटहेड्स दूर होतील. पेस्ट सुकल्यावर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

  • पेन्सिल आयलायनर आणि लिक्विड आयलायनर यापैकी जास्त परिणामकारक काय आहे?

लिक्विड आयलायनरमुळे डोळे जितके मोठे आणि आकर्षक दिसतात तितके पेन्सिल आयलायनरने दिसत नाहीत. लिक्विड आयलायनर खूप काळ टिकूनही राहतो. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांच्यासाठी लिक्विड आयलायनर जॅकपॉटसारखा आहे. ते बराच काळ त्याच शेपमध्ये राहते, सोबतच त्यामुळे काळपटपणा दिसत नाही. याउलट पेन्सिल किंवा पावडर लायनरमुळे डोळयांच्या आजूबाजूला तेलकटपणा निर्माण झाल्याने दिवसभरात दिलेला शेप खराब होऊ शकतो किंवा निघूनही जाऊ शकतो. लिक्विड आयलायनरचा हादेखील मोठा फायदा आहे की, तुम्ही याच्या मदतीने काहीही क्रिएटिव्ह करु शकता.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवा

प्रश्न : माझ्या पतीचे वय ५२ वर्षं आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या वडिलांचे व बहिणीचे दोघांचेही मृत्यू ब्रेन स्ट्रोकमुळे झाले होते. वडिलांचे वय ६६ वर्षं व बहिणीचे वय ६२ वर्षं असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या कारणांमुळेच त्यांच्या प्रकृतीबाबत मला अधिक काळजी वाटते. ब्रेन स्ट्रोक हा आनुवंशिक आजार आहे का? यापासून बचाव करायचा झाल्यास काय उपाय करता येतील?

उत्तर : सद्यस्थितितील वैज्ञानिक माहितीनुसार ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूची विकार त्याच हानिकारक बाबींमुळे उद्भवू शकतो, ज्यामुळे हृदय विकाराचा धोका संभवतो. या बाबींमध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, धुम्रपान, अस्थिर लिपिड प्रोफाईल व कौटुंबिक रोगाची जनुके येतात.

यात उपाय म्हणून नियमित रक्तदाब तपासून घेणे व तो १३०/८० पर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करणे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे व फास्टींग ब्लड शुगर ११० मिलिग्रॅम व लाकोसिलेटेड हेमोग्लोबिन ६.५च्या आत ठेवणे. धुम्रपान करत असाल तर सोडून द्या, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण असू द्या, संतुलित आहार घ्या, स्थूल होणार नाही याची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा व अतिताण घेऊ नका, डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित बेबी अॅस्प्रीनचा डोस घेणे ही लाभदायक ठरेल. बेबी अॅस्प्रिनच्या डोसमुळे धमन्यांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि धमन्यांमध्ये रक्ताची गुठळी न होण्यासही मदत होते.

तरीही कधी त्यांना कुठल्याही प्रकारच्या पक्षाघाताची लक्षणे दिसलीच तर वेळ न दवडता त्यांना इस्तिळात दाखल करा. बऱ्याचदा मेंदूच्या विकारांमध्ये योग्य प्रकारे प्रथमोपचार मिळाल्यास परिस्थिती आटोक्यात राखता येते, अन्यथा पक्षाघात किंवा इतरही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

प्रश्न : मी १८ वर्षांचा असून बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. काही दिवसांपासून जवळपास दर आठवड्याला १-२ वेळेस तरी रात्री स्वप्नंदोष होत आहे. माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे की मला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवायला हवं नाहीतर त्याचे माझ्या तब्येतीवर दुष्परिणाम होतील. ही समस्या खरंच एवढी गंभीर आहे का? की मला खरंच एखाद्या डॉक्टरकडे जायला पाहिजे? मी काही वैद्य-हकीम यांच्या जाहिरातीदेखील पाहिल्या आहेत. ज्यात स्वप्नदोषावर खात्रीशीर उपचारांचा दावा केला जातो. माझी मानसिक स्थिती खूप विचलित झाली आहे. मी काय करावे? उपाय सुचवा.

उत्तर : तुम्ही गोंधळून जाऊ नका. किशोरावस्थेतून युवावस्थेत प्रवेश करताना आपले शरीर अधिक संवेदनशील झालेले असते. लैंगिक हारमोन्स वाढीस लागलेले असतात. अंड ग्रंथी शुक्राणू तयार करू लागलेल्या असतात. प्रजनन  प्रक्रियेत वीर्य बनू लागते आणि पौरूषत्त्वाची इतर शारीरिक लक्षणंही दिसू लागतात. या अवस्थेत काही किशोरावस्थेतील मुलांना व युवकांनाही रात्री झोपताना उत्तेजना जागृत झाल्यामुळे वीर्यपतन होणे सामान्य लक्षण आहे. बोली भाषेत याला आपण स्वप्न दोष असे म्हणतो.

खरं तर हा कुठलाही आजार नसून एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत ही शारीरिक घटना कुठल्याही वयोगटातील पुरुषांमध्ये आढळते. या क्रियेला स्वप्नमैथुन म्हणणं अधिक योग्य ठरेल कारण याचा संबंध कामुक स्वप्नांशी आहे, जी झोपेतून उठल्यानंतर आठवतही नाहीत. ही क्रिया म्हणजे कामेच्छांचा निचरा होण्याचा नैसर्गिक मार्ग आहे असे मानसोपचार सांगतात.

पण लक्षात ठेवा चुकूनही वैद्य हकिम यांच्या नादी लागू नका. कित्येक वैदू बाबा काहीही भ्रमाक गोष्टी सांगून अनेक युवकांचे युवा जीवन उध्वस्त करतात.

प्रश्न : मी एक ५४ वर्षीय महिला आहे. माझ्या उजव्या कानावर एक भुरकट काळ्या रंगाचा तीळ आहे. मागील काही दिवसांपासून मला असं वाटतंय की तीळाचा आकार वाढलेला आहे हे काही आजाराचे लक्षण तर नाही ना? माझ्या एका मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की कधीकधी तीळामध्येसुद्धा कॅन्सर उत्पन्न होऊ शकतो. हेखरं आहे का? मला काय करावे लागेल

उत्तर : हे खरे आहे की तीळ एक सेंटिमीटर ने वाढला, रंगात काही फरक दिसू लागला, खाज सुटू लागली किंवा त्यातून रक्त येऊ लागले तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घेतली पाहिजे. अनेक वर्षांच्या अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला गेला आहे की त्यातील ३,००० पुरुषांमधील एक व १०,८००मधील एका स्त्रिच्या तीळामध्ये मेलोनोमा नामक कॅन्सर उद्भवू शकतो.

सुरुवातीलाच जर शस्त्रक्रिया करून मुळापासून तीळ काढून टाकला तर यापासून अडचणीतून मार्ग काढता येऊ शकतो. जर दुर्लक्ष केले गेले तर मेलोनोमा शरीरात पसरल्यामुळे हा रोग जीवघेणा ठरू शकतो.

आरोग्य परामर्श

* डॉ. अरविंद वैद्य, आयव्हीएफ एक्सपर्ट,
इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं आहे. मी आणि माझे पती दोघंही मायनर थॅलेसीमिक आहोत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर आम्ही मुलाचं प्लॅन केलं, तर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता ९० टक्के असेल. यासाठी काही मेडिकल उपाय आहे का?

उत्तर : आईवडील दोघंही थॅलेसीमिक असल्यावर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता २५ टक्के, मायनर थॅलेसीमिक होण्याची ५० टक्के आणि सामान्य होण्याची २५ टक्के शक्यता असते. संपूर्ण जगात असं कोणतंही औषध नाही, जे याला रोखू किंवा बरं करू शकेल. मुलाला थॅलेसीमिकच्या विळख्यातून वाचवण्यापासून जन्मापूर्वी डायग्नोसिसच्या दोन पध्दती आहेत.

पहिली सीव्हीएम म्हणजेच क्रोनिक विलस बायोप्सी. अशा वेळी मूल जर असामान्य असेल, तर गर्भपात करून घ्यावा. दुसरं आईवडील दोघांच्या म्युटेशन स्टडीनंतर पीजीडी म्हणजेच प्रीजेनेटिक डायग्नोसिस करून घ्यावे. त्यानंतर निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात इंप्लांट केले जाते.

प्रश्न : माझं वय ३७ वर्षे आहे. लग्नाच्या ८ वर्षांत माझे ४ गर्भपात झाले आहेत. अशा वेळी मी काय केले पाहिजे? मी असं ऐकलं आहे की, आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो?

उत्तर : हे अगदी बरोबर आहे की आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो, विशेषत: ३ महिन्यांमध्ये. जर आपला ४ वेळा गर्भपात झाला असेल, तर आयव्हीएफचा पर्याय निवडा. अशा स्थितीत भ्रूणांना तयार केल्यानंतर त्यांची जेनेटिक स्क्रिनिंग केली जाते. निरोगी भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. त्यामुळे गर्भावस्थेचा दरही वाढतो आणि गर्भपाताचा धोकाही कमी होते.

प्रश्न : माझे वय ३० वर्षे आहे. मी अजून लग्नासाठी तयार नाहीए, पण आई बनायची इच्छा आहे. वाढत्या वयाबरोबर मी आई बनण्याचं सुख गमावू शकते का? मी काय केले पाहिजे?

उत्तर : आपण वय वाढल्यानंतरही आपली बायोलॉजिकल अपत्य प्राप्त करू शकता. त्यासाठी २ पर्याय उपलब्ध आहेत. जर आपण विवाहित असाल किंवा आपला पार्टनर फिक्स असेल, तर आपण अँब्रियो फ्रीजिंगचा पर्याय निवडू शकता. यात अंडी आणि शुक्राणूंना फलित करून भ्रूण तयार करून त्याला फ्रीज करता येतं. जर आपण सिंगल असाल, तर आपण एग फ्रीज करू शकता. याला विट्रीफिकेशन म्हणतात. यात तरल नायट्रोजनमध्ये यांना प्रीझर्व्ह करून ठेवले जाते. अनेक वर्षे याला सुरक्षित ठेवले जाते. यासाठी आपल्याला वार्षिक शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न : मी २७ वर्षीय अविवाहित महिला आहे. मला फायब्रॉइडची समस्या आहेत. मग याचा अर्थ मी कधीही आई बनू शकत नाही का?

उत्तर : असं आवश्यक नाहीए, सर्वप्रथम समस्या किती गंभीर आहे, याची तपासणी केली जाते. फायब्रॉइड अनेक प्रकारचे असतात. जेव्हा फायब्रॉइडचा आकार खूप मोठा होतो आणि समस्या गंभीर होते, तेव्हा त्याला ऑपरेशनद्वारे काढलं जातं. अनेक प्रकरणांत तर ते न काढताच गर्भधारणा शक्य होते.

प्रश्न :  कमी वयात डायबिटिक असलेल्या महिलेला कंसिव्ह करण्यात खूप समस्या येते का?

उत्तर : बऱ्याच प्रकरणांत डायबिटिक महिला निरोगी मुलांना जन्म देतात. डायबिटिसबरोबर जी सर्वात मोठी समस्या जोडलेली आहे, ती आहे शुगर लेव्हलची. जर शुगर अनियंत्रित असेल, तर मुलांमध्ये आनुवंशिक व्यंग निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. परंतु रक्तात शुगरच्या प्रमाणाला नियंत्रित केले गेले, तर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करून सामान्य मुलाला जन्म देणे शक्य आहे.

प्रश्न : मी असं ऐकलं आहे की महिला आपलं अंड दान करून दुसऱ्या एखाद्या महिलेला आई बनायला मदत करू शकते. मी अशा एखाद्या महिलेला मदत करू शकते का आणि याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो का?

उत्तर : कोणतीही महिला अंडी दान करू शकते. केवळ तिला डोनर बनण्यापूर्वी काही तपासण्या करून घ्याव्या लागतात. अंडी दान करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट असणे खूप आवश्यक आहे. एका डोनरचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असायला हवे.

प्रश्न : माझे वय ४५ वर्षे आहे. माझ्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत, परंतु मूल झालेलं नाहीए. मी अलीकडेच एका बातमीत पाहिलं होतं की ५० वर्षांच्या वयातही महिला आई बनू शकतात. मेनोपॉजनंतरही मी आई बनू शकते का?

उत्तर : असिस्टिव्ड रीप्रोडक्टिव्ह तंत्राने मेनोपॉजनंतरही आई बनणे शक्य बनले आहे. मेनोपॉजचा अर्थ अंडी संपणं. अशावेळी एखाद्या एग डोनरकडून अंडी घेतली जातात आणि ती प्रयोगशाळेत फलित करून भ्रूण तयार केला जातो. मग भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. तसेही आईव्हीएफमध्येही उत्तम परिणाम ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्याच महिलांना मिळतात. आपले वय ४५ वर्षे आहे, जर आपण शारीरिकरीत्या फिट आहात, तर पॉझिटिव्ह परिणाम मिळण्याची शक्यता जास्त आहे.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर : आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवासाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते.

सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

प्रश्न : मी २२ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या पतिचे वय ३१ वर्षे आहे. आमच्या विवाहाला १ वर्ष झाले आहे. परंतु इच्छा असूनही मी गरोदर राहू शकले नाही. मी आई होण्याचे सुख मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?

उत्तर : कदाचित आपल्याला हे सत्य माहीतच असेल की महिलेला प्रेग्नंट होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की, पतिपत्नीने त्या दिवसांत शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत, ज्या दिवसांत महिलांमध्ये संतानप्राप्तीची शक्यता असते. हा संयोग महिलेच्या मासिकपाळीच्या चक्राच्या मध्यावर ओव्हरीतून डिंब सुटण्याच्या ४८ ते ७२ तासांपर्यंत आणि डिंब सुटल्यानंतर ४८ तासांपर्यंत जास्त असतो. त्या काळात झालेल्या  समागमात जर पतीच्या शुक्राणू बीजांनी पत्नीच्या डिंबाला फलित केले, तर प्रेग्नंसी येते.

आपण आपल्या पतीसोबत एखाद्या इन्फर्टिलिटी विशेषज्ञाचा सल्ला घेणे उचित ठरेल.

उपलब्ध आकड्यांनुसार, देशातील ७५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही संतानसुख प्राप्त होत नाही. वांझपणाची ही समस्या केवळ महिलांशीच जोडलेली नसते. संतान न होण्याच्या २५-४० टक्के प्रकरणांत ही समस्या पुरुष वंध्यत्वाशी जोडलेली असते. ४० टक्के प्रकरणात महिलांमध्ये प्रजनन क्षमतेची कमतरता असते. १० टक्के प्रकरणात समस्या स्त्रीपुरुष दोघांशीही संबंधित असते आणि जवळपास तेवढ्याच प्रकरणांत सर्व तपासण्या करूनही हे स्पष्ट होत नाही की प्रेग्नंसी कोणत्या कारणामुळे येत नाहीए.

आपण आपल्या पतिसोबत एखादद्या योग्य इन्फर्टिलिटी विशेषज्ञाला भेटा. कदाचित आपली समस्या छोटी असेल, असे होऊ शकते आणि त्यावर लवकर उपचार करता येतील. तसेही आपले वय अनुकूल आहे. १९ ते २५च्या दरम्यानचे वय महिलेला आई बनण्यासाठी सर्वात चांगले वय म्हटले जाते. या काळात तिचे प्रजनन अंग, लैंगिक हार्मोन्स आणि मानसिक लय प्रजननासाठी सर्वात अनुकूल अवस्थेत असते.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एका मुलावर खूप प्रेम करते. आम्ही अनेकदा शरीरसंबंध ठेवले आहेत, परंतु त्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र यावेळेस निष्काळजीपणामुळे संबंध ठेवताना गर्भनिरोधक साधनांचा वापर केला नाही. आता मला भीती वाटते की जर मला गर्भ राहिला तर काय होईल? कृपया सांगा की असं झाल्यास मी या समस्येतून कशी मुक्तता मिळवू?

तुम्ही सविस्तरपणे खुलासा केलेला नाही की तुम्ही संबंध साधून किती कालावधी झाला आहे. सुरूवातीच्या कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्या असतात, ज्यांचं सेवन करून तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. परंतु कालावधी अधिक उलटला असेल तर गर्भनिरोधक उपाय उपयोगाचे ठरणार नाहीत. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ लेडी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर गर्भ राहिला असेल तर गर्भपात करून घेऊ शकता. भविष्यात चुकूनही विवाहापूर्वी संबंध साधू नका.

  • मी १६ वर्षीय तरुणी आहे, सध्या शिकत आहे. एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला नव्हता, परंतु त्याच दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करू लागले. या गोष्टीला ६-७ महिने उलटून गेल्यावर जेव्हा मी त्याच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याने ना धड होकार दिला ना नकार. त्याच्या या तटस्थ वागणूकीचा मी काय अर्थ काढू? त्याची प्रतिक्षा करू की आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू?

आता तुझं वय प्रेमात पडण्याचं वा व्यक्तिला समजून घेण्याचं नाहीए. ज्याला तू प्रेम समजतेस ते प्रेम नाहीए, तर केवळ लैंगिक आकर्षण आहे, जे या वयात विरूद्धलिंगी व्यक्तीप्रति जाणवणं स्वाभाविक आहे. यावेळी तुझ्यासाठी आपल्या करिअरहून अधिक महत्त्वाचं काही असता कामा नये. त्यामुळे सध्या आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं उत्तम.

  • मी ३१ वर्षीय विवाहिता आहे व २ मुलींची माता आहे. माझ्या लग्नाला १६ वर्षं झाली आहेत. मी माझ्या वैवाहिक जीवनात खुश नाही. माझे पती माझ्या मोठ्या बहिणीवर प्रेम करतात. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंधसुद्धा आहेत. ही गोष्ट मला ४ वर्षांपासून माहीत आहे. परंतु इच्छा असूनही मी काही करू शकले नाही, कारण माझे पती हुकूमशाही वृत्तीचे आहेत. लहानसहान गोष्टींवरून त्यांचा राग अनियंत्रित होतो. मी त्यांना विरोध करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व बघून केवळ कुढत राहाते. ते माझ्या मुलींवरही लक्ष देत नाहीत.

माझी मुलगी ज्या शिक्षकांकडे गेल्या ९ वर्षांपासून शिकत आहे, त्यांना जेव्हा मी त्रस्त असल्याचं कळलं तेव्हा माझ्या चिंतेचं कारण समजून घेत त्यांनी माझ्याप्रति सहानुभूति दर्शवली. आता मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. ६ महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी माझ्यासोबत ते आपला आनंद वाटून घेऊ इच्छितात असं सांगितलं तेव्हा मी चकित झाले. अशा संबंधांमध्ये निर्माण होणारी जवळीक वाढणं स्वाभाविक असतं, परंतु मला भीती वाटते. मी काय केलं पाहिजे, तुम्हीच सांगा?

४ वर्षांपूर्वी तुम्हाला तुमच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची गोष्ट ठाऊक झाली होती, तेव्हाच तुम्ही याला विरोध करायला हवा होता. पती कितीही हुकूमशाही करणारे असले तरी या अन्यायविरूद्ध आवाज न उठवून तुम्ही त्यांना स्वैराचार करण्यासाठी मोकळीक दिली. पतीला घाबरत होतात हे खरं. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या बहिणीला रागवायला हवं होतं. अजूनही वेळ आहे. तिच्या पतीकडे तक्रार करा. आपल्या माहेरीसुद्धा तिची करतूत सांगा. हे असं केल्याने ती तुमच्या मार्गातून बाजूला होईल.

उरला प्रश्न मुलीच्या शिक्षकांचा तर त्यांना तुम्ही आपली खाजगी गोष्ट सांगायला नको होती. ते सहानुभूती दाखवून तुमच्या अडचणीचा गैरफायदा उठवू पाहत आहेत. अशा संधीसाधू व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. बाहेर आनंद शोधण्याऐवजी आपल्या कुटुंबात हरवलेला आनंद शोधा. तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्यावर २ मुलींची जबाबदारीसुद्धा आहे. तुम्हीच म्हणता की तुमचे पती मुलींवर लक्ष देत नाहीत. मग अशावेळी तर तुमची जबाबदारी अधिक वाढते, तेव्हा समजूतदारपणे वागा.

  • माझ्या भावाचं लग्न १० वर्षांपूर्वी कोटा येथील मुलीशी झालं होतं. मुलीची मोठी बहिण घटस्फोटित होती. हे लग्न जुळवताना लोक आम्हाला हे स्थळ योग्य नसल्याचं सुचवत होते. मुलीची आई मुलींना भडकवते. त्यामुळे मोठ्या मुलीचं सासरी पटू शकलं नाही. आम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि लग्न जुळवलं. परंतु लग्नानंतर सत्य अनुभवास आलं. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी वहिनी माहेरी निघून गेली. प्रसूतीनंतर परतणार असं सांगून गेली होती. मुलगी झाल्यावर ३-४ वेळा भाऊ तिला आणायला गेला, परंतु ती परतली नाही. याच दु:खात माझा भाऊ रात्रंदिवस दारू पिऊ लागला आणि २ महिन्यांपूर्वी वारला. आता मुलीकडचे म्हणतात की आम्ही भावाच्या मुलीला ताब्यात घ्यावं, जेणेकरून त्यांना वहिनीचं पुन्हा लग्न लावता येईल. असंही धमकावतात की आम्ही मुलीला ताब्यात घेतलं नाही तर तिला अनाथाश्रमात सोडून देणार. सांगा काय करू?

लग्न जुळवताना एकमेकांबद्दलची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. तुम्हाला मुलीच्या घरच्यांबद्दल लोकांनी सावध करूनही तुम्ही त्याकडे डोळेझाक केलीत. आत जे घडलं ते घडलं. ते बदलता येणार नाही. त्यापेक्षा भावाच्या मुलीला ताब्यात घ्या, जेणेकरून त्या लहानग्या जीवावर अन्याय होणार नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझा विवाह ८ महिन्यांपूर्वी झाला आहे. मी आपल्या पतिला अजिबात पसंत करत नाही. ते एक उच्च अधिकाऱ्याच्या हुद्दयावर आहेत आणि स्वभावाने सरळही आहेत. मी मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करते. मुंबईत राहत असतानाच मागच्या ४ वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये बरोबर राहत होतो. बॉयफ्रेंड बंगालचा निवासी आहे. तर मी उत्तराखंडची राहणारी आहे.

आमच्या संबंधाबद्दल माझ्या पॅरेंट्सना माहिती होती. परंतु त्यांना हे स्थळ मंजूर नव्हते. बॉयफ्रेंड लग्नासाठी तयार होता. त्याच्या घरच्यांचाही विरोध नव्हता. पण माझे घरचे आग्रह करून मला सोबत घेऊन गेले आणि लग्नाचा दबाव टाकू लागले. या दरम्यान त्यांनी मला तयार करण्यासाठी जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीतीही दाखवली. तरीही मी तयार झाले नाही.

एके दिवशी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला हॉस्पिटलला अॅडमिट करण्यापर्यंत वेळ आली. घर-कुटुंब, मामा-मामी आणि त्याचबरोबर माझी एक टीचर, जिचा मी खूप सन्मान करते अशा सर्वांकडूनच माझ्यावर दबाव आणला गेला. मी आतून खचले आणि विवाहासाठी हो म्हटले. पती मोकळया मनाचे व विचारांचे वाटले. मी त्यांच्याबरोबर देहरादूनला गेले. जेथे त्यांची पोस्टिंग होती. परंतु रात्रं-दिवस बॉयफ्रेंडच्या आठवणीत गुंतून राहायची. नोकरीचे निमित्त करून नंतर मी मुंबईला येऊ लागले आणि पुन्हा बॉयफ्रेंडबरोबर राहू लागले. बॉयफ्रेंड खूप रडला आणि पतिकडून डिवोर्स घेण्यासाठी जोर देऊ लागला. मी त्याला सांगितले की मी पतिबरोबर सेक्स संबंध ठेवले आहेत, तरीही तो म्हणतो की त्याचा काही आक्षेप नाही आहे आणि तो मला जीवनभर प्रेम करत राहणार. त्याच्या दबावात येऊन मी एके दिवशी पतिला फोनवर सर्व सत्य खरं-खरं सांगितले.

ते काही वेळ तर शांत राहिले, नंतर म्हणाले की तुझे आपले जीवन आहे. तू ज्याच्याबरोबर राहू इच्छिते, राहा. पण मी डिवोर्स देणार नाही आणि तू स्वत: माझ्याकडे परत येशील याची वाट बघेन. मी पतिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी  ऐकले नाही आणि म्हणत राहिले की तू नाही तर कोणीच नाही.

इकडे बॉयफ्रेंडपासून दूर जाण्याची गोष्ट ऐकूनच तो त्रासून जातो आणि कुठल्याही परिस्थितीत साथ न सोडण्याच्या जिद्दीवर अडून बसला आहे. मी खूप अडचणीत आहे. काय करावं ते कळत नाहीए. कृपा करून सल्ला द्या?

आपण आपल्या घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या शिकार झाल्या आहात, यात काही संशय नाही. जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीती दाखवून त्यांनी तुम्हाला नाईलाजास्तव लग्न करण्यास तयार केले. ही त्यांची चूक आहे.

दुसरीकडे जर तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये एवढया पुढे निघून गेल्या होतात तर आपणही हे लग्न करायला नको होते. आपण व आपला बॉयफ्रेंड दोघे आपल्या स्वत:च्या पायावर उभे होतात आणि सज्ञान होतात. घरचे मानत नव्हते तर आपण कोर्ट मॅरेज करू शकत होतात. नंतर त्यांनी या नात्याला स्वीकारलेच असते.

आता जर तुमचे लग्न झालेच आहे आणि जसे की आपण सांगितले की तुमचे पती मोकळया मनाचे आहेत तर तुम्ही आपल्या पतिबरोबरच राहायला हवे. सद्यस्थितीत बॉयफ्रेंडबरोबरचे नाते बेकायदेशीर मानले जाईल. बरे झाले असते जर आपण बॉयफ्रेंडबरोबरचे नाते पतिला सांगितले नसते आणि सगळे विसरून नवीन जीवनाची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली असती. आता जर आपण आपल्या पतिला सर्व काही खरे सांगून टाकले आहे आणि असे असूनही ते आपली साथ देण्यासाठी तयार आहेत तर स्पष्ट आहे की ते खरेच मोकळया मनाचे पुरुष आहेत. जे विवाहरूपी संस्थेला कमकुवत होऊ देऊ इच्छित नाहीत. डिवोर्सनंतर त्यांच्यावरसुद्धा दोष ठेवला जाईल, हे ते जाणत असतील.

पती चांगले कमावणारे आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि आपणास हृदयापासून स्वीकारताहेत तर चांगले होईल, आपण आपल्या पतिकडे परत जावे आणि या बेकायदेशीर नात्याला पूर्णविराम लावावा.

  • मी २५ वर्षीय महिला आहे. नुकतेच लग्न झाले आहे. पती घरातील एकुलते एक अपत्य आहेत आणि सरकारी बँकेत कामाला आहेत. घर सर्व सुखसोयीनीं युक्त आहे. पण सगळयात मोठी अडचण सासूबाईंची आहे. त्यांनी माझ्या आधुनिक कपडे घालणे, टीव्ही बघणे, मोबाईलवर गप्पा मारणे आणि एवढेच नाहीतर माझ्या झोपण्यावरसुद्धा बंदी घातली, जे मला खूप बोचतेय, सांगा मी काय करू?

आपण घरातील एकुलत्या एक सुनबाई आहात. तेव्हा स्पष्ट आहे की पुढे जाऊन आपणास मोठया जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. ही गोष्ट आपल्या सासुबाई चांगल्याप्रकारे जाणून आहेत. म्हणून त्यांची इच्छा असेल की तुम्ही लवकरच आपली जबाबदारी ओळखून घर सांभाळावे. खूप बरे होईल की सासरच्या सर्वांना विश्वासात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. सासूला आईसारखे समजून, मान-सन्मान द्याल तर लवकरच त्यासुद्धा आपल्याशी मिळून मिसळून राहतील आणि तेव्हा त्या स्वत: आपणास आधुनिक कपडे घालण्यास प्रेरित करतील.

घराचे कामकाज आटपून टीव्ही बघण्यास सासूबाईंचाही काही आक्षेप नसणार. चांगले हे होईल की आपण सासूबाईंबरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवा, एकसाथ शॉपिंग करायला जा, घरातील जबाबदारी ओळखा, मग बघा आपण दोघी एकत्र एकमेकांच्या पूरक व्हाल.

आरोग्य परामर्श

– डॉ. यतिश अग्रवाल

प्रश्न : माझं वय ३५ वर्षं आहे आणि मी अविवाहित आहे. माझी मासिक पाळी १५ वर्षांपूर्वी सुरु झाली. सुरूवातीचे ६-७ महिने नियमित स्वरूपात येत राहिली. त्यानंतर अनियमित होऊ लागली, पण मी लक्ष दिलं नाही. आता माझं वजन वाढून ८० किलोग्रॅम झालं आहे. उलट माझी उंची ५ फूट १ इंच आहे. आता खुप वर्षांपासून मासिक पाळीसुद्धा येणं बंद झाली आहे. लग्नानंतर मला गर्भधारणेसाठी काही त्रास तर होणार नाही?

उत्तर : तुमच्या माहितीप्रमाणे स्पष्ट होतं की तुमच्या शरीरात लैंगिक हार्मोनल प्रणाली नीट काम करत नाहीए. प्रत्येक स्त्रीच्या देहात १ जैविक हार्मोनल घडयाळ टिकटिक करत असतं. ज्यामुळे दर २८-३० दिवसांनी तिचं शरीर एका लयबद्ध परिवर्तनातून जातं.

हे हार्मोनल घडयाळ तारुण्यात सुरु होतं. याची किल्ली मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते. किशोरावस्थेत येताच त्यात काही विशिष्ट प्रकारचे यौन प्रेरक हारमोन्स तयार होणं सुरु होतं आणि त्यापासून प्रेरणा देणारे सिग्नल घेऊन डिम्ब ग्रंथी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन तयार करू लागतात. याच हार्मोन्सच्या प्रभावामुळे दर महिन्यात डिम्ब ग्रंथींमध्ये एक नवा डिम्ब मॅच्युर होतो आणि डिम्ब ग्रंथीतून सुटून बाहेर येतो. याच हार्मोनल हालचालीमुळे महिन्या अखेर स्त्रीला मासिक स्त्राव होतो.

तुमच्या शरीरात हे जैविक चक्र सुरूवातीपासूनच एखाद्या कारणामुळे लय पकडू शकलं नाही. तुमच्या आईवडिलांनी आणि तुम्ही याची खूप पूर्वीच तपासणी केली असती आणि योग्य वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं. आता यात सुधार होणं कठीण वाटतं आहे. परंतु तरीही तुम्ही एखाद्या गायनोकॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तुमची रीतसर तपासणी करू शकता.

आता लग्न आणि त्यानंतर प्रेग्नन्सीचा विचार करता, तर स्वाभाविक आहे की या सगळया गडबडीत ही इच्छा पूर्ण होणं सोपं नाही. स्त्रीच्या शरीरात वेळेत मासिक स्त्राव होणं ही गोष्ट दर्शवते की तिची प्रजनन व्यवस्था नीट काम करत आहे. जर या  नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम झाला तर अपत्य सुखाची इच्छा पूर्ण होणं कठीण जातं. तरीही प्रजननाच्या नव्या टेक्निकच्या मदतीने प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. मला २ मूलं आहेत ५ वर्षांपूर्वी मी गर्भनिरोधासाठी कॉपर टी बसवली होती. याची वेळ संपल्यावर मी त्या जागेवर नवी कॉपर टी बसवली. परंतु गेल्या काही दिवसांपासून जेव्हा मी मूत्रविसर्जनासाठी जाते तर मला प्रत्येक वेळी योनिमार्गावर जळजळ होते. या जळजळीचा सबंध कॉपर टी लावण्याशी आहे का? मी काय करायला हवं?

उत्तर : तुमच्या लक्षणांवरून हे स्पष्ट दिसून येतं की तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं आहे. अशा वेळेस तुमच्या युरीन कल्चरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर अँटिबायोटिक औषधं सुरु करायला हवी. औषधाचा परिणाम होण्यासाठी कमीतकमी १०-१४ दिवस ते नियमित घेणं आवश्यक आहे. औषध सुरु होताच २-३ दिवसात आराम वाटेल.

यादरम्यान पाणी आणि इतर द्रव पदार्थ जेवढे जास्त पिता येतील तेवढे प्या. यामुळे मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. जास्त मूत्र तयार झाल्याने मूत्र व्यवस्थेची वेगाने सफाई होते आणि इन्फेक्शन निर्माण करणारे बॅक्टेरिया मूत्राबरोबर शरीराच्या बाहेर जात राहतात.

औषधांचा डोज पूर्ण झाल्यावर परत युरीन कल्चर तपासून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होईल आणि युरिनरी ट्रॅकमध्ये काही अपायकारक बॅक्टेरिया तर राहिले नाही ना हे कळेल. काही केसेसमध्ये अँटिबायोटिक औषधं जास्त दिवस घ्यायची गरज भासू शकते.  औषध घेण्यात चालढकल करणं बरोबर नाही. त्यामुळे किडनीजवर  परिणाम होऊ शकतो.

आता कॉपर टी बाबत म्हणाल, तर हा मात्र योगायोगच आहे की ज्या काळात तुम्ही कॉपर टी लावली त्याच काळात तुम्ही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनशी सामना करत आहात, परंतु हे पण शक्य आहे की कॉपर टी लावताना योग्य प्रकारे अँटिसेप्टिक खबरदाऱ्या न पाळल्या गेल्याने इन्फेक्शन झाले असेल.

प्रश्न : मी ४५ वर्षाची महिला आहे. २६ वर्षांची असताना माझं लग्न झालं. वैवाहिक जीवन ठीकठाक चाललं होतं की अचानक मला गर्भाशयाचा टीबी झाला. नंतर १८ महिने मला टीबीची औषधं चालू होती. त्यानंतर डॉक्टरांनी मी बरी झाली आहे हे सांगून माझी औषधं बंद केली. परंतु अजूनही मला मासिक  पाळीच्या वेळेस खूप वेदना होतात आणि योनिमार्गातून पांढरा स्त्राव होतो. दरम्यान जेव्हा मी कधी अँटिबायोटिक्स औषध घेते तेव्हा काही दिवस आराम पडतो, पण काही दिवासांनी पुन्हा तिच समस्या सुरु होते, डॉक्टरकडे मी गर्भाशय काढण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी सरळ नकार दिला. तुमचं काय मत आहे?

उत्तर : एखाद्या अनुभवी आणि योग्य अशा गायनोकॉलॉजिस्टला दाखवणं योग्य राहील. आपली तपासणी करा आणि डॉक्टरला आवश्यक वाटलं तर पेल्वीस म्हणजे पोटाच्या खालच्या भागाची अल्ट्रासाउंड सोनोग्राफी करून घ्या.

योनीतुन पांढरा स्त्राव जाणे, मासिक पाळीच्या वेळेस वेदना होणे आणि अँटिबायोटिक्स घेतल्यावर आराम पडणे याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला सतत इन्फेक्शन होत आहे.

जर योनीत इन्फेक्शन असल्याचे समजले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या पतीचेसुद्धा योग्य उपचार करा. ही सावधगिरीन बाळगल्यास तुम्हाला हे इन्फेक्शन सतत होऊ शकतं.

आता गर्भाशयाच्या टिबीबद्दल बोलायचं झालं तर १८ महिन्यांच्या यशस्वी उपचारांनंतर त्याच्या पुनरावृत्तीचा धोका जवळपास नाहीच आहे.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

 * मी २१ वर्षांची तरुणी आहे. मला फिरायला, मौजमजा करायला आवडते. अभ्यासात किंवा घरकामात माझे मन लागत नाही. यामुळे घरातीलही सर्व माझ्यावर नाराज असतात. मी माझ्या सवयी कशा बदलू ते सांगा?

तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता. सध्या तुम्हाला फिरायला, मौजमजा करायला नक्कीच आवडत असेल, पण जेव्हा तुमचे मित्र मेहनतीने अभ्यास करुन पुढे जातील, चांगली नोकरी करू लागतील तेव्हा तुम्हाला खूपच पश्चाताप होईल.

तुम्हाला घरातली कामे करायलाही आवडत नाहीत. याचा अर्थ तुम्ही करिअरही करू शकणार नाही आणि घर कामातही पारंगत होणार नाही.

तसे तर आईवडील शक्य तोपर्यंत मुलांना लाडाने वाढवतात. त्यांच्यातील उणिवा लपवतात आणि त्यांच्यावर प्रेमही करतात. पण तुमचे लग्न होईल तेव्हा सासरचे तुम्हाला तुमच्या याच रुपात स्वीकारतील असे मुळीच नाही.

त्यामुळे वेळीच स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्हाला तुमचा दिनक्रम बदलावा लागेल.

रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठून फिरायला जा. व्यायाम करा. चांगली पुस्तके वाचा. असे एखादे काम करा ज्यामुळे दुसऱ्यांचे भले होईल. सोबतच घरातील कामातही हातभार लावा.

सुरुवातीला हे कंटाळवाणे वाटेल. पण यामुळे लवकरच तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागेल. यामुळे तुम्ही घरातल्यांच्या लाडक्या व्हाल शिवाय करियरही करू शकाल.

* मी २९ वर्षांची विवाहिता आहे. पती माझ्यापेक्षा २ वर्षांनी मोठे आहेत. आम्हाला एक मुलगा असून तो ज्युनिअर केजीत आहे. घरात सर्वकाही ठीक आहे. पण मुख्य समस्या पतीची आहे. वेळ मिळताच ते मोबाइलमध्ये फेसबुक, ट्विटरमध्येच हरवून जातात. रात्री उशिरापर्यंत असेच चालते. याचा माझ्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत आहे. ते महिनाभर सेक्स संबंध ठेवत नाहीत. मी पुढाकार घेतल्यावर तयार होतात, पण पहिल्यासारखे नाहीत. मोबाइलमुळे आमच्यात अनेकदा भांडणही झाले. कृपया सांगा, मी काय करू?

सोशल नेटर्वकिंग साईट्समुळे नाती आणि भावनांना तडा जात आहे. याचा परिणाम सेक्स संबंधावरही होत आहे. तरुणाई सेक्स लाईफ केवळ यामुळेच खराब करतात. तरीही हे थांबायचे नाव घेत नाही, उलट अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्रिटनमध्ये केलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, तेथे १६-४४ वर्षांचे लोक महिन्यातून पाचपेक्षाही कमी वेळा सेक्स करतात. सोशल नेटर्वकिंग साईट्स, आर्थिक चणचण आणि तणाव हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

सध्या तुम्हाला संयमाने वागवे लागेल. पतीची ही सवय सोडवण्यासाठी त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सोबत फिरायला जा, सिनेमा बघा, बाहेर जेवायला जा, सकाळ-संध्याकाळ सोबत फिरा आणि वेगवेगळया विषयांवर चर्चा करा. एकांतपणी त्यांच्या आवडीचा ड्रेस घाला आणि सोबतच संसारातील वेगवेगळया जबाबदारींची जाणीव त्यांना हसतखेळत करुन द्या.

तुम्ही अशा प्रकारे वागू लागल्यानंतर पती आपोआपच मोबाइल सोडून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल.

मी २७ वर्षीय तरुण असून एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. मी स्वत:च माझ्यासाठी समस्या बनलो आहे. कारण, मला कधीच कोणती मुलगी आवडली नाही किंवा मी आतापर्यंत एखाद्या तरुणीशी सेक्स संबंध ठेवलेला नाही. मात्र, एका मुलासोबत माझी मैत्री आहे आणि आम्ही गेली ३ वर्षे एकत्र राहत आहोत. आईवडिलांना माझे लग्न लावून द्यायचे आहे, पण मला एखाद्या मुलीचे जीवन उद्भवस्त करायचे नाही. सांगा, मी काय करू?

असे वाटते की तुम्ही होमो सेक्सुअल आहात. मानसोपचारतज्ज्ञांचे असे मत आहे की, समालिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटण्यामागील एक कारण म्हणजे आपलेपणाचा अभाव, हे असू शकते.

खरंतर कुटुंबात दु:खी असणारे किंवा एखाद्या अन्य कारणामुळे त्रस्त असताना कुणीतरी आधार दिल्यास ती व्यक्ती त्यांना जवळची वाटू लागते.

संशोधनानुसार, समलिंगी सेक्सबाबत आकर्षणाचे कारण हार्मोन्सचे असंतुलन हेदेखील असू शकते. हे वंशपरंपरागत असते किंवा मग अन्य प्रभावांमुळेदेखील असे होऊ शकते.

त्यासाठी तुम्ही एखाद्या सेक्सुअल काऊन्सिलरची भेट घ्या. आवश्यकता भासल्यास मेडिकल चेकअप करा. तरच खरं कारण समजू शकेल.

तुम्हाला तुमचे आयुष्य कोणासोबत आणि कसे व्यतित करायचे आहे, याचा निर्णय तुम्ही स्वत: घ्या.

पाहायला गेल्यास आपल्या समाजात अशा नात्यांना स्वीकारले जात नाही, पण आता सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करून समलैंगिक व्यक्तींना त्यांचा हक्क बहाल केला आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें