* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा
- मी २२ वर्षांची आहे. माझी समस्या अशी आहे की, जेव्हा मी आर्टिफिशियल दागिने घालते तेव्हा माझ्या त्वचेवर पुरळ उठते. यापासून वाचण्यासाठी काय करायला हवे?
आर्टिफिशियल दागिने घालण्यापूर्वी स्कीन क्रीमचा वापर करा. दागिने काढल्यानंतर दागिन्यांचा स्पर्श झालेली जागा डेटॉलने धुवा.
- मी २५ वर्षांची आहे. काही दिवसांपासून भुवयांवरील केस गळत आहेत. कृपया असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे हे केस गळणे थांबेल?
तुमच्या भुवयांचे केस गळण्याचे कारण तणाव हे असू शकते. जास्त तणावामुळे केस गळू लागतात. म्हणून तणावात राहणे बंद करा. जेवणातील झिंक, आयर्न, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळेही भुवयांचे केस गळू लागतात. यावर उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑईल बोटांवर घेऊन भुवयांची गोलाकार दिशेने मालीश करा. ३० मिनिटांपर्यंत तेल तसेच लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
- मी १८ वर्षांची आहे. माझे केस खूपच तेलकट आहेत. शाम्पू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा तेलकट होतात. शाम्पू करण्यापूर्वी मी केसांना खोबरेल तेल लावते. खोबरेल तेल लावणे योग्य आहे का?
तुमच्या समस्येचे कारण हेदेखील असू शकते की, केसांना शाम्पू केल्यानंतरही तुमच्या केसांमधील तेल चांगल्या प्रकारे निघून जात नसेल. केसांना पोषण मिळावे यासाठी तेलाऐवजी हेअर टॉनिक लावा. यामुळे केस निरोगी होतील आणि तेलकटही होणार नाहीत. केस तेलकट दिसू नयेत यासाठी शाम्पूत लिंबाच्या रसाचे काही थेंब घातल्यानंतरच केसांना शाम्पू करा. केस धुतल्यानंतर केसांची २ ते ३ इंच त्वचा सोडून कंडीशनर लावा.
- मी १९ वर्षांची आहे. माझा रंग सावळा आणि केस काळे आहेत. एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार मी केसांना बरगंडी कलर लावला. पण यामुळे माझा रंग अधिकच सावळा दिसू लागला. मला वाटते की, बरगंडी कलर मला शोभत नाही. कृपया सांगा की, केसांचा हा रंग कसा आणि किती लवकर काढता येईल? शिवाय माझा चेहरा आणि केसांवर कोणता रंग शोभून दिसेल, हेदेखील सांगा?
केसांना लावलेल्या रंगामुळे तुम्ही घाबरुन जाऊ नका. सर्वप्रथम चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांना नैसर्गिक रंगाची डाय लावा आणि केसांना चांगले कंडिशनिंग करा. नेहमी चांगल्या क्लॉलिटीचाच शाम्पू वापरा, जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही. तुमच्या सावळया रंगावर वाईन आणि वॉलनट कलर चांगला दिसेल. सर्व केसच कलर करणे मुळीच गरजेचे नाही. वाटल्यास तुम्ही हेअर कलरने केसांच्या काही बटा रंगवू शकता.