“ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय

* सोमा घोष

अलीकडे लॉन्च करण्यात आलेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमानच्या अंगात उत्साह सळसळललेला दिसतो.

त्याला त्याचे मित्र आणि कुटुंबियांकडून सतत कॉल आणि मेसेज येत असतात.

याविषयी बोलताना आयुषमान खुराना सांगतो, “ड्रीम गर्ल तर ब्लॉकबस्टर ठरला. पहिल्या भागामुळे आता सिक्वेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ड्रीम गर्ल 2’चा ट्रेलर लोकांना वेड लावतोय हे बघून आनंद वाटतो. माझे चाहते मोठ्या पडद्यावर फिल्म पाहतात, तेव्हा त्यांचं भरपूर मनोरंजन होईल हे बघून समाधान वाटतं.”

तो पुढे सांगतो, “ड्रीम गर्ल 2 हा सिनेमा प्रत्येकाला धमाल वाटतो, भरपूर हशा आणि पोटदुखेपर्यंत मनोरंजन करते. आम्ही वचन देतो की लोकांना एक अद्वितीय अनुभव मिळेल. मी सिनेमात साकारलेली पूजा लोकांच्या पसंतीस उतरली हे पाहून मला समाधान वाटत आहे! एखाद्या मुलीची वेषभूषा करून सगळा गोंधळ उडवणाऱ्या व्यक्तीची भूमिका करणं माझ्यासाठी मोठी जोखीम होती. माझा हा अवतार लोकांना आवडतो याचा मला खरोखर आनंद वाटतो. हे खूप फायद्याचे आहे. एखाद्याला हसवण्याची कामगिरी खूप मोठी असते. हा सिनेमा प्रेक्षकांना निराळा अनुभव देणारा आहे.”

दिनांक 25 ऑगस्ट रोजी ड्रीम गर्ल 2 चंदेरी पडद्यावर प्रदर्शित होईल आणि नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल!

संघर्षातूनच ओळख मिळते – तन्वी बर्वे

– सोमा घोष

संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो आणि मलाही तो करावा लागत आहे. संघर्षापासून पळ काढून कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. संघर्षातून मिळालेली कुठलीही गोष्ट अनमोलच असते. असेच काहीसे सांगत आहे मुंबईतील २२ वर्षीय मराठी अभिनेत्री तन्वी बर्वे, जिला लहानपणापासूनच काही वेगळे आणि आव्हानात्मक काम करायला आवडायचे. यासाठी तिला नेहमीच आईवडिलांचे सहकार्य मिळाले. किशोरवयात तन्वीला जत्रेला जायला खूप आवडायचे. सुंदर चेहरा, नम्र स्वभाव आणि हसतमुख तन्वी सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. यात ती प्राची कानिटकरची भूमिका साकारत आहे. वेळात वेळ काढून तिने आमच्यासोबत फोनवर संवाद साधला. चला, तिच्या प्रवासाबाबत तिच्याकडूनच जाणून घेऊया.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

मला अभिनयाची आवड नव्हती. माझी मोठी बहीण शाळेत असताना नाटकात काम करायची. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी तिच्या शिक्षिकेला तिची आठवण झाली. त्यांचा नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी माझ्या बहिणीसोबत मलाही त्यांच्या ग्रुपमध्ये घेतले. तिथूनच माझ्यामध्ये अभिनयाची आवड वाढू लागली. मी मोनो अॅक्ट, आंतरराज्य शालेय स्पर्धेत भाग घेऊ लागले. तिथूनच मला अभिनयाची प्रेरणा मिळाली. महाविद्यालयात असताना मी अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आणि पुरस्कारही मिळवले. त्यानंतर काही प्रायोगिक नाटकंही केली. यातून मला खूप काही शिकायला मिळाले.

महाविद्यालयात असतानाच मला पहिली टीव्ही मालिका मिळाली. त्यामुळे सर्वजण मला ओळखू लागले आणि मला आणखी काम मिळत गेले. ही माझी तिसरी मालिका आहे.

अभिनय क्षेत्रात करियर करण्यासंदर्भात पहिल्यांदाच तू घरी सांगितलेस तेव्हा पालकांची प्रतिक्रिया काय होती?

माझे वडील एका मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि आई गृहिणी आहे. आई घरूनच दागिन्यांचा व्यवसायही करते. अभिनय क्षेत्रात करिअर करायचे की नाही, हे ठरवायला मला बराच वेळ लागला, कारण त्यावेळी मी महाविद्यालयात शिकत होते. मला कधी मुख्य भूमिका तर कधी छोटया भूमिका मिळायच्या. घरून मला कधीच विरोध होत नव्हता, पण मला कधी घरी यायला उशीर व्हायचा तर कधी मी घरी जाऊच शकायचे नाही, कारण रिहर्सल अर्थात तालमी सुरूच असायच्या. त्यामुळे माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटायची. त्यांना या क्षेत्राबद्दल काहीच माहित नव्हते. हळूहळू त्यांनी माझे काही शो पाहिले, माझा अभिनय बघितला. यामुळे त्यांना माझ्या कामाची माहिती झाली आणि त्यांनी मला परवानगी दिली. आईची मला खूपच मदत मिळते. मी काहीही केले तरी ते तिला आवडते, पण माझे वडील खूप मोठे टीकाकार आहेत. माझे प्रत्येक काम ते अतिशय बारकाईने पाहातात आणि मला सल्ला देतात.

तुला पहिला ब्रेक कधी आणि कसा मिळाला?

मी अकरावीत असताना मला मराठी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘ती सध्या काय करते’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे आमच्या कुटुंबाशी मैत्रीचे नाते आहे आणि मी छोटेमोठे कामे करते, हे त्यांना माहीत होते. त्यांनी मला या चित्रपटातील एका छोटया भूमिकेसाठी काम करण्याची संधी दिली. महाविद्यालयात असताना मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. टीव्ही मालिकांसोबतच मी चित्रपटही करते. मला मराठी चित्रपटातील भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. माझा ‘फनरल’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

या मालिकेत काम करण्यामागील तुझं खास कारण काय आहे?

हे एक पारंपारिक, एकत्र राहणारे कुटुंब आहे, जिथे आधुनिक विचारसरणी असलेल्या माझ्या मैत्रिणीचे माझ्याच भावासोबत लग्न होते आणि ती आमच्या घरची सून होते. या मालिकेत मी कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये सर्वात लहान बहिणीची भूमिका साकारत आहे. कुटुंबात माझा भाऊ आणि त्याची बायको नेहमी छोटयाशा गोष्टीवरूनही भांडतात. त्यांचा राग घालवण्यासाठी माझे वडील आणि घरातील सर्व तरुण काहीतरी युक्ती शोधून काढतात.

ही भूमिका तुझ्या जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

वास्तविक जीवनातील माझे कुटुंब खूपच छोटे आहे, पण मालिकेतील मोठया कुटुंबासोबत चित्रिकरण आणि त्यांच्यासोबत मजा करायला मला आवडते. वास्तव जीवनात मला एक विवाहित बहीण आहे. तिला भेटायला मला क्वचितच वेळ मिळतो.

अभिनयाव्यतिरिक्त तुला काय करायला आवडते?

मी पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर, मी बराच वेळ घरी होते. त्यानंतर मी काही दिवस टीव्ही वाहिनीवरील एका काल्पनिक कथानक असलेल्या मालिकेसाठी सहाय्यक क्रिएटिव्हिटी म्हणून काम केले. हा माझ्यासाठी एक अनुभव होता आणि असे काम करण्याची माझी इच्छाही होती. ज्या क्षेत्रात मी पडद्यावर काम करते त्याच क्षेत्रात पडद्यामागे काम करण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी अभिनय क्षेत्रात शिकता येत नाहीत त्या मला येथे शिकायला मिळाल्या.

तुला काही संघर्ष करावा लागला का?

मला पहिले काम काहीही संघर्ष न करताच मिळाले, मात्र काम टिकवून ठेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पहिले काम मला एका ओळखीतल्या दिग्दर्शकाने दिले होते. त्यामुळे काही लोकांना वाटते की, मला संघर्ष करावा लागत नाही आणि आरामात काम मिळाले आहे. म्हणूनच माझ्या अभिनयाचे ते कौतुक करत नाहीत. हा शिक्का पुसून काढण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

‘मोलकरीण बाई’ ही माझी पहिली मालिका होती. त्याआधी मी इतक्या मोठया स्तरावर काम केले नव्हते. या मालिकेमुळे लोक मला ओळखू लागले. या मालिकेमुळे मी खूप काही शिकले. त्याचा उपयोग मला आता होत आहे.

हिंदी चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मी प्रयत्न करत आहे, जिथे ऑडिशन्स होतात तिथे मी ऑडिशन देत आहे. हाही माझ्यासाठी एक संघर्ष आहे, ज्याद्वारे मी मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत ही संधी मला मिळेल, अशी आशा आहे.

अंतर्गत दृश्य तू सहजतेने करू शकतेस का?

मी ते कधीच केले नाही, पण जर कथेची मागणी असेल तर ते मी करू शकते. माझी सहकलाकार आणि मी त्या दृश्यावर जर चर्चा करू शकलो तर असे दृश्य करायला मला काहीच अडचण नसेल.

कोणत्या दिग्दर्शक आणि सहकलाकारांसोबत तुला हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल?

मी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, कारण त्यांनी चित्रपटातील नायिकेला इतक्या उंचीवर नेले आहे, जे खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी इंडस्ट्रीत नायक नेहमीच वैभवात जगणारे दाखवले जातात आणि नायिका एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातली असते. असे पूर्वी हिंदी चित्रपटांमध्येही दाखवले जायचे, पण आता हे चित्र बदलत आहे. संजय लीला भन्साळींनी नायक कितीही मोठा केला तरी तो नायिकेपेक्षा मोठा होऊ शकत नाही. त्यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी स्वर्गीय अनुभव असेल. याशिवाय मला अभिनेता विकी कौशलसोबत काम करायचे आहे.

तू खवय्यी, फॅशनेबल आहेस का?

मला सर्व काही खायला आणि बनवायला आवडते. सुट्टीच्या दिवशी मी घरीच काहीतरी बनवते आणि सेटवरही घेऊन जाते. सगळे एकत्र जेवतात. मला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत आहे. मला माझ्या आईच्या हातची डाळ-ढोकळी खूप आवडते. गोड पदार्थांमध्ये माझी आई लापशी खूपच छान बनवते.

फॅशनबद्दल मी फारशी जागरूक नाही, पण इंडस्ट्रीत राहायचे तर काहीतरी वेगळे करावेच लागते. मला पारंपरिक कपडे जास्त आवडतात. मी पारंपरिक छापील कापड विकत घेऊन स्वत:साठी ड्रेस शिवते. मला कपडयांच्या डिझाईनबाबत थोडेफार समजते. मला फॅशन आणि शॉपिंग खूप आवडते.

आवडता रंग – निळा.

आवडता ड्रेस – पाश्चिमात्य कपडे.

आवडते पुस्तक – कृष्णकिनार (अरुणा ढेरे).

आवडते परफ्यूम – अत्तर.

जीवनातील आदर्श – परिस्थिती कशीही असो, आईवडिलांचा आदर करणे.

वेळ मिळाल्यास – बाहेर फिरायला जाणे.

स्वप्नातला राजकुमार – माझ्या क्षेत्रातील असावा, सहनशील आणि कर्तव्यदक्ष असावा.

सामाजिक कार्य – गरजूंना मदत करणे.

झोंबिवलीत रंगणार झोंबीजचा कहर

* प्रतिनिधी

Saregama प्रस्तुत, Yoodlee Films निर्मित आणि सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ चित्रपटाची रिलीज डेट अनाऊन्समेंट आज इंस्टा लाईव्ह वरून करण्यात आली. येत्या ४ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जनमनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी अपल्या अनोख्या अंदाजात आज रिलीज डेट अनाऊन्समेंट पोस्टर लाँच केले असून ४ फेब्रुवारी २०२२ ला ‘झोंबिवली’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

तर ४ फेब्रुवारी ला ‘झोंबिवली’ स्टेशनवर उतरून हा हॉरर-कॉमेडी प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही नक्की सज्ज राहा.

‘कुसुम’ सोनी मराठी वाहिनीवर!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि महेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे.

लोकलमध्ये तिची मैत्रीण तिला संध्याकाळी मिसळ पार्टी करण्याबद्दल विचारते, तेव्हा ‘बाबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे’, असं सांगते. त्यावर ‘अजूनही तूच करतेस त्या घरचं?’ असं तिची मैत्रीण विचारते. त्यावर कुसुम तिला विचारते की, ‘सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची गरज आहे का? ‘सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली  वाटते.

ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी!

* सोमा घोष

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही  रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची  जबाबदारी संभाळतेय.  वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

साहिल अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही.  वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो.

वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी  उत्सुकतेचं असणार आहे.

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दली आणि त्यांच्याकडून  बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत  पाहायला मिळेल. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी  प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

पाहा, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, सोम. -शनि.,  संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘जिंदगानी’ या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉंच!

*प्रतिनिधी

कोरोनाच्या जागतिक आपत्तीवर मात करत आता अखेरीस अनलॉकची प्रक्रिया सुरु झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या उदास मनांना उभारी आणण्यासाठी आता बंद पडलेलं करमणुकीच क्षेत्र नव्याने कामाला लागले आहे. आता लवकरच चित्रपटगृहांचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार असून नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

‘जिंदगानी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आज सोशल मीडियावर लॉंच करण्यात आले आहे. अभिनेते शशांक शेंडे व विनायक साळवे खेडेगावातील कठीण परिश्रम आणि संयमाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या ‘प्रभाकर’ आणि ‘सदा’ या आदिवासी व्यक्तींच्या भूमिका साकारत असून या चित्रपटात त्यांच्यासमवेत अभिनेत्री सविता हांडे, सुष्मा सिनलकर, स्मिता प्रभू, सायली पाटील, अभिनेते विनायक साळवे, प्रदिप नवले, गणेश सोनवणे, प्रथमेश जाधव, रवि साळवे, सागर कोरडे, संजय बोरकर, दिपक तावरे, पांडुरंग भारती आढळून येणार आहेत.

जिंदगानी चित्रपटाद्वारे वैष्णवी हिचे चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. चित्रपटाचे लेखन विनायक भिकाजीराव साळवे यांनी केलेले असून विजय गवंडे यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. तर चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आदर्श शिंदे, बेला शेंडे, राधिका अत्रे, अमिता घुगरी यांच्या सुरमधुर स्वरांनी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

नर्मदा सिनेव्हीजन्स निर्मित आणि विनायक भिकाजीराव साळवे दिग्दर्शित ‘जिंदगानी’ हा बदलत्या काळानुसार माणसाच्या बदलत्या जीवनशैलीची जीवनगाथा सांगणारा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टिचं भविष्य उज्ज्वल आहे – वीणा जामकर

– सोमा घोष

मराठी नाटय आणि चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री वीणा जामकरचा जन्म मुंबईजवळच्या पनवेल आणि पालनपोषण रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात झालं. तिचं कौटुंबिक वातावरण कला आणि संस्कृतीचं राहिलंय, या कारणामुळेच तिने शाळा आणि महाविद्यालयातून नाटकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने अविष्कार नाटयसंस्थेत प्रवेश घेतला आणि मराठी चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला लागली, तिला नाटकांबरोबरच चित्रपट करण्याचीदेखील संधी मिळाली. हसमुख आणि विनम्र स्वभावाच्या वीणाचा प्रवास आणि मराठी चित्रपटसृष्टीबद्दल बोलणं झालं, सादर आहेत त्याचे काही खास अंश :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

अभिनयात येण्याची प्रेरणा माझी आई अलका जामकरकडून मिळाली. शाळेत शिक्षक असली तरी तिलादेखील नाटकांची आवड होती. खरं म्हणजे महाराष्ट्रात कलेचं वातावरण आहे, त्यामुळे अनेक कुटुंब कला आणि संस्कृतिशी संबंधित असतात. मला आठवतंय की लहानपणी मी आईला उरणमध्ये छोटयाछोटया नाटकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मला अभिनयाची आवड आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने मला काही संवाद बोलायला सांगितले, जे मी अनाहुतपणे करून दाखवलं. बाबा सरकारी कर्मचारी होते, परंतु त्यांना पेंटिंग, कॅलिग्राफीची आवड होती. त्यांनी ९० च्या दशकात आम्हा दोघींना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं, कारण त्याकाळी गावात काम करण्यासाठी माझी आई संकोचायची. माझ्या बाबांचे विचार खूप सुधारक होते. माझा भाऊ केमिकल इंजिनिअर आहे.

तुझ्या प्रवासात कुटुंबाने किती सहकार्य केलं?

मी वयाच्या १५व्या वर्षीच सांगून टाकलं होतं की मला अभिनयाची आवड आहे आणि मी शाळेच्या नाटकात सहभागी व्हायची. त्यावेळी माझा भाऊ मुंबईत शिकत होता आणि मलादेखील तिथे जाऊन शिकायचं होतं. अभिनय करण्यासाठी मुंबईत येऊन सर्वांना भेटता येणार होतं. मराठी साहित्यात पदवी घेतल्यानंतर मी नाटकातदेखील व्यस्त राहिली. मानसिक आधारदेखील खूप मिळाला, ज्यामुळे मला काम करताना मजा आली.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मुंबईची जुनी आणि प्रचलित नाटयसंस्था अविष्कार संस्थेत मी गेली आणि तिथे दिग्दर्शक राजेंद्र बडे त्यांचा पहिला चित्रपट बनवत होते. त्यावेळी मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांची रुची वाढत चाललेली. त्यादरम्यान मला दिग्दर्शकांनी कास्ट केलं आणि त्यामुळे मला चित्रपटात काम करण्याची पद्धत, कॅमेरा फेस करणं इत्यादी समजलं. थिएटरमध्ये काम करणं आणि चित्रपटात काम करणं खूप वेगळं आहे. दुसरा चित्रपट वळू होता, जो खूप चालला आणि आजदेखील तो चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना कसं वाटलं?

अजिबात आवडलं नव्हतं. नाटकात कोणी ना कोणी मागून बोलत असतं, वेळ ठरलेली असते, त्यामुळे मला अभिनय करताना आनंद मिळतो. एक लिंक बनते. चित्रपटात काम करताना वारंवार कट बोलणं, इमोशनचं मागेपुढे होणं छान नाही वाटतं. त्यामुळे मी बाबांनादेखील सांगून टाकलं की मी फक्त नाटकामध्ये कामे करेन. त्यांनी मला फोर्स न करता माझ्यावर सोडून दिलं. मी २०११ साली मी चित्रपट आणि नाटक दोन्हीमध्ये काम करत होती. त्यामुळे मला एकत्रित पैसे मिळत होते त्यामुळे मला मुंबईत राहण्याची वा खाण्यापिण्याची आबाळ होत नव्हती. माझं पॅशन नाटक होतं, परंतु नंतर मला चित्रपट आवडू लागले.

कोणत्या चित्रपटामुळे घरोघरी ओळख मिळाली?

कामाला सुरुवात ‘वळू’  चित्रपटाने झाली, परंतु २०१०साली मी महेश मांजरेकरचा ‘लालबाग परळ’ चित्रपट २०१० साली केला होता, जो मुंबईच्या मिल कामगारांवर बनविला गेला होता, त्यामध्ये माझी मंजुची भूमिका सर्वांना आवडली होती. त्यानंतर ‘कुटुंब’ चित्रपट आला आणि घरोघरी ओळख मिळाली.

मराठी चित्रपटसृष्टित काम करताना कसं वाटतं?

मराठी चित्रपटसृष्टित साहित्य, कलाकृती, कथा आणि कलाकार खूप छान आहेत, एवढी विविधता कुठे पहायला मिळत नाही. या इंड्रस्ट्रीत काम करून छान वाटतं. याव्यतिरिक्त मराठी चित्रपटसृष्टित स्टार सिस्टीम नाही, कारण हा व्यवसाय नाहीए. त्यामुळे बॉलिवूड आणि टॉलीवूड चित्रपटामधून कायम चढाओढ लागते. त्याचं बजेट आणि इन्फ्रास्ट्रॅक्चर पुढे मराठी सिनेमा काहीच नाहीए. कधीकधी ‘सैराट’ सारखे सिनेमा येतात, जे सुपरहिट होतात. मराठी चित्रपटसृष्टित पैसा टाकण्यापूर्वी निर्माता एकवार विचार करतोच. मराठीत खूप एक्सप्रेमेंटल आणि लो बजेटचे सिनेमे बनतात, परंतु आता चांगले चित्रपट येत आहेत, पुढे जाऊन भविष्य उज्ज्वल आहे.

तुला इथे पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला?

संघर्ष अजूनही आहे. चित्रपट एक व्यवसाय आहे, त्यामध्ये खूप पैसा लागलेला असतो. चित्रपट न चालल्यास तुमचं मानधन कधी नाही वाढत. चांगलं काम करुनदेखील सिनेमा चालला नाही तर मानधन खूप कमी मिळतं आणि निर्मातेदेखील अधिक पैसा गुंतवायला घाबरतात. आर्थिकरित्या कमजोर असल्यामुळे आजदेखील दुसरा मार्ग स्वीकारावा लागतो. टॉलीवूडमध्ये साधारण कलाकाराला ५० कोटी एका सिनेमासाठी मिळतात. तसंच इथे चांगले नाटय आणि चित्रपटगृह नाहीत. त्यामुळे लोकांना चांगली कलाकृती पाहता येत नाही. टीव्ही कलाकार अधिक प्रसिद्ध होतात, कारण टीव्ही प्रत्येक घरात  असतो. याशिवाय अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील तफावत.

मराठी चित्रपटसृष्टीत नेपोटीज्मचा सामना करावा लागला होता का?

इथे नेपोटीज्म नाहीए, मी गेल्या १५ वर्षापासून या इंडस्ट्रित काम करतेय, इथले मोठे कलाकारदेखील बाहेरून येणाऱ्या कलाकारांचं कौतुक करतात आणि कधीही स्वत:च्या मुलांना इंडस्ट्रित आणण्यासाठी कोणावर जोर देत नाहीत. इथे सगळे एकमेकांच काम पाहतात आणि प्रंशसा करतात. इथे असं कोणतंही असं कुटुंब नाहीए जे परंपरेने इंडस्ट्रित आहे, जे हिंदीत पहायला मिळतं. इथे मोकळं वातावरण आहे. कथा खूप वेगळया पद्धतीने लिहिल्यामुळे सर्व कलाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याची संधी मिळते. इथे खूप हँडसम दिसणारा कलाकार हिरो बनतो आणि साधारण दिसणारादेखील हिरो बनू शकतो. इथे  सिनेमाची कथा स्टार असते. क्रिएटीव्हीटीमध्ये स्वातंत्र्य असल्यामुळे पावर सेंट्रलाईज्ड होत नाही.

किती फॅशनेबल आणि फुडी आहेस?

फॅशन मला फार आवडत नाही, परंतु खूप फुडी आहे आणि प्रत्येक प्रकारचं महाराष्ट्रीयन जेवण बनविते.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?

मी काही खूप ग्लॅमरस अभिनेत्री नाहीए. आता हिंदीत खूपच प्रयोग केले जात आहेत आणि मला काम करायचं देखील आहे.

आवडता रंग – पिवळा.

आवडता पेहराव – भारतीय, खासकरून साडी.

आवडतं पुस्तक – पाडस, लेखक – राम पटवर्धन.

आवडतं पर्यटन स्थळ – देशात मनाली, परदेशात पॅरिस.

वेळ मिळतो तेव्हा – सोलो ट्रिप आणि खाणं बनविणं.

आयुष्यातील आदर्श – सहानुभूती, प्रेम आणि काळजी.

सामाजिक कार्य – मुलं आणि त्यांची मानसिकता.

स्वप्नातील राजपूत्र – फ्रेंडली.

हास्यजत्रेच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लीवर

*प्रतिनिधी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून, दर रविवारी रात्री ८ ते १० असा २ तासांची ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं केलं आहे. प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन व्हावं यासाठी आता रविवारी २ तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. १८ जुलैला ‘रविवारची हास्यजत्रा’च्या भागात कॉमेडी किंग दस्तुरखुद्द जॉनी लीवर येणार आहेत. जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. कॉमेडी किंग येणार आणि मंचावर येणार नाहीत असं कसं शक्य आहे. या भागात हास्याच्या मंचावर कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सर्व स्किट्स पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि एवढंच नाही तर त्यांनी सर्व कलाकारांचं आणि हास्यजत्रेचं तोंडभर कौतुक केलं.

प्रेक्षकांना या भागात भरपूर धमाल, मस्ती आणि मनोरंजन यांनी ठासून भरलेली  स्किट्स पाहायला मिळणार आहेत. पाहा, ‘रविवारची हास्यजत्रा’ १८ जुलैपासून दर रविवारी रात्री ८ वा.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचं शीर्षकगीत देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात!

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीचे लाडके चेहरे मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या मालिकेचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, पण त्या शीर्षकगीताचं चित्रीकरण कसं झालं, याचा व्हिडिओ नुकताच आला आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. देवकी पंडित यांनी अनेक वर्षांनीशीर्षकगीतासाठी गायन केलं आहे.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’ १२ जुलैपासून,  सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

होणार मनोरंजनाची बरसात, ‘अजूनही बरसात आहे.’

*सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. त्यांचे चाहते आणि प्रेक्षक त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ती दोघं एकत्र काम करणार आहेत.

सध्याच्या वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका  आणली आहे.  प्रेमाला कुठे असते Expiry Date, असं म्हणणार्‍या मुक्ता आणि उमेश यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद केले आहेत तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

पाहा, ‘अजूनही बरसात आहे’! १२ जुलैपासून सोम.-शनि. रात्री ८ वा.
सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें