सुंदर इंटेरियर फायदेशीर काम

– शैलेंद्र सिंह

मिठाईच्या दुकानापासून ते अगदी वाण्याच्या दुकानापर्यंतच इंटेरियर आता पूर्वीपेक्षा छान होऊ लागलं आहे. ज्या दुकानांमध्ये पूर्वी इंटेरियरवर अगदी दुर्लक्ष केलं जात होतं तिथेदेखील आता आधुनिक स्टाईलचं इंटेरियर होऊ लागलं आहे. कपडयांची दुकानंदेखील पूर्वीपेक्षा बदलली आहेत. फरशी असो वा छत आता प्रत्येक जागी इंटेरियर वेगळं दिसू लागलं आहे. सॅलोनच्या नावावरती पूर्वी केवळ स्त्रियांची ब्युटी पार्लरच सजलेली दिसत असत परंतु आता पुरुषांच्या सॅलोनमध्येदेखील इंटेरियर डिझाईन होऊ लागलं आहे. सोशल मीडियाच्या काळात लोक जिथे जातात तिथले फोटो अपडेट करण्याचा प्रयत्न करतात. चांगलं इंटरियर फुकटात प्रचार करण्याचंदेखील काम करतं.

या बदलाची काय कारणं आहेत? हे जाणून घेण्यासाठी आम्ही लखनौमध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध इंटेरियर डिजाइनर आणि आर्किटेक्ट अनिता श्रीवास्तव यांच्याशी बोलणं केलं :

दुकानाचं मॅनेजमेंट चांगलं होतं

अनिता श्रीवास्तव सांगतात, ‘‘सुंदर आणि सुव्यवस्थित वातावरण प्रत्येकालाच आवडतं. असं वातावरण मनावर सुंदर छाप सोडतं. पूर्वी दुकानांमध्ये सामान इकडेतिकडे पसरलेलं असायचं, ज्यामुळे खूप वाईट दिसायचं, स्वच्छता करणे कठीण होऊन जायचं, उंदीर आणि किडे सामानांचं नुकसान करायचे. तर लाइटिंगची योग्य व्यवस्था होत नव्हती. विजेमुळे गुंतलेल्या तारांमुळे दुकानांमध्ये दुर्घटना व्हायची.

शॉर्टसर्किटमुळे आग लागायची. काम करणाऱ्यांना योग्य प्रकारे बसण्यास व उभे राहण्यास जागा मिळत नव्हती. हवा आणि प्रकाश मिळत नव्हता. आता इंटेरियर डिझाईनर दुकानाच्या गरजा आणि तिथे येणाऱ्या कस्टमरच्या सुविधा पाहता दुकानांना चांगलं डिझाईन करतात. यामुळे काम करणाऱ्यांना सुविधा आणि कस्टमरला पहायला छान वाटतं.’’

वीजेचं डिजाइनर सामान

इंटरियर डिझाईनिंगमध्ये पूर्वी विजेचा वापर गरजेसाठी होत होता. अलीकडच्या काळात विजेचं असं सामान आलं आहे जे गरजेसोबतच सुंदरदेखील दिसतं. जिथे ज्या प्रकारे हवा आणि प्रकाशाची गरज असते, तिथे त्याचा उपयोग केला जाऊ लागला आहे. विजेची अशी उपकरणं आली आहेत जी कमी होल्टेजवर चालतात. यामुळे विजेची बचत होऊ लागली आहे. हवेसाठी पंख्यासोबतच एसीचा वापर होऊ लागला आहे. पिण्याचं स्वच्छ पाणीदेखील विजेच्या वापरानेच मिळतं.

जमिनीपासून छतापर्यंत सर्व बदललं आहे

अनिता श्रीवास्तव सांगतात, ‘‘आज इंटेरियरसाठी खूप चांगलं मटेरियल मिळू लागलं आहे. जे स्वस्तदेखील आहे आणि व्यवस्थित तयार होतं. सोबतच हलकंदेखील आहे. भलेही हे लाकडासारखं मजबूत व टिकावू नसलं तरी आज यांची इंजिनियरवूड आणि प्लाईचा वापर इंटेरियरमध्ये होऊ लागला आहे. स्वस्त असल्यामुळे हे लवकर बदललंदेखील जातं.

‘‘केमिकलचा वापर केल्यामुळे वाळवी लागत नाही. इंटेरियरमध्ये पेपर कार्डबोर्डचा वापर होऊ लागला आहे. महागडया टाइल्सच्या जागी आकर्षक फ्लोरिंग मिळू लागलं आहे. हे मॅचिंग आणि आवडता रंग व डिझाईनचं होऊ लागलं आहे. जमिनीपासून ते छतापर्यंत नवीन रंगरूपामध्ये बदललं जाऊ शकतं.’’

बजेट इंटेरियर

इंटेरियर डिजाइनर पूर्वी डिझाईन तयार करून घ्यायचे, त्यानंतर ते बजेटनुसार मटेरियल निवडत असत. डिझाईनचं आता थ्रीडी फॉर्माट बनतं, ज्यामुळे पूर्ण इंटेरियर कसं दिसेल हे अगोदरच समजतं. जे चांगलं नाही वाटलं तर ते बदलता येऊ शकतं. इंटेरियरमध्ये काही अशा गोष्टींचा समावेश केला जातो जे पूर्ण इंटेरियरला हायलाईट करतं. जसं म्युरल आर्टचा प्रयोग वाढला आहे, हिरवळ दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोकळी जागा राहते, तेव्हा वातावरण अधिक चांगलं होतं. लोकं कम्फर्टेबल फील करतात.

कार्यक्षमतेला वाढवतं

इंटेरियरची उपयोगिता यासाठी वाढत चालली आहे कारण हे पाहणाऱ्यांना आकर्षित करतं. कस्टमर इथे येण्यात कम्फर्टेबल फील करतात. तिथे काम करणाऱ्यांना जेव्हा स्वच्छ हवा, पाणी, आनंदी वातावरण मिळतं तेव्हा त्यांची कार्यक्षमता वाढते.

जसी जागा तसे इंटिरियर

* शैलेंद्र सिंह

पूर्वी, जेथे लहान आणि मोठया घरांसाठी बजेटनुसार इंटिरियरचे परिमाण वेगवेगळे होते, तेथे आता बजेटऐवजी केवळ जागेवरच तडजोड केली जात आहे. १२ शे चौरस फूट असलेल्या छोटया घरात, जर स्वयंपाकघर १०० चौरस फूटमध्ये बनविले असेल तर ३००० चौरस फूट घरामध्ये ते ३०० चौरस फूटमध्ये बनते. स्वयंपाकघरात नवीन जमान्याच्या मॉड्यूलर किचनच्याच फिटिंग्ज वापरल्या जातात. फक्त फरक म्हणजे गरज आणि बजेटनुसार इंटीरियरमध्ये लागणाऱ्या वस्तूंच्या आकारात फरक येत असतो. जर कमी बजेटमध्ये ग्रॅनाइट वापरली जात असेल तर कुरियर सिंथेटिक जास्त बजेटमध्ये वापरला जातो.

लखनऊमधील इंटिरियर डिझायनर आणि प्रतिष्ठा इनोव्हेशन्सच्या संचालिका प्रज्ञा सिंह म्हणतात, ‘‘आजकाल घरांमध्ये इंटिरियरची कामे खूप वाढली आहेत. आजच्या काळात घर बांधण्यासाठी चांगले तंत्रज्ञान आणि त्यात वापरली जाणारी सामग्री सहज उपलब्ध होत आहे.’’

तंत्रज्ञान समृद्ध इंटिरियर

आक्टिक्ट प्रज्ञा सिंह पुढे स्पष्टीकरण देतात, ‘‘केवळ लहानच नव्हे तर मोठया घरांमध्येही आता अधिक मोकळी जागा सोडण्याचा ट्रेंड वाढत आहे. यामध्ये एकतर घराचा खर्च कमी केला जाऊ शकतो, आणि दुसरीकडे देखभाल करण्यातही काही अडचण होत नाही. मोकळया जागेचा फायदा हा होतो की आपल्याकडे भविष्यातील गरजेसाठी जागा मोकळी असते, ज्यामध्ये बदलत्या गरजेनुसार कधीही नवीन बांधकाम केले जाऊ शकते.

‘‘नव्या काळातील इंटिरियरमध्ये लोकांना तंत्रज्ञानामध्ये सर्वात नवीन आणि दिसायला प्राचीन स्वरूप लुक हवे आहे. खुल्या लॉनमध्ये एका बाजूला लोक टेकडयांचा लुक देणारा फव्वारा आणि युरलवर्क पसंत करतात तर दुसऱ्या बाजूला काचेची बनलेली अशी जागाही हवी आहे, जेथे एसीचा आनंद घेता येईल.

‘‘त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात मॉड्यूलर किचनबरोबरच अॅन्टिक किचन लुकदेखील हवे असते. घराचे प्रत्येक कोपरे कॅमेऱ्याच्या नजरेत असले पाहिजेत. आग प्रतिबंधक यंत्रणा हवी असते. आजकाल लोकांना घरांचे इंटिरियरदेखील हॉटेलांसारखे हवे आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञान आणि अँटीक लुकचा ताळमेळ इंटिरियरला खास बनवू लागला आहे.’’

अधिक काम कमी जागा

इंटिरियरमध्ये कमीतकमी जागेला मोठयाहून मोठया जागेप्रमाणे कसे दाखवता येईल याकडे सर्वाधिक लक्ष दिले जात आहे. कमी बजेटमध्ये जुन्या लुकला नवीन कसे करता येईल? असे विचारले असता प्रज्ञा सिंह म्हणतात, ‘‘घरांच्या इंटिरियरमध्ये वॉल पेपरचा वापर वाढला आहे. थीम आधारित वॉल पेपर यामध्ये येऊ लागले आहेत. काही वॉल पेपर सानुकूलित करण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाइन, कोटेशन किंवा एखाद्या खास प्रसंगाचा स्वत:चा फोटोही छापू शकता. पूर्वी घरांचे लिंपण्याचे व रंग देण्याचे काम उत्सव किंवा लग्नापूर्वी करून घराचा देखावा बदलला जात होता, पण आता नवीन लुक देण्यासाठी केवळ वॉल पेपर बदलला जात आहे.

‘‘काचेची भिंत स्वयंपाकघर, बेडरूम आणि लॉबीमध्येदेखील वापरली जाते ज्यामुळे जागा अधिक दिसते. काचेच्या भिंतींवर पडदे वापरल्याने गोपनीयतादेखील राखली जाते. काचेच्या भिंती जागा कमी व्यापतात, ज्यामुळे घरात मोकळेपणा दिसतो. काचेच्या भिंतींमधून मोकळया वातावरणात नैसर्गिक भावना जाणवते.

‘‘बऱ्याचवेळा लोक कृत्रिम गवत आणि वनस्पतीदेखील वापरतात. त्यांना काचेच्या भिंतीतून पाहिल्यास एक वेगळीच भावना जाणवते. आज सर्व काही इंटिरियरमध्ये प्राप्त होत आहे. इंटिरियर आता स्थितीचे प्रतीक म्हणून बदलले आहे.’’

नवीन वर्षात घराला द्या नवा लुक

* पुष्पा भाटिया

हिवाळयाच्या दिवसात घराच्या सजावटीतही काही बदल करणे गरजेचे असते. लेअरिंग, एक्स्ट्रा कम्फर्ट आणि वार्म फेब्रिक इंटेरिअरमध्ये छोटे-छोटे बदल करून हे काम अगदी सहजपणे कमी मेहनत आणि कमी खर्चात पूर्ण करता येते. जाणून घेऊया घर सजावटीच्या काही टिप्स :

रंग : हिवाळा आणि उन्हाळयातील फरक रंगांमुळे स्पष्ट होतो. उन्हाळयात सौम्य रंगांचा वापर चांगला वाटतो, तर हिवाळयात उष्ण आणि उजळ रंग खुलून दिसतात. त्यामुळेच या ऋतूत तुम्ही घरात रंगकाम करणार असाल तर उष्ण आणि उजळदार रंगच निवडा. त्यांच्यामुळे घरात उबदारपणा आल्यासारखा वाटतो. सोबतच यामुळे घर उठावदार दिसते. याशिवाय लाल, भगवा किंवा पिवळया रंगाचा वापर केल्यामुळेही घरात ऊर्जेचा संचार होतो.

या गोष्टीकडे लक्ष द्या की, दोन विरोधाभासी रंग तुम्ही एकत्र लावू नका. जसे की, एकाच रंगाच्या सौम्य आणि गडद छटांमुळे खोली भडक, भपकेबाज दिसू शकते.

लेअरिंग : हिवाळयात ज्या प्रकारे शरीराला लेअरिंगद्वारे ऊब मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो त्याच प्रकारे लेअरिंग करून घरालाही उबदार असा लुक देता येतो. त्यासाठी कारपेट्स राज, ब्लँकेट्स आणि व्रिवल्ट्वर जास्त लक्ष द्या. आजकाल बाजारात विविध रंग, आकार, डिझाईन आणि पॅटर्न उपलब्ध आहेत.

विविध रंग आणि टेक्सचर वापरण्याऐवजी एकच रंग वापरून घराला आरामदायक बनवा. तुम्ही जे कोणते कार्पेट खरेदी कराल ते घराची रचना आणि रंगला साजेशे असेल याकडे लक्ष द्या.

लायटिंग : जेव्हा लायटिंगचा प्रश्न असतो तेव्हा तुम्ही तुमच्या घराला टास्क आणि एक्सॅट लायटिंगने उबदार बनवू शकता. याशिवाय घराला सुंदर आणि उबदार बनवण्यासाठी लादी आणि भिंतींवरील लायटिंगचाही वापर करता येईल. फ्लोरोसंट बल्बऐवजी टंकस्टन बल्ब वापरा, कारण ते घराला उबदार लुक देतील.

सर्वसाधारणपणे लोक या ऋतूत जाडसर पडदे लावतात किंवा दरवाजे-खिडक्या बंद करून घेतात. असे करू नका. यामुळे घरातले प्रदूषण बाहेर जाणार नाही. घरातल्या एका मोकळया भिंतीवर आरसा लावा.

नक्षीकाम केलेल्या काचेच्या काही वस्तू घरात नक्की ठेवा. त्यांच्यामुळे प्रकाश परावर्तित होऊन घराच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहचू शकेल आणि त्यामुळे हिवाळयातही थोडासा उबदारपणा घरातील प्रत्येक खोलीत जाणवेल. यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. आतल्या बाजूने पिवळटसर असलेले बल्ब लावा. याशिवाय काळोख्या कोपऱ्यात स्टेटमेंट लाईट लावा.

स्वयंपाकघर : आधुनिक गृह सजावटीत स्वयंपाकघराचा लुक सर्वाधिक बदललेला पाहायला मिळतो. आता एका विशिष्ट पद्धतीचेच ओटे किंवा कप्पे पाहायला मिळत नाहीत. मिक्सिंगवर तसेच वेगवेगळया काँट्रास्टिंग टेक्सचरवरही विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. स्लीक वर्कटॉप्स, डार्क केबिनेटरीसह क्लीन मार्बल्ड स्प्लॅशबॅकचा वापर करून या ऋतूत स्वयंपाकघराला नवा लुक मिळू शकतो.

स्टँड कँडल्स : अशा कँडल्स निवडा ज्या तुमच्या घराच्या अंतर्गत सजावटीला शोभून दिसतील. त्या घरातील एखाद्या कोपऱ्यात होल्डरवर लावा किंवा प्लेट अथवा बाऊलमध्ये सजवा. घरात फायरप्लेस असेल तर त्याच्या अवतीभवती कॉफी टेबल, २-३ खुर्च्या ठेवा किंवा कोपऱ्यांवर कँडल्स लावा. कँडल्समुळे घरात उबदारपणा येईल. तुम्ही लाईट स्टँड कँडल्स किंवा सुगंधी अगरबत्तीचाही वापर करू शकता.

विंडो सीट :  घरात उबदारपणा यावा यासाठी गडद रंगांचे पडदे लावा. यामुळे उबदारपणा जाणवेल. पण हो, सकाळच्या वेळी ते बाजूला करून ठेवायला विसरू नका. याशिवाय हिवाळयाच्या सुट्टीत खिडकीकडची जागा तुमच्यासाठी आरामदायी ठरेलं.

पूर्व दिशेकडील खिडकीकडे बसायची सुंदर व्यवस्था करा. ही जागा आळसावलेल्या दुपारी पुस्तक वाचन, डुलकी घेणे किंवा संगीत ऐकण्यासाठी उपयोगी ठरेल. खिडकीकडे एक छोटीशी जागा तयार करा आणि तिला पडदे, उशांनी सजवा. खिडकीतून बाहेर डोकावल्यावर हिरवळ दिसेल याकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येक ऋतुनुसार केलेल्या बदलांमुळे घराला नवे रंगरूप मिळते.

फुलांकडे विशेष लक्ष द्या : हिवाळयात उमलणारी रंगीबेरंगी फुले घराला नैसर्गिक लुक देतात. त्यामुळेच घराच्या अंतर्गत आणि बाह्य सजावटीसाठी फुलांचा वापर करता येईल. रजनीगंधा आणि विविध प्रकारची फुले हिवाळयाची शोभा वाढवतात. रजनीगंधाचा मोहक सुगंध संपूर्ण घर सुगंधित करेल. कुंड्यांना गडद रंगाने रंगवून नवा लुक द्या. हिवाळयात थोडा जरी ओलावा कमी झाल्यास रोपटे सुकू लागते. म्हणूनच त्यांना पाणी घालायला विसरू नका. फुले निसर्ग आपल्या जवळ असल्याची सुखद अनुभूती देतात अॅलर्जी असेल तर आर्टिफिशियल फुलांचा वापर करता येईल.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* घर सजावट कशी आहे, हे  घरातल्या फर्निचरवरून समजते. फर्निचर महागडे असेल तरच चांगले असते, असे मुळीच नाही. बाजारात कमी किमतीतही उत्तम फर्निचर मिळते. फक्त ते दिसायला आकर्षक, घरातील इतर वस्तूंना साजेसे, साधे आणि आरामदायक असेल, याकडे लक्ष द्या. फर्निचर असे हवे ज्याचा वापर कोणीही सहजपणे करू शकेल. अनेकदा फर्निचरची जागा बदलल्यामुळेही खोलीला नवा लुक मिळतो.

* घरात विनाकामाचे, जुने किंवा, मोडके सामान ठेवू नका. यामुळे अंतर्गत सजावट उठून दिसणार नाही. सोबतच ते उगाचच जागा अडवतील. जेवढे सामान जास्त असेल तेवढा जास्त त्रास घर नीटनेटके ठेवताना होईल.

* डायनिंग टेबलच्या खुर्च्यांवर छोटी गादी किंवा कपडयाचे कव्हर घातले तर यामुळे हिवाळयात उबदारपणा जाणवेल. खुर्चीवर घातलेले सिल्कचे कापडही हिवाळयात उबदारपणासाठी उपयोगी ठरते.

* भारतीय घरात शक्यतो फायरप्लेसचा वापर केला जात नाही. त्यामुळेच तुम्ही हवे असल्यास कृत्रिम फायरप्लेसचा वापर करू शकता. घर जितके उबदार, उजळ आणि आरामदायक ठेवाल ते तितकेच चांगले दिसेल. तर मग उशीर कशाला करायचा? बजेटनुसार आपले घर सजवून सुंदर बनवा. तुमच्या घराचे हे नवे रूप नव्या वर्षाची सर्वोत्तम भेट ठरेल.

७ गृहसजावटीचे ट्रेंण्डस

* रेशम सेठी, आर्किटेक्ट, ग्रे इंक स्टुडिओ

गृहसजावटीमध्ये आजकाल मिनिमलिस्टिक डिझाइन हा सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. तुम्ही तुमचा इंटिरिअर थीम काहीही ठेवा, तुमची पसंती मिनिमलिस्टिक डिझाइनला असेल तर तुमचे घर ट्रेंडी दिसेल. यात सर्व गोष्टी कमीतकमी ठेवल्या जातात, मग तो रंग असो, फर्निचर असो वा डिझायनर पीस असो. मिनिमलिस्टिक डिझाइनमध्ये खोल्या थोडया मोकळया, परंतु शोभिवंत दिसतात. बहुसंख्य लोकांना याबरोबरच घराला सफेद रंग देणे आवडते. जरी इतर रंग निवडले गेले, तरी त्याचा टोन म्युटेड ठेवला जातो. मिनिमलिस्टिक डिझाइन पॅटर्न आणि निओ क्लासिकल थीम डिझाइन सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे, ज्यात आधुनिक आणि शास्त्रीय वास्तुकलेचा मिलाफ दिसून येतो.

झुंबर

पूर्वी राजामहाराजांच्या आणि श्रीमंतांच्या राजवाडयांमध्ये आणि हवेल्यांमध्येच झुंबरांचा वापर केला जात होता, परंतु २१व्या शतकात झुंबर हा गृहसजावटीत एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

याची दोन मुख्य कारणे आहेत – पहिले म्हणजे लोक आपले घर सजवण्यासाठी पैसे खर्च करण्यास तयार असतात, दुसरे म्हणजे आता बाजारामध्ये पारंपरिक झुबंरांबरोबर नवीन डिझाइनचे झुंबर उपलब्ध आहेत. हे झुंबर निओ क्लासिक होम डेकोरसह घराला लुक देतात.

पेंटिंग

आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये सफेद, पिस्ता ग्रीन, फिकट राखाडी, गडद हिरवा, सॉफ्ट क्ले, फिकट निळा, मस्टर्ड, मिस्ट (पेस्टल ब्लू आणि ग्रीन यांचे मिश्रण), मशरूम कलर, हिरवा वगैरे रंगांचा ट्रेंड सुरू आहे.

तसे, बोल्ड रंगदेखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये चैतन्य यावे असे वाटत असेल तर बोल्ड रंगांची निवड करण्यास अजिबात संकोच करू नका. बोल्ड रंग खोल्यांना डेप्थ आणि टेक्सचर देतात. तसे आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये काळा रंगदेखील ट्रेंडमध्ये आहे, परंतु या बोल्ड रंगांचा टोन म्यूट ठेवला जातो. आजकाल ग्लास, सॅटिन, एग शेल, मॅट टेक्सचरचा ट्रेंड आहे.

इनडोअर व्हर्टिकल गार्डन

इनडोअर व्हर्टिकल गार्डनदेखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आज असे गार्डन लावणे खूप सोपे झाले आहे. ते तुमच्या घराच्या भिंतींना एक वेगळा लुक आणि टेक्सचर देते. ते आकर्षक तर दिसतेच, पण थर्मल इन्सुलेटर म्हणूनही काम करते. ते उन्हाळयात खोली थंड आणि हिवाळयात उबदार ठेवते.

डबल हाइट पॅसेज

जर तुम्ही नवीन बांधकाम करत असाल, तर तुम्ही डबल हाइट पॅसेज ही कॉन्सेप्ट निवडू शकता. यात जागा मोठी दिसते. साधारणत: छप्पर ९-११ फूट उंचीवर असते. डबल हाइट सीलिंगमध्ये ते यापेक्षा दुप्पट किंवा थोडया कमी वा जास्त उंचीवर असू शकते.

उंच भिंतींवर भित्तीचित्रे आणि कलाकृती ठेवता येतात. मोठमोठया दरवाज्यांसह त्या अतिशय ग्रँड लुक देतात. डबल हाइट पॅसेजमध्ये पारंपरिक झुंबरदेखील अतिशय रॉयल लुक देतात.

प्लँट्स आणि फ्लॉवर्स

तसेही गृहसजावटीत वनस्पती आणि फुलांचे विशेष महत्त्व अबाधित असले, तरी कोरोना महामारीनंतर त्यांचा वापर अधिकच वाढला आहे. ते घराला आकर्षक बनवण्याबरोबरच त्याला नॅचरल लुकही देतात. इनडोअर प्लँट्स एक नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून काम करतात.

तुम्ही त्यांना बाल्कनी आणि टेरेसवरदेखील ठेवू शकता. टेरेस गार्डनची हिरवळ रंगीबेरंगी फुले, ताजी हवा आणि मोकळया आकाशासोबत एक नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देते.

वॉर्डरोब डिझाइनिंग

सध्या जो निओ क्लासिकल ट्रेंड सुरू आहे त्यामध्ये १९व्या शतकात प्रचलित असलेले फ्लुटेड आणि फॅब्रिक फिनिश ग्लास पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहेत. ते स्टायलिश असण्याबरोबरच नाजूक आणि सुंदरही दिसतात.

तुम्ही त्यांचा वॉर्डरोब डिझायनिंग आणि स्लायडिंग डोअरमध्येही वापर करू शकता. हे इनडोअर प्रायव्हसीसाठी प्रायव्हसी स्क्रीन म्हणूनही वापरले जातात. त्यामुळे बेडरूम-स्टडीरूम, बेडरूम-ड्रेसिंगरूममध्ये पार्टिशनसाठी त्यांचा वापर केला जातो.

फ्लुटेड ग्लासेस व्यतिरिक्त फॅब्रिक फिनिश ग्लासदेखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये पातळ फॅब्रिकची जाळी २ ग्लासच्यामध्ये बसवली जाते. यामध्ये वापरण्यात येणारी जाळी वेगवेगळया रंगांची आणि डिझाइनची असू शकते. तुम्ही तुमच्या घराच्या थीम आणि गरजेनुसार त्यांची निवड करू शकता.

आरशांनी असे सजवा घर

*  गरिमा पंकज

आरशाचा उपयोग फक्त चेहरा पाहण्यासाठीच होत नाही तर घराच्या सजावटीसाठीही होतो. इंटिरियर डेकोरेशन म्हणजे अंतर्गत सजावटीत त्याचा मोठया प्रमाणावर वापर होऊ लागल्याने आता अंतर्गत सजावटीतील महत्त्वाचा घटक म्हणून आरशाकडे पाहिले जाऊ लागले आहे.

आरसा योग्य पद्धतीने लावल्यास छोटी जागाही मोठी दिसू लागते. भकास जागेत चैतन्य निर्माण होते आणि काळोख्या जागेत प्रकाशाचा आभास होतो. म्हणजेच सजावटीत आरशाचा केलेला वापर त्या जागेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकतो.

आरशाची संकल्पना

प्राचीन काळापासूनच आरशाचा उपयोग घर आणि महालांना सजविण्यासाठी होत आला आहे. आता पुन्हा एकदा सजावटीत आरशाच्या संकल्पनेचा वापर झपाटयाने वाढत आहे. त्यामुळेच आरसा केवळ ड्रेसिंग टेबलचाच एक भाग राहिलेला नाही तर घराच्या सजावटीतीलही एक महत्त्वपूर्ण घटक झाला आहे. घर आणि कार्यालयांतील अंतर्गत सजावटीत आर्ट पीस म्हणून आरशाचा वापर केला जात आहे.

घराच्या आतच नाही तर घराबाहेर बाग, अंगण, गच्चीवरही आरशाचा वापर होऊ लागला आहे. कोणती जागा सजवायची आहे, ते पाहून त्यानुसार वेगवेगळया आकार आणि प्रकारातील आरशाची निवड केली जाते.

प्रे इंक स्टुडिओचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तूरचनाकार सर्वेश चड्ढा यांनी मिरर इफेक्टबाबत माहिती दिली :

भिंतीवर : आरसा भिंतीवर लावल्यास तुमची खोली मोठी दिसेल, सोबतच ती अधिक आकर्षक वाटू लागेल. खोलीत नेहमीच मोठा आरसा लावा. त्याची उंची भिंतीइतकी असायला हवी. दरवाजासमोर असलेल्या भिंतीवरच आरसा लावा, जेणेकरून बाहेरचे संपूर्ण प्रतिबिंब आत दिसेल.

सोफ्यावर : सोफ्याच्यावर जी मोकळी जागा असते तिथे फ्रेम बनवून त्यात छोटे, मोठे आरसे लावले जातात. तुम्ही ही फ्रेम इतर एखाद्या मोकळया भिंतीवरही लावू शकता. भिंतीची लांबी, रुंदी, फर्निचर आणि पडद्याच्या रंगानुसार फ्रेमचा आकार ठरतो.

स्वयंपाकघर : स्वयंपाकघरातही आरशाचा वापर होऊ लागला आहे. त्याचा वापर तुम्ही कपाटावर किंवा फ्रीजवरही शो पीस म्हणून करू शकता.

सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात खिडकीच्या अगदी खाली सिंक लावले जाते, पण जर खिडकी नसेल तर सिंकच्यावर आरसा लावून तुम्ही खिडकीची उणीव भरून काढू शकता. आरशाचा प्रयोग केल्यामुळे स्वयंपाकघरात अधिकचा प्रकाश असल्यासारखा भास होईल. याशिवाय मिरर टाईल्स स्वयंपाकघरातील सौंदर्यात भर घालू शकतात.

दिवाणखाना : सुंदर फ्रेममध्ये लावलेला आरसा लिविंग रूम म्हणजेच दिवाणखाण्याची शोभा वाढवितो. आरशासमोर एखादी सुंदर कलाकृती, चित्ररूपी देखावा असेल तर त्याचे प्रतिबिंब आरशात दिसते आणि त्यामुळे खोली अधिक मोठी आणि सुंदर दिसू लागते. खिडकीसमोर लावलेला आरसा प्रकाशाला प्रतिबिंबित करून खोलीत जिवंतपणा आणतो.

खिडकीजवळ : खिडकीच्याजवळ आरसा लावल्यास खोलीतील नैसर्गिक प्रकाशात वाढ होईल. खिडकीच्या जवळ किती जागा उपलब्ध आहे ते पाहून त्यानुसारच आरशाची निवड करा. आरसा जितका मोठा असेल तितकी खोली अधिक उजळून निघेल.

बगिच्यात : अनेक घरात स्वत:चा बगिचा किंवा मग टेरेसवर बगिचा असतो. बगिच्यात केलेला आरशाचा वापर तुमच्या घराच्या सजावटीला एक वेगळा आयाम देईल. यात तुमच्या बगिच्यातील हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांचे प्रतिबिंब पहायला मिळेल. पतंगाच्या आकाराचे आरसे लावल्यास हे आरसे आणि रात्रीचे निळे आकाश अशी रंगसंगती खूपच आकर्षक दिसेल.

पायऱ्यांवर : चित्ररूपी देखावा किंवा शोपीस ऐवजी पायऱ्यांवर आरसा लावता येईल. तुम्ही वेगवेगळया आकाराच्या आरशांचा कोलाज करू शकता.

कॉरिडॉरमध्ये : जर कॉरिडॉर छोटा असेल तर तिथेही आरसे लावा. यामुळे तो मोठा आणि चमकदार दिसेल.

पलंगाच्या बाजूचे टेबल : पलंगाच्या बाजूच्या टेबलामागे छोटा आरसा लावा. त्याच्या पुढे लॅम्प शेड किंवा फुलदाणी ठेवा. याचे आरशात पडणारे प्रतिबिंब बेडरूमला अधिक आकर्षक बनवेल.

वॉर्डरोब पॅनल्स : वॉर्डरोब पॅनल्सना मिरर पॅनल्सने बदलून टाका. यामुळे तुमची खोली मोठी आणि उजळदार दिसेल. शिवाय लाकडाच्या तुलनेत तुमच्या वॉर्डरोबचे पॅनल्स वजनानेही कमी असतील. ड्रेसिंग एरिया म्हणूनही तुम्ही याचा वापर करू शकता.

बाथरूम : बाथरूममध्येही आरसा लावा. यामुळे तो मोठा आणि अधिक प्रकाशमान दिसेल.

प्रवेशद्वार : प्रवेशद्वारावर लावलेला आरसा खूपच उपयोगी पडेल. तुम्ही आणि तुमचे पाहुणे घरात पाऊल टाकण्यापूर्वी स्वत:वर एक नजर टाकू शकतील.

निवड कशी कराल?

खोलीचा रंग आणि तेथील फर्निचरच्या रंगानुसारच आरशाची फ्रेम निवडा. अंतर्गत सजावटीत मेटल किंवा लाकडाच्या फ्रेमचा वापर अधिक केला जातो. घराला क्लासिक लुक द्यायचा असेल तर गोल्ड प्लेटेट फ्रेम निवडा. तर मॉडर्न लुकसाठी तुम्ही मेटॅलिकची फ्रेम निवडू शकता. आरशावर काढण्यात आलेल्या चित्रांना तुम्ही वॉल आर्टच्या रुपातही लावू शकता.

बाथरूममध्ये नेहमीच मोठा आरसा लावा. तो ७-८ एमएमचा असायला हवा. आरसा जितका मोठा तितकाच लुक चांगला मिळेल. आरशाच्या मागच्या बाजूला गडद रंग लावला असेल तर अतिउत्तम. यामुळे आरशातील  तुमची प्रतिमा अधिक ठळक आणि चांगली दिसेल.

घराला नेहमी सिमिट्रीने सजवा. यामुळे तुमचे घर सुंदर दिसेल, सोबतच आरसे अधिक आकर्षक दिसतील.

कोणत्या आरशांना आहे जास्त मागणी?

ट्रान्सपलंट म्हणजे आरपार दिसेल असे पारदर्शक आरसे, विविध रंगात येणारे लेकर्ड आरसे, रंगीत किंवा ठिपके असलेले आरसे, लुकिंग मिरर म्हणजे चेहरा पाहता येईल असे आरसे इत्यादी प्रकारच्या आरशांना सध्या विशेष मागणी आहे. ते वेगवेगळया आकार आणि प्रकारात उपलब्ध आहेत. गोल, चौकोनी, लांब, रुंद, लहान, मोठे इत्यादी. तुम्ही तुमची गरज आणि आवडीनुसार आरशाची निवड करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें