हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करते – ऋता दुर्गुळे

* नमिता धुरी

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तरुण प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी आणि छोट्या पडद्यावर आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळे सांगतेय तिच्या कलाविश्वातील आयुष्याबद्दल.

अभिनयाची सुरुवात कशी झाली?

माझं शिक्षण रुईया महाविद्यालयात झालेलं असलं तरीही मी कधी एकांकिका वगैरे केल्या नव्हत्या. कारण मी अकरावी-बारावी सायन्सला होते. त्यानंतर मी मास मिडिया शिकत होते. त्यामुळे आम्हाला इंटर्नशिप्स कराव्या लागतात. मी ‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर इंटर्नशिप करत होते. तिथे मला रसिका देवधर भेटल्या. त्या ‘दुर्वा’ मालिकेच्या कास्टिंग डिरेक्टर होत्या. त्यांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिली आणि मला ‘दुर्वा’ मालिकेत दुर्वाची मुख्य भूमिका मिळाली. तेव्हापासून माझं या क्षेत्रात पदार्पण झालं.

सुरुवातीला एक प्यादं म्हणून वापरली जाणारी दुर्वा शेवटी स्वत:च राजकारणात उतरते. तुला काय वाटतं महिला जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा खरंच काही बदल घडतो?

खरंतर या विषयावर मला फार काही बोलता येणार नाही. कारण मालिकेतल्या गोष्टी आणि खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी यांमध्ये खूप फरक असतो. पण तरीही मला असं वाटतं की बदल हा कोणीही घडवू शकतो. त्यासाठी तुम्ही महिलाच असलं पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचे विचार चांगले असायला हवेत आणि तुम्ही योग्य मार्गाने पुढे जात राहिलं पाहिजे.

सध्या सुरु असलेल्या फुलपाखरुमालिकेत मानस तुला म्हणजे वैदेहीला त्याच्या कविता ऐकवून प्रपोज करतो. तू स्वत: कॉलेजमध्ये असताना असं काही तुझ्यासोबत घडलं का?

नाही, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. पण हेच फुलपाखरु मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेतली प्रेमकथा जरी आजच्या काळातली असली तरीही प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम खूप वेगळं आहे. आजकाल सोशल मिडियावर आपण सगळ्याच गोष्टी खुलेपणाने बोलत असतो. पण तरीही मानस मात्र स्वत:च्या कवितेतून प्रेम व्यक्त करतो. त्यामुळेच ‘फुलपाखरु’ मालिका प्रेक्षकांना जास्त भावते. पण माझ्याबाबत असं कधीच झालं नाही.

कॉलेजचे दिवस हे मजामस्तीचे तर असतातच, पण या काळात मुलांचं करिअरही घडत असतं. अशावेळी पेपर फुटणे, निकाल वेळेत न लागणे अशा गोष्टींमुळे कॉलेज लाइफवर काय परिणाम होतो?

खरंतर आमची पहिली बॅच होती, जेव्हा क्रेडिट सिस्टीम आली. पण त्यावेळेला आम्हाला फार काही अडचणी जाणवल्या नाहीत. पिढीनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आताचे विद्यापीठाचे घोळ वगैरे या गोष्टी बघितल्या की मला प्रश्न पडतो की आताचे विद्यार्थी कसे एन्जॉय करत असतील? माझ्या कॉलेज लाइफमध्ये तर मी शूटींगच करत असायचे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला कधी वेळच मिळाला नाही.

प्रसारमाध्यमं, सोशल मिडिया यामुळे कलाकारांना प्रसिद्धी तर मिळते. पण याचे काही दुष्परिणामही असतात का?

मला असं वाटतं की प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट एका मर्यादेपर्यंत असते, तेव्हा ती चांगली असते. एखाद्या गोष्टीचे अधिकार तुमच्याकडे येतात, तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारीही तुमच्याकडेच येते. तुम्ही जर पब्लिक फिगर असाल तर तुमच्यावर तेवढीच जबाबदारीही असते की समाजात कसं वागावं, सोशल मिडियावर काय पोस्ट करावं, कधीकधी यामुळे प्रायव्हसीला धक्का लागतो. पण तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता हे तुमच्यावर आहे. माझी प्रायव्हसी हरवली आहे असे अजूनतरी मला वाटत नाही.

तु ज्या मालिका पाहात मोठी झालीस त्या मालिका आणि आताच्या मालिका यात काही फरक जाणवतो का?

हो, खरंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तेव्हा मलाही असंच वाटायचं की मला किचन पॉलिटिक्स नाही बघायचंय. पण आज ‘तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून मालिका सुरू केल्या आहेत. तरुण जे देशाचं भविष्य असतात, त्यांच्यासाठी मालिका सुरु करणं हा एक वेगळा प्रयोग आहे असं मला वाटतं.

महिला या सुरुवातीपासूनच मालिकांच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आहेत. पण या सगळ्याचा महिलांच्या आयुष्यावर काही परिणाम होताना दिसतो का?

मला असं वाटतं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. गृहिणी मालिकांमधल्या नायिकांशी स्वत:ला रिलेट करत असतात. त्या नायिकांचा महिलांवर काही प्रभाव पडतो का माहीत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना एक कंपनी मिळत असते.

मासिक पाळी हा महिलांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. पण त्याविषयी असणाऱ्या अंधश्रद्धेविरोधात आजपर्यंत कोणत्याच मालिका सिनेमातून भाष्य केलं गेलेलं नाही. याविषयी तुला काय वाटतं?

मला असं वाटतं की मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोललं गेलं पाहिजे. ती काही वाईट गोष्ट नाही. त्यातून आपण नवा जीव घडवतो. जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती वाईट असूच शकत नाही. त्यामुळे पाच दिवस मंदिरात जायचं नाही हे मला तरी पटत नाही. माझे आईवडीलही अशा गोष्टी मानत नाहीत. मालिकेतल्या नायिकांच्या तोंडून जर याविषयी बोललं गेलं तर बरं होईल. शिवाय या गोष्टीचा खूप आनंद होतोय की या विषयावरचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा लवकरच येतोय. बाकी कोणी याविषयी काही बोलत नसेल तर आपण स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे.

तुझ्या करिअरची सुरुवात तर झाली आहे. पण मग पुढे काय?

मला केणत्याही गोष्टीची घाई नाहीए. मला स्वत:ला आणखी ग्रूम करायचंय. मी नाटक आणि सिनेमामध्ये अजून काम केलेलं नाहीए. त्यामुळे त्या माध्यमांतही मला काम करायचंय. मी प्रत्येकवेळी असा प्रयत्न करेन की मी नेहमी वेगळ्या रुपात सगळ्यांसमोर येईन आणि प्रेक्षकांना खूप आवडेन.

गृहशोभिकेच्या वाचकांना काय सांगशील?

वाचकांना मी इतकंच सांगेन की तुम्हाला जे काही करायचंय ते आत्मविश्वासाने करा. टोकणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला जे करायचंय त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कही करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें