अक्षया गुरवची ‘बंडखोरी’ रिवणावायली मधून येणार समोर

* सोमा घोष

मराठी चित्रपट हा नेहमीच समाजातील दुर्लक्षित घटकांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची दृष्टी प्रेक्षकांना देत आहे. हेच मराठी चित्रपट हे बहू आयामी आणि विषयातील वैविध्य यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या चित्रपटातुन कलाकारांची सामाजिक जाणीवसुद्धा लक्षात येत असून बिटरस्वीट या चित्रपटाच्या नंतर अक्षया गुरव ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

रिवणावायली असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटही आपल्या भूमिकेविषयी अक्षया सांगते ‘सामाजिक दृष्टया कितीही पुढारलेलो असला तरी कुठे ना कुठे अनिष्ट रूढी परंपरा या आपल्या पाठीमागे तग धरून असतात. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कितीही जनजागृती होत असली तरी कुठेतरी समाजात अनेक स्त्रिया शिक्षणापासून वंचित आहेत. तर शिकलेल्या स्त्रीला तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यापासूनसुद्धा अडवलं जात आहे. अशाच एकदा बंडखोर मुलीची तिच्या संघर्षाची कथा म्हणजे रिवणावायली.’ तर याच चित्रपटाच्या विषयी पुढे ती सांगते ‘कलाकार आपल्या कलेतून समाजाचं एक प्रतिबिंब उभं करत असतो. कलाकार समाजाचा देणेकरी असतो, त्याने सामाजिक विषय हाताळताना विषयाची सवेंदनशीलता जाणून घेणे आणि त्यावर योग्य ती भूमिका घेणं ही त्याची जबाबदारी असते. तीच जबाबदारी मी या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे.’ अक्षया या चित्रपटात ‘ऐश्वर्या देसाई’ हे पात्र साकारत असून ती उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहे.

या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

मला भिंतींवर कुल कलर अधिक आवडतात – संस्कृती बालगुडे

* सोमा घोष

मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेला लहानपणापासूनच कोरिओग्राफर बनायचं होतं, परंतु तिला अभिनयाची संधी मिळाली आणि तिचा स्वीकार करत ती पुढे निघाली. तिचा चर्चित मराठी चित्रपट ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ आणि मराठी मालिका ‘पिंजरा’ होती. ज्यामुळे घरोघरी तिची ओळख निर्माण झाली. खूपच लाजाळू असलेली संस्कृती सुरुवातीला कॅमेरा फ्रेंडली नव्हती, परंतु तिला हळूहळू अभिनय आवडू लागला. तिला नशिबाने ही संधी मिळाली. तिच्या मते मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम नसलं तरी ग्रुपीजम असल्यामुळे चित्रपट तसंच मालिकांमध्ये काम करण्यासाठी बाहेरच्यांना कायम संघर्ष करावा लागतो. कायम आनंदी राहणाऱ्या संस्कृतीला जे काम मिळतं ते उत्तम पद्धतीने करण्याचा ती प्रयत्न करते. संस्कृतीने ‘गृहशोभिका’साठी खास मुलाखत दिली, ती खूपच रोचक होती, सादर आहेत खास अंश :

या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

मी इंडस्ट्रित येण्याबाबत काही ठरवलं नव्हतं, मला कोरिओग्राफर बनायचं होतं. त्यावेळी मला नृत्याची खूप आवड होती आणि जर कोरिओग्राफर बनायची संधी मिळाली असती तर छान झालं असतं. मी ११वी आणि १२ वी होइपर्यंत अनेक मराठी शोज परदेशात केले होते. याव्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीत मोठमोठे सेलिब्रिटिज असायचे, मी त्यांना असिस्ट करायचे आणि अनेकांना मी नृत्यदेखील शिकवलं होतं. त्यांच्या मागे सपोर्टींग डान्सर म्हणूनदेखील नृत्य केलंय. एके दिवशी एका ऑर्गनायजरने माझं नाव प्रोड्युसरला दिलं. तेव्हा मी फक्त १७ वर्षाची होती. जेव्हा मी प्रोड्युसरकडे गेली, तेव्हा त्यांना माझ्यासारखीच मुलगी मालिकेत हवी होती. अशाप्रकारे माझी निवड झाली. थोडं फिल्मी होतं, परंतु त्यांना लीड रोलसाठी माझ्या वयाच्या लावणी नृत्यागना असणं गरजेचं होतं आणि मी त्यात फिट बसत होती. या ‘पिंजरा’ मालिकेत प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर सर्व प्रोसेस सुरु झाली आणि मी अभिनयाच्या प्रेमात पडली.

पहिल्यांदा कॅमेराला सामोरं जातानाचा अनुभव कसा होता?

मी कधीच कॅमेरा फ्रेंडली नव्हती, पहिल्या ऑडिशनमध्येदेखील नर्व्हस होती आणि अभिनय करतानादेखील खूप भीती वाटत होती. पहिल्या शॉटच्या वेळी सर्वजण मलाच पहात होते. घाबरल्यामुळे एक दृश्य तीन ते चार वेळा करावं लागलं. माझी टीम मात्र खूपच छान असल्यामुळे त्यांनी मला कधीच नवीन असल्याचं जाणवू दिलं नाही आणि त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. माझ्यासाठी हे एक अॅक्टिंग स्कुल होतं, जिथे मला अॅक्टिंगचं ट्रेनिंग मिळालं. सुरुवातीचे काही महिने मला कॅमेरा फ्रेंडली व्हायला लागले होते.

कुटुंबात कोणाचा अधिक पाठिंबा होता?

कुटुंबात आईचा अधिक पाठिंबा होता, कारण काही गोष्टी बाबांशी बोलता येत नव्हत्या. त्या आईकडून पोहोचवल्या जायच्या. ‘पिंजरा’ मालिका संपल्यानंतर माझ्या घरी एक चर्चा झाली, ज्यात माझ्या बाबांनी सांगितलं की जर इंडस्ट्रित जायचं असेल तर कथेच्या मागणीनुसार काम करावं लागेल, नकार देता येणार नाही, अशावेळी आईने बाबांना समजावलं. माझी आई कायम माझ्यासोबत शूटिंगला येते. आईला लहानपणापासून सिनेमा आणि अभिनयाची आवड होती. ती सोशल वर्कर आहे आणि जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा ती माझ्यासोबत येते.

तुला कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागला? कोणत्या गोष्टीमुळे आयुष्य बदललं?

इंडस्ट्रित आल्यानंतर संघर्ष करावा लागला, कारण पहिल्या मालिकेपासून लोकं मला ओळखू लागली. यासाठी मला संघर्ष करावा लागला. अभिनयाला मी वयाच्या १८ व्या वर्षी सुरवात केली होती, हे सगळं सांभाळायला मी शिकली. त्यावेळी मी कॉलेजात जायचे आणि टीचर्स मला पॅम्पर करायच्या. मला आता चित्रपटांसाठी संघर्ष करावा लागला. याव्यतिरिक्त मालिका न चालल्यास चॅनेल आणि निर्माते दोघेही काढू शकतात ही भीती मला ३ ते ४ महिने वाटत होती, कारण मला अभिनय येत नव्हता, परंतु निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला सांभाळून घेतलं आणि डेली सोप करत करत अभिनयात आली.

माझी पाहिली मालिका ‘पिंजरा’नंतर माझी लाईफस्टाईल बदलली होती. मला सेलिब्रिटि बनायचं होतं, ती इच्छा पूर्ण झाली होती.

हिंदीत काम करायचं आहे का?

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करायचं आहे, कारण आज वेब सिरीजमध्ये अनेक नवीन कथा आणि नवीन कलाकार काम करत आहेत, त्यांची अभिनय क्षमतादेखील छान आहे. काही ऑफर येत आहेत आणि मी त्यावर विचार करतेय.

वेब सिरीजमधील इंटिमेट सीन करण्याबाबत काय वाटतं?

मी ऑफ कॅमेरा खूपच लाजाळू आहे, परंतु ऑन कॅमेरा नाही. सिरीजमध्ये जर त्या दृष्याची गरज असेल, तर प्रेक्षकदेखील त्याचा स्वीकार करतील, परंतु विनाकारण असे इंटीमेट सीन करायला नाही आवडणार. आज प्रेक्षकांना बॉलीवूड चित्रपटांबद्दल माहिती आहे. जर ते चित्रपट ते पाहू शकतात, तर इथले चित्रपटदेखील ते सहजपणे स्वीकारू शकतात. मात्र गरज नसताना इंटीमेट सीन असतील तर प्रेक्षकदेखील त्या कथेबद्दल न विचार करता फक्त सेक्स सिन्सची चर्चा करतात. मी नुकताच एक मराठी चित्रपट केलाय त्यात किसिंग सीन दिलाय, कारण त्यात गरज होती.

नृत्याचं प्रशिक्षण केव्हापासून घ्यायला सुरुवात केली?

मी वयाच्या ६व्या वर्षापासून नृत्य शिकतेय. लहानपणी खूप लठ्ठ असल्यामुळे, बारीक होण्यासाठी आईने डान्स क्लास लावला. भरतनाट्यम पूर्ण केल्यानंतर मला नृत्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर वेस्टर्न डान्स शिकले, स्पर्धेत भाग घेतला, मग परदेशात शो करू लागले. अजूनही नृत्य माझी पाहिली आवड आहे, परंतु अभिनयदेखील आवडतो. वर्कआऊटमध्ये डान्स करते, यामुळे माझा नृत्याचा रियाझदेखील होतो.

घराची सजावट करायला किती आवडतं?

मला होम डेकोरची फार आवड नाहीए, परंतु स्वच्छ, सुंदर, सुसज्जीत घर आवडतं. मला भिंतीवर कुल कलर ज्यामध्ये हलकिशी निळया रंगाची शेड आवडते.

काय मेसेज द्यायला आवडेल?

सोशल मीडियाचा प्रयोग तरुणाईने व्यवस्थित करावा, कारण हे चांगलं असण्याबरोबरचं चुकीचा संदेशदेखील देतं. मुलींनी त्यांच्या रंगरूपाबाबत दु:खी होता कामा नये, उलट स्वत:वर प्रेम करायला शिकावं. करीअरवर फोकस करावा.

आवडता रंग – निळा.
आवडता पेहराव – वेस्टर्न कॅज्युअल.

आवडतं पुस्तक – अल्केमिस्ट.

वेळ असतो तेव्हा – चित्रपट पाहणं.

आवडतं परफ्यूम – बेनिटास बाय वर्साची.

पर्यटन स्थळ – निसर्गाच्या जवळ जाणं.

आयुष्यातील आदर्श – एक उत्तम व्यक्ती बनणं.

सामाजिक कार्य – हत्तीसाठी काही काम.

स्वप्न – लिजेंड अभिनेत्री मधुबालाच्या बायोपीकमध्ये काम करणं.

वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी!

* सोमा घोष

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्‍या या मालिकेत वैदेही ही  रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची  जबाबदारी संभाळतेय.  वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे.

साहिल अंध आहे, पण त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही.  वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे त्याच देवळात साहिल येत असतो.

वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी  उत्सुकतेचं असणार आहे.

साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दली आणि त्यांच्याकडून  बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. त्याचा अभ्यास त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत  पाहायला मिळेल. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी  प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.

पाहा, ‘वैदेही’ – शतजन्माचे आपुले नाते, सोम. -शनि.,  संध्या. ७:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें