सायोनारा

कथा * शकुंतला सिन्हा

देवेंद्र ऊर्फ देवचं पोस्टिंग त्यावेळी झारखंड राज्यातल्या जमशेदपूरच्या टाटा स्टील इंडस्ट्रीजमध्ये होतं. तो इंजिनीयर होता. मुळचा पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातला, पण त्याच्या वडिलांचा जमशेदपूरला बिझनेस होता. जमशेदपूरला टाटा नगरी म्हणतात. तिथल्या बिष्ठुपुर भागातच त्यांचं कापड दुकान होतं.

देवचं शिक्षण तिथंच झालेले. इंजिनीयरिंग रांचीतून केलं. कॅम्पस इंटरव्हयूमध्ये लगेच नोकरीही मिळाली. तीही टाटा स्टीलमध्येच. इतर दोन तीन ऑफर्स होत्या त्याला, पण इथल्या रेखीव वसाहती, दलमा टेकडी, स्वर्णरेखा नदी अन् ज्युबिली पार्कचंही आकर्षण होतंच. शिवाय आईवडिलही होतेच.

खरकाई नदीच्या पलीकडे आदित्यपुरला त्याच्या वडिलांची मोठी हवेली होती. पण कंपनीनं त्याला इथंच ऑफिसर्स फ्लॅट्समध्ये एक छानसा फ्लॅट दिला होता. त्याला शिफ्ट ड्यूटी असायची. बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागे. त्यामुळे त्यानं इथंच राहणं पसंद केलं होतं. त्यामुळे त्याचे आईवडिलही हवेलीचा काही भाग भाड्यानं देऊन इथंच त्याच्या फ्लॅटवर राहायला आले होते.

याच दरम्यान टाटा स्टीलच्या आधुनिकीकरणाचा प्रोजेक्ट आला. जपानच्या निप्पोन स्टीलच्या तांत्रिक सहयोगानं टाटा कंपनी आपल्या फोल्ड रोलिंग मिल आणि कंटिन्यूअस कास्टिंग शॉपच्या निर्मितीत गुंतली होती. देव सुरूवातीपासूनच या प्रोजेक्टमध्ये होता. जपानहून निप्पोन कंपनीनं काही टेक्निकल एक्सपर्र्ट्सही टाटा नगरीला पाठवले होते. ही मंडळी टाटा स्टीलच्या वर्कर्स आणि इंजिनीयर्सना टे्निंग देण्यासाठी आलेली होती. त्याच्यासोबत काही दुभाषीही होते. जे जपानीचं इंग्रजीत भाषांतर करून इथल्या लोकांना समजावून सांगत होते. त्या टीममध्येच अंजूही होती. जपानी व इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. वीस वर्षांची सुंदर तरुणी, मुख्य म्हणजे तिचे फीचर्स जपानी वाटत नव्हते. जवळजवळ सहा महिने हे सर्व तिथे राहिले. या दरम्यान अंजू व देवची चांगली ओळख झाली होती. देव तिला भारतीय पदार्थ खाऊ घालायचा. कधीतरी तीही त्याला जपानी पदार्थ करून खाऊ घालायची. इथलं काम संपवून ती सहा महिन्यांनी जपानला निघून गेली.

तिला निरोप द्यायला देव कोलकत्त्याच्या विमानतळावरही गेला होता. त्यानं तिला एक संगमरवरी ताजमहाल अन् बौद्धगयेतील बुद्ध मंदिराचा फोटो भेट म्हणून दिला. ही भेट बघून अंजूला खूप आनंद झाला. निरोप घेताना शेकहॅण्ड करत देवने म्हटलं ‘‘बाय…बाय…’’

अंजूनं हसून म्हटलं, ‘‘सायोनारा…’’ अन् ती एअरपोर्टच्या दरवाजातून आत गेली.

काही दिवसांनी नवीन काहीतरी शिकण्यासाठी टाटा स्टीलनं आपली एक टीम जपानला पाठवली. तिथल्या ओसाका फ्लॅटमध्येच हे टे्निंग होतं. या टीममध्ये देवचा समावेश होता. योगायोगाने इथंही दुभाषी म्हणून अंजूच आलेली होती. अवचित भेटल्यामुळे दोघांनाही आनंद झाला. एरवी टे्रनिंग खूपच टफ होतं. पण वीक एंडला दोघं भेटायची. एकत्र कॉफी घ्यायची.

बघता बघता मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता टे्निंग संपायला थोडेच दिवस उरले होते. देवनं म्हटलं, ‘‘जवळपास बघण्यासारखं काही असेल तर दाखव ना?’’

‘‘हो, इथून हिरोशिमा जवळच आहे. बुलेट टे्ननं दोन तासातच पोहोचता येईल.’’

‘‘मला जायचंय तिथं. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं तिथंच अणुबॉम्ब टाकला होता ना?’’

‘‘होय, सहा ऑगस्ट १९४५ त्या अभद्र दिवशीच ती घटना घडली. कोणताही जपानी, जपानीच काय पण सारं जग ती घटना विसरणार नाही. माझ्या आजोबांनी सांगितलं होतं, सुमारे ऐंशी हजार लोक एका क्षणात मृत्यूमुखी पडले होते अन् पुढल्या चारच महिन्यात ही संख्या एक कोटी एकोणपन्नास लाख एवढी झाली होती.’’

‘‘खरोखरंच फार दुर्देवी घटना होती ती. जगात पुन्हा कुठेच असं काही घडता कामा नये.’’

‘‘परवाच सहा ऑगस्ट आहे. मीही चलते तुझ्यासोबत. जपानी लोक या दिवशी शांतता स्थापित व्हावी म्हणून तिथं प्रार्थना करतात,’’ अंजूनं म्हटलं.

दोन दिवसांनी दोघंही हिरोशिमाला गेली. तिथं दोन दिवस थांबली. तिथल्या पीसपार्कमध्ये प्रार्थना केली. मग दोघंही हॉटेलात गेली. लंचमध्ये अंजूनं स्वत:साठी लेडीज ड्रिंक शोंचू ऑर्डर केलं. तिने देवला विचारलं, ‘‘तू काय घेणार?’’

‘‘आज मीदेखील शोंचू टेस्ट करून बघतो. दोघंही सोफ्यावर बसून जेवत होती. एकमेकांच्या खूपच जवळ आली होती.. अंजूनं त्याला किस केलं अन् म्हणाली, ‘‘एशिते इमासू.’’

देवला काहीच कळलं नाही. तेव्हा तिनं सांगितलं याचा अर्थ ‘‘आय लव्ह यू.’’

त्यानंतर दोघंही जणू या जगात नव्हतीच. त्यांच्यामधलं द्वैत कधी संपलं ते दोघांनाही समजलं नाही.

तिच्यापासून दूर होताना देव म्हणाला, ‘‘अंजू, तू मला जे सुख दिलंस…खरं तर मीच तुला प्रपोज करणार होतो.’’

‘‘मग आता कर ना? खरं तर मी लाजायला हवं, तर तूच लाजतो आहेस…’’

‘‘ही घे अंगठी,’’ आपल्या बोटातली अंगठी काढत देवनं म्हटलं, ‘‘सध्या यावरच भागवूयात.’’

‘‘नको, नको,’’ त्याला अडवत अंजू म्हणाली, ‘‘तू प्रपोज केलंस, मी होकार दिला…मला अंगठी नकोय…ती तुझ्या बोटातच राहू दे.’’

‘‘ठीक आहे. टे्निंग संपताच भारतात परत गेलो की आईबाबांना सगळं सांगतो. मग तूच तिथं ये. आपलं लग्न भारतीय पद्धतीनंच होईल,’’ देवनं म्हटलं.

‘‘मी त्या दिवसाची आतुरतेनं वाट बघते,’’ अंजू म्हणाली.

टे्निंग संपवून देव भारतात परत आला. इकडे त्याच्या गैरहजेरीत त्याच्या आईबाबांनी त्याचं लग्न ठरवून ठेवलं होतं. देव त्या मुलीला ओळखत होता. तिचे वडिल व देवचे वडिल पक्के मित्र होते. दोन्ही कुटुंबांचा खूप घरोबा होता. मुलीचं नाव अजिंदर होतं. ती पंजाबी होती. तिच्या वडिलांना धंद्यात खूपच नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केली होती. ते कुटुंब त्या दु:खात अन् धक्क्यात असतानाच देवच्या आईबाबांनी अजिंदरच्या आईला सांगितलं होतं की अजिंदरला आम्ही सून करून घेऊ.

देवला जेव्हा अजिंदरशी लग्न ठरवल्याचं कळंलं तेव्हा त्यानं या गोष्टीला नकार दिला. ‘‘आई, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी अजिंदरसोबत लग्न करू शकत नाही.’’ त्यानं सांगितलं.

‘‘पण तिच्यात वाईट काय आहे? अन् तू कोणती मुलगी पसंत केली आहेस?’’ बाबांनी विचारलं.

‘‘ती जपानी मुलगी अंजू…आपल्याकडे आली होती. आठवतंय का?’’

‘‘देव, त्या परदेशी पोरीशी तू लग्न करणार? आम्हाला हे अजिबात मान्य नाही. आपल्या देशात मुलींचा दुष्काळ पडलाय का? आम्ही अजिंदरच्या आई व आजीला वचन दिलंय.’’ बाबा भडकून म्हणाले.

‘‘बाबा, मी ही…’’

‘‘अजिबात काही बोलू नकोस, तुला इथे आईवडिल जिवंत बघायचे असतील तर तुला अजिंदरशी लग्न करावं लागेल.’’ बाबांनी धमकीच दिली.

काही वेळ सगळेच शांत होते. मग बाबा म्हणाले, ‘‘देव, तू जर आमचं ऐकलं नाहीस तर मीही अजिंदरच्या बापाप्रमाणे आत्महत्या करेन. त्या मृत्युसाठी तूच सर्वस्वी जबाबदार असशील.’’

‘‘छे छे, भलतंच काय बोलताय,’’ देवच्या आईनं म्हटलं.

‘‘आता सगळं तुझ्या लाडक्या पोरावर अवलंबून आहे,’’ एवढं बोलून बाबा तिथून निघून गेले.

शेवटी देवला आईबाबांचं ऐकावंच लागलं.

देवनं आपली सगळी परिस्थिती अन् असहायता अंजूला कळवल्यावर ती समजूतदारपणे म्हणाली की त्यानं अजिंदरशीच लग्न करणं योग्य ठरेल.

अंजूनं देवला जरी अगदी सहजपणे मुक्त केलं होतं तरी ती मात्र फारच अडचणीत सापडली होती. देवपासून तिला दिवस गेले होते. अजून एकच महिना झाला होता. पण तिनं देवला हे काहीच कळवलं नाही. त्याला कशाला उगीच काळजी अन् अपराधबोध.

पुढच्याच महिन्यात देवचं लग्न होतं. त्यानं अंजूला लग्नाला येण्याचं आमंत्रण दिलं. तिनंही येते म्हणून कळवलं.

अगदी मोकळ्या मनानं अंजू देवच्या लग्नात सहभागी झाली. पण तिला वरचेवर उलट्या होत होत्या. ‘‘तुला बरं नाहीए का?’’ देवनं विचारलं.

‘‘बरी आहे मी…पण विमान प्रवासाचा थोडा त्रास अन् लग्नाचं हे जड जेवण यामुळे मला बरं वाटत नाहीए.’’

लग्नानंतर तिनं देवला म्हटलं की तिला बोधगयेला जायचंय.

देव म्हणाला, ‘‘मी व अजिंदरही येतो,’’ त्यानं गाडी बुक केली व तिघंही एकत्रच बोधगयेला गेले. अंजूनं आधीच गोळ्या वगैरे घेतल्यामुळे तिला प्रवासाचा त्रास झाला नाही. रात्री तिघंही एकाच रूममध्ये राहिले. कारण अजिंदरचाच आग्रह होता, ‘‘पुन्हा केव्हा अशी संधी मिळणार. आज एकत्र राहू व पोटभर गप्पा मारू.’’

गयेतून अंजू जपानला गेली. देव व अजिंदरनं तिला विमानतळावर सोडलं. निरोप घेताना दोघांनी तिला बाय केलं. तिनंही हसून ‘सायोनारा’ म्हटलं संपर्कात राहा, असंही सांगितलं.

लग्नानंतर दहा महिन्यातच अजिंदरला मुलगा झाला. त्याच्या दोन महिने आधी अंजूला मुलगी झाली होती. तिचा चेहरा अगदी देवसारखा होता. इकडे देवचा मुलगाही हुबेहुब देवसारखाच होता. त्यानं अंजूला आपल्याला मुलगा झाल्याचं कळवलं होतं, पण अंजूनं मात्र त्याला मुलीबद्दल काहीच कळवलं नव्हतं. अजिंदर, अंजू व देवचा इंटरनेटवर संपर्क होता. ती त्याच्या मुलाला गिफ्ट पाठवायची. लग्नाच्या वाढदिवसालाही भेटवस्तू द्यायची.

देव तिला म्हणायचा, ‘‘तू लग्न कर…मला तुला काही भेटवस्तू द्यायला निमित्त हवं ना?’’

ती उत्तर टाळायची. एकदा म्हणाली, ‘‘मी माझ्या आजीकडेच वाढले कारण आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. मला लग्न करण्याची इच्छा नाहीए. पण मी एक मुलगी दत्तक घेतली आहे. एकल पालक म्हणून तिला वाढवते आहे.’’

देवनं मग फार काही विचारलं नाही. फक्त विचारलं, ‘‘मुलीचं नाव काय आहे?’’

‘‘तिचं नाव किको आहे. किकोचा अर्थ ‘आशा’ असा आहे. तिच माझ्या आयुष्याची एकमेव आशा आहे.’’

‘‘तिचे फोटो पाठव ना?’’ अजिंदरनं म्हटलं.

‘‘पाठवेन…’’ अंजू म्हणाली.

काळ पुढे पुढे जात होता. देवचा मुलगा व अंजूची मुलगी एव्हाना सात वर्षांची झाली होती. एक दिवस अंजूचा ई मेल आला. निप्पोन कंपनी एक इंजिनियर व टेकनियन्सची टीम टाटाला पाठवते आहे. त्यांच्याबरोबर इंटरप्रिटर म्हणून अंजली येते आहे.

ठरल्याप्रमाणेच अंजू आली. शिवमसाठी खूप गिफ्ट आणल्या होत्या.

‘‘किकोला का नाही आणलंस?’’

‘‘एक तर तिला व्हिसा मिळाला नाही. शिवाय शाळा बुडाली असती. माझ्या एका मैत्रीणीजवळ सोपवून आले आहे. तिची मुलगी किकोची खास मैत्रीण आहे,’’ अंजूनं म्हटलं.

अंजूच्या टीमचं काम दोन अडीच आठवड्यात आटोपलं. ती परत जाणार होती. त्याच्या आदल्या दिवशी देवकडे डिनरला आली. तिघांनी खूप गप्पा मारल्या. हसत खेळत जेवण झालं.

दुसऱ्यादिवशी अंजू टे्ननं कोलकत्त्याला जाणार होती. रेल्वेस्टेशनवर अजिंदर व देव तिला सोडायला गेली.

टे्रन सुटता सुटता अंजूनं आपल्या बॅगेतून एक मोठासा बॉक्स काढून अजिंदरला दिला.

‘‘हे काय? सध्या तर गिफ्ट घेण्यासारखा काहीच प्रसंग नाहीए?’’ तिनं म्हटलं.

‘‘घरी जाऊन बघ.’’ अंजू म्हणाली. टे्रन सुरू झाली. हात हलवून अंजूनं म्हटलं, ‘‘सायोनारा…’’

घरी जाऊन बॉक्स उघडला तेव्हा कीकोचा एक सुंदर मोठा फोटो फ्रेम केलेला मिळाला. त्या खाली लिहिलं होतं, ‘हिरोशिमाचा एक अंश.’

चकित होऊन दोघंही बघत होती. शिवम अन किको जुळी भावंडं दिसत होती. फक्त किकोचा रंग जपानी गोरा होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें