उष्ट अन्न

– करूणा साठे

मेरठला पोहोचल्यावर राकेशचं घर शोधायला सीमाला फारसा त्रास झाला नाही. कारमधून उतरून ती बंगल्याच्या गेटपाशी आली. वरकरणी ती अगदी शांत अन् संयमित वाटत असली तरी मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती.

बेल वाजल्यावर ज्या स्त्रीनं दार उघडलं, तिलाच सीमानं विचारलं, ‘‘राकेश घरी आहेत का?’’

त्या स्त्रीच्या डोळ्यात एकदम ओळखीचे भाव उमटले. ‘‘तुम्ही सीमा…सीमाचना?’’
तिनं हसून म्हटलं, ‘‘हो, पण तुम्ही कसं ओळखलंत?’’

‘‘एकदा यांनी ऑफिसमधल्या कुठल्या तरी समारंभाचे फोटो दाखवले होते, त्यात तुम्हाला बघितलं होतं, तेच लक्षात राहिलं, या ना, आत या,’’ तिनं प्रेमानं सीमाचा हात धरून तिला घरात घेतलं.

‘‘मी कोण ते तुम्ही ओळखलंच असेल? माझं नाव…’’

‘‘वंदना!’’ सीमानं तिचं वाक्य पूर्ण केलं.

‘‘मी ओळखते तुम्हाला. राकेशच्या फ्लॅटमध्ये तुमचा फॅमिली फोटो आहे, त्यात बघितलंय मी तुम्हाला.’’

चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया न दाखवता वंदनाने सहजच विचारलं, ‘‘यांच्या आजारपणाचं कसं कळलं?’’

‘‘राकेश माझे सीनिअर आहेत,  त्यांच्याशी मला फोनवर रोजच बोलावं लागतं. ऑफिसचे अपडेट्स द्यावे लागतात.’’

सीमाच्या बोलण्यात संकोच किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. ‘‘आता कशी आहे तब्येत?’’ तिनं विचारलं.

‘‘ते स्वत:च सांगतील तुम्हाला. मी पाठवते त्यांना. मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला चहा, कॉफी किंवा सरबत यापैकी काय आवडेल?’’

‘‘गरम कॉफी मिळाली तर मजा येईल.’’

‘‘तुम्ही आमच्या खास पाहुण्या आहात सीमा. आजतागायत यांच्या ऑफिसमधल्या कुठल्याच सहाकाऱ्याला मी भेटले नाहीए. तुम्हीच पहिल्या.’’ अगदी जवळच्या मैत्रीणीशी बोलावं इतक्या आपलेपणानं वंदना बोलत होती.

मग सीमा वंदनाच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार करू लागली. रंगानं गोरीपान नसली तरी नाकीडोळी आकर्षक होती. चेहऱ्यावर हसरा भाव अन् मार्दव होतं. दोन मुलांची आई होती पण हालचालीत चपळपणा होता. किंचित गोलाई असलेल्या बांध्याला निरोगीपणाचा तजेला होता.

ती फक्त दहावीपर्यंत शिकली आहे हे सीमाला ठाऊक होतं, पण तिच्या वागण्याबोलण्यात सुसंस्कृतपणा अन् आत्मविश्वास होता हे सीमाला मान्य करावंच लागेल.

थोड्या वेळानं राकेशनं ड्रॉइंगरुममध्ये प्रवेश केला. सीमाच्या अगदी जवळ येत त्यानं हसून म्हटलं, ‘‘तुला इथं बघून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. काल फोनवर तू इथं येण्याबद्दल काही बोलली नव्हतीस?’’

‘‘मी सांगितलं असतं तर तू मला इथं येऊ दिलं असतंस?’’ त्याच्या हातावर हात ठेवत सीमानं विचारलं.

‘‘नाही…बहुधा नाहीच.’’

‘‘म्हणूनच मी सांगितलं नाही अन् सरळ येऊन थडकले. आज तब्येत कशी आहे?’’

‘‘गेले दोन दिवस ताप नाहीए, पण फार थकवा वाटतोय.’’

‘‘एकूणच सर्वांगावर अशक्तपणा जाणवतोय…अजून काही दिवस विश्रांती घे,’’ सीमानं म्हटलं.

‘‘नाही, परवा, सोमवारी मी जॉईन होतो. खरंतर तुझ्यापासून फार काळ दूर राहवत नाहीए.’’

‘‘जरा हळू बोल. तुझी बायको ऐकेल,’’ सीमानं त्याला दटावलं. मग म्हणाली, ‘‘एक विचारू?’’

‘‘विचार.’’

‘‘वंदनाला आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल माहीत आहे का?’’

‘‘असेल, पण कधीच काही म्हटलं नाहीए,’’ राकेशनं खांदे उडवून खूपच बेपर्वाइनं म्हटलं.

‘‘माझ्याशी ती इतकी छान वागली की माझ्याविषयी तिच्या मनात राग किंवा तक्रार असेल असं मला वाटत नाही.’’

‘‘तू माझी परिचित अन् सहकारी आहेस, त्यामुळेच ती तुझ्याशी वाईट वागण्याचं धाडस करणार नाही. तू माझ्या घरात अगदी बिनधास्तपणे वावर. हास, बोल…वंदनाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीए,’’ प्रेमानं सीमाच्या गालावर थोपटून राकेश समोरच्या सोफ्यावर बसला.

‘‘राकेशच्या आजारपणामुळे सीमाची व त्याची भेट होत नव्हती, त्यामुळे आज त्याच्यासमोर बसून त्याच्याशी गप्पा मारताना सीमाला वंदनाची आठवणही आली नाही. वदंना रिकामा कप, प्लेटस् उचलून घेऊन गेली तरीही ती दोघं बोलतच होती.’’

सीमा राकेशच्या प्रेमात पडली त्याला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला होता. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राकेश तिला पहिल्या भेटीतच इतका आवडला की तिच्या नकळत ती त्याच्यावर प्रेम करू लागली. लोक काय म्हणतील याचा विचारही न करता काही महिन्यातच तनमनानं ती त्याला समर्पित झाली.

त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी खूप आकांडतांडव केलं.

‘‘हे बघा, मी आता तीस वर्षांची होतेय. मला लहानशी मुलगी समजून दिवसरात्र मला समजावण्याचा खटाटोप आता सोडा. दोघांनाही सांगतेय, समजलं का?’’ एकदा सीमानं चढ्या आवाजातच त्यांना ऐकवलं. ‘‘माझ्या लग्नाची काळजी करू नका. कारण योग्य वयात तुम्ही माझ्यासाठी चांगला मुलगा बघू शकला नाहीत. माझ्या भविष्याची काळजी, माझ्या सुखदु:खाची चिंता माझी मलाच करू द्या. राकेशशी माझे असलेले संबंध तुम्हाला पसंत नाहीत तर मी वेगळी राहते.’’

सीमाच्या या धमकीमुळे आईबाबा गप्प बसले. त्यांचा राग ते अबोल्यातून व्यक्त करायचे. कमावत्या आणि हट्टी पोरीला बळजबरीनं काही करायला लावणं त्यांना आधीही जमलं नव्हतं, आताही जमणार नव्हतं.

वय वाढत गेलं अन् मनाजोगता जोडीदार भेटला नाही, तेव्हा सीमानं मनातल्या मनातच अविवाहित राहण्याचा निश्चय केला होता. पण एकट्यानं आयुष्य काढणंही सोपं नसतंच. त्याचवेळी फॅमिली मेरठला ठेवून तिच्या गावी नोकरीसाठी आलेल्या एकट्या, देखण्या राकेशनं तिचं मन जिंकून घेतलं. राजीखुशीनं ती त्याला समर्पित झाली.

‘‘मी तुझ्याबरोबर तुझी प्रेयसी, मैत्रीण बनून जन्मभर राहायला तयार आहे. तरीही लग्न करून एकत्र राहण्याची मजाच काही वेगळी असते. तुला काय वाटतं राकेश?’’ सुमारे एक महिन्यापूर्वी सीमानं राकेशच्या फ्लॅटमध्ये सकाळी त्याला बेड टी देता देता विचारलं होतं.

‘‘तू तयार असशील तर आजच मी तुझ्याशी दुसरं लग्न करायला तयार आहे,’’ राकेशनं तिच्या प्रश्नाला फारसं गंभीरपणे न घेता म्हटलं.

सीमा मात्र गंभीर होती. ‘‘असं करणं म्हणजेच स्वत:लाच फसवणं आहे.’’

‘‘तुला जर असं वाटतंय तर मग लग्नाचा विषय कशाला काढतेस?’’

‘‘माझ्या मनातलं तुला नाही तर कुणाला सांगणार मी?’’

‘‘ते बरोबर आहे,’’ राकेश म्हणाला, ‘‘पण आपलं लग्न होऊ शकत नाही…तसा काही पर्यायच नाहीए.’’

‘‘तू माझ्यावर खरं खरं, मनापासून प्रेम करतोस ना?’’

‘‘हा काय प्रश्न आहे?’’ तिच्या ओठांचं चुंबन घेत तो म्हणाला.

‘‘तू नेहमीच मला सांगतोस की तुझी पत्नी वंदना नाही तर मीच तुझी हृदयस्वामिनी आहे, हे खरंय ना?’’

‘‘होय, वंदना माझ्या दोन मुलांची आई आहे. ती सरळसाधी स्त्री आहे. जे आकर्षक व्यक्तिमत्त्व मला आवडतं तशी ती नाही. खरं तर आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी मी लग्नच करायला नको होतं. पण तरीही लग्न करावं लागलं. आता केवळ कर्तव्य म्हणून मी तिच्याशी बांधलेला आहे,’’ राकेश गंभीरपणे म्हणाला.

सीमाही एव्हाना थोडी घायकुलीला आली होती. ‘‘आपल्या प्रेमासाठी, माझ्या आनंदासाठी तू वंदनाला घटस्फोट देऊ शकतोस ना?’’ तिनं आपल्या मनातली इच्छा बोलूनच दाखवली.

‘‘नाही, कधीच नाही. याबाबतीत या विषयावर तू मला कधीच प्रेशराइज करू नकोस. वंदनानं मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी. कारण ती पूर्णपणे मला, माझ्या मुलांना, माझ्या संसाराला समर्पित आहे. तिचा काहीही दोष नसताना मी तिला घटस्फोट देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं आहे,’’ राकेश इतक्या कठोरपणे बोलला की त्यानंतर सीमानं हा विषय पुन्हा काढला नाही.

त्याच दिवशी सीमानं वंदनाला भेटण्याचा निश्चय केला. त्यामागे काय हेतू आहे हे ही तिला कळलं नाही. तरीही तिला वंदनाला भेटायचं होतं, समजून घ्यायचं होतं. कदाचित मनात सुप्त इच्छा होती की वंदनाला तिचं अन् राकेशचं प्रेमप्रकरण कळलं की ती आपण होऊनच त्याच्यापासून दूर होईल.

वंदना अत्यंत सालस अन् साधी होती. तिनं ज्या आपलेपणानं सीमाचं स्वागत केलं, त्यामुळे तर सीमाला तिच्याविषयी कौतुकच दाटून आलं. चीड, संताप, हेवा असं काहीच वाटलं नाही.

उलट राकेश वंदनाशी जसं वागत होता, ते तिला खूपच विचित्र आणि असंस्कृतपणाचं वाटत होतं. फक्त ती राकेशवर प्रेम करत होती म्हणूनच ते तिनं सहन केलं होतं.

स्वत:च्या घरातही राकेश तिच्याशी इतका मोकळेपणानं वागत होता की तिलाच संकोच वाटत होता. सीमाचा हात हातात घेणं, सूचक बोलणं, तिच्या गालाला हात लावणं वगैरे बिनधास्त चालू होतं.

वंदनानं हे पाहिलं तर याचा धाक फक्त सीमाला होता. एकदा तर त्यानं सीमाला मिठीत घेऊन तिचं चक्क चुंबन घेतलं…सीमा खूप घाबरली.

‘‘हे काय करतोय राकेश? अरे, वंदनानं बघितलं तर? मलाच खूप लाजल्यासारखं होईल.’’ सीमा खरोखर रागावली होती. धास्तावली तर होतीच.

‘‘रिलॅक्स सीमा,’’ अत्यंत बेपर्वाइनं राकेशनं म्हटलं. तो हसून म्हणाला, ‘‘माझ्या हृदयात तुझ्याविषयी खरं प्रेम आहे. तू माझ्यासाठी वासनापूर्तीचं साधन नाहीस खरं सांगतो. जो आनंद वंदनाच्या संगतीत कधी मिळाला नाही तो तुझ्या संगतीत मिळतो.’’

‘‘पण इथं…घरात वंदना असताना… तिच्या घरात तू माझ्यावर प्रेम करतोस हे मलाच विचित्र वाटतंय…सहन होत नाहीए…’’

‘‘बरं बाई, आता काही गडबड करत नाही. शांत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘काय?’’

‘‘वंदनाला घाबरू नकोस. जर तिनं कधी मला संधी दिली तर मी तुझ्याचकडे येईन. तिला सोडून देईन…’’ राकेश खूपच भावनाविवश झाला होता. त्याचं ते भावनाविवश होणं तिला सुखावून गेलं तरीही मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी बोच वाटतच होती.

एकाएकी सीमाला वाटलं, याक्षणी वंदनाशी बोलायला हवं. तिचं एकूण व्यक्तिमत्त्व, तिचे प्लस अन् मायनस पॉईंट जाणून घ्यायला हवेत. तिच्यात कुठं, कसली उणीव आहे अन् कुठं तिचे गुण सीमापेक्षा जास्त ठरतात ते कळायलाच हवं. त्याशिवाय तिला राकेशपासून दूर करता येणार नाही, तोपर्यंत सीमाचं राकेशशी लग्न होणार नाही.

‘‘मला जेवायला घालूनच वंदना स्वत: जेवायला बसते. तू सुरूवात कर, ती नंतर जेवून घेईल,’’ राकेश अलिप्तपणे बोलला. त्याच्या शब्दातून पत्नीविषयीची बेपर्वाई स्पष्ट जाणवत होती. राकेशनं स्वत: खूप उत्साहानं सीमाचं ताट वाढलं.

सीमाला जाणवलं जेवण खरोखर चविष्ट आहे अन् सगळेच पदार्थ राकेशच्या आवडीचे आहेत.

वंदना समोर असतानाच राकेशनं सीमाला विचारलं, ‘‘स्वयंपाक कसा झालाय?’’

‘‘स्वयंपाक अतिशय सुरेख झालाय. प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट आहे की कौतुक करायला शब्द अपुरे पडतील,’’ सीमानं मनापासून कौतुक केलं.

‘‘वंदना उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळेच माझं वजन कमी होत नाही.’’

राकेशच्या तोंडून स्वत:चं कौतुक ऐकून वंदनाचा चेहरा आनंदानं डवरून आला हे सीमाच्या लक्षात आलं. राकेश तिच्याकडे बघतही नव्हता, ती मात्र प्रेमळ नजरेने त्याच्याकडेच बघत होती.

वंदनाचं राकेशवर प्रेम आहे. ती कधीच त्याला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार नाही. हा विचार मनात येताच सीमा एकदम बैचेन झली.

जेवण झाल्यावर राकेश ड्रॉइंगरूममधल्या दिवाणावर आडवा झाला. थोडा वेळ सीमाशी गप्पा मारल्या अन् त्याला झोप लागली. सीमा तिथून उठून स्वयंपाक घरात आली.

वंदना जेवणाची दोन ताटं वाढत होती, ‘‘तुम्ही अन् आणखी कोणी अजून जेवायचं राहिलंय का?’’ सीमाने विचारलं.

‘‘हे दुसरं ताट त्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी आहे,’’ घराकडे बोट दाखवत वंदनानं म्हटलं.

‘‘तुमची मैत्रीण इथं येईल जेवायला?’’

‘‘नाही. निशाकडे ताट पोहोचवायचं काम माझा मोठा मुलगा सोनू करेल.’’

‘‘तुमच्या दोन्ही मुलांना तर मी भेटलेच नाहीए, आहेत कुठं दोघं?’’ सीमानं विचारलं.

‘‘छोट्या भानूला थोडा ताप आलाय. तो बेडरूममध्ये झोपून आहे. सोनूला बोलावते मी. सकाळपासून तो निशाकडेच आहे.’’ वंदनानं मागचं दार उघडून सोनूला हाक मारली. काही वेळातच तो धावत आला. वंदनानं त्याची सीमाआण्टीशी ओळख करून दिली. त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग आईनं सांगितल्याप्रमाणे झाकलेलं ताट घेऊन तो हळूहळू निशाच्या घरी गेला.

‘‘गोड आहे मुलगा,’’ निशानं म्हटलं.

‘‘निशाही त्याच्यावर खूप प्रेम करते. अगदी आपल्या मुलाप्रमाणे. सोनूला दोन दोन आयांचं प्रेम मिळतंय,’’ सीमाच्या डोळ्यात बघत वंदनानं म्हटलं.

किचनला लागून असलेल्या व्हरांड्यात एक छोटसं गोल टेबल होतं. भोवती चार खुर्च्या होत्या. त्या दोघी तिथंच बसल्या. वंदनानं जेवायला सुरूवात केली.

‘‘निशाला स्वत:चं मूल नाहीए का?’’ सीमानं विचारलं.

‘‘तिनं लग्नच केलेलं नाही. तुझ्यासारखीच अविवाहित आहे ती,’’ वंदना आता एकेरीवर आली. ‘‘प्रत्येक स्त्रीच्या हृदयात आईचं प्रेम असतं. तिच्या हृदयातलं प्रेम निशा माझ्या सोनूवर उधळतेय,’’ वंदना हसत म्हणाली.

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग सीमा म्हणाली, ‘‘मी लग्न करणार नाही असं ठरवलं होतं, पण आता मी कुणाबरोबर तरी लग्न करून वैवाहिक आयुष्य जगायचं ठरवलं आहे.’’ याच संदर्भात बोलायला इथं आले आहे.

 

‘‘मी निशालाही नेहमी म्हणते की लग्न कर, पण ती ऐकत नाही. म्हणते, लग्नाशिवाय मला सोनूसारखा छान मुलगा मिळाला आहे तर विनाकारण कुणा अनोळखी माणसाशी लग्न करून मी आपलं स्वातंत्र्य का घालवून बसू? तिला अगदी खात्री आहे की माझा सोनू तिची म्हातारपणची काठी ठरेल,’’ सीमाच्या बोलण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत वंदना बोलत राहिली.

‘‘मी आणि राकेश, एकमेकांना ओळखतो, त्याला वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. ते भेटल्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. त्या आधीचं आयुष्य अगदीच नीरस, उदासवाणं, एकाकी होतं,’’ वंदनाचं बोलणं मनावर न घेता सीमानं आपल्या विषय पुढे दामटला.

‘‘आता या निशाच्या आयुष्यातही सगळा आनंद माझ्या सोनूमुळेच आहे. दर दिवशी ती सोनूला काही ना काही गिफ्ट देतच असते.’’

 

‘‘राकेशचे अन् माझे संबंध केवळ सहकारी किंवा मित्रत्त्वाचे नाहीत. आम्ही त्या पलीकडे पोहोचलो आहोत. त्यांचं माझ्यावर अन् माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे,’’ सीमानं आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

वंदना उदास हसली, ‘‘माझ्या सोनूला स्वत:च्या कह्यात करण्यासाठी निशाने त्याला सतत महागड्या हॉटेलात जेवायला नेऊन त्याची सवय बिघडवली आहे. आता त्याला घरचा, माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. सतत बाहेरचं चमचमीत खायला हवं असतं त्याला.’’

‘‘तू पुन्हा पुन्हा सोनूबद्दल बोलते आहेस. तू माझ्याशी राकेशबद्दल का बोलत नाहीस?’’ सीमानं आता चिडूनच विचारलं.

खूपच आपलेपणानं, डाव्या हातानं सीमाच्या खांद्यावर थोपटत वंदनानं त्याच लयीत बोलणं सुरू ठेवलं, ‘‘निशाला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. सोनू जर तिचा स्वत:चा मुलगा असता तर तिला असं स्वयंपाक न करता जगता आलं असतं? मुलाची किंवा पाल्याची संपूर्ण जबाबदारी घेणं सोपं नसतं. आपल्या पोटच्या मुलाला स्वत: कष्ट घेऊन, स्वत:च्या हातानं करून घालण्यात कसला आलाय त्रास? ते काही ओझं वाटावं असं काम आहे का?’’

‘‘छे छे, आईला आपल्या मुलासाठी काही करणं म्हणजे ओझं वाटत नाही,’’ सीमानं म्हटलं.

‘‘ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काहीही करायला त्रास वाटत नाही, ओझं वाटत नाही. ही निशा तर सोनूला कायदेशीरपणे दत्तक घेण्यासाठी माझ्यावर सतत दबाव आणते आहे.’’

‘‘या बाबतीत तुझं स्वतचं काय मत आहे, वंदना.’’

वंदना तशीच उदास हसली, ‘‘खऱ्या अर्थानं प्रसववेदना सोसल्याशिवाय कुणी स्त्री आई झाली आहे का? आई होऊ शकते का? घर संसाराचा रामरगाडा ओढायला लागणारी उर्जा, शक्ती फक्त आईकडे असते. मुलाला वळण लावणं, गरजेला धाक दाखवणं, एरवी आधार देणं, मदत करणं, निरपेक्ष प्रेम करणं हे आईशिवाय कुणीच करू शकत नाही. मावशी, काकी, मामी, आत्या किंवा मोलानं ठेवलेली बाई आईची जागा घेऊच शकत नाही.’’

‘‘बरोबर बोलते आहेत तू. मीही आता आपला संसार मांडायचा…’’

वंदनानं तिला हातानं गप्प राहण्याची खूण केली. ‘‘निशानं सोनूवर कितीही प्रेम केलं तरी शेवटी तो माझाच मुलगा असेल. समाजात लोक त्याला माझा मुलगा म्हणूनच ओळखतात. निशानं दिलेल्या महागड्या भेटवल्तू, त्याच्यासाठी करत असलेला भरमसाट खर्च, सोनू सध्या तिच्याकडे घालवत असलेला वेळ हे सगळं मान्य केलं तरी तो माझा मुलगा आहे. हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही…तुला एक विचारू का?’’

‘‘विचार…’’ सीमा एकदम गंभीर झाली. त्यासाठीच तो विषय तिनं लावून धरला आहे.

‘‘माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा सोनू…समजा अगदी नाइलाजानं, काळजावर दगड ठेवून मी निशाला माझा मुलगा दत्तक दिलाही, तरी ती त्याची आई होऊ शकेल का? सोनूला जन्माला घातल्याचा जो आनंद मी उपभोगला, तो तिला मिळेल का? त्याच्याबरोबर घालवलेल्या गेल्या आठ वर्षांतले अनेक सुखदु:खाचे प्रसंग जे मी जगले, ते तिला जगता येतील का? त्याच्या ज्या काही खस्ता मी खाल्ल्या त्या तिला खाव्या लागल्याच नाहीत…हे सगळे अनुभव ती कुठून मिळवणार? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रडवून, दु:खी करून ती हसू शकेल का? आनंदात राहू शकेल?’’ वंदनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

वंदनानं तिच्या हातावर हात ठेवला. तिचा कंठ दाटून आला होता, ‘‘सीमा, तुला धाकटी बहीण मानून माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात माझा संसार, माझा नवरा अन् माझी मुलं यांच्या खेरीज दुसरं काहीही नाही. माझं सगळं जीवन या तिन्हीभोवती विणलेलं आहे. राकेशना सोडण्याची कल्पनाही मला असह्य होते.’’

‘‘राकेश तुझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी फार दु:खद आहे. त्यांचे सगळे दोष पोटात घालून मी त्यांच्यासाठी सतत खपत असते. आनंदानं त्यांची सेवा करते. त्यांचं त्यांच्या दोन्ही मुलांवर जिवापाड प्रेम आहे. मुलांमुळे का होईना ते या घराशी, पर्यायाने माझ्याशीही कायम बांधील राहतील. एरवी त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक आहे ही भावना मला असुरक्षितपणाची जाणीव करून देते, पण ते आमची बांधीलकी तोडणार नाहीत या भावनेनं खूपच सुरक्षित वाटतं.’’

वंदनाच्या चेहऱ्यावर तेच खिन्न हास्य होतं,  ‘‘माझ्या हृदयात डोकावण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुला माझ्याविषयी सहानुभूतीच वाटेल, कारण प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम न मिळण्याची खंत मला नेहमीच वाटत राहिलीय, ती वेदना फक्त ज्याला प्रेम करूनही प्रेम मिळालं नाही तीच व्यक्ती समजू शकते.’’

राकेश अन् सोनू दोघांच्या वयात खूप अंतर आहे पण तरीही, त्यांच्यात एक साम्य आहे. माझा नवरा तुझ्याशी अन् सोनू निशाशी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी संबंध ठेवून आहेत. त्या संबंधासाठी घर सोडण्याचं धारिष्ट्य दोघांमध्येही नाही. आईसारख्या खस्ता निशा मावशी काढू शकत नाही हे या वयातही सोनूला कळतं अन् बायको इतकं झिजणं तुला जमणार नाही हे राकेश जाणून आहेत.

सोनू अन् राकेशच्या आनंदासाठी मी त्यांचे निशाशी अन् तुझ्याशी असलेले संबंध कुठल्याही तक्रारीविना स्वीकारले आहेत.

पण माझे त्यांच्याशी असलेले संबंध फक्त माझ्या मृत्यूनंतरच संपतील. मी तर ते दोघं जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारलंय, कोणतीही तक्रार न करता, मी त्यांच्यासोबत आनंदानं राहतेय, पण मला एक कळलेलं नाहीए की निशा काय किंवा तू काय, तुम्हाला यांच्याशी भावनिक बांधिलकी बाळगायची गरजच का आहे? तिला मुलगा हवाय किंवा तुला नवरा, आयुष्याचा जोडीदार हवाय तर तुम्ही दोघी अगदी नवी सुरूवात का करत नाही? कितीही चविष्ट अन्न असलं, तरी दुसऱ्याचं उष्ट खायची तुम्हाला काय गरज आहे? उष्ट अन्न…मी काय म्हणतेय कळतंय का? ’’

बोलता बोलता वंदनाला अश्रू अनावर झाले. काही क्षण सीमा तशीच उभी होती. मग झटकन पुढे होऊन तिनं वंदनाचे अश्रू पुसले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिनं मनापासून म्हटलं, ‘‘थँक यू.’’

पुढे एक अक्षरही न बोलता ती झटकन ड्रॉइंगरूममध्ये निघून आली.

अजूनही राकेश तिथं दिवाणावर झोपला होता. सीमानं टेबलवरची आपली पर्स उचलली अन् राकेशकडे वळूनही न बघता त्याच्या घराबाहेर पडली.

राकेशशी असलेले आपले अनैतिक प्रेमसंबंध कायमचे संपवायचे हाच एक विचार तिच्या मनात प्रबळ.

सत्य समजल्यावर

कथा • शालिनी गुप्ते

देह मनाची सारी मरगळ दूर करणाऱ्या पहिल्या पावसासारखंच पहिलं प्रेमही असतं. त्या सरीत भिजणाऱ्यालाच त्याचं सुख कळतं.

रवीवर मी प्रेम केलं ते मनापासून, ते माझं पहिलं प्रेम होतं. त्यामुळेच माझ्या प्रेमावरचा विश्वास अधिक दृढ होता. मी घरी सांगून टाकलं, ‘‘लग्न करेन तर फक्त रवीशी. नाहीतर लग्नच करणार नाही.’’

‘‘त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही. पण त्यानं एकदा घरी येऊन सर्वांना भेटायला तर हवं ना? त्यालासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे हे त्याच्या तोंडून कळायला हवं,’’ दादा म्हणाला. त्याच्या बोलण्यातला खोचकपणा अन् रवीविषयीची नाराजी मला खटकली.

‘‘हो, हो. मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. त्याला हीरो व्हायचंय. तेवढ्यासाठीच तो दिवसरात्र स्टुडियोच्या चक्करा मारतोय. बस्स, एक ब्रेक मिळू देत, त्याचं इतकं नाव होईल की लोक डोळे विस्फारून बघत राहतील. तेवढयासाठीच तो मुंबईला गेलाय.’’

‘‘त्याला ब्रेक मिळणार कधी अन् तो हीरो होणार कधी?’’ दादानं हसत हसत टोमणा दिला अन् तो बाहेर निघून गेला.

‘‘आई, बघ ना, दादा रवीबद्दल कसं बोलतोय ते? पण बघाल तुम्ही एक दिवस तो खूप मोठा कलाकार म्हणून नाव काढेल,’’ बोलता बोलता मला रडू फुटलं.

‘‘रडू नकोस बाळा. तो हिरो बनेलही पण आत्ता या क्षणी तो काय करतोय?’’ बाबांनी चहा घेताना विचारलं.

या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. कारण तो मुंबईत नक्की कुठं आहे अन् काय करतोय हे मला तरी कुठं त्यानं सांगितलं होतं?

‘‘तुझ्या हिरोबद्दल तुलाच ठाऊक नाही अन् तू त्याच्याशी लग्न करायला निघाली आहेस? अगं, आम्ही जो मुलगा तुझ्यासाठी निवडला आहे तो एकदा बघ. रूप, गुण, संस्कार, स्वत:चा व्यापार, उत्तम कौटुंबिक पार्श्वभूमी सगळंच तुला अन् आम्हाला साजेसं आहे.’’

आईबाबांनी परोपरीनं समजावलं अन् मी समीरशी लग्न करून संसाराला लागले. त्या आधी मी एकदा मुंबईला जाऊन रवीचा शोध घेण्याचाही विचार केला होता. पण मुंबईत मी त्याला कुठं अन् कशी शोधणार होते? फार असह्य वाटलं मला. मनात रवी होता. शरीर फक्त समीरच्या मालकीचं होतं.

समीरशी लग्न झालं. त्यांच्या घरात, कुटुंबात अन् समीरच्या आयुष्यात मला मानाचं स्थान होतं. घराची स्वामिनी म्हणून पत्नी म्हणून जे जे माझ्या हक्काचं होतं, ते सगळं सगळं मला समीरनं दिलं. पती म्हणून तो कुठं कमी पडला नाही. पण मी मात्र मनात रवी असल्यानं समीरला न्याय देऊ शकले नाही.

हनीमूनसाठी आम्ही मसूरीला गेलो होतो. मालरोडवर भटकत असताना अवचित पाऊस पडायला लागला. समीरला पावसात भिजायला फार आवडतं हे मला तेव्हा कळलं. तो पावसात भिजत होता. मी मात्र आडोसा बघून स्वत:ला पावसापासून वाचवत होते.

‘‘नेहा, येना, बघ पावसात भिजायला किती मजा येतेय…’’ समीर म्हणाला.

‘‘नको गं बाई, उगीच गारवा बाधायचा. तूच ये इथं.’’ मी म्हणाले.

‘‘डार्लिंग, गारठ्याचं काय घेऊन बसलीस? अगं तुला मिठीत घेऊन इतकी ऊब देईन की तू अक्षरश: वितळशील…ये…ये…पटकन्,’’ समीरनं मला ओढून पावसात उभं केलं. त्याचं बोलणं ऐकून जवळपास उभी असलेली टूरिस्ट मंडळी हसायला लागली. मी लाजून चूर झाले.

आम्ही पावसात मनसोक्त भिजलो. मला तर थंडी बाधली नाही पण समीरला मात्र त्रास झाला. तो गोळ्या घेऊन, स्वेटर घालून पांघरूणात गुडूप झोपला. मी मात्र रवीच्या आठवणीनं तळमळत होते. सतत मनात येत होतं, जर आज समीरच्या जागी नवरा म्हणून रवी असता तर या हनीमूनची मजाच वेगळी असती.

मला एक जुना प्रसंग आठवला. मी व रवी मोटरसायकलनं येत होतो. एकाएकी जोरात पाऊस पडायला लागला. रवीनं गाडी बाजूला उभी केली अन् मला ओढत तो मोकळ्या मैदानात घेऊन गेला. दोन्ही हात पसरून तो पावसाचा आनंद उपभोगत होता. मलाही त्यानं तसंच करायला लावलं. प्रथम मी संकोचन मग मुक्त मनानं हात पसरून पावसाचं स्वागत करत मनसोक्त भिजले. पाऊस कमी झाला तेव्हा प्रथम आम्ही जवळच्या चहाच्या टपरीवर जाऊन गरमागरम चहा घेतला. कपडे पिळून वाळवले अन् मग घरी गेलो. पावसात भिजण्याचा आनंद त्यानंतर मी रवीसोबत खूपदा घेतला. चिंब ओल्या देहावर त्याच्या हाताचा स्पर्श मला किती रोमांचित करायचा…

रवीची आठवण सतत मनात असल्यामुळे मी समीरशी कधी मोकळेपणानं वागू शकले नाही.

आमच्या दोघांमध्ये सतत रवी आहे असं मला वाटायचं. तो त्याचा हक्क मागतोय असा मला भास व्हायचा. शरीर समीरचं झालं होतं, मन मात्र रवीजवळच होतं.

सासरच्या घरी पैसा, सत्ता, सन्मान अन् स्वातंत्र्य असूनही मी अजून अस्वस्थ होते. बेचैन होते. काही तरी खटकतंय हे समीरच्या लक्षात आलं. तो म्हणाला, ‘‘तू अशी उदास का असतेस? माझ्या व्यवसायामुळे मी तुला खूप वेळ देऊ शकत नाही, पण तू एकटी का राहतेस? घराबाहेर पड, मित्र मैत्रिणी मिळव. ग्रुप तयार कर. तुलाच उत्साह वाटेल. नवं काही बघायला, शिकायला मिळेल.’’

ती कल्पना मला आवडली. मी आमच्या सोसायटीच्या भिशी ग्रुपची मेंबर झाले. एक दोन अजून ग्रूप जॉइन केले.

नव्या वातावरणात, नव्या ओळखीमुळे मी खरंच बदलले. मनातली निराशा कमी होऊ लागली. हा बदल मला मानवला. एव्हाना आमच्या लग्नाला सहा वर्षं झाली होती. माझा मुलगा बंटी चार वर्षांचा होता. आयुष्य एखाद्या शांत नदीप्रमाणे वाहत होतं.

पण ही शांतता फार काळ टिकली नाही. रवी पुन्हा माझ्या आयुष्यात आला.

समीर अन् मी सिनेमाला जाणार होतो. पण अचानक समीरला काही काम आलं अन् मी एकटीच सिनेमाला गेले.

तिकिटं काढलेली होती. मी गाडीतून टॉकीजपाशी उतरले अन् समोरच रवी दिसला.

दोघंही स्तब्ध होऊन एकमेकांकडे किती तरी वेळ बघत होतो.

‘‘मी स्वप्न बघतेय का?’’ मी मलाच चिमटा घेत प्रश्न केला.

‘‘स्वप्नंच असावं,’’ रवीचा कंठ दाटून आल्यासारखं वाटलं मला.

आम्ही दोघं गर्दीपासून जरा लांब जाऊन उभे राहिलो. ‘‘होतास कुठं? फोन नाही, पत्र नाही. मी वेड्यासारखी वाट बघत होते,’’ मला रडूच यायला लागलं.

रवीही दाटल्या कंठानं म्हणाला, ‘‘नेहा, एक क्षण तुझ्या आठवणींवाचून गेला नाही. माझं शरीर फक्त माझ्याजवळ होतं. मन तर तुझ्याचपाशी होतं.’’

काही क्षणांतच आम्ही स्वत:ला सावरलं. रवी म्हणाला, ‘‘चल आत जाऊयात, आजच्या सिनेमात माझा व्हिलनचा रोल आहे. पण खूप जबरदस्त रोल आहे.’’

आम्ही आत जाऊन बसलो. रवीचा रोल खूपच छान होता. त्याची मेहनत त्याच्या कामात दिसत होती. मला सिनेमा आवडला. सिनेमा संपला अन् लोकांनी रवीला ओळखलं. गराडा घातला. अभिनंदनाचा त्याच्यावर वर्षाव होत होता. मी सरळ घरी निघून आले.

आता मला फक्त रवी अन् रवीच हवा होता. त्याच्या एक दोन पिक्चरची शूटिंग सुरू होती. मी तिथंही त्याच्याबरोबर जाऊन आले. त्याचा रिकामा वेळ माझ्याबरोबरच तो घालवत होता.

माझी इच्छा होती त्यानं एकदा तरी समीरला भेटावं. पण त्याची अजिबात इच्छा नव्हती, ‘‘माझ्या शत्रूचं नाव माझ्यासमोर काढू नकोस. माझी जखम पुन्हा भळभळा वाहू लागते. तुझ्याशी लग्न नाही करू शकलो हा माझा पराजय वाटतो मला. पण एक दिवस मी या पराभवाला माझ्या विजयात बदलेन…’’

त्याच्या या शब्दांनी मला खूप बरं वाटायचं. रवीला मिठी मारावी असं वाटायचं. पण मनांवर ताबा ठेवून वागत होते.

अनेकदा मनात यायचं त्याला विचारावं की मधल्या काळात होतास कुठे? माझं लग्न झालं त्या आधी भेटला का नाहीस? पण मी नाही विचारलं. त्याला दु:खी करावं असं मला वाटत नव्हतं.

एका सायंकाळी पाच वाजता मला रवीचा फोन आला.

‘‘काय करते आहेस?’’

‘‘विशेष काहीच नाही.’’

‘‘ताबडतोब ये. अमुक अमुक हॉटेलात मी वाट बघतोय,’’ त्यानं एका पंचतारांकित हॉटेलचं नाव घेतलं.

‘‘का? अचानक काय झालंय?’’

‘‘प्रश्न विचारू नकोस. एक सरप्राइज आहे,’’ रवीच्या मी इतकी आहारी गेले होते की क्षणाचाही विचार न करता मी जायचं ठरवलं. समीर तेव्हा बिझनेस टूरवर होता. मी बंटीची तयारी करून त्याला मैत्रीणीकडे सोडला. बऱ्याचदा तो तिच्याकडे रहायचा, कारण मैत्रिणीचा मुलगा त्याच्याच शाळेत होता. स्वत:चं आवरून मी त्या हॉटेलात पोहोचले.

रवी माझी वाटत बघत होता. ‘‘आजच मला एक फार चांगला रोल मिळाला आहे. हा सिनेमा चांगला चालला तर मी रातोरात स्टार बनेन बघ,’’ त्यानं मला जवळ ओढून घेत म्हटलं.

‘‘नको रवी, हे बरोबर नाही,’’ मी स्वत:ला त्याच्यापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘प्रेमात सगळं बरोबर असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेमात समर्पण गरजेचं असतं. तुझं माझं प्रेम तर किती जुनं आहे. खरं प्रेम आहे आपलं. कधीपासून आपण एकमेकांसाठी तळमळतो आहोत.’’

त्यानं मला एक सुंदर कागदी पिशवी दिली. मी ती उघडून बघितली. आत एक सुंदर गुलाबी रंगाची नाइटी होती.

खोलीतल्या बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्यानं मला कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये पाठवलं.

नाइटीला येणारा गुलाबाच्या अत्तराचा सुगंध, अंथरूणावरच्या गुलाबपाकळ्यांचा गंध, खोलीतला स्वर्गीय निळसर प्रकाश अन् मंद धुंदावणारं संगीत…मी जणू स्वत:चं भान विसरले.

अन् मग तेच घडलं…जे फार पूर्वी घडलं असतं.

शरीर तृप्त होतं. मन तृप्त होतं. प्रथमच मी इतकं सुख, अशी तृप्ती अनुभवत होते. समीरबरोबर मी अशी खुललेच नव्हते.

‘‘रवी, खरंच मी खूप तृप्त आहे.’’ मी त्याला बिलगत म्हणाले.

‘‘अजून काय झालंय? तुला मी इतकं सुख देणार आहे जे आजपर्यंत कुणा स्त्रीला मिळालं नसेल,’’ माझं चुंबन घेत रवी म्हणाला, ‘‘मला समीरचा हेवा वाटतो. माझी दौलत त्याच्या वाटयाला आली.’’

‘‘आत्ता त्याचं नाव नको ना घेऊस…’’ मला त्या क्षणी फक्त रवी हवा होता.

सगळी रात्र मी रवीबरोबरच होते. सकाळी लवकर उठले. पटकन् आवरून रवीला बाय करून हॉटलातून निघाले. येताना बंटीला बरोबर घेतलं. तो शाळेसाठी तयारच होता. त्याला अन् मैत्रिणीच्या मुलाला शाळेत सोडून मी माझ्या घरी पोहोचले.

रवीबरोबर त्या रात्री शरीरसुखाचा अनुभव घेतल्यापासून माझ्या चित्तवृत्ती उल्हसित असायच्या एकूणच मी खूप आनंदात होते.

एकदा मी कुठलं तरी गाणं गुणगुणत होते. समीर म्हणाला, ‘‘इतकं आनंदात तुला कधीच बघितलं नव्हतं.’’

मी मनोमन दचकले. सावरून घेत हसत म्हटलं, ‘‘हल्ली चांगला ग्रुप मिळाला आहे. छान काम करतोय आम्ही…त्यामुळेच…’’

‘‘तू अशी आनंदात असलीस ना की मला ही खूप छान वाटतं,’’ समीर अगदी मनापासून म्हणाला अन् त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं.

त्याक्षणी मला रवीचीच आठवण झाली. केवळ रवीमुळे माझ्या जीवनात आनंद निर्माण झाला होता. आज दुसऱ्यांदा रवीनं मला त्याच हॉटेलात बोलावलं होतं. त्याच्या प्रेमाच्या ओढीनं मी ही जायला तयार होते.

प्रश्न बंटीचा होता. तो शाळेतून अजून आला नव्हता. मला काळजीत बघून त्याच दिवशी माझ्याकडे रहायला आलेल्या सासूबाईंनी म्हटलं, ‘‘अगं, मी आहे ना इथं. मी सांभाळीन त्याला. तू तुझा कार्यक्रम रहित करू नकोस.’’

त्यांचे मनापासून आभार मानत मी पटकन् आवरून बाहेर पडले. रिक्षा करून सरळ हॉटेलला पोहोचले. भराभर चालत, लॉबी ओलांडून रवीच्या खोलीशी आले.

खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. दार ढकलून आत जाणार तेवढ्यात रवीच्या तोंडून माझं नाव ऐकलं. आत अजून कुणीतरी होतं. रवी अन् त्याचं बोलणं चालू होतं. मी पटकन् दाराआड झाले. हळूच बघितलं. रवी कुणासोबत बसून दारू पित होता. खोलीत सिगारेटचा धूर कोंदला होता.

‘‘तुझी ती कबुतरी येणार तरी केव्हा रे? मला तर फारच तहान लागलीय तिची,’’ दारू ढोसत तो माणूस म्हणाला. त्यानं रिकामा केलेला ग्लास पुन्हा दारूनं भरत अत्यंत नम्रपणे रवी म्हणाला, ‘‘सर, अगदी कुठल्याही क्षणी येईल ती.’’

‘‘अरे, पण ती तुझी गर्लफ्रेंड आहे. माझ्याबरोबर ती…’’

‘‘सर, त्याची काळजी करू नका. ती माझ्या प्रेमात इतकी खुळावली आहे की माझ्या म्हणण्यासाठी काय वाट्टेल ते करेल,’’ रवी हसत हसत म्हणाला.

‘‘सर, आज तुम्ही माझा अभिनय बघाल. आज तिला मी अशी खुलवीन की माझ्याबरोबर तुम्हालाही ती पूर्ण सुख देईल. भयंकर हॉट आहे साली,’’ सिगरेट ओढत रवी बोलला.

‘‘बरं तर मी निघतो. तू मला फोन कर. मी माझ्या खोलीत वाट बघतो.’’ तो माणूस बोलला.

‘‘सर, माझा हिरोचा रोल तर पक्का आहे ना?’’ दीनपणे रवीनं विचारलं.

‘‘पक्का म्हणजे पूर्णपणे पक्का…ती पोरगी गेली की तुझं कॉन्ट्रॅक्ट साइन करायचं.’’

हे सगळं ऐकलं अन् पृथ्वी आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं मला. संताप असा आला होता की आत जाऊन दोघांची थोबाडं फोडावीत. पण ते बरोबर नव्हतं. मी उलट्या पावली माघारी वळले. घाईघाईनं बाहेर पडून रिक्षा केली.

मनात संताप मावत नव्हता. रवीचं ते किळसवाणं रूप बघून माझ्या अंगावर शहारे आले. रिक्षात असताना रवीचा फोन पुन्हा येत होता. मी फोन बंद करून टाकला. घरी कधी पोहोचते असं झालं होतं.

घरी पोहोचले तर समीर अन् बंटी बागेत फुटबॉल खेळत होते.

‘‘तू कधी आलास?’’ मी समीरला विचारलं.

‘‘मुद्दाम घरी लवकर आलो. बंटीशी खेळायचं होतं अन् आजची संध्याकाळ खास तुझ्यासाठी. सिनेमा बघायचाय अन् जेवण बाहेरच करू.’’

समीरशी डोळे भिडवून बोलायची मला भीती वाटली. स्वच्छ निर्मळ चरित्र्याचा प्रेमळ नवरा माझा अन् मी अशी…त्याचा विश्वासघात करणारी…

‘‘आज? नको…नको…उद्या सकाळी बंटीची शाळा आहे…’’ मी समीरला टाळायला बघत होते.

सासूबाई पुन्हा मदतीला आल्या, ‘‘बंटीला मी बघेन गं? जा तुम्ही दोघं…’’

माझा बिघडलेला मूड समीरच्या सान्निध्यात पूर्वपदावर आला. सिनेमा बघून जेवण आटोपून आम्ही बाहेर आलो तेवढ्यात पावसाला सुरूवात झाली. गाडीचं दार उघडून आत बसणाऱ्या समीरला मी ओढून बाहेर काढलं.

‘‘चल, पावसात भिजूयात,’’ मी म्हटलं, तेव्हा त्यानं आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं.

आम्ही दोघं मनसोक्त पावसात भिजलो. आता माझं मन आणि माझा देह एकदम स्वच्छ होता. मनातला संताप आता निवळला होता. विषाद दूर झाला होता. आता फक्त प्रेमच प्रेम होतं मनात समीरविषयी.

मी अंतबार्ह्य बदलले होते. जणू पुनर्जन्म झाला होता. समीरनं मला मिठीत घेत माझ्या ओठांचं चुंबन घेतलं अन् मला जाणवलं त्याचाच अधिकार आहे माझ्या मनावरही. आता रवी माझ्या आयुष्यातून हद्दपार झाला होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें