‘‘ग्लॅमरमुळे नव्हे तर प्रतिभेच्या जोरावर काम मिळाले’’ – शीतल कुलकर्णी-रेडकर

* सोमा घोष

मला घडवताना आईची भूमिका काय होती आणि ती मला कधी समजली, याबद्दल मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने काय सांगितले…

कोविड आणि ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर मराठी इंडस्ट्रीत कलाकारांची मागणी आणि त्यांची विचारसरणीही बरीच बदलली. आता दिसण्यापेक्षा जास्त अभिनय क्षमतेवर भर दिला जातो. माझी उंची कमी आहे, पण माझ्या अभिनयाचे कौतुक सर्वच जण करतात. म्हणूनच कोणीही गॉडफादर नसतानाही मी इंडस्ट्रीत चांगले काम करू शकते, असे मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने हसत सांगितले. अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची तिची इच्छा होती आणि त्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील चंद्रकांत कुलकर्णी आणि आई चारुशीला कुलकर्णी याना तेव्हा आनंद झाला जेव्हा त्यांनी शीतलला छोटया पडद्यावर अभिनय करताना पाहिले. शीतलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोटया भूमिकांद्वारे केली. सोबतच ती लघुपटातही काम करायची. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मराठी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दुपारच्या जेवणावेळी तिने खास ‘गृहशोभिके’शी गप्पा मारल्या. चला, जाणून घेऊया, तिच्या जीवनातील काही गोष्टी ज्या तिने स्वत:हून सांगितल्या.

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

शाळेत असताना मला नृत्य आणि अभिनयाची आवड होती, मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईपर्यंत अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याबाबत विचार केला नव्हता. महाविद्यालयात आल्यानंतर आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत मी भाग घेऊ लागले. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मराठी व्यावसायिक नाटकात काम करायची संधी मिळाली. ते नाटक केल्यानंतर मला २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्या नाटकातील माझ्या अभिनयासाठी मला अनेक पुरस्कारही मिळाले. येथूनच माझ्या अभिनयातील कारकिर्दीला खऱ्या अर्थी सुरुवात झाली. त्यानंतर एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे काम मिळत गेले. मी मूळची मुंबईची आहे. लग्नानंतर आता सासरी टिटवाळयाला राहाते.

पती संदीप यांच्याशी कशी ओळख झाली?

आमची ओळख महाविद्यालयात असताना झाली. अभिनयातील कारकिर्दीस आम्ही दोघांनीही एकत्रच सुरुवात केली. तोही व्यावसायिक नाटक करतो. याशिवाय मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करतो.

तुला अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवायची आहे, असे पालकांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

माझे घरचे खूप खुश झाले. कोणाचीही काहीच तक्रार नव्हती, कारण मी लहानपणापासून गुरू राजश्री शिर्के यांच्याकडून कथ्थक शिकत होते आणि कथ्थकमधूनच अभिनयाचा प्रवास सुरू होतो.

तुला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक कसा मिळाला?

निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘मधु इथे, चंद्र तिथे’ ही मालिका येणार होती, त्यात मी काम केले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिले, मात्र कुठे एका दिवसाचे तर कुठे दोन दिवसांचेच काम असायचे. हे करत असतानाच मला चरित्र अभिनेत्रीचे काम मिळू लागले. पुढे मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ ची विजेती ठरले. हा एक विनोदी शो आहे आणि त्यानेच मला सर्वात मोठा ब्रेक मिळवून दिला.

सध्या तू काय करतेस?

सध्या मी स्टार प्रवाहच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत छोटी जाऊबाई असलेल्या अपर्णा कानेटकरची भूमिका साकारत आहे. ही कथा कानेटकर कुटुंबाची आहे, जे नेहमी एकत्र राहतात आणि आनंद असो किंवा दु:ख, कुठल्याही परिस्थितीला मिळून सामोरे जातात. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. त्यामुळे यात भूमिका साकारताना मला फार छान वाटत आहे.

वास्तविक जीवनातही तू हीच भूमिका जगतेस का?

ही भूमिका माझ्या जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी टिटवाळयाच्या माझ्या सासरच्या ११ माणसांच्या कुटुंबात राहते. म्हणूनच ही मालिका मला माझ्या अगदी जवळची वाटते.

इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागला?

चांगल्या भूमिकेसाठी माझी धडपड सतत सुरूच असते, पण मी नेहमी शांत राहाते. हे खरे आहे की, गॉडफादरशिवाय आणि कोणत्याही गटात सामील झाल्याशिवाय काम होत नाही, पण शेवटी तुमच्यातील प्रतिभेचीच कसोटी लागते. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, माझी उंची कमी आहे, माझा रंग सावळा आहे, त्यामुळेच बरे दिसण्यासाठी मी सतत धडपड करते, कारण प्रत्येक वेळी मला थोडे गोरे आणि सुंदर दिसायचे असते. प्रत्यक्षात मी फारशी ग्लॅमरस नाही. मला आजवर जे काही काम मिळाले ते ग्लॅमरमुळे मिळालेले नाही, तर माझ्यातील प्रतिभेच्या जोरावर मिळाले. याशिवाय विनोदी शो, ज्यामध्ये टायमिंग आवश्यक असते ते मी अचूक साधू शकते.

कुठल्या  मालिकेमुळे तुझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ या शोची मी विजेती आहे. सोनी मराठीवरील या शोमुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. या मालिकेमुळेच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना लोक मला ओळखू लागले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, याशिवाय हा शो करताना मी गरोदर राहिले.

आईची जबाबदारी पार पाडताना तू कामाशी कसे जुळवून घेतेस?

माझा मुलगा साकेत आता अडीच वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात राहात असल्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा खूप आधार मिळतो. माझा मुलगा माझ्यासोबत चित्रिकरणासाठी यायचा हट्ट करायचा. त्यावेळी त्याची समजूत काढली. मला काय काम करावे लागते, हे त्याला सांगितले. आजीला त्रास देउ नको, असेही प्रेमाने समजावले. कोविडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर, मी चित्रिकरणासाठी सिल्वासामध्ये दीड महिने होते. त्यावेळी माझा मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहिला, कारण तेव्हा काम मिळणे कठीण होते आणि गरजेचेही होते. त्यावेळी घरातल्या सदस्यांनी मला पाठिंबा दिला.

आईशी तुझे नाते कसे आहे?

माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. मी आईशी भांडते, पण आई ही आईच असते, हे मी स्वत: आई झाल्यावर चांगल्या प्रकारे अनुभवले. मुलांना ओरडणे, त्यांना एखादा गोष्टीसाठी नकार देण्यामागचे आईचे कारण नेहमीच खास असते, कारण तिला मुलाला चांगल्या प्रकारे घडवायचे असते. आईला माझ्याबद्दल सर्व गोष्टी माहिती असतात. माझ्या मुलासोबतही मला अशाच प्रकारेचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण करायचे आहे.

तुला खायला किती आवडते? तू किती फॅशनेबल आहेस?

मला खायला प्रचंड आवडते. कथ्थक शोच्या वेळी मी कोलकाता, लखनऊला जायचे, तिथे गेल्यावर तिथले खास पदार्थ शोधून खायचे. याचप्रकारे मला फॅशनही आवडते, पण मला जे घालायला सोयीचे वाटते तीच माझ्यासाठी फॅशन असते, ज्यामध्ये मी साडी जास्त नेसते. याशिवाय जीन्स टी-शर्ट आणि फ्रॉक घालते.

हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक अंतरंग दृश्य असतात. ती तू सहजतेने करू शकतेस का?

कथानकाची गरज असेल तर अशी दृश्य करण्यात काहीच गैर नाही, कारण अनेक अभिनेत्रींनी कथेची हीच गरज पूर्ण करून हिंदीतही खूप चांगले काम केले आहे.

मातृदिनानिमित्त काही संदेश द्यायचा आहे का?

माझ्या मते, आई हा एक स्वभाव आहे, जो मी आई झाल्यावर अनुभवला. आई एक सुंदर अनुभव, एक प्रेमळ वर्तन असते. त्याला जपायला हवे. आई कुठल्याही साच्यात चपखल बसते, तिला न सांगता सगळे समजते. निसर्गाने स्त्रीला आई बनण्याची जी क्षमता दिली आहे ती अद्भुत आहे

आवडता रंग – पांढरा आणि निळा.

आवडता पोशाख – भारतीय (साडी).

वेळ मिळेल तेव्हा – कथ्थकचा सराव, पुस्तक वाचणे आणि मित्रांशी बोलणे.

आवडता परफ्यूम – इंगेजचा व्हॅनिला बॉडी मिस्ट.

पर्यटन स्थळे – देशात हिमाचल आणि परदेशात स्वित्झर्लंड.

जीवनातील आदर्श – कोणाचीही फसवणूक न करणे. कोणालाही दु:ख न देणे, मनात अपराधीपणाची भावना नसणे.

सामाजिक कार्य – गरीब मुलींना नृत्य शिकवणे.

‘‘माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे’’ – वैष्णवी शिंदे

* सोमा घोष

२२ वर्षीय वैष्णवी शिंदे औरंगाबादची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. तिची ही आवड सोशल मीडियावर टाकून सर्वात अधिक लाईक्स मिळवणारी मुलगी बनली. हा तिचा छंद बनला आणि अभ्यासानंतर जेव्हादेखील वेळ मिळायचा तेव्हा ती नृत्य व अभिनय करायची. वैष्णवीला कधीच असं वाटलं नव्हतं की ती चित्रपटात अभिनय करू शकेल. वैष्णवी अभ्यासात खूप हुशार होती. तिने मॅथमॅटिक्समध्ये एमएस्सी केले आणि आता स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत आहे आणि तिचं स्वप्न आयएएस बनण्याचं आहे. परंतु चित्रपटांच्या चांगल्या ऑफर आल्या तर ती अभिनयदेखील करू शकते.

आयएएस बनल्यावर वैष्णवीला औरंगाबादला उत्तम रस्ते बनवायचे आहेत. जे कधीच कोणी केलं नाही. याबरोबरच क्लीन आणि ग्रीन इंडिया बनविण्याची तिची इच्छा आहे. तिचा मराठी चित्रपट ‘जिंदगानी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कन्सेप्ट वातावरण संरक्षित करण्याबाबत आहे. ज्याचा प्रभाव वास्तविक आयुष्यामध्ये देखील पूर्ण जगात पाहायला मिळत आहे.

अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

मला लहानपणापासूनच नृत्य, नाटक पाहणं आणि फोटोग्राफीची आवड होती. माझी आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे. तिला पाहूनच मी अभिनेत्री व्हायचं ठरवलं. परंतु यासाठी काय करायचं हे काही मला समजत नव्हत. मी लहान वयातच सोशल मीडियाशी जोडली गेले आणि काही नवीन गोष्ट म्हणजे नृत्य असो वा अभिनय मी सोशल मीडियावर टाकत गेले. यामुळे मला सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली. मला सर्वांचे रिएक्शन पाहण्याची आवड होती. मला यामध्ये मजादेखील यायची. आता तर हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे बंद झाला आहे. माझ्या कुटुंबातील मी पहिली कलाकार असल्यामुळे माझं या क्षेत्रांमध्ये येणं काही नातेवाईकांना आवडलं तर काहीजणांना अजिबात आवडलं नाही. त्यांना वाटत होतं की हे क्षेत्र माझ्यासाठी उत्तम नाही आहे. मुलींसाठीदेखील सुरक्षित नाही आहे. परंतु माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच सर्वांची रिएक्शन पॉझिटिव्ह येऊ लागली. त्यांना माझा अभिनय आवडला आणि तो कायम राखण्यासाठी ते मला आता सल्ले देत असतात.

तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?

मराठी अभिनेता विनायक साळवेचं माझ्या घरी येणं-जाणं होतं त्यांना माहीत होतं की मी सोशल मीडियावर छोटयाछोटया रिल्स टाकते आणि सर्व तरुणाईला ते आवडतं. त्यांनी एक संवाद अभिनयासोबत बोलायला सांगितला. माझा अभिनय त्यांना थोडाफार बरा वाटला. त्यांनी त्यामध्ये काही बदल सुचविले. मी त्यांनी सांगितल्यानुसार पुन्हा अभिनय केला आणि त्यांना माझा अभिनय आवडला. त्याचवेळी त्यांनी मला चित्रपटात अभिनय करण्याच्याबद्दल विचारलं, मी होकार दिला आणि मला तो चित्रपट मिळाला.

चित्रपटामध्ये अभिनय करण्याबद्दल तू पालकांना सांगितलं तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती? सर्व प्रथम कॅमेरासमोर भीती वाटली का?

माझी आई सुनीता शिंदेला खूप आनंद झाला, कारण पीएचडीचा अभ्यास करूनदेखील त्यांना चित्रपटाची आवड आहे. माझे वडील संपत शिंदे पोलीसमध्ये आहेत. त्यांनीदेखील कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, म्हणून अभिनय क्षेत्रात येणं सहजसोपं झालं. चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि सर्वांना माझं काम आवडलं आहे. माझे को-स्टार विनायक साळवे आणि शशांक शिंदे आहेत.

चित्रीकरणाचा पहिला दिवस माझ्यासाठी खूपच तणावपूर्ण होता. परंतु शूटिंग सर्वांसोबत होतं. सर्व मोठमोठे कलाकार होते. सर्वांनी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे केली होती, त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. सर्वांना ही गोष्ट समजत होती आणि सर्वांनी मला ताण न घेण्याचा सल्ला दिला. माझा पहिला शॉर्ट एवढा छान झाला की सर्वांनी टाळया वाजविल्या.

या चित्रपटामध्ये तुझी भूमिका कोणती आहे?

यामध्ये मी मोनीची भूमिका साकारली आहे. जी दिसते खूप शांत परंतु राग आल्यानंतर डेंजर बनते. खूप छान मुलगी आहे आणि कोणाशीही तिला अधिक बोलायला आवडत नाही.

पहिल्यांदा चेक मिळाल्यानंतर तू काय केलं?

मी सर्वप्रथम माझ्या आईच्या हातात चेक दिला आणि नंतर मी खूप शॉपिंग केलं. आई माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. ती माझी आवड नावड खूप चांगली समजते.

तू किती फॅशनेबल आणि फूडी आहेस?

मला फॅशन खूप आवडते. मी वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल दोन्ही घालते. मी डिझायनर कपडे घालत नाही. स्वत: मिक्स अँड मॅच करून वापरते. मला वेगवेगळया डिश ट्राय करायला खूप आवडतात, परंतु यामध्ये चाट मला अधिक आवडतं. मिठाईदेखील आवडते. आईच्या हातचा बनलेला गाजराचा हलवा खूप आवडतो. मला पोळी भाजी बनवता येते.

हिंदी आणि मराठी कलाकारांकडून तुला काय शिकायला आवडतं?

मला अभिनेत्री कैटरीना कैफ खूप आवडते. कारण तिने दुसऱ्या देशातून येऊन संघर्ष करून स्वत:ला एस्टॅब्लिश केलं आहे. अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा खूप आवडतो. मराठीमध्ये स्मिता पाटील यांचं काम आवडतं. अनेक लोकांनी मला मी स्मिता पाटीलसारखी दिसते असं सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतरदेखील स्त्रिया घरगुती अत्याचार, बलात्कार इत्यादींना बळी पडत आहेत.

महिला दिनाबद्दल तू काय विचार करतेस?

माझ्या मते स्त्रिया स्वतंत्र होत आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत त्या दुसऱ्यांवर अवलंबून राहतील तोपर्यंत त्या मानसिक व शारीरिकरित्या त्रास भोगत राहतील. यासाठी खरंतर समाज आणि कुटुंबदेखील जबाबदार आहे, जे आपल्या मुलांना लहानपणापासून आई, बहीण, मुलगी आणि पत्नीच्या वेगवेगळया रूपात समजावून सांगत नाहीत. ज्यामुळे अशी मुलं मोठी होऊन कोणत्याही स्त्रीचा सन्मान करणं विसरून जातात आणि वाईट वागतात. या व्यतिरिक्त कायदयानेदेखील वाईट विचार ठेवणाऱ्या विरुद्ध लवकरच निष्पक्ष होऊन आपला निर्णय द्यायला हवा.

आवडता रंग : हिरवा.

आवडता पेहराव : भारतीय.

आवडते पुस्तक : द सीक्रेट.

पर्यटन स्थळ : देशात राजस्थान, परदेशात स्वित्झलँड.

वेळ मिळाल्यावर : झोपते आणि चित्रपट पाहते.

आवडता परफ्युम : पोसेस.

जीवनातील आदर्श : पालकांना अभिमान वाटेल असं.

स्वप्न : रोहित शेट्टीसोबत चित्रपट करणं.

सामाजिक कर्तव्य : रक्तदान प्रसार.

स्वप्नातील राजकुमार : लॉयल, हार्ड वर्किंग.

शिवानी बावकर दिसणार नव्या भूमिकेत – ‘कुसुम’

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम.

आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जाबदाऱ्या उत्तम पार पाडते.

२००१ साली हिंदीमध्ये ‘कुसुम’ नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल.

बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून ‘कुसुम’ या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत.

सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिने यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.

‘कुसुम’ ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ekta Kapoor quote –

२१ वर्षानंतर ‘कुसुम’  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर ‘कुसुम’ आणण्याची संधी मला मिळाली. ‘कुसुम’ ही  मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका ‘कुसुम’, ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मला भिंतींवर कुल कलर अधिक आवडतात – संस्कृती बालगुडे

* सोमा घोष

मराठी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख बनविणारी मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेला लहानपणापासूनच कोरिओग्राफर बनायचं होतं, परंतु तिला अभिनयाची संधी मिळाली आणि तिचा स्वीकार करत ती पुढे निघाली. तिचा चर्चित मराठी चित्रपट ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ आणि मराठी मालिका ‘पिंजरा’ होती. ज्यामुळे घरोघरी तिची ओळख निर्माण झाली. खूपच लाजाळू असलेली संस्कृती सुरुवातीला कॅमेरा फ्रेंडली नव्हती, परंतु तिला हळूहळू अभिनय आवडू लागला. तिला नशिबाने ही संधी मिळाली. तिच्या मते मराठी सिनेसृष्टीत नेपोटीझम नसलं तरी ग्रुपीजम असल्यामुळे चित्रपट तसंच मालिकांमध्ये काम करण्यासाठी बाहेरच्यांना कायम संघर्ष करावा लागतो. कायम आनंदी राहणाऱ्या संस्कृतीला जे काम मिळतं ते उत्तम पद्धतीने करण्याचा ती प्रयत्न करते. संस्कृतीने ‘गृहशोभिका’साठी खास मुलाखत दिली, ती खूपच रोचक होती, सादर आहेत खास अंश :

या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली?

मी इंडस्ट्रित येण्याबाबत काही ठरवलं नव्हतं, मला कोरिओग्राफर बनायचं होतं. त्यावेळी मला नृत्याची खूप आवड होती आणि जर कोरिओग्राफर बनायची संधी मिळाली असती तर छान झालं असतं. मी ११वी आणि १२ वी होइपर्यंत अनेक मराठी शोज परदेशात केले होते. याव्यतिरिक्त मराठी सिनेसृष्टीत मोठमोठे सेलिब्रिटिज असायचे, मी त्यांना असिस्ट करायचे आणि अनेकांना मी नृत्यदेखील शिकवलं होतं. त्यांच्या मागे सपोर्टींग डान्सर म्हणूनदेखील नृत्य केलंय. एके दिवशी एका ऑर्गनायजरने माझं नाव प्रोड्युसरला दिलं. तेव्हा मी फक्त १७ वर्षाची होती. जेव्हा मी प्रोड्युसरकडे गेली, तेव्हा त्यांना माझ्यासारखीच मुलगी मालिकेत हवी होती. अशाप्रकारे माझी निवड झाली. थोडं फिल्मी होतं, परंतु त्यांना लीड रोलसाठी माझ्या वयाच्या लावणी नृत्यागना असणं गरजेचं होतं आणि मी त्यात फिट बसत होती. या ‘पिंजरा’ मालिकेत प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर सर्व प्रोसेस सुरु झाली आणि मी अभिनयाच्या प्रेमात पडली.

पहिल्यांदा कॅमेराला सामोरं जातानाचा अनुभव कसा होता?

मी कधीच कॅमेरा फ्रेंडली नव्हती, पहिल्या ऑडिशनमध्येदेखील नर्व्हस होती आणि अभिनय करतानादेखील खूप भीती वाटत होती. पहिल्या शॉटच्या वेळी सर्वजण मलाच पहात होते. घाबरल्यामुळे एक दृश्य तीन ते चार वेळा करावं लागलं. माझी टीम मात्र खूपच छान असल्यामुळे त्यांनी मला कधीच नवीन असल्याचं जाणवू दिलं नाही आणि त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. माझ्यासाठी हे एक अॅक्टिंग स्कुल होतं, जिथे मला अॅक्टिंगचं ट्रेनिंग मिळालं. सुरुवातीचे काही महिने मला कॅमेरा फ्रेंडली व्हायला लागले होते.

कुटुंबात कोणाचा अधिक पाठिंबा होता?

कुटुंबात आईचा अधिक पाठिंबा होता, कारण काही गोष्टी बाबांशी बोलता येत नव्हत्या. त्या आईकडून पोहोचवल्या जायच्या. ‘पिंजरा’ मालिका संपल्यानंतर माझ्या घरी एक चर्चा झाली, ज्यात माझ्या बाबांनी सांगितलं की जर इंडस्ट्रित जायचं असेल तर कथेच्या मागणीनुसार काम करावं लागेल, नकार देता येणार नाही, अशावेळी आईने बाबांना समजावलं. माझी आई कायम माझ्यासोबत शूटिंगला येते. आईला लहानपणापासून सिनेमा आणि अभिनयाची आवड होती. ती सोशल वर्कर आहे आणि जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा ती माझ्यासोबत येते.

तुला कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागला? कोणत्या गोष्टीमुळे आयुष्य बदललं?

इंडस्ट्रित आल्यानंतर संघर्ष करावा लागला, कारण पहिल्या मालिकेपासून लोकं मला ओळखू लागली. यासाठी मला संघर्ष करावा लागला. अभिनयाला मी वयाच्या १८ व्या वर्षी सुरवात केली होती, हे सगळं सांभाळायला मी शिकली. त्यावेळी मी कॉलेजात जायचे आणि टीचर्स मला पॅम्पर करायच्या. मला आता चित्रपटांसाठी संघर्ष करावा लागला. याव्यतिरिक्त मालिका न चालल्यास चॅनेल आणि निर्माते दोघेही काढू शकतात ही भीती मला ३ ते ४ महिने वाटत होती, कारण मला अभिनय येत नव्हता, परंतु निर्माते आणि दिग्दर्शकांनी मला सांभाळून घेतलं आणि डेली सोप करत करत अभिनयात आली.

माझी पाहिली मालिका ‘पिंजरा’नंतर माझी लाईफस्टाईल बदलली होती. मला सेलिब्रिटि बनायचं होतं, ती इच्छा पूर्ण झाली होती.

हिंदीत काम करायचं आहे का?

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करायचं आहे, कारण आज वेब सिरीजमध्ये अनेक नवीन कथा आणि नवीन कलाकार काम करत आहेत, त्यांची अभिनय क्षमतादेखील छान आहे. काही ऑफर येत आहेत आणि मी त्यावर विचार करतेय.

वेब सिरीजमधील इंटिमेट सीन करण्याबाबत काय वाटतं?

मी ऑफ कॅमेरा खूपच लाजाळू आहे, परंतु ऑन कॅमेरा नाही. सिरीजमध्ये जर त्या दृष्याची गरज असेल, तर प्रेक्षकदेखील त्याचा स्वीकार करतील, परंतु विनाकारण असे इंटीमेट सीन करायला नाही आवडणार. आज प्रेक्षकांना बॉलीवूड चित्रपटांबद्दल माहिती आहे. जर ते चित्रपट ते पाहू शकतात, तर इथले चित्रपटदेखील ते सहजपणे स्वीकारू शकतात. मात्र गरज नसताना इंटीमेट सीन असतील तर प्रेक्षकदेखील त्या कथेबद्दल न विचार करता फक्त सेक्स सिन्सची चर्चा करतात. मी नुकताच एक मराठी चित्रपट केलाय त्यात किसिंग सीन दिलाय, कारण त्यात गरज होती.

नृत्याचं प्रशिक्षण केव्हापासून घ्यायला सुरुवात केली?

मी वयाच्या ६व्या वर्षापासून नृत्य शिकतेय. लहानपणी खूप लठ्ठ असल्यामुळे, बारीक होण्यासाठी आईने डान्स क्लास लावला. भरतनाट्यम पूर्ण केल्यानंतर मला नृत्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर वेस्टर्न डान्स शिकले, स्पर्धेत भाग घेतला, मग परदेशात शो करू लागले. अजूनही नृत्य माझी पाहिली आवड आहे, परंतु अभिनयदेखील आवडतो. वर्कआऊटमध्ये डान्स करते, यामुळे माझा नृत्याचा रियाझदेखील होतो.

घराची सजावट करायला किती आवडतं?

मला होम डेकोरची फार आवड नाहीए, परंतु स्वच्छ, सुंदर, सुसज्जीत घर आवडतं. मला भिंतीवर कुल कलर ज्यामध्ये हलकिशी निळया रंगाची शेड आवडते.

काय मेसेज द्यायला आवडेल?

सोशल मीडियाचा प्रयोग तरुणाईने व्यवस्थित करावा, कारण हे चांगलं असण्याबरोबरचं चुकीचा संदेशदेखील देतं. मुलींनी त्यांच्या रंगरूपाबाबत दु:खी होता कामा नये, उलट स्वत:वर प्रेम करायला शिकावं. करीअरवर फोकस करावा.

आवडता रंग – निळा.
आवडता पेहराव – वेस्टर्न कॅज्युअल.

आवडतं पुस्तक – अल्केमिस्ट.

वेळ असतो तेव्हा – चित्रपट पाहणं.

आवडतं परफ्यूम – बेनिटास बाय वर्साची.

पर्यटन स्थळ – निसर्गाच्या जवळ जाणं.

आयुष्यातील आदर्श – एक उत्तम व्यक्ती बनणं.

सामाजिक कार्य – हत्तीसाठी काही काम.

स्वप्न – लिजेंड अभिनेत्री मधुबालाच्या बायोपीकमध्ये काम करणं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें