लिंग संवेदनशीलता गरजेची आहे

* प्राची भारद्वाज

भारतीय समाजात सुरूवातीपासूनच काही स्त्रियांवर निरनिराळी बंधने लादली जातात. त्यांना तरूणांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले जाते. कुटुंबामध्ये, मग ते उच्चवर्गीय असो किंवा मध्यमवर्गीय, शिक्षित असो किंवा कमी शिकलेले, मुलीच्या जन्मावर एवढा आनंद साजरा होत नाही जेवढा मुलाचा जन्म झाल्यावर होतो. मुलगा झाल्यावर पूर्ण परिसरात नातेवाईकांना मिठाई वाटली जाते. कित्येक दिवस उत्साहाचे वातावरण असते. मुलगा झाला हे शुभ लक्षण आहे म्हणून ब्राम्हण भोजन केले जाते. मुलाच्या हाताने स्पर्श करून मंदिरांमध्ये दान दिले जाते. नामकरण ते मुंजीपर्यंत सर्व समारंभ अगदी थाटामाटात साजरे केले जातात.

मुलीला मात्र सुरूवातीपासूनच हे सांगून दबाव टाकला जातो की तू तर मुलगी आहेस, तू घरात बैस. स्वयंपाक पाणी कर हेच सासरी उपयोगी पडेल. जास्त उडण्याची गरज नाही.

त्यांची इच्छाही विचारली जात नाही. लग्नाआधी त्यांना नवऱ्यामुलाकडे पाहूही दिले जात नाही. उलट ही ताकीद दिली जाते की तूला परतून यायचे नाही. सासर घरूनच आता तुझी तिरडी निघेल आणि यातच सगळ्यांचे भले आहे. अशा कडक शिस्तीत मुलींचे संगोपन होते, तर मुलांना मात्र मोकळीक असते की कुठेही जावे कधीही घरी यावे.

काळ बदलला, सोबतच समाजाच्या बऱ्याचशा मान्यताही बदलल्या आहेत. आज मुली कॉलेजला जात आहेत. नोकऱ्या करत आहेत. फॅशनेबल कपडेही घालत आहेत. पण तरीही इतके सर्व असूनही कुठेना कुठे मुलांच्या तुलनेत तरी त्यांना ती सूट कमीच आहे. त्यांना आजही कमकुवत समजले जाते. मुलगी उशीरा घरी परतत असेल तर घरच्यांची काळजी वाढते. आईवडिल ताबडतोब तिच्या मैत्रिणींना फोनाफोनी करतात आणि जोपर्यंत ती घरी येत नाही तोवर ते स्वस्थ बसत नाहीत.

रोजच वृत्तपत्रात मुलींवर झालेल्या बलात्काराच्या बातम्या छापून येतात. त्यांच्या अगतिकपणावर कुठलीही दया न दाखवता समाज कानाडोळा करतो आणि मुले त्यांचा हेतू साध्य करून निघून जातात. सर्व दोष मुलीला दिला जातो की फॅशनेबल कपडे घातले का असेच होणार, यात मुलांचा काय दोष म्हणजे मुलांना जसे सर्व काही करायचे लायसेंन्सच मिळाले आहे.

मुलींच्या प्रति समाजाचा असा दृष्टिकोन का आहे? हा एक संशोधनाचा विषय आहे. पण दु:ख तेव्हा वाटते, जेव्हा एखादी फिल्मी सेलिब्रिटी आपल्या अभिनयाची तुलना बलात्कार पिडीतेशी करतो.

सलमान खानने जेव्हा ‘सुलतान’मध्ये भूमिका केली तेव्हा त्याने आपली तुलना बलत्कार पिडीत मुलीशी केली, तेव्हा त्याचा निषेध करण्यात आला. वडिल सलीम खान यांना त्याच्यावतीने माफी मागावी लागली. पण जर त्यांच्या बोलण्याचे लक्षपूर्वक विश्लेषण केले तर हे स्पष्ट होते की समाजात लिंगभेद आजही आहे आणि मुलींप्रति संवेदनांचा अभाव कायम आहे. सलमान खानसारख्या प्रसिद्ध व्यक्तींकडून अशातऱ्हेचे उदाहरण दिले जाणे हे दर्शवून देते की माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे.

अशा घटना नेहमी ऐकण्यात येतात. एक दिवस रत्नाच्या घरातून अचानक काळजी वाटू लागेल असे आवाज येऊ लागले. दुसऱ्यादिवशी तिची शेजारीण मान्यताने रत्नाच्या घरी जाऊन तिच्या सासूला विचारले की रात्री तुमच्या घरातून आवाज का येत होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘अगं, काही नाही, पतीपत्नीमध्ये भांडणे तर होतातच. बस्स मोहितने ३-४ कानाखाली वाजवल्या. मग पूर्ण रात्रभर तिने गोंधळ घातला होता. मुकाट्याने राहाणार नाही मग मार तर खाणारच.’’

‘‘हे काय बोलताय तुम्ही काकू? भाडंणे, वाद इथपर्यंत ठिक आहे. पण मारझोड? पतीपत्नी शेवटी बरोबरीच्या नात्याने बांधले गेलेले असतात.’’

‘‘बरोबरी? हे काय बोलतेस तू? पत्नी नेहमीच दुय्यम दर्जाची असते. हे कोण नाकारू शकतं.’’

एक स्त्री असूनसुद्धा त्या दुसऱ्या स्त्रीबद्दल इतके तुच्छ विचार करत होत्या. जे एकदम चूकीचेच नाही, तर स्त्रीबद्दल समाजाचा असलेला दृष्टीकोनही त्यातून दिसून येतो.

एका प्रतिष्ठित इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या सिनिअर अॅडव्हायझार पल्लवी आनंद यांनी सांगितले की त्या चित्रपटगृहात ‘उड़ता पंजाब’ हा सिनेमा पाहत होत्या. त्यात एका दृश्यात अभिनेत्री आलिया भट्ट रडत रडत तिच्यावर सतत झालेल्या बलात्काराबाबत सांगत असते, त्यावेळी तिथे चित्रपटगृहात अनेक मुले हसून टाळ्या आणि शिट्या वाजवत होते. एका मुलीच्या काळीज चिरून टाकणाऱ्या बोलण्यावर त्या मुलांना हसू येत होते.

यावरून हेच स्पष्ट होते की समाज स्त्रीला पुरुषाच्या हातातील खेळणे समजतो. स्त्रीबाबत बलात्कारासारखी घटना घडली तरी स्त्रीलाच दोषी ठरवले जाते. का आहे हा लिंगभेद? समाज अजूनही स्त्रियांसाठी संवेदनशील का नाही?

मीनाच्या शेजारी राकेश नावाचा एक तरूण राहात होता. त्याच्यावर बलात्काराचा खटला सुरू होता. तरीही त्याचे लग्न झाले. ही गोष्ट कळली, तेव्हा मीनाने तिच्या नवऱ्याला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘चांगली गोष्ट आहे. राकेशमध्ये काय कमी आहे? तो एक पुरूष आहे आणि पुरूषावर कधीही कलंक लागत नाही.’’

हे ऐकून मीनाला तिच्या नवऱ्याचा राग तर खूप आला पण ती नाईलाजाने गप्प बसली.

रोजच घडणाऱ्या अशा कितीतरी लहान सहान असंवेदना दाखवून देतात की नारीला देवीचे स्थान देणाऱ्या आपल्या समाजात लिंग संवेदीकरणाची किती कमतरता आहे.

रोहन सुमितला जेव्हा त्याच्या घरी भेटायला आला होता, तेव्हा त्याचे कुटुंब एकत्र बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात रोहनच्या मुलीने घरात प्रवेश केला. तिने छोटा स्कर्ट घातला होता. सुमितने त्याचा मित्र रोहनला म्हटले, ‘‘आजकाल कशाकशा बातम्या येतात, वाचतोस ना? मुली जर असे छोटे कपडे घालू लागल्या तर दोष कोणाला देणार?’’

‘‘हो, भावोजी,’’ सुमितच्या पत्नीनेही री ओढली, ‘‘अशामध्ये मुलांना काय म्हणणार आपण, जर मुलीच शुद्धीवर नसतील? आम्हाला तर काही काळजी नाही, आमच्या घरात तर मुलगा आहे. पण ज्यांच्या घरात मुलगी आहे, त्यांनी तर काळजी घेतलीच पाहिजे की त्यांनी त्यांच्या मुलीवर बंधने घालून ठेवावीत.’’

त्यांच्या या मानसिकतेवर रोहन आणि त्याच्या पत्नीला आश्चर्याबरोबरच रागही आला. जर मुलींप्रमाणेच मुलांनाही नैतिक मूल्य शिकवली गेली तर जर त्यांनाही घरी वेळेत येण्यासाठी बंधने घालण्यात आली. त्यांच्यासमोरही लहानपणापासूनच नैतिकतेचे आव्हान ठेवण्यात आले, तर कदाचित आपल्या समाजात मुलगी घरातून बाहेर निघताना तिला सुरक्षित वाटेल.

लिंग संवेदीकरणावर परदेशींचे विचार

लिंग संवेदीकरणाच्या घटना फक्त भारतातच घडतात असे नाही तर परदेशातही अशा घटना सामान्य आहेत.

अमेरिकन पत्रकार व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या ग्लोरिया स्टीनेमने सांगितलं की आम्ही आमच्या मुलींनाही मुलांसारखेच वाढवायला सुरूवात केली आहे. पण आपल्या मुलांना मुलींप्रमाणे वाढवण्याची हिंमत खूपच कमी आहे.

निकलस क्रिस्टोफ, जे अमेरिकन पत्रकार व लेखक आहेत आणि दोन वेळेस पुलित्द्ब्रार पुरस्काराचे विजेतेसुद्धा आहेत.त्यांचे म्हणणं आहे की गुलामीशी लढताना शतके निघून गेली. १९व्या शतकात अधिनायकवादाच्या विरूद्ध लढाई लढण्यात आली आणि वर्तमान शतकात पूर्ण विश्वात लैंगिक समानतेचे नैतिक आवाहन सर्वोच्च राहिल.

या विदेशी विचारवंतांच्या विचारावरून हे स्पष्ट आहे की लिंग असमानता फक्त एकाच देशाची समस्या नाही, तर पूर्ण जग या समस्येने ग्रासलेले आहे.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपति पदासाठी असणाऱ्या निवडणूकांमध्ये हिलरी क्लिंटन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हरणे यातूनही हेच दिसून येते की अमेरिकासारखा देशसुद्धा लिंग भेदाच्या दलदलीत अजूनही अडकलेला आहे. जर हिलरी क्लिंटन निवडणूक जिंकल्या असत्या तर त्या २४५ वर्ष जुन्या लोकतंत्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपति बनल्या असत्या.

जर अमेरिकेसारख्या मॉडर्न देशात लिंग संवेदीकरण आणि स्त्रियांना दुय्यम समजले जाते तर भारतासारख्या भोंदूबाबा यांच्या प्रवचनांच्या व कूपमंडूकांच्या बोलण्याला प्राधान्य देणाऱ्या देशात लिंग असमानता असू शकत नाही हे शक्यच नाही.

जिनेव्हा स्थित विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक जेंडर गॅप इंडेक्सनुसार भारत ११४व्या स्थानावर आहे, याउलट मागील वर्षी भारताचे स्थान भाग घेणाऱ्या १३६ देशांमध्ये १०१ क्रमांकावर होते.

कसे होईल लिंग संवेदीकरण

आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जीवनाची परिभाषाच बदलून गेली आहे आणि म्हणून आपल्याला लिंग संवेदीकरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे व असा एक समाज निर्माण करायचा आहे, जिथे लिंग संवेदीकरणाची भावना असावी व स्त्री आणि पुरूषात असमानतेची भिंत नसावी. दोघांनाही एकाच पारड्यात तोलले जावे. स्त्रियांसोबत होणारे गैरवर्तन, अन्याय संपवण्यात यावा.

जर आम्हाला असे वाटत असेल की समाजात लिंग संवेदीकरण व्हावे तर सुरूवात आपल्याला आपल्या मुलांपासून केली पाहिजे आणि घरात याबद्दल जितके कार्य होऊ शकते तेवढेच शाळेतही. पोर्टब्लेअरच्या निर्मला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कॅरोलीन मॅथ्यू यांचे मत आहे की विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यामध्ये शिक्षकांची भूमिका श्रेष्ठ आहे. सर्वात आधी शिक्षकांचा लिंग संवेदीकरणावर विश्वास असला पाहिजे. एकमेकांबद्दल आदर आणि समानतेची भावना मुलामुलींमध्ये समान असायला पाहिजे. दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या व वाईट गोष्टी समजून घेता व सहन करता आल्या पाहिजेत.

मुलामुलींना समान संधी दिल्या पाहिजेत. मुलींना प्रसिद्ध महिलांच्या जीवनगाथा वाचून दाखवल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या अधिकारांच्या माहितीबरोबरच आत्मरक्षणाचे प्रशिक्षणही दिले पाहिजे.

कॉलेजमधील शिक्षण घेऊन जेव्हा तरूण तरूणी नोकरीच्या क्षेत्रात पाऊल टाकतात, तेव्हाही लिंग संवेदीकरणाचा विषय समोर येतो. आज कॉर्पोरेट विश्वातही याविषयी खूप काम होत आहे व ते प्रगतिपथावर आहे.

कॉर्पोरेट जगात झालेले बदल

विप्रोमध्ये एचआर हेड असणाऱ्या प्रिती कटारिया सांगतात की त्यांच्या कंपनीमध्ये असे प्रश्न जसे की ‘तुम्ही विवाहित आहात का?’ कधीच विचारू शकत नाही. त्या म्हणतात की भारतीय महिलांना असे प्रश्न उदाहरणार्थ विवाहाविषयी किंवा मुलांसंबंधी विचारणे सहज वाटते. पण असे प्रश्न पुरूषांना विचारले जात नाहीत. असे प्रश्न विचारले जाऊ नयेत कारण अशा प्रश्नांनी महिलांच्या करिअरवर परिणाम होतो. महिलांनाही पुरूषांप्रमाणे आपल्या कामात नैपुण्य मिळवायचे असते.

काही ठोस पावले

लाइफ स्किल्स कोच, मंजुळा ठाकूर म्हणतात की आता लोकांना लिंग संवेदीकरणासारख्या विषयावर मोकळेपणी बोलण्याची गरज वाटू लागली आहे. विविधता असलेल्या या परिपूर्ण देशात लैंगिक समानता आणण्याच्या हेतूने काही विशेष बाबींवर लक्ष दिले पाहिजे.

* रूढीवादी संस्कार तसेच पक्षपातीपणाच्या मूल्यांपासून वेगळे होऊन लिंगाच्या प्रगतिशील अस्तित्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

* दोघांच्याही कार्यक्षेत्रासाठी समजूतदार दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

* महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी पावले उचलली पाहिजेत. सोबतच हे ही निश्चित केले पाहिजे की यामुळे पुरूषांप्रति कुठलाही भेदभाव होणार नाही.

मंजुळा असे मानतात की प्रशिक्षण देण्याने आणि जागरूकता वाढवल्याने आपला समाज, शैक्षणिक संस्था, कार्यालये इ. मधून लिंग आधारित भेदभाव नक्की कमी होईल आणि स्त्रियांना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक संधी मिळतील. याच आशेने मंजुळा चंदीगडमधील पंतकुला व मोहालीमध्ये लाईफ स्किल्स टे्रनिंग संस्थेद्वारा सल्ला व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करत असतात.

अक्षुना बक्षी अवघी २५ वर्षांची आहे. ती असे काही करत आहे की आपण सर्वांनी तिच्याकडून धडा घेतला पाहिजे. तसे तर अक्षुना टॅ्रवलिस्ता नावाची ऑनलाइन साईट चालवते. पण समाजात स्त्रीचे शोषण, स्त्रियांबद्दल असलेल्या द्वेष भावनेला त्रासून अक्षुनाने एका संस्थेची सुरूवात केली आहे. त्यांच्या टीममध्ये फक्त महिलाच आहेत. ज्या महिलांना जीवनातील वेगवेगळे पैलू समजावून सांगतात.

संवेदीकरणावर काम करत असताना अक्षुनाने एक विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्यात लैंगिक समानता, पुरुषांची जबाबदारी, पुरूषांकडून लहानपणीच मुलींना आदर देणे इ. बाबी त्यांच्या सर्व सत्रात सहभागी केल्या आहेत.

लिंग संवेदीकरणासाठी आपण छोट्याछोट्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील असणाऱ्या ऐलीन मारकीस यांचे म्हणणे आहे की मुलांसमोर आपण सतर्क राहून प्रतिक्रिया दिली पाहिजे. ते सतत आपल्या पालक, शिक्षक आदींचे वागणे बोलणे पाहत असतात आणि म्हणूनच हे खूपच गरजेचे आहे की त्यांच्यासमोर आपले वर्तन योग्य असावे.

आपल्याला हे विसरून चालणार नाही की देशाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाण्यात या अर्ध्या लोकसंख्येचेही विशेष योगदान आहे. हा वेग कायम राखण्यासाठी आपल्याला लिंग संवेदीकरणाप्रति संवेदनशील व्हावेच लागेल.

नाजूक आहेत कमकुवत नाही

* रोहित

२१ व्या शतकातील २०२२ या वर्षात आपण पदार्पण केले आहे. गेल्या वर्षी बरेच बदल झाले, पण एक गोष्ट जशीच्या तशी आहे आणि ती म्हणजे समाजातील महिलांची स्थिती. हजारो वर्षांपासून जगात एक रुढीवादी परंपरा आपली मुळे घट्ट रोवून आहे, जी असे सांगते की, पौराणिक काळापासूनच देव आणि निसर्गाने महिला, पुरुषांमध्ये भेदभाव केला आहे. यामुळे पुरुषांचे काम वेगळे आणि महिलांचे काम वेगळे आहे. ही प्रवृत्ती नेहमीच असे सांगत आली आहे की, आदि मानवासापासून जेव्हा कधी जेवण गोळा करण्यासारखे अवघड काम करावे लागले, मग ती जुन्या काळात शिकार करणे असो किंवा आजच्या युगात बाहेर पडून कुटुंबासाठी पैसे कमावणे असो, त्यासाठी पुरुषांनाच सक्षम ठरवण्यात आले आहे आणि शारीरिकदृष्टया कमकुवत असल्यामुळे महिलांच्या वाटयाला घरातली कामे आली आहेत.

या लैंगिक भेदामुळेच महिलांचे बाहेर पडून काम न करण्यामागचे कारण त्यांचा शारीरिक कमकुवतपणा असल्याचे सांगण्यात आले. त्यांची शारीरिक ठेवण पुरुषांच्या तुलनेत दुबळी किंवा कमकुवत आणि अशुद्ध ठरवण्यात आली. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले. त्या पुरुषांच्या तुलनेत शारीरिकदृष्टया कमकुवत आहेत, बाहेरचे काम करण्यासाठी योग्य नाहीत आणि कुटुंबाचे पालनपोषण करू शकत नाहीत, याची जाणीव त्यांची त्यांनाच करून देण्यात आली.

हेच कारण आहे की, आज लिंगावर आधारित असमानतेवर जगभरात वादविवादाच्या फैरी झोडत आहेत. महिलांचा शारीरिक दुबळेपणा हा नेहमीच या वादातील एक मोठा भाग राहिला आहे. याच

वादादरम्यान संशोधकांनी दक्षिण अमेरिकेतील एंडिज पर्वतरांगेत ९,००० वर्षांपूर्वीच्या अशा एका जागेचा शोध लावला जिथे महिला शिकाऱ्यांना दफन केले जात असे. या शोधामुळे प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान मिळाले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठाशी जोडले गेलेले आणि या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक असलेले रँडी हास यांचे म्हणणे आहे की, प्राचीन काळातील दफनविधी प्रक्रियेचे हे संशोधन आणि विश्लेषण फक्त पुरुषच शिकारी असण्याचे पुरुषांचे वर्चस्व मोडणारे आहे.

कुशल शिकारी

या संशोधनात यावर शिक्कामोर्तब झाले आहे की, प्राचीन काळात पुरुषांप्रमाणेच महिलाही घराबाहेर पडून शिकार करायच्या. त्यावेळी बाहेर पडून शिकार करणे हे पूर्णपणे श्रमावर आधारित होते, लिंगभेदावर नाही.

२०१८ मध्ये पेरूच्या पर्वतांवरील उंचीवर पुरातत्त्व उत्खननादरम्यान संशोधकांनी जुन्या शिकाऱ्यांना दफन केलेल्या प्राचीन जागेचा शोध लावला होता. तेथे शिकारीची आणि प्राण्यांना कापण्याची धारदार अवजारे सापडली होती. त्याच ठिकाणी ९,००० वर्षांपूर्वी दफन केलेले मानवी सांगाडे सापडले. त्यांची हाडे आणि दातांच्या तपासणीनंतर ते महिलांचे सांगाडे असल्याचा निष्कर्ष निघाला.

 

उत्तरेकडील आणि दक्षिणी अमेरिकेत सापडलेल्या अशा १०७ प्राचीन ठिकाणांच्या संशोधनानंतर संशोधकांनी ४२९ सांगाडयांची ओळख पटवली. संशोधकांनी सांगितले की, यातील एकूण २७ शिकाऱ्यांचे सांगाडे होते, ज्यात ११ महिला आणि १६ पुरुष होते. सांगाडे आणि संशोधकांनी लावलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, प्राचीन काळात महिलाही शिकार करायच्या. इतकेच नव्हे तर शिकारीच्या कामात पुरुषांच्या तुलनेत महिलाही जवळपास बरोबरीतच होत्या. संशोधनानुसार संशोधकांचे असे म्हणणे आहे की, त्या काळात शिकारीच्या कामात महिला, पुरुषांचे समान वर्चस्व होते. महिलांचा शिकारीत सहभाग घेण्याचा वाटा जवळपास ३०-५० टक्के पर्यंत होता. उत्खननात सापडलेल्या सांगाडयांच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की, असे कोणतेच निर्बंध (नैसर्गिक किंवा दैवी) त्या काळात महिलांवर नव्हते, ज्या आधारे असे म्हणता येईल की, तेव्हा कामांची विभागणी होत असे.

हा शोध लैंगिक समानतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचे मोठे कारण महिला आणि पुरुषांमध्ये कामाच्या विभागणीवरून पूर्वापार चालत आलेला वाद हे आहे. या संशोधनात जी महत्त्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे त्या काळात महिला पूर्णपणे स्वावलंबी होत्या. स्वत:चे निर्णय स्वत:च घेत होत्या. एका महिलेचे शिकारी असणे हेच सांगते की, ती आपली जमात किंवा कुटुंबासाठी बाहेर पडून काम करत होती. स्वत:च्या मुलांचे पोट स्वत: भरू शकत

होती. तिला पुरुषाच्या खांद्याच्या आधाराची गरज नव्हती. शिकार करून आणलेल्या मांसाचे वाटप कशा प्रकारे करायचे आहे, किती करायचे आहे आणि ते कोणाला द्यायचे आहे, हे सर्व निर्णय महिलाच घेत असत. हे स्वाभाविक आहे की, जो आपल्या जमातीचे पोट भरतो त्याला त्या जमातीवर वर्चस्व गाजवण्याचा अधिकार असतो. अशा वेळी जर महिला आणि पुरुष बरोबरीने कुटुंबाचे पालनपोषण करत असतील तर तिथे दोघांना समान अधिकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिकारी होण्यामागचा एक अर्थ असाही आहे की, त्या काळातील महिलांकडे आपल्या सुरक्षेसाठी लागणारी हत्यारे होती. ही हत्यारे त्यांना सुरक्षा मिळवून देण्यासोबतच ती त्यांच्याकडील बहुमूल्य साधनांपैकी एक होती. यातून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो, जसे की, ज्या पुरुषी समाजात महिलांना स्वत:कडे संपत्ती ठेवण्याचा अधिकार नसेल, पण कदाचित त्या काळात महिलांकडेच मौल्यवान संपत्ती म्हणून पाहिले जात असेल. त्यामुळेच त्या काळातील तो एक असा समाज असेल जिथे महिलांकडे संपत्तीच्या रूपात हत्यारांचे असणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

महिला शारीरिकदृष्टया दुबळया किंवा कमकुवत असतात, त्यामुळेच त्या घराबाहेरची कामे करण्यासाठी योग्य नाहीत, असा जो तर्क पुरुषप्रधान संस्कृती पूर्वापारपासून लावत आली आहे त्या तर्काला या संशोधनाने मोठा धक्का दिला आहे. शिकारीसारख्या कामासाठी आवश्यक असलेली शारीरिक चपळता, ताकद, हिंमत महिलांमध्ये होती, सोबतच त्या हे काम करण्यासाठी पुरुषांच्या तुलनेत कुठेच कमी नव्हत्या. अशा वेळी प्रश्न असा उपस्थित होतो की, जर प्राचीन काळात महिला शारीरिकदृष्टया पुरुषांच्या बरोबरीने काम करत होत्या तर मग आज याच्या अगदी उलट अशी त्या शारीरिकदृष्टया कमकुवत असल्याची प्रतिमा समाजात कशी रूढ झाली?

धर्माचे निर्बंध

जगातील कितीतरी इतिहासकारांनी महिलांवरील पुरुषांच्या वर्चस्वाशी संबंधित असलेले अनेक शोध यापूर्वी लावले आहेत. ज्यात त्यांनी असे सांगितले की, आदियुगात अशा समाजाचे अस्तित्व होते जिथे कुठलीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य महिलांना होते. परंतु या शोधांवर सर्वात जास्त कठोर आणि थेट हल्ला ज्या लोकांनी केला ते धर्मकर्माशी जोडलेले रुढीवादी लोक होते. त्यांच्या मतानुसार जग देवाने बनवले आहे आणि महिलांच्या शारीरिक ठेवणीला कमकुवत तर पुरुषांना बळकट करून या जगाचे संतुलन साधण्यात आले आहे. त्यांच्या या तर्कामुळेच पुरुषांना संरक्षक आणि महिलांना अबलेचा दर्जा देण्यात आला.

हे पूर्णपणे महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रत्येक धर्मातील त्या कथांना, ग्रंथांना प्रमाण मानण्यात येऊ लागले जे महिलांना आदर्श स्त्री किंवा पतिव्रता बनण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर दबाब आणणारे होते. महिलांनी पतिव्रता असणे केवळ वंशाच्या शुद्धीसाठीच नव्हे तर परपुरुषाशी तिने शारीरिक संबंध ठेवू नयेत यासाठीही गरजेचे मानले जाऊ लागले.

धर्मदेखील आहे जबाबदार

हिंदू समाजातील ग्रंथ, पौराणिक कथा, रामायण, महाभारत, गीता, वेद आणि तत्सम संबंधित कथांमध्ये सामूहिकरित्या सांगण्यात आले आहे की, महिलांनी स्वतंत्र होता कामा नये.

मनुस्मृती ज्याला सरंजामशाहीचे संविधान मानले जाते त्यात महिला पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आणि दुय्यम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जवळपास सर्वच संघटित धर्मग्रंथांमध्ये पृथ्वीवरील संतुलनासाठी लिंग भेदभाव हे प्रमाण मानले गेले. ज्या पौराणिक ग्रंथांमधून महिला स्वतंत्र असल्याचे आणि सक्षम असल्याचे समोर आले तिथे ते ग्रंथ किंवा अशा सक्षम महिलेला राक्षसीन, कुरूप समजण्यात आले. त्यांच्याऐवजी घाबरलेल्या, भित्र्या, कमकुवत, गृहिणी असलेल्या महिलेलाच आदर्श मानण्यात आले

या सर्व बुरसटलेल्या विचारसरणीमुळे महिलांना घराबाहेर जाण्यापासून रोखण्यात आले, सोबतच राहणीमान, वागणे-बोलणे, हसणे, यौन शुचिता अशा सर्वच बाबतीत तिच्यावर निर्बंध लादण्यात आले. याचे दूरगामी परिणाम असे झाले की, महिलांकडून जबरदस्तीने किंवा त्यांना आपले म्हणणे पटवून देऊन त्यांच्याकडून यासाठी परवानगी घेण्यात आली की, त्यांचे व्यक्तिमत्त्व निसर्गत:च पुरुषांपेक्षा दुबळे, कमकुवत आहे. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी पुरुषांचा आधार घ्यायला हवा.

असो, पण या संशोधनातून २ गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे महिलांचे व्यक्तिमत्त्व नैसर्गिकरित्या पुरुषांपेक्षा कमकुवत नाही आणि दुसरे म्हणजे धर्मात महिलांसाठी लिहून ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टी या ईश्वराच्या मुखातून निघालेली अमरवाणी नाही तर धर्मातील पुरुष ठेकेदारांनी अर्ध्या लोकसंख्येकडून फुकटात श्रमाची कामे करून घेण्यासाठी आणि भोगविलासाचे जीवन जगण्यासाठी करून ठेवलेली तरतूद आहे.

आधीही नव्हती आणि आताही कमकुवत नाही

उत्तराखंडातील पौडी जिल्ह्यातील जलथा गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय बसंती भंडारीचे गाव कोटद्वार शहरापासून खूप दूर, दुर्गम भागात आहे. या गावातील जनजीवन त्याच्या जवळ असलेल्या इतर भागातील गावांसारखेच खूप अवघड आहे. पहाडी, दुर्गम भाग असल्यामुळे आजही लोकांना उदरनिर्वाहासाठी बऱ्याच लांबवर शेती करण्यासाठी जावे लागते. त्यासाठी बसंती देवी यांना पाळीव जनावरांचे वजनदार शेण गोळा करून त्याचे खत बनवून ते डोक्यावरून २-३ किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागते. असे काम करण्यासाठी हिंमत आणि प्रचंड ताकदीची गरज असते.

बसंती भंडारी सांगतात, ‘‘माझे अर्धे आयुष्य असेच मेहनतीच्या कामात गेले. पर्यटकांना हे पर्वत आवडतात, पण मी नेहमीच येथे खूप काबाडकष्ट केले.

‘‘इतके अवजड वजन डोक्यावर वाहून नेण्याबाबत त्यांनी सांगितले की, पुरुषांचे काम फक्त शेतात बैलांना हाकून नांगर चालवण्यापुरतेच आहे. महिलांनाच पेरणी, खत घालणे, कापणी, गवत आणणे, दूरवरून पाणी, लाकडे आणणे, अशी श्रमाची कामे करावी लागतात. तरीही त्याची दखल कुठेच घेतली जात नाही. खरंतर जास्त मेहनतीची कामे महिलाच करतात.

नाही आहोत कमकुवत

असे फक्त खेडोपाडयात पाहायला मिळत नाही. दिल्ली शहरात मजुरी करणाऱ्या २६ वर्षीय मुनमुन देवीचे गाव उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात आहे. लग्नाला वर्ष झाल्यानंतर त्या ४ वर्षांपूर्वी आपल्या पतीसह दिल्ली शहरात आल्या होत्या. मुनमुन यांना ३ मुले आहेत. या ३ मुलांमध्ये १ मुलगी असून ती दिड वर्षांची तर मुलगा २ वर्षांचा आहे. मोठा मुलगा ३ वर्षांचा आहे. दिल्लीतील बलजीत नगर परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे, तिथे सरकारी ठेकेदाराकडे काम करताना मुनमुन एका हाताने आपल्या ३ वर्षांच्या रडणाऱ्या मुलाला कसेबसे आपल्या कमरेवर पकडून डोक्यावर सिमेंटने भरलेले घमेले घेऊन जाते.

मुनमुन सांगते की, मी सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पतीसोबत मजुरी करते. आमच्यातील बहुतांश महिलांचे काम डोक्यावरून विटा उचलून नेणे, घमेल्यातून सिमेंट आणणे, खड्डा खोदणे असे असते. या कामासाठी आम्हाला तितकीच ताकद लागते जितकी एका पुरुषाला हे काम करण्यासाठी लागेल. असे असताना आम्ही कमकुवत कशा काय? अनेकदा आम्हाला कामादरम्यान मुलांना दूधही पाजावे लागते.’’

युनायटेड नेशनच्या एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय महिलांना एकूण कामांपैकी ५१ टक्के कामांचा मोबदला मिळत नाही. दुसरीकडे जगभरात घरातील ७५ टक्के काम महिला कोणताच मोबदला न घेता करतात. तरीही जगातील ६० टक्के महिला किंवा मुली भुकेल्या असतात. त्यांच्यात भूकबळीचे प्रमाण अधिक असते.

एका अभ्यासानुसार, आफ्रिका आणि आशियात एकूण कामगारांपैकी जवळपास ६० टक्के कामगार महिला असतात आणि तरीही पुरूषप्रधान समाजात त्यांना शेतकऱ्याचा दर्जाही मिळत नाही.

अशा वेळी हे स्पष्ट आहे की, महिला पूर्वीही कमकुवत नव्हत्या आणि आजही नाहीत. त्या शारीरिकदृष्टया सक्षम आहेत. पुरुषांप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. फक्त समाजाच्या डोक्यातून महिलांना कमकुवत समजण्याच्या संकुचित विचाराला कायमची तिलांजली देण्याची गरज आहे.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें