नवी मालिका – ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता ‘प्रतिशोध’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘प्रतिशोध’ या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर तृतीयपंथी आईची भूमिका साकारणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अमोल  बावडेकरबरोबरच पायल मेमाणे ही गुणी अभिनेत्रीसुद्धा पाहायला मिळणार आहे. ती ममताच्या मुलीची म्हणजेच दिशाची व्यतिरेखा साकारताना दिसणार आहे.

प्रतिशोध ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी ही थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे, हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

एक आगळंवेगळं कथानक असलेली ही मालिका सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. येत्या १६ जानेवारीपासून रात्री १० वाजता.

‘प्रतिशोध’ – झुंज अस्तित्वाची ही नव्या पठडीतली मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते आहे. या मालिकेत तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं उलगडणारी आहे आणि त्यांच्या  संघर्षाची कहाणीही या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नव्या मालिकेतील अमोलची तृतीयपंथीची भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक ठरलेली आहे. अशा धाटणीची भूमिका प्रथमच साकारण्याची संधी मिळाल्याने तो या भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे आगळंवेगळं कथानक पाहून प्रेक्षकांनी या मालिकेचं स्वागत केलं आणि अमोलच्या भूमिकेला पसंतीही दर्शवली. अरुण नलावडे आणि अक्षय वाघमारे हे कलाकारही या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. त्यातच आता ही थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने रंगेल यात काही शंका नाही.  भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा. पाहायला विसरू नका ‘प्रतिशोध’- झुंज अस्तित्वाची.

१६ जानेवारी पासून सोम. ते शनि. रा. १० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असते. शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येते आहे. या मालिकेचे विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित होणारी ही नवी मालिका पाहणं प्रेक्षकांनाही विशेष भावेल. कोकणातली नयनरम्य दृश्यं, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे. ‘शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस’  असं ब्रीदवाक्य  असलेल्या या मालिकेत निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल.

या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर हिनी साकारली आहे. मूळची कोकणातली असलेली रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हे कलाकारही मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष ठरेल. तर मालिकेतले काही निवडक कलाकारही कोकणातले असल्याने कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्याची मज्जा काही औरच आहे. अशा या कोकणपुत्रांचा अभिनय छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल यात शंकाच नाही. तर ‘इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकाची ओढ’ असं म्हणत पुस्तकात सतत डोकं घालून असणार्‍या बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा पूर्ण होईल हे पाहणं रंजक ठरेल.

शिक्षणाच्या जिद्दीचा हा अनोखा प्रवास बयोचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार, हे पाहण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवरली ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका नक्की पाहा.

पाहा, 12 सप्टेंबरपासून सोम.-शनि., रात्री 8.30 वा, ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’, सोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतिया काहिली’  या मराठी मालिकेत पाहायला मिळणार कानडी तडका

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनी सातत्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे.

मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते,  हे त्यातून दिसलं. कानडीचा आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. मुख्य कलाकरां बरोबरच आकर्षण ठरले आहेत. नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

मालिकेतल्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका, प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑन स्क्रीन भांडण, आणि भाषेपलीकडचं प्रेम. त्यामुळे १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर मालिका नक्की बघा.

‘जिवाची होतिया काहिली’, 18 जुलैपासून, सोम.-शनि., संध्या. 7:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें