चाइल्ड फ्री ट्रिप

* पूनम अहमद

मुंबईमध्ये राहणाऱ्या सुनीताची मुले नववीच्या वर्गात असताना ती आणि तिचा नवरा निलीन पुण्यात एका लग्नाला गेले होते. लग्नाला जाणे गरजेचे होते आणि त्यात मुलांची परीक्षा होती. बऱ्याच विचाराअंती पतिपत्नी मुलांची समजूत घातल्यानंतर कामवालीला सूचना देऊन २ रात्रींसाठी पुण्याला गेले.

ती म्हणते, ‘‘पहिल्यांदा तर माझ्या मनात याची चिंता वाटत होती की, आम्ही नसताना मुलांना काही अडचण भासू नये, आम्ही सोसायटीमध्येही नवीन होतो. मीही बरेच दिवस घरात राहून कंटाळले होते. याआधी कधी मुलांना एकटे सोडून गेलो नव्हतो. पण जेव्हा गेलो, तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्या गोष्टीची विनाकारण चिंता करत मी गेले होते, परंतु पहिल्याच रात्री मुलांशी बोलून इतका आनंद झाला, जेव्हा बघितले की दोघेही छानपणे आपापले काम करत आहेत, आमच्याशिवाय सर्व व्यवस्थित मॅनेज करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. तेव्हा कुठे मी माझी पहिली चाइल्ड फ्री ट्रिप मनापासून एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही दोघे बऱ्याच वेळा १-२ रात्रींसाठी बाहेर फिरायला गेलो, मुलांनीही हेच सांगितले की, आम्ही तर शाळा-कॉलेजमध्ये व्यस्त असतो, तुम्ही निर्धास्तपणे जाऊन येत जा.

‘‘मुले जेव्हा फ्री झाली तेव्हा त्यांच्यासोबत कधी फिरायला गेलो, नाहीतर आम्ही २-३ रात्रींच्या ट्रिपवरून आता १ आठवडयाच्या ट्रिपवर आलो आहोत आणि तसे वारंवार जात राहतो. काही दिवस एकमेकांच्या सहवासात स्वत:चा वेळ घालवून फ्रेश होऊन परत येतो. त्यामुळे मन आनंदी राहते.’’

आता तर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे कुटुंबातील वेळ जास्तीचा झाला होता. बऱ्याचशा लोकांवर वर्क फ्रॉम होमचा फार ताण होता, घरातील इतर सदस्यांच्या गरजा आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग यामुळे पती-पत्नीला एकमेकांबरोबरचे मोकळे क्षण फार मुश्किलीने मिळत होते. दोघांवरही कामाचा भरपूर ताण होता. कदाचित हेच कारण आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले क्षण घालवण्यासाठी मुलांशिवाय ट्रिपचे नियोजन करताना दिसले, जे कदाचित गरजेचेही झाले होते.

एक मजेशीर किस्सा

नीता तर तिचा एक मजेशीर किस्सा सांगताना म्हणते, ‘‘एकदा तिचा पती ऑफिसच्या काही मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात जात होता. तिथे माझी एक खास मैत्रीण राहात होती, मलाही असे वाटले की मीसुद्धा त्याच्याबरोबर जाऊन तिला तिथे भेटून येईन. मला एकच मुलगा आहे, जो त्यावेळी आठवीमध्ये होता. त्याच्या मित्राची आई म्हणाली की, मुलाला त्यांच्याकडे सोडून मी जाऊ शकते.’’

‘‘मी एका रात्रीसाठी गेले. मुलाने त्याचा वेळ त्याच्या मित्राच्या घरी इतका एन्जॉय केला की, त्यानंतर कित्येक दिवस तो सांगत होता की आई, पुन्हा तुझ्या कोणत्या मैत्रिणीला भेटायला जाणार असशील तर मी राहीन. त्यानंतर   आम्ही पती-पत्नी जेव्हाही बाहेर गेलो, तेव्हा तो एकटा असताना कधी त्याच्या मित्रांना बोलवायचा, कधी त्यांच्या घरी जायचा. आम्हीही छोटे हनीमून साजरे करून यायचो आणि मुलगाही त्याचा वेळ छान एन्जॉय करायचा.’’

बऱ्याचशा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज प्रौढांना याप्रकारे वेळ घालवण्यासाठी बरेचसे पर्याय आणि ऑफर देत असतात. लक्झरी रिसॉर्टची संख्या वाढत चालली आहे. काही विमान कंपन्या तर छोटया मुलांपासून लांब बसण्यासाठी सीट निवडण्याचा पर्यायही देतात. चला तर या ट्रेंडबद्दल काही बोलू :

एकांतही आणि मज्जाही

मुलांशिवाय पती-पत्नीने एकटेच ट्रिपला जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. ९०च्या दशकात कॅरेबियन सिंगल्स रिसॉर्टने ही कल्पना समोर आणली होती. हा ट्रेंड कोणालाही एका रुटीन जीवनातून एक वेगळी वैयक्तिक मोकळीक देतो. मग सनसेट क्रुजवर जाणे असो, तारांकित स्पा ट्रीटमेंट असो, यात कोणत्याही प्रकारची रोमांचकारी अॅक्टिव्हीटी प्लॅन केली जाऊ शकते.

आजकाल भारतात हा ट्रेंड अनेक कारणांमुळे प्रचलित आहे. व्यस्त जीवनशैली, मुलांची देखभाल आणि त्यांची कधीही न संपणारी कामे, तसेच अन्य जबाबदाऱ्या पार पाडतापाडता सद्यस्थितीत प्रौढ जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवणे विसरून गेली आहेत किंवा इच्छा असूनही एकमेकांच्या सहवासात राहू शकत नाहीत. आजकाल दोघे जेव्हा अशा प्रकारचा प्लॅन बनवतात, तेव्हा त्यांना चांगल्या ठिकाणी एकांताची अपेक्षा असते.

वी टाइम एन्जॉय

भारतात बरीचशी जोडपी गोवा, जयपूर, कुर्ग आणि उत्तरेकडील हिल स्टेशन्सवर जाणे पसंत करतात. तसेच परदेशात जाण्यासाठी आजकाल कित्येक लोक थायलंड, मेक्सिको आणि सॅशेल्सला जाणे पसंद करत आहेत. एडल्ट्स ओन्ली हॉलिडेज पॅकेजमध्ये कँडल लाईट डिनर्स, स्कूबा डायव्हिंग, जंगल सफारी आणि रेन फॉरेस्टचा आनंद घेतला जाऊ शकतो. जोडीदार आता वी टाइम एन्जॉय करू इच्छितात आणि करतही आहेत.

वीकेंड मौजमजा आता कालची गोष्ट

* शैलेंद्र सिंह द्य

मेघा आणि सचिन दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात. दोघेही दररोज जवळपास एकाच वेळेला घरातून निघतात. त्यांचे खणेपिणेही व्यवस्थित होत नसे. त्यांच्या स्वयंपाकघरात जेवण बनविण्याचे सामान कमी आणि जेवण ऑनलाईन घरपोच करणाऱ्या साईट्सचे फोन नंबरच जास्त लिहून ठेवलेले होते. तोंडाची चव बदलावी यासाठी ते वेगवेगळया साईट्सवरून जेवण मागवित असत. त्यांना वीकेंड म्हणजेच आठवडयाची सुट्टी सर्वात आनंददायी वाटत असे. शनिवार आणि रविवार त्यांच्या जीवनात सर्वात मोठा आंनद घेऊन येत असत.

मेघा सांगते, शनिवारी सकाळी उशिरापर्यंत झोपायची संधी म्हणजे जीवनातील सर्व सुख मिळाल्यासारखे वाटत असे. वीकेंडलाच आम्ही घरात आवडीचे जेवण बनवित असू.

शालिनी आणि रमेश दोघेही आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करीत होते. नुकतेच दोघांचे लग्न झाले होते. वय झाल्यानंतर त्यांनी लग्न केले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाला वर्ष झाल्यानंतर घरच्यांची इच्छा होती की, त्यांना लवकर मूल व्हावे, अन्यथा पुढे जाऊन मूल होणे अवघड होईल. घरच्या मंडळींचा दबाव वाढतच होता. त्यामुळे शेवटी दोघे डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी पतीपत्नीच्या नोकरीसाठी लागणाऱ्या वेळेबाबत माहिती करून घेतली. दोघे एकमेकांसोबत किती वेळ घालवतात, हे समजून घेतले. तणावमुक्त होऊन काही वीकेंड सोबत राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वागल्यानंतर काहीच दिवसांनी बाळाची चाहूल त्यांना लागली.

कोरोना काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘क्वारंटाईन’ यामुळे शनिवार, रविवारच्या सुट्टीतील मौजमजा संपली आहे. घरातील तणाव वाढू लागला आहे. लोकांमध्ये मानसिक आजार वाढू लागले आहेत. जे लोक वीकेंड आणि सुट्टयांची वाट बघायचे आज तेच लॉकडाऊन संपून कामावर कधी जाता येईल, याची वाट बघत आहेत. आता घरात राहणे त्यांच्यासाठी कैदेत राहण्यासारखे झाले आहे. कुटुंबात आपापसातील तणाव वाढत आहे. एकत्र कुटुंबाला हा प्रश्न जास्तच भेडसावत आहे. त्रिकोणी कुटुंबातील समस्याही वाढत आहेत.

वीकेंडची क्रे

वीकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची क्रेझ काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठया प्रमाणावर होती. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा वीकेंड तयार करून एखाद्या पॅकेजप्रमाणे ते कर्मचाऱ्यांना देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या या पॅकेजकडे सुरुवातीला देशी कंपनीतील कामगार आशाळभूत नजरेने पाहत असत. आंतरराष्ट्रीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असे त्यांना वाटत असे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही वीकेंडच्या या क्रेझला अशा प्रकारे सादर केले होते की, पगारापेक्षा याचीच जास्त भुरळ कर्मचाऱ्यांना पडली होती. नव्यानेच जेव्हा लोक आंतरराष्ट्रीय कंपनीत रुजू व्हायचे तेव्हा आपल्या जुन्या कंपनीतील सहकाऱ्यांना अभिमानाने सांगायचे की, आमच्याकडे ‘पाच दिवसांचा आठवडा’ असतो. २ दिवसांच्या सुट्टीमुळे वीकेंड आरामात घालवता येतो.

राहिली नाही क्रे

देशी कंपन्यांमध्ये जिथे केवळ रविवारी सुट्टी असते तेथील कर्मचारी तिरस्काराने वीकेंड साजरा करणाऱ्यांकडे पाहायचे. त्यानंतर वीकेंडची ही पद्धत हळूहळू चांगलीच प्रचलित होऊ लागली. देशी कंपन्यांनीही स्वत:ला आंतरराष्ट्रीय असल्यासारखे भासविण्यासाठी वीकेंडची पद्धत सुरू केली. देशी कंपन्या या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देण्यात येणाऱ्या पगाराशी स्पर्धा करत नव्हत्या, पण तेथे देण्यात येणाऱ्या वीकेंडशी मात्र स्पर्धा करू लागल्या. एक अतिरिक्त सुट्टी देण्यात येणार असल्यामुळे ‘वर्किंग हवर’ म्हणजे इतर दिवसांतील कामाचे तास वाढविण्यात आले. आधी साडेनऊ ते साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे कर्मचाऱ्यांना ८ तास काम करावे लागत होते.

कोरोनाने संपवली क्रे

जेव्हा एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळते तेव्हा ती नुकसानदायी ठरते. अशीच काहीशी अवस्था वीकेंडची झाली. कोरोनामुळे २०२० च्या मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत संपूर्ण देशात सुरुवातीला ३ महिन्यांचे लॉकडाऊन जाहीर झाले. त्यानंतर वीकेंड लॉकडाऊन सुरू झाले. कार्यालये आणि इतर कार्यक्षेत्रे बंद झाली. लोकांवर घरातून काम करण्याची वेळ आली. अर्थात घरातूनच ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले. यामुळे नोकरदार महिलांना जास्त त्रास होऊ लागला, कारण पतीचे ऑफिस आणि मुलांची शाळाही घरातूनच ऑनलाईन सुरू झाली. त्यामुळे एकाच घरात आणि एकाच छताखाली राहूनही एकमेकांशी बोलण्यासाठी आवश्यक असलेला वेळ मिळेनासा झाला.

पूर्वीसारखे काहीच नाही

आकांक्षा जैन यांनी सांगितले की, ‘‘ऑफिसमधून काम करण्याचा असा फायदा होता की, घरी आल्यानंतर जो वेळ शिल्लक राहायचा त्या वेळेत कुटुंबासोबत गप्पा मारता येत होत्या. आता वर्क फ्रॉम होममुळे घरच्यांच्या जवळ असूनही त्यांच्याशी बोलायला वेळ मिळत नाही. ३-४ तास फक्त झूम मीटिंगमध्ये जातात. घर छोटे असल्यास आणि त्या घरातील तिघे वर्क फ्रॉम होम करीत असल्यास त्यांच्यासाठी काम करणे अवघड होऊ लागले. जागा कमी पडू लागली. मीटिंगशिवायही इतर अनेक कामे करावी लागतात. आंतरराष्ट्रीय कंपन्या तर रात्रीही काम करायला सांगतात, जे एक प्रकारे त्रासदायक ठरते. ऑफिसमध्ये ७-८ तास काम करण्यासाठी जे वातावरण आणि सुविधा मिळायची ती घरी मिळू शकत नाही.’’

शनिवार, रविवार मिळत नसल्यामुळे नकारात्मक परिणाम

ऑनलाईन प्रोफेशनल नेटवर्क लिंकेडीनच्या एका सर्वेक्षणात असे निदर्शनास आले आहे की, जवळपास ५० टक्के नोकरदार महिलांना कोरोनामुळे जास्त दडपण आल्यासारखे वाटते. केवळ शारीरिक श्रमामुळेच नाही तर भावनात्मकरित्याही त्रासल्यासारखे त्यांना वाटत आहे. या सर्वेक्षणातील ४७ टक्के महिला आणि ३८ टक्के पुरुषांनी हे मान्य केले. 27 जुलैपासून २३ ऑगस्ट 2020 च्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. यात २५००हून अधिक व्यावसायिकांशी संवाद साधण्यात आला. सर्वेक्षणात नोकरदार माता आणि नोकरदार महिला दोघांचाही समावेश करण्यात आला होता. नोकरदार मातांनी असे सांगितले की, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देणे, हे कोरोना काळातील सर्वात मोठे आव्हान ठरले.

महिला व पुरुषांच्या वेगवेगळया दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर असे निदर्शनास आले की, ३१ टक्के महिलांना संपूर्ण दिवस मुलांना सांभाळावे लागले. आधी शाळा आणि ऑफिस असल्यामुळे दोघांचा बराचसा वेळ तिथेच जायचा. केवळ १७ टक्के पुरुषांनीच मुलांना सांभाळण्यासाठी बायकोला मदत केली. मुलांना सांभाळण्यासाठी कामावरील दिवसभराच्या तासांपेक्षाही बराच जास्त वेळ काम करावे लागले, असे ४४ टक्के महिलांनी तसेच २५ टक्के पुरुषांनी मान्य केले. मुलांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील सदस्यांवर किंवा मित्र-मैत्रिणींवर अवलंबून रहावे लागले, असे २० टक्के महिलांनी मान्य केले. याचप्रमाणे मुलांना सांभाळण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागले असे या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३२ टक्के पुरुषांनी मान्य केले.

वर्क फ्रॉम होममुळे वाढले कामाचे तास

वर्क फ्रॉम होम करताना शनिवार आणि रविवारसह कामाचे एकूण तास वाढले. ४६ टक्के महिलांनी हे मान्य केले की, कामावरचे काम घरात करताना ते जास्त वेळ करावे लागते. जास्त काम करूनही कामाचा दर्जा मात्र तितकासा चांगला नसतो. ४२ टक्के महिलांनी मान्य केले की, मुले घरी असल्यामुळे त्या ऑफिसच्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे आता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची तितकीशी क्रेझ राहिलेली नाही. उलट त्या तणावाचे कारण ठरत आहेत. कधी ही दीर्घ सुट्टी संपेल आणि कामावर जाऊन काम करता येईल, याची त्या वाट पाहत आहेत.

आकांक्षा जैन यांनी सांगितले की, आम्हाला आठवडयातील २ दिवस ऑफिसला जायला सांगितले आहे. आता मला तेच २ दिवस वीकेंडसारखे वाटू लागले आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीची आता कोणतीच क्रेझ उरलेली नाही.

दाम्पत्य जीवनात याला असावी नो एंट्री

* ललिता गोयल

संशयाच्या रोगाला इलाज नाही. जर का याच्या फेऱ्यात खासकरून पतीपत्नीपैकी कुणी एक अडकले तर तो त्यांना हैवान बनवू शकतो. अशीच एक घटना अलीकडेच हैदराबादमध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेने आपल्या पतीला अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयामुळे अशी शिक्षा दिली ज्याची वेदना तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या ३० वर्षीय महिलेने पतीशी झालेल्या वादात चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पतीला गंभीर जखमा झाल्या.

असेच एक प्रकरण दिल्लीच्या निहाल विहार परिसरातसुद्धा घडले, जिथे पतिनेच आपल्या पत्नीची मर्डर केली. पकडले गेल्यावर त्या पतिने पोलिसांना सर्व काही सांगितले. त्याने स्पष्ट केले की त्याचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते, पण पतिला सतत वाटायचे की आपल्या पत्नीची अनेक मुलांसोबत मैत्री आहे आणि याच गोष्टीवरून त्यांच्यात सतत वादविवाद होत आले.

तुटणारी कुटुंबं आणि विखुरणारी नाती

संशयामुळे न जाणो कित्येक हसती खेळती कुटुंबं बरबाद झाली आहेत. दाम्पत्य जीवन जे विश्वासाच्या आधारावर टिकलेले असते, त्यात संशयाची चाहूल विष कालवते. हल्ली अनैतिक संबंधांच्या संशयावरून लाइफपार्टनरवर हल्ला, हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंब पध्दती विखुरणे हे याचे कारण आहे असे मानसशास्त्रज्ञ मत मांडतात.

खरंतर एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा पती आणि पत्नीत भांडणे होत, तेव्हा घरातील मोठी माणसे सामोपचाराने बातचीत करून ती भांडणे सोडवत असत किंवा मग मोठयांच्या उपस्थितित त्यांचे भांडण उग्र रूप धारण करू शकत नसे. मात्र आज पती पत्नी एकटे राहतात, त्यामुळे भांडण झाल्यावर ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. इथे त्यांच्यामध्ये उभी राहिलेली संशयाची भिंत तोडायला कुणीही नसते.

अशात संशय अधिकच बळावल्यामुळे पतीपत्नीचे नाते शेवटच्या घटका मोजू लागते. वर्तमान लाइफस्टाइलमध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरदार असतात. ते दिवसातले ८ ते १० तास घराबाहेर असतात आणि ते विरुद्ध लिंगीय व्यक्तींसोबत कामाच्या निमित्ताने सहवासात असतात. हाच सहवास हे दोघांमधील संशयाचे कारण बनते. अशावेळी पतीपत्नी दोघांनी विश्वास ठेवायला हवा.

बिझी लाइफस्टाइल

लग्नानंतर जिथे वैवाहिक नाते टिकवून ठेवणे ही जशी पतीपत्नीची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे हे नाते संपुष्टात आणण्यासही ही दोघचं कारणीभूत असतात. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा दोघेही आपल्या रुटीन लाइफमध्ये बोअर होतात आणि आपल्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी तिसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होतात, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात, तेव्हा वैवाहिक नात्याचा अंत हा संशयापासून सुरू होऊन एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे ते हत्येपर्यंत पोहोचतो.

अनेकदा तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे जेव्हा पतिपत्नी जीवनातील समस्या सोडवण्यास अक्षम ठरतात, तेव्हा त्यांच्यात खटके उडू लागतात. आणि यासाठी ते बाहेरच्या संबंधांना जबाबदार धरतात. त्यांच्या डोक्यात संशय उत्पन्न होऊ लागतो. हळूहळू हा संशय बळावू लागतो आणि भांडण वाढत जाते.

जर का त्यांना कोणी समजावले तर संशय आणि सगळया समस्या संपुष्टात येऊ शकतात, परंतु एकल परिवारात त्यांना समजावणारे कोणी नसते. यामुळे परिस्थिती मारझोडीपासून हत्येपर्यंत जाऊन पोहोचते.

तू फक्त माझा/माझी आहेस असा विचार

लाइफपार्टनरविषयी जास्तच पझेसिव्ह राहणे हेसुद्धा संशयाचे मोठे कारण असते. आजच्या काळात जिथे स्त्री आणि पुरुष हे ऑफिसमध्ये मोठमोठया जबाबदाऱ्या सांभाळत असतात, अशीवेळी त्यांच्यात सलगी होणे स्वाभाविक असते. मग पती किंवा पत्नी हे जेव्हा एकमेकांना दुसऱ्या व्यक्तिसोबत सलगी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात संशय उत्पन्न होतो. त्यांना हे सहनच होत नाही की त्यांचा लाइफपार्टनर ज्याच्यावर ते मनापासून प्रेम करतात, तो कुणा बाहेरच्या व्यक्तिसोबत सलगी करत आहेत. कारण ते त्यांच्यावर फक्त आपला अधिकार आहे असे समजत असतात.

अशाप्रकारची विचारसरणी नात्यांमध्ये कटुता आणते. पती किंवा पत्नी जेव्हा फोनवर कुणा दुसऱ्या महिलेचा किंवा पुरुषाचा मेसेज किंवा कॉल पाहतात, तेव्हा त्यांना संशय येऊ लागतो. भले वास्तव वेगळेच असो. पण संशयाचे बीज दोघांच्या संबंधात फूट पाडते, ज्याचा अंत हा मारहाण किंवा मग हत्या अशा घटनांत होतो.

हेरगिरीची माध्यमे बनणारे अॅप्स

पती पत्नीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी स्मार्टफोनही काही कमी जबाबदार नाही. सोशल मिडियाने जिथे वैवाहिक जोडीदारांच्या विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घातले आहे तिथे या स्मार्टफोनमध्ये असेही अॅप्स आहेत, जे पती आणि पत्नी यांना एकमेकांवर हेरगिरी करण्याची पूर्ण संधी देतात.

या अॅप्सद्वारे पती किंवा पत्नी हे आपला लाइफपार्टनर त्यांच्याव्यतिरिक्त सर्वाधिक कोणाशी बोलतात. म्हणजेच हल्ली कोणत्या व्यक्तिशी त्याची जवळीक वाढत आहे. त्यांच्यात काय गप्पा होतात, ते कोणत्या प्रकारच्या इमेज किंवा व्हिडिओ शेअर करतात. थोडक्यात लाइफपार्टनरच्या फोनवर कंट्रोल करण्याचीही पूर्ण व्यवस्था आहे. हे अॅप्स लाइफपार्टनरच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवण्याची पूर्ण संधी देतात. या अॅप्सच्या मदतीने लाइफपार्टनरचा फोन पूर्णपणे तुमच्या ताब्यात येऊ शकतो.

आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की या टेक्निकचा सदुपयोग तुम्ही आपसातल्या नात्यात जवळीक आणण्यासाठी की दुरावा वाढवण्यासाठी?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें