पवित्र प्रेम

कथा * सुनीता माहेश्वरी

रूपा मॅडम, तुम्ही खूप छान आहात. तुमचे मन फार सुंदर आहे. तुमच्यासारखीच हिंमत आम्हा सर्वांमध्ये असती तर किती बरे झाले असते ना?’’ रूपाची मोलकरीण नीना मोठया आदराने म्हणाली आणि कॉफीचा कप रूपाला देऊन आपल्या घरी निघून गेली.

रूपाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. मागील २ वर्षांपासून ती व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेत होती. या क्षेत्रात तिने अभूतपूर्व यश मिळवले होते. तिच्या केंद्राची कीर्ती दूरवर पसरली होती. २ वर्षांतच तिने आपल्या वागण्यातून, मेहनतीतून, कौशल्यातून, आत्मविश्वासाने आणि आत्मीयतेने समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त केले होते. तिचे गुण आणि मनाच्या सौंदर्यापुढे तिची कुरूपता खुजी ठरली होती. अनेक विषम परिस्थितीत तपश्चर्या करून तिने आपल्या व्यक्तिमत्त्वाला सोन्यासारखी झळाळी दिली होती, कारण तिच्यासोबत प्रेमाची अफाट शक्ती होती.

त्या दिवशी नीना गेल्यावर रूपा घरात एकटीच होती. तिचा पती विशाल आणि वकील असलेले सासरे प्रमोद खटल्याच्या सुनावणीसाठी गेले होते. हातात कॉफीचा कप घेऊन सोफ्यावर बसलेल्या रूपाला तिच्या आयुष्यातील तो काळोखा काळ आठवला. तो १-१ क्षण तिच्या डोळयांसमोर उभा राहिला.

तारुण्यातील ते दिवस रूपाला आठवले जेव्हा अचानक एके दिवशी सामसूम रस्त्यावर रोहित तिचा रस्ता अडवत म्हणाला, ‘‘माझ्या प्रिये, तू दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाहीस, तू फक्त माझा आहेस.’’

रोहितचा वाईट हेतू पाहून रूपा भीतीने थरथर कापू लागली. कशीबशी स्वत:ची सुटका करून घेत पळतच घरी पोहोचली. तिला धाप लागली होती. तिची आई गीताने तिला जवळ घेतले. रूपा थोडी शांत झाल्यावर आईने विचारले, ‘‘काय झाले बाळा?’’

रूपाने रोहितबद्दल सर्व सांगितले. रोहितच्या वागण्यामुळे ती इतकी घाबरली होती की, आता तिला महाविद्यालयात जायचीही इच्छा होत नव्हती. जेव्हा ती एकटी बसायची तेव्हा रोहितचे उतावीळपणे पाहाणारे डोळे आणि अश्लील कृत्य तिला घाबरवायचे.

काही दिवसांनी रूपा कसाबसा धीर एकवटून महाविद्यालयात जाऊ लागली, पण रोहित रोज काहीतरी बोलून तिला त्रास द्यायचा. रूपाने त्याला पोलिसांची धमकी दिली तेव्हा तो म्हणाला, ‘‘पोलीस माझे काहीच बिघडवू शकणार नाहीत. तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला जगू देणार नाही.’’

रूपाने रोहितबद्दल सर्व काही तिच्या प्राचार्यांनाही सांगितले, पण प्रकरण महाविद्यालयाच्या बाहेरचे असल्याने त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. रूपाला तिच्या वडिलांची खूप आठवण यायची. तिला वाटायचे की, जर वडील हयात असते तर तिला कोणीही असा त्रास देऊ शकला नसता.

रूपा आणि तिच्या आईला शांतपणे जगणे कठीण होत होते. अनेक अडचणींचा सामना करून रूपाने एमए (मानसशास्त्र)ची अंतिम परीक्षा दिली होती.

एके दिवशी आई गीताने तिला लग्नासाठी विचारत सांगितले, ‘‘रूपा, माझ्या मैत्रिणींचा मुलगा विशाल चंदिगडला आहे. तो अभियंता आहे. खूप समजूतदार आहे. मी त्याचे स्थळ तुझ्यासाठी विचारू का?’’

रूपाने लगेच होकार दिला. तिलाही त्या गुंड रोहितपासून सुटका हवी होती. लग्नाची बोलणी झाली आणि लग्न ठरलेही.

लग्नाचे गोड क्षण आठवताच रूपाच्या डोळयांत चमक आली. तिने कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि सोफ्यावर झोपली. जुन्या आठवणी आकाशात उंच भरारी घेत होती.

रूपा आणि विशालचे लग्न चंदिगडमध्ये मोठया थाटामाटात पार पडले. विशालसारख्या हुशार, देखण्या, समजूतदार आणि प्रेमळ तरुणाचा सहवास लाभल्याने रूपा खूप आनंदी होती. जणू तिला आयुष्यातील सर्व सुख मिळाले होते.

रूपा हळूहळू तिच्या नवीन प्रेमळ आयुष्यात रमून गेली. सासरच्यांनाही ती खूप प्रिय होती. घरच्या सर्व जबाबदाऱ्या तिने उत्तम प्रकारे पेलल्या होत्या. तिच्या रूपाचे आणि गुणांचे सर्वच चाहते झाले होते.

रूपाने विशालला रोहितबद्दल सर्व सांगितले होते. विशाल तिला समजावत म्हणाला, ‘‘तू घाबरू नकोस रूपा, असे काही मूर्ख असतात. तू त्याला विसर. आता मी तुझ्यासोबत आहे.’’

लग्नाला ३ वर्षे झाली होती. दरम्यान, अनेक वेळा रूपा आणि विशाल चंदिगडहून लखनऊला गेले होते, पण रोहित कधीच त्यांच्या समोर आला नाही. हळूहळू रूपा त्याला विसरली. तिला आयुष्य खूप सुंदर वाटू लागले होते.

एके दिवशी रूपा पती विशालसोबत लखनऊच्या बाजारातून परतत होती. तेवढयात अचानक रोहितने तिच्या सुंदर चेहऱ्यावर अॅसिड फेकत म्हटले, ‘‘आता दाखव विशालला तुझे हे रूप.’’

रूपाचा सुंदर चेहरा क्षणार्धात जळून कुरूप झाला. रूपाचे रूप कुरूप होताच तिच्या सुंदर चेहऱ्यावर अॅसिड फेकणारा रोहित जिंकल्याप्रमाणे हसू लागला.

हे सर्व पाहून विशालला धक्का बसला. त्याने लगेचच पोलिसांना फोन करून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. काही वेळात लोक जमले. रोहितच्या हातात अॅसिडची बाटली होती. त्यामुळे भीतीने त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याला पकडले.

विशालने रूपाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.

औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर रूपावर उपचार सुरू झाले. तिच्या दोन्ही डोळयांच्या बाहुल्या दिसत नव्हत्या. चेहरा इतका खराब झाला होता की, डॉक्टरांनी विशाललाही तिला पाहू दिले नाही. रूपाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. २ दिवसांनी रूपाची आई गीता आणि विशालला रूपाला भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तिला पाहून आई किंचाळली. अॅसिड फेकण्याचा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या रोहितबद्दल तिच्या मनात संतापाची आग धगधगू लागली.

तब्बल अडीच महिन्यांनंतर रूपाला रुग्णालयातून घरी जायची परवानगी मिळाली, पण उपचार संपले नव्हते. तिला ना दृष्टी होती ना रूप. तिच्यावर आणखी अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.

विशाल रूपाला घेऊन चंदिगडला परतला. तिथे तिच्या डोळयांवर आणि चेहऱ्यावर अनेक शस्त्रक्त्रिया झाल्या.

हळूहळू तिची दृष्टी परत आली. या घटनेनंतर रूपाने पहिल्यांदा जग पाहिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही, मात्र स्वत:चा चेहरा पाहून ती किंचाळली. स्वत:चे भूत आरशात पहिल्यासारखे तिला वाटले. तिने विशालला मिठी मारली आणि मोठयाने ओरडली, ‘‘विशाल, या कुरूप चेहऱ्याने मी तुझे आयुष्य खराब करू शकत नाही. मला जगायचे नाही. माझ्यावर इतके प्रेम करू नकोस.’’

विशालचे डोळे पाणावणार होते, पण त्याने कसेबसे अश्रू रोखले. रूपाला त्याने प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘रूपा, तू माझी धाडसी पत्नी आहेस. तू माझे जीवन आहेस. तुझ्याशिवाय माझे अस्तित्व नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो, फक्त तुझ्या रूपावर नाही. तू अशी हरून गेलीस तर माझे काय होईल?’’

आपल्या कुरूप चेहऱ्यावर विशालच्या ओठांचा स्पर्श होताच तिला अधिकच रडू आले. तिचे हुंदके थांबत नव्हते. विशालच्या निस्वार्थी प्रेमात आकंठ बुडून ती आपल्या कुरूपतेला दोष देत होती. अॅसिडमुळे केवळ तिचा चेहराच नाही तर विशालचा आनंदही जळून खाक झाला होता.

आपला भीतीदायक चेहरा पाहून रूपा दिवसेंदिवस अधिकच निराश होत होती. एवढी कुरूपता, विद्रूपता पाहून तिच्या मनाला खूप वेदना होत होत्या. जेव्हा ती लोकांना तिच्याकडे टक लावून बघताना पाहायची तेव्हा तिला असे वाटायचे की जणू सर्वच तिची कुरूपता पाहून घाबरले आहेत. प्रत्येक नजर तिचे मन हेलावून टाकत होती.

एके दिवशी रूपा संतापून  म्हणाली, ‘‘विशाल, माझ्यासारख्या कुरूप मुलीसाठी तुझे आयुष्य का वाया घालवतोस? तू पुन्हा लग्न का करत नाहीस? तुझा आनंद माझ्या या कुरूपतेवर वाया घालवू नकोस. तू मला घटस्फोट दे.’’

विशाल प्रेमाने म्हणाला, ‘‘रूपा, मी लग्नाचे सुंदर बंधन तोडण्यासाठी बांधले नाही. पती-पत्नीचे मिलन म्हणजे दोन हृदयांचे मिलन असते. एखादी दुर्घटना आपल्याला वेगळे करू शकेल का? माझ्यासोबत असे काही घडले असते तर तू मला घटस्फोट दिला असतास का?’’

रूपाने विशालच्या तोंडावर हात ठेवला. तिच्या डोळयांतून प्रेमाने अश्रू वाहू लागले. विशालचा त्याग आणि प्रेम पाहून तिचे मन धन्य झाले.

चंदिगडमध्ये रूपावर उपचार सुरू होते. अॅसिडने जळलेल्या त्वचेसाठीच्या प्रदिर्घ काळ चालणाऱ्या महागड्या उपचारांमुळे विशालच्या आर्थिक स्थितीवर आणि त्याच्या कामावरही परिणाम होत होता, पण त्याने रूपाला कधीच काही जाणवू दिले नाही. एका जबाबदार पतीप्रमाणे तो आपले कर्तव्य चोख बजावत होता.

विशालचे वडील प्रमोद हे प्रसिद्ध वकील होते. रूपाच्या न्यायालयीन प्रक्रियेच्या कामकाजात ते रात्रंदिवस गुंतले होते. त्या गुन्हेगाराला शिक्षा व्हायालाच हवी, असा निर्धार त्यांनी केला होता. याशिवाय उपचार आदींसाठी शासनाकडून मदत     मिळावी यासाठीही ते प्रयत्नशील होते.

अचानक रूपाला तिच्या नातेवाईकांची कडवट बोलणी आठवली. एके दिवशी एक नातेवाईक रूपाला भेटायला आला. तो रूपाला भेटला आणि निघताना      विशालला म्हणाला, ‘‘तू हीची जशी सेवा करत आहेस त्यासाठी तुझ्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. आजकालच्या मुली एकावर प्रेम करतात तर दुसऱ्याशी लग्न करतात. तुझ्यासारख्या पतींना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात.

जन्मपत्रिका पाहून आणि गुणमिलन करून तुझे लग्न झाले असते, तर ही दुर्घटना टळली असती. माझा सल्ला ऐक आणि दुसरे लग्न कर. या कुरूपतेचा भार किती काळ सहन करणार?’’

विशालचे वडील प्रमोद हे सर्व ऐकत होते. ते तावातावाने म्हणाले, ‘‘भाऊ, तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न पत्रिका पाहूनच केले होते ना? मग काय झाले? तुम्हाला आठवतेय ना? तुमची सून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हा सर्वांना सोडून माहेरी निघून गेली. जन्मपत्रिका पाहून आणि गुणमिलन करून तुम्ही कोणता गड जिंकलात? आमच्या निष्पाप सुनेवर आरोप करण्यापूर्वी आधी तुम्ही स्वत:च्या घरात डोकावून पाहायला हवे होते.’’

त्या दिवशी नातेवाइकाचे बोलणे ऐकून रूपाला पुन्हा कोणीतरी तिच्यावर कडवटपणाचे अॅसिड फेकल्यासारखे वाटले. तिचे मन प्रचंड दुखावले गेले. चेहरा लपवून ती रडू लागली.

विशाल रूपाचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘तू काळजी करू नकोस रूपा. मी तुझा नवरा आहे आणि तुझ्यासोबत आहे. कुणी असे निरर्थक बोलतो तेव्हा वाटते की, त्याचे तोंड फोडून टाकावे, पण हा यावरचा उपाय नाही… जोपर्यंत महिलांना समाजात मानाचे स्थान मिळत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार आहे. अशा संकुचित वृत्तीच्या लोकांची विचारसरणी बदलायला हवी.’’

रूपा विशालच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती.

विशाल तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, ‘‘माझ्या रूपाने पुन्हा हसायला शिकावे अशी माझी इच्छा आहे. स्वत:ला पुन्हा पुन्हा कुरूप म्हणणे थांबव. रूपा, माझ्यासाठी तू पूर्वीइतकीच आजही सुंदर आहेस. तुझे मन किती सुंदर आणि पवित्र आहे हे मला माहीत आहे,’’ असे प्रेमाने सांगत विशालने रूपाला ज्यूस देऊन झोपायला लावले.

प्रत्येक दिवस एक नवीन दिवस ठरत होता. काही जखमा कोरडया पडायच्या तर काहींच्या टोचून बोलण्यामुळे नव्या जखमा मनाला पोखरायच्या. विशालने हळूहळू रूपाचे मन प्राणायामाकडे वळवले. तो तिला नेहमी सांगायचा की, तुझ्या मनाचा आवाज ऐक, ते खूप सुंदर आहे. रूपा, तुला अशा गुन्हेगारांविरुद्ध लढायचे आहे. तुझ्यात हिंमत असायला हवी. तू सुंदर आहेस. शक्तिशाली हो, मानसशास्त्राची जाणकार आहेस. तुझ्या आत अनंत शक्ती दडलेल्या आहेत. तू हार पत्करू शकत नाहीस. मनात आशा निर्माण करून आणि विश्वास जागवून तुला समाजातील वाईट शक्तींचा नाश करायचा आहे.

दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रियाही सुरू होती. विशाल आणि त्याचे वडील तारखेला न्यायालयात जात असत. एक वर्षानंतर जी तारीख मिळाली तेव्हा विशाल त्याचे आई-वडील आणि रूपासोबत न्यायालयात पोहोचला होता. गुन्हेगार रोहित आधीपासूनच तेथे होता. रूपाला आधार देऊन ज्या प्रेम आणि सन्मानाने विशाल तिला न्यायालयात घेऊन आला ते पाहून रोहितचा चांगलाच हिरमोड झाला. इतक्या कुरूप मुलींवरही कोणी पती प्रेम करेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.

विशालने रूपाचा आनंद हिरावून घेणाऱ्या रोहितकडे तिरस्काराने पाहिले आणि म्हणाला, ‘‘तू आमच्यासोबत जे केलेस त्याची शिक्षा तुला लवकरच मिळेल. माझ्या मते तू जगातील सर्वात कुरूप व्यक्ती आहेस… जगात तू कोणालाच आवडणार नाहीस, याउलट रूपा या अवस्थेतही सगळयांना प्रिय आहे. ती नेहमीच सुंदर होती आणि सुंदर राहील.’’

त्या दिवशी रूपाही रणरागिणी झाली होती. तिच्या डोळयांत त्या गुन्हेगाराबद्दलच्या द्वेषाबरोबरच रागाच्या ज्वाळाही धगधगत होत्या. ती कसाबसा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होती.

काही वेळातच विशाल आणि प्रमोद न्यायालयातून घरी परतले. ते खूप आनंदी होते, कारण रूपा जिंकली होती. त्या गुन्हेगाराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

कथा * पौर्णिमा आरस

डिसेंबर महिन्याची किटी पार्टी रियाच्या घरी होती. हाउसी म्हणजे तंबोलाचा खेळ रंगात आला होता. शेवटचा नंबर अनाउन्स झाला अन् मालिनीची बॉटम लाइन पूर्ण झाली. पंचावन्न वर्षांची मालिनी त्या किटीतली सर्वात वयस्कर सदस्य होती. एरवी मालिनी किती उत्साहात असायची, पण आज बॉटम लाइन पूर्ण होऊनही ती विमनस्क बसून होती. सगळ्यांनी आपापसांत डोळ्यांनीच ‘काय झालंय?’ असं विचारलं अन् कुणालाच काही माहिती नसल्याने नकारार्थी माना हलवत त्यांनी ‘काही ठाऊक नाही,’ असंही सांगितलं.

किटीतली सर्वात लहान सभासद होती रिया. तिनेच शेवटी विचारलं, ‘‘मावशी, आज काय झालंय तुम्हाला? इतके नंबर कापले जाताहेत तरी तुम्ही अबोल, उदास का?’’

‘‘काही नाही गं!’’ उदास होऊन मालिनीने म्हटलं. अंजलीने आग्रहाने म्हटलं, ‘‘मावशी, काही तरी घडलंय नक्की. सांगा ना आम्हाला…’’

अनीता मालिनीची खास मैत्रीण होती. तिने विचारलं, ‘‘पवन बरा आहे ना?’’

‘‘बरा आहे की!’’ मालिनीने उत्तर दिलं, ‘‘चला, हा राउंड पूर्ण करूयात.’’

‘‘बरं तर, हा राउंड होऊन जाऊ दे,’’ इतरांनीही संमती दिली.

हाउसीचा पहिला राउंड संपला तेव्हा रियाने विचारलं, ‘‘न्यू ईयरचा काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’’

सुमन म्हणाली, ‘‘अजून काहीच ठरलेलं नाहीए. बघूयात, सोसायटीत काही कार्यक्रम असेल तर…’’

नीताचा नवरा विनोद सोसायटीच्या कमेटीचा सभासद होता. तिने म्हटलं, ‘‘विनोद सांगत होते यंदा आपली सोसायटी न्यू ईयरचा कोणताही कार्यक्रम करणार नाहीए. कारण कमिटी मेंबर्समध्ये काही मुद्दयांवर मतभेद आहेत?’’

सारिका वैतागून म्हणाली, ‘‘खरं तर आपल्या सोसायटीत किती छान कार्यक्रम व्हायचा. बाहेर जाण्याची गरजच वाटत नसे. बाहेर एक तर सर्व हॉटेल्समधून गर्दी भयंकर. तासन्तास ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय ते जेवण महाग किती पडतं? जा, खा अन् परत या. यात कसली आलीय मजा? सोसायटीचा कार्यक्रम खरंच छान असतो.’’

रियाने पुन्हा विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय बेत आहे? पवनकडे जाणार आहात का?’’

‘‘सांगणं अवघड आहे. अजून तरी काहीच ठरलेलं नाहीए.’’

हाउसीचा एक आणखी राउंड, थोड्या गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं अन् किटी पार्टी संपली. मंडळी घरोघर निघून गेली.

मालिनीही घरी आली. कपडे बदलून ती पलंगावर आडवी झाली. समोरच शेखरचा, तिच्या नवऱ्याचा फोटो होता. त्याकडे नजर जाताच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

शेखरला जाऊन आता सात वर्षं झाली होती. मॅसिव्ह हार्टअॅटक आला अन् काहीही करायची उसंत न देता शेखर गेला. एकुलता एक मुलगा पवन अन् ती मुलुंडच्या टू बेडरूम फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत राहात होती. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. बरे आनंदात दिवस जात होते. पण नीतूला, म्हणजे सुनेला वेगळं घर हवं होतं. पवनचाही तिला पाठिंबा होता. खरं तर मुलगी नसल्याने मालिनीने नीतूला मुलीसारखंच प्रेम दिलं होतं. तिचे सगळे दोष पोटात घातले होते. सर्व लाड पुरवले होते.

पवनचं ऑफिस अंधेरीला होतं. पवनने म्हटलं, ‘‘आई, येण्याजाण्यात वेळही फार जातो शिवाय दमायलाही होतं. मी विचार करतोय अंधेरीतच एक फ्लॅट घ्यावा…’’

‘‘तुला जे योग्य वाटेल ते कर. हे घर भाड्याने द्यावं लागेल ना? इथलं सर्वच सामान शिफ्ट करायचं का?’’ मालिनीने विचारलं.

‘‘भाड्याने? हे घर भाड्याने का द्यायचं? तुला राहायला हे घर लागेलच ना?’’

मालिनीला धक्काच बसला. ‘‘मी इथे? एकटीच? एकटी कशी राहीन मी?’’

‘‘त्यात काय झालं? अगं, तिथे मी वन-बेडरूमचं घर घेणार आहे. तिथे तुला अडचण होईल ना? इथे बरी मोकळीढाकळी राहाशील. तुझ्या भरपूर ओळखी आहेत इथे. नव्या ठिकाणी या वयात अॅडजेस्ट व्हायला त्रासच होतो गं! शिवाय अधूनमधून आम्ही येऊ इथे. तूही येत जा तिथे.’’

यावर सगळे अश्रू डोळ्यांतून मागे परतून लावून मालिनीने परिस्थिती स्वीकारली होती. दुसरा पर्यायही नव्हता. उत्साहाने दोघं नव्या घरात निघून गेली. आर्थिकदृष्ट्या मालिनीला काही प्रॉब्लेम नव्हता. शेखरने छान नियोजन करून ठेवल्यामुळे मालिनीच्या हातात भरपूर पैसा होता. शिवाय ती विचारी, समंजस अन् धीराची होती. गेली वीस वर्षं ती या सोसायटीत राहात होती. सर्वांशी तिचे संबंध सलोख्याचे होते. मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, सर्वांशी जमवून घ्यायची वृत्ती यामुळे सोसायटीतल्या लहानथोर सर्वांनाच तिच्याबद्दल आपुलकी अन् आदर वाटत असे. एम.ए.बी.एड असल्याने ती लहान मुलांच्या ट्यूशन्स घेत होती. तो एक छान विरंगुळा होता.

नीतूला दिवस गेल्यावर पवन अधूनमधून मालिनीला आपल्या घरी नेत होता. सासू सुनेचे सर्व डोहाळे पुरवत होती. बाळंतपणाच्या महिनाभर आधीच मालिनी पवनच्या घरी जाऊन राहिली. नीतूला मुलगा झाला. नीतूचे आईवडील परदेशातच राहात असल्यामुळे ते इथे येऊन राहाणं शक्यच नव्हतं. लहानग्या यशची तीन महिने छान काळजी घेतली मालिनीने. बाळंतिणीलाही भरपूर विश्रांती, तेलमालिश, सकस, सात्त्विक आहार, सगळंच यथासांग केलं. यश तीन महिन्यांचा झाला अन् पवनने आईला परत तिच्या घरी आणून सोडलं. लहानग्या यशला सोडून येताना मालिनीला रडू अनावर झालं होतं. पण काय करणार?

सणावाराला, काही समारंभ असला म्हणजे पवन त्यांना घ्यायला यायचा. त्याही आनंदाने जायच्या. पण तिथं पोहोचल्याबरोबर घरातली सगळी कामं त्यांच्या अंगावर टाकून दोघं नवराबायको खरेदीसाठी, भटकण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी निघून जायची. यशलाही त्यांच्यावरच सोपवून जायची. जाताना अमूक खायला कर, तमुक खायला कर हेही बजावून जायची. यशला सांभाळून सगळं करताना त्याची धांदल व्हायची. जीव दमून जायचा. काम झालं की लगेच पवन त्यांना घरी सोडून यायचा. इथे घरी त्यांची खूप जुनी मोलकरीण होती. तिचा मालिनीवर जीव होता. ती मनोभावे तिची सेवा करत असे. मालिनीची कुतरओढ तिला समजत होती.

यंदाच्या दिवाळीला पवनने मालिनीला घरी नेलं. ढीगभर फराळाचे जिन्नस तिच्याकडून करवून घेतले. चार दिवस सतत काम केल्याने मालिनीची कंबर दुखायला लागली. ते नीतूच्या लक्षात येताच तिने पवनला म्हटलं, ‘‘आजच आईला घरी सोडून ये. सगळं काम तर झालंच आहे. आता आरामच करायचाय तर त्यांनी त्यांच्या घरी करावा.’’

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पवनने आईला तिच्या घरी नेऊन सोडलं. मालिनीला त्या क्षणी लक्षात आलं, मुलगा किंवा सून तिची नाहीत. यापुढे ती कधीही त्यांच्या घरी जाणार नाही. दिवसभर राबून दमलेल्या जिवाला दोन प्रेमाचे शब्द हवे होते. पण तिथे तर कोरडा व्यवहार होता. समोरच्या फ्लॅटमधल्या सारिकाने त्यांचं घर उघडं बघितलं तर ती चकित झाली.

‘‘मावशी, आज तुम्ही इथे? पवन…पवन अन् नीतूही आली आहेत का?’’

‘‘नाही आली,’’ भरल्या कंठाने मालिनीने म्हटलं. त्यांची विद्ध नजर सगळं सांगून गेली. सारिकाला काही विचारण्याची गरजच भासली नाही. तिनेच पटकन् घराचा केर काढला. पुसून घेतलं. दारापुढे रांगोळी घालून चार पणत्याही लावल्या. एका ताटात फराळाचे पदार्थ रूमालाखाली झाकून आणून टेबलावर ठेवले. रात्री जेवायचं ताटही घेऊन आली अन् बळजबरी मालिनीला चार घास खायला दिले.

त्या दिवसाच्या आठवणीने आत्ताही मालिनीचे डोळे पाणावले. आज रियाकडे जाण्यासाठी मालिनी आवरत असतानाच पवनचा फोन आला, ‘‘आई न्यू ईयरला तुला घ्यायला येतो. माझे बॉस अन् कलिग्ज डिनरसाठी येणार आहेत.’’

एरवी फोन केला तर पवन, ‘मी बिझी आहे, नंतर फोन करतो,’ म्हणून फोन कट करायचा. आजचा फोन दिवाळीनंतर प्रथमच आला होता. नीतूही केव्हातरी अगदी औपचारिक फोन करते.

फोनच्या आवाजाने मालिनी पुन्हा वर्तमानकाळात आली. फोन नीतूचाच होता.

‘‘आई, नमस्कार, कशा आहात?’’

‘‘बरी आहे मी. तुम्ही तिथे कसे आहात?’’

‘‘आम्ही ठीकठाक आहोत आई, पवनने तुम्हाला सांगितलंच असेल. न्यू ईयरची पार्टी आहे. वीस एक लोक असतील. तुम्ही दोन दिवस आधीच या. मला तर स्वयंपाक येत नाही. तुमच्या हातचं जेवण सर्वांना आवडतंही! तर, तुम्ही तयारीत राहा. मी नंतर पुन्हा फोन करते,’’ फोन बंद झाला.

‘किती चतुर अन् लबाड, स्वार्थी अन् कोरडी आहेत ही माणसं’?मालिनीच्या मनात आलं. पोटचा पोरगाच असा आहे तर सुनेला काय दोष द्यायचा? जाऊ दे. आता आपण फक्त आपला विचार करायचा. त्यांच्या हातातली कठपुतली नाही व्हायचं. दिवाळीत काम करून कंबर दुखून आली होती. आठ दिवस लागले बरं व्हायला. आता पुन्हा तिथे जायचं नाही. कशाला त्रास करून घ्यायचा स्वत:ला?

डिसेंबरची किटीपार्टी रेखाच्या घरी होती.

न्यू इयर सेलिब्रेशनचा विषय निघाला, ‘‘खरं तर जागा लहान पडते, नाही तर काही कार्यक्रम ठरवायला हरकत नाही.’’ अंजलीने म्हटलं.

रेखाने विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय कार्यक्रम आहे? पवनकडे जाणार का?’’

‘‘अजून ठरवलं नाहीए,’’ मालिनीने म्हटलं. ती काही तरी विचारात गढली होती.

‘‘मावशी, कसला विचार करताय?’’

सर्वांच्याकडे बघत मालिनी म्हणाली, ‘‘विचार असा करतेय की तुम्ही न्यू इयरची पार्टी माझ्या घरी करू शकता. भरपूर मोकळी जागा आहे, माझं रिकामं घर तुम्हा सर्वांच्या येण्याने आनंदाने भरून जाईल.’’

‘‘काय म्हणता? तुमच्या घरी?’’ आश्चर्याने सर्वांनी म्हटलं.

‘‘त्याला काय झालं? आपण दणक्यात करू पार्टी,’’ मोकळेपणाने हसत मालिनीने म्हटलं.

‘‘काय मस्त कल्पना आहे…पण मावशी. तुम्ही पवनच्या घरी…’’ रिया म्हणाली.

‘‘यावेळी सगळं वेगळंच करायचं आहे. नव्या वर्षांची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची. झकास सेलिब्रेशन करून. डिनर बाहेरून ऑर्डर करू. गेम्स खेळू,  मुलं कार्यक्रम देतील. डिनर करू…मजा येईल. खरं तर आपला हा ग्रूप जिथे जमतो ना, तिथे मजाच मजा असते.’’

रियाने तर आनंदाने मालिनीला मिठीच मारली. ‘‘व्वा! मावशी, किती मज्जा. जागेचा प्रॉब्लेम सुटला अन् इतका छान कार्यक्रमही ठरला. व्वा!’’

‘‘आणि बरं का मावशी, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्याजणी मिळून सांभाळू सगळं. अन् खर्च सगळे मिळून वाटून घेऊयात,’’ सारिकाने सांगितलं.

‘‘अगं, तुम्हा सगळ्यांनाच सांगते,’’ मालिनीने म्हटलं, ‘‘फक्त न्यू ईयरच नाही, तुम्हाला एरवीही कधी काही समारंभाची पार्टी करायची असेल तर माझं घर मोकळंच असतं अन् माझ्या घरात तुम्ही सगळे आलात तर मलाही आनंदच वाटतो ना? एकाकी आयुष्यात तेवढंच चैतन्य अन् आनंद.’’

‘‘पण मावशी, पवन…घ्यायला आला तर?’’

‘‘नाही, मी जाणार नाही, इथेच राहाणार आहे.’’

त्यानंतर काही दिवसांनी सगळ्या मालिनीच्या घरी जमल्या. पार्टीला कोण कोण येणार? एकूण किती माणसं, मोठी किती, मुलं किती, मेन्यू काय, कुठून काय आणायचं, कोणावर कसली जबाबदारी असेल, म्युझिक, माइक, लायटिंग, तंबोला, मुलांचे कार्यक्रम सर्व गोष्टी अगदी तपशीलवार ठरल्या. लिहून काढल्यामुळे गडबडघोटाळ्याला वाव नव्हता. न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली.

तीस डिसेंबरला सकाळी पवनचा फोन आला. ‘‘आई, तुला घ्यायला येतोय, आवरून तयार राहा.’’

‘‘नाही रे बाळा, यावेळी मी येऊ शकणार नाही.’’

‘‘का?’’

‘‘माझाच काही कार्यक्रम ठरला आहे.’’

पवन वैतागून म्हणाला, ‘‘तुझा कसला कार्यक्रम? एकटीच तर आहेस तिथे…’’

‘‘नाही रे, एकटी नाहीए मी. खूप लोक आहेत इथे सोबतीला. न्यू ईयरची पार्टी ठेवलीय घरी.’’

‘‘आई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? या वयात पार्टी करते आहेस? अन् इथे माझ्याकडे कोण करेल सगळं?’’

‘‘वयाचा विचार तर मी केला नाही…पण यावेळी मला जमणार नाही.’’

आता पवनने सूर बदलला, ‘‘आई, यावेळी तू एकटी नको राहूस. मुलाच्या घरी तुला अधिक चांगलं वाटेल ना?’’

‘‘एकटी तर मी गेली कित्येक वर्षं राहतेच आहे रे, त्याची मला सवय झालीए.’’

पवनने संतापून म्हटलं, ‘‘जशी तुझी इच्छा…’’ त्याने रागानं फोन आपटला.

त्याचा रागाने लाल झालेला चेहरा बघून नीतूने विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘आई येत नाहीए.’’

‘‘का?’’

‘‘तिच्या घरी पार्टी ठेवलीए तिने.’’

‘‘का? अन् कशाला? आता इथल्या पार्टीचं कसं व्हायचं? मला तर इतक्या लोकांचा स्वयंपाक जमणारच नाही.’’

‘‘पण आता तर तुलाच करावं लागेल.’’

‘‘छे: छे:, मला नाही जमणार.’’

‘‘पण मी सगळ्यांना बोलावून ठेवलंय.’’

‘‘तर मग हॉटेलमधून मागवून घे.’’

‘‘छे: छे:, फारच महाग पडतं ते.’’

‘‘मग बघ काय करायचं ते.’’

दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. शेवटी पवनने सर्वांना फोन करून आई आजारी असल्याने पार्टी कॅन्सल केल्याचं सांगितलं. दोघंही आईवर अन् एकमेकांवरही संतापलेली होती.

‘‘तू आईशी चांगली वागली असतीस तर आज असं खोटं बोलावं लागलं नसतं,’’

पवन म्हणाला, ‘‘आईने कामाशिवाय इथे राहिलेलं तुला खपत नव्हतं ना सतत, लगेच तिला पोहोचवाचा लकडा लावायचीस?’’

‘‘मला काय म्हणतोस? झी आई आहे, तूच तिला समजून घ्यायला कमी पडलास, मी तर सून आहे…मी काय करणार?’’

दोघं एकमेकांना दोष देत राहिली. भांडणं संपेना. दोघांची तोंडं फुगलेली.

हाउसी, लायटिंग, माइक, म्युझिक, गेम्स, मुलांची नाटकं, डान्स, चविष्ट जेवण या सगळ्याबरोबर ‘हॅप्पी न्यू ईयर’चा घोष. असं सगळं सगळं झालं. पण ते पवनकडे नाही, मालिनीच्या घरी. नववर्षांच्या शुभेच्छांच्या वर्षांवात मालिनी न्हाऊन निघाली. यापुढची सगळीच वर्षं अशी आनंदात जाणार होती.

आजी बदलली आहे

कथा * ऋतुजा सोनटक्के

गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.

मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.

पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.

पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?

माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.

एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’

आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’

त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’

‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.

‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.

मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.

आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.

आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.

एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.

‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’

‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’

मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’

‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’

यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’

माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.

‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.

बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.

आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.

एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.

तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.

आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’

‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.

आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.

क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’

‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.

दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,

‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.

मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’

आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.

आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.

आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.

मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’

आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.

आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’

मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.

‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.

शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’

‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’

‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’

आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’

एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’

महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.

आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?

मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’

आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून  शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून  तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’

खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.

आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.

निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.

आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’

निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’

वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें