अद्भूत सौंदर्याची खाण अजिंठा-एलोरा (वेरुळ) लेणी

* प्रतिनिधी

अजिंठा-एलोराच्या लेण्यांच्या दुनियेचा फेरफटका म्हणजे एक सुंदर अनुभूती असते. तुम्ही जर कलाप्रेमी असाल आणि पुरातन काळातील ऐतिहासिक वास्तू व कलाकृतींचे प्रशंसक असाल, तर अजिंठा-एलोरा तुमच्यासाठी एक खूपच छान पर्यटन स्थळ आहे. या लेण्यांना १९८३ मध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. येथील गुंफांमध्ये केली गेलेली चित्रकारी व मूर्तिकला खूपच अद्वितीय आहे.

औरंगाबादपासून जवळपास २ तासांच्या टॅक्सी प्रवासानंतर अजिंठाच्या गुंफांपर्यंत पोहोचता येईल. जगप्रसिद्ध अजिंठा-एलोराची चित्रकारी व गुंफा कलाप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहिल्या आहेत. विशालकाय खडक, हिरवळ, सुंदर मूर्ती आणि इथून वाहणारी वाघोरी नदी येथील सौंदर्य द्विगुणित करतात.

अजिंठामध्ये छोटया-मोठया ३२ प्राचीन गुंफा आहेत. २००० वर्षे जुन्या अजिंठाच्या गुंफेच्या द्वारांना खूपच सुंदर पद्धतीने सजविण्यात आले आहे. घोडयाच्या नालेच्या आकाराच्या या गुंफा अत्यंत प्राचीन असून, त्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे. आकर्षक चित्रे आणि भव्य मूर्तींबरोबरच येथील सिलिंगवर बनविलेली चित्रे अजिंठाच्या गुंफांना एक आगळेवेगळे सौंदर्य प्रदान करतात. या सुंदर कलाकृती साकारण्यासाठी कोणते तंत्र वापरण्यात आले, हे अजूनही एक गूढच आहे. हे गूढ उकलण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक इथे येतात.

वाघोरा नदी येथील सौंदर्यात आणखी भर टाकते. या गुंफांचा शोध आर्मी ऑफिसर जॉन स्मिथ व त्यांच्या दलाने १८१९ साली लावला असे सांगितले जाते. ते या ठिकाणी शिकार करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना या ओळीत बनलेल्या २९ गुंफा दिसल्या. त्यानंतरच या गुंफा संपूर्ण जगात प्रसिद्ध झाल्या.

येथील सुंदर चित्रकारी व मूर्ती कलाप्रेमींसाठी अनमोल भेट ठरल्या आहेत.

हातोडी आणि छेनीच्या मदतीने कोरलेल्या या मूर्ती सौंदर्याचा अप्रतिम नमुना आहेत. या लेणी पाहण्यासाठी आपल्याला अनेक वेळा पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात. त्यामुळे इथे जाताना तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने फिट असणे आवश्यक आहे. इथे प्रत्येक गुंफेबाहेर एक बोर्ड लावला आहे, त्यावर हिंदी व इंग्रजीमध्ये गुंफांची संख्या आणि त्यांच्यासंबंधी माहिती दिलेली आहे. चित्रांचे आयुष्य तीव्र प्रकाशामुळे कमी होत असल्यामुळेच, गुंफांमध्ये चार ते पाच लक्सचा प्रकाश असतो. अर्थात, मिणमिणत्या मेणबत्तीसारखा प्रकाश. कोणत्याही चित्राच्या सौंदर्याची जाणीव होण्यासाठी ४० ते ५० लक्स तीव्रतेच्या प्रकाशाची गरज असते.

एलोराच्या गुंफा

औरंगाबादपासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर एलोरा लेणी आहेत. एलोरामध्ये ३४ गुंफा आहेत. या गुंफा बसाल्टिकच्या डोंगराच्या किनाऱ्या-किनाऱ्यावर बनलेल्या आहेत.

महत्त्वपूर्ण बाबी

मुंबई, पुणे, अहमदाबाद, नाशिक, इंदूर, धुळे, जळगाव इ. शहरांतून औरंगाबादसाठी बसच्या सुविधा उपलब्ध आहेत. सोमवार सोडून आपण कधीही अजिंठा एलोराला जाऊ शकता. औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून दिल्ली व मुंबईसाठी ट्रेनची सुविधा आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्र पर्यटन विभागाचे हॉटेल आहे.

* जर गरमीच्या मोसमात जात असाल, तर सकाळी लवकर पोहोचा. सोबत पाणी, हॅट आणि सनग्लासेस घ्यायला विसरू नका. अर्थात, इथे पर्यटनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वात उत्तम काळ आहे.

* गुंफांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चढावाचा मार्ग निवडावा लागेल. नंतरचा मार्ग सरळ आणि सोईस्कर आहे. म्हणूनच इथे जाताना आरामदायक चप्पल घाला.

* वानरांपासून सावध राहा.

* युनेस्कोचा वारसा असलेले हे ठिकाण संपूर्ण पाहण्यासाठी आपल्याला ३ ते ४ तास पुरेसे असतात. तसेही संपूर्ण दिवसभरासाठी ही ट्रीप तुम्हाला आनंद देऊन जाईल.

* जेवणासाठी एमटीडीसीची रेस्टॉरंट खूप चांगली आहेत.

* तिकीट विभागाजवळ फिरणाऱ्या फेरीवाल्यांपासून सावध राहा. ते खूप त्रास देतात.

आवश्यक गोष्टी

  • आपल्या ओळखीच्या दुकानांवर घेऊन जाणाऱ्या गाइड्सपासून सावध राहा. तिथे त्यांचे कमिशन ठरलेले असते. त्यामुळे त्या दुकानांत मिळणाऱ्या वस्तू महाग असतात.
  • वयोवृद्धांसाठी इथे जाणे थकवा आणणारे ठरू शकते. म्हणूनच जे प्रकृतीने स्वस्थ असतील, त्यांनीच इथे जावे. इथे जाण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे थंडीचा मोसम.
  • सकाळी लवकरात लवकर गुंफांपर्यंत पोहोचा आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पुन्हा औरंगाबादला परता. जेणेकरून तुम्हाला बीबी का मकबरा, पंचकी, सिद्धार्थ गार्डन व प्राणिसंग्रहालय यांसारख्या पर्यटनस्थळांचाही आनंद घेता येईल.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें