९ टीप्स आनंदी गरोदरपणासाठी

* नसीम अन्सारी कोचर

वर्षानुवर्षांची अशी प्रथा आहे की, महिलेला दिवस जाताच घरातल्या अन्य महिला तिच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेऊ लागतात. जुन्या काळात चणे, गूळ, दूध, खवा, फळे इत्यादींचे सेवन करणे गरोदर महिलेसाठी गरजेचे होते, जेणेकरून तिच्या शरीराला रक्ताची कमतरता भासू नये. परंतु सध्या एकत्र कुटुंब राहिलेली नाहीत. शहर आणि महानगरात महिला केवळ आपल्या नवऱ्यासोबत राहतात, सोबतच नोकरीही करतात. त्यामुळेच स्वयंपाकघरात स्वत:च्या गरोदरपणासाठी पौष्टिक बनवण्याइतका वेळ तिच्याकडे नसतो आणि त्याबाबत तिला माहितीही नसते.

याशिवाय आजकालच्या महिला कमनीय बांध्यासाठी गरजेपेक्षा जास्तच काळजी घेतात. वजन वाढले तर आपण खराब दिसू, अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळेच गरोदर असतानाही पुरेसे खात नाही आणि त्यामुळे त्यांना प्रसूतीवेळी अॅनेमिया म्हणजे रक्तक्षयाचा त्रास जाणवतो.

गरोदरपणात बाळाच्या विकासासाठी शरीर अधिक प्रमाणात रक्त तयार करते. त्यामुळेच तुम्ही या काळात पुरेशा प्रमाणात लोह आणि पौष्टिक अन्न ग्रहण केले नाही तर तुमच्या शरीरात जास्त रक्त तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाल पेशींची निर्मिती थांबते. रक्तक्षयामुळे शरीरातील उती आणि भ्रुणापर्यंत ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी शरीरातील रक्त पुरेशा प्रमाणात निरोगी लाल रक्त पेशी बनवू शकत नाही. गरोदरपणात हृदयाला भ्रुणाला आवश्यक पोषण मिळवून देण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.

गरोदरपणात शरीरातील रक्ताचे प्रमाण ३० ते ५० टक्के वाढते. गर्भावस्थेदरम्यान रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हिमोग्लोबिनच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचे असते. लाल रक्त पेशींपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन घेऊन जण्याचे काम हिमोग्लोबिन करते. गरोदरपणात रक्तक्षय होतोच.

आई किंवा सासूने बनवलेले पिठाचे तुपातील आणि खव्याचे लाडू मिळाले नाहीत म्हणून फारसे बिघडत नाही. त्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील त्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा ज्यात लोह जास्त प्रमाणात असते. शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्त पेशींचे प्रमाण योग्य रहावे यासाठी लोहयुक्त पदार्थ खाणे गरोदर महिलेसाठी खूपच गरजेचे असते. गरोदर महिला कोणत्या पदार्थांमुळे स्वत:ला आणि होणाऱ्या बाळाला निरोगी ठेवू शकते, हे माहिती करून घेऊया :

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या लोहाने युक्त असतात. गरोदरपणात या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर लोहयुक्त आहाराचा तुम्हाला फायदाच होईल. लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीस मदत करते जे लाल रक्त पेशी तयार करते.

पालक, केळी, ब्रोकली, कोथिंबीर, पुदिना आणि मेथीदाणा हे लोहयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे असतात.

सुकामेवा

खजूर आणि अंजिरात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते. अन्य सुकामेवा जसे की, अक्रोड, किसमिस आणि बदामही खाता येईल. हे सर्व गरोदर महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करू शकतात. खजूर आणि अक्रोडही रक्त वाढीसाठी उपयुक्त असतात. रात्री ३ अक्रोड पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा.

डाळी

डाळींमध्ये लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. सलाड किंवा सूप केल्यास त्यामध्ये डाळी घाला. मटार, डाळी आणि बीन्समध्ये जीवनसत्त्वे, खनिज, लोह आणि प्रथिने असतात. त्यामुळे यांचा गर्भवती महिला आपल्या आहारात समावेश करू शकतात.

शतावरी

यात मोठया प्रमाणावर लोह असते. तुम्ही गरमागरम शतावरी सूप एक कप पिऊ शकता. यात लोहाचे प्रमाण आणखी जास्त वाढवण्यासाठी तुम्ही तिळाच्या बियांचाही वापर करू शकता.

ताजी फळे

ताजी फळे जसे की, डाळिंब आणि संत्र्यांमुळे हिमोग्लोबिन वाढू शकते. डाळिंबात लोह भरपूर प्रमाणात असते आणि संत्र्यांमध्ये क जीवनसत्त्व असते जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि हिमोग्लोबिनच्या पातळीतही वाढ होते. किवी, पीच, द्राक्षे आणि पेरूमध्ये मोठया प्रमाणात लोह असते.

फॉलिक अॅसिड

फॉलेट किंवा फॉलिक अॅसिड हे एक प्रकारे ब जीवनसत्त्व आहे, जे सहज मिसळून जाते. हे गर्भावस्थेत भ्रुणाचे न्यूरल ट्यूब दोषापासून रक्षण करण्यासाठी मदत करते. हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी हे जीवनसत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फॉलिक अॅसिडची गरज भागविण्यासाठी मका, केळी, मोड आलेली कडधान्ये, अवाकॅडो आणि भेंडी खावीत. यात पुरेशा प्रमाणात फॉलिक अॅसिड असते.

स्मूदी आणि बिया

भोपळयाच्या बिया, बदाम आणि सूर्यफुलांच्या बियांमध्येही लोह मोठयाप्रमाणात असते. गर्भवती महिला याचे सेवन करून आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवू शकतात. सफरचंद, बीट आणि गाजराची स्मूदीही फायदेशीर असते.

पूरक आहार

गरोदर महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वसाधारणपणे डॉक्टर लोहयुक्त पूरक आहार लिहून देतात. तुम्हाला कधी, कोणता आणि किती प्रमाणात लोहयुक्त पूरक आहार घ्यावा लागेल, हेही डॉक्टरच सांगतात.

मोबाईलपासून रहा दूर

गरोदरपणात मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर रहा. गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. या काळात तुम्ही चांगले साहित्य आणि चांगली पुस्तके वाचू शकता.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें