* सोमा घोष
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अभिनेत्री जानकी पाठकने ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. तिला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते, त्यामुळेच शाळा आणि महाविद्यालयात असताना ती नाटकात काम करू लागली. ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ हा तिचा चित्रपट बराच गाजला. या चित्रपटामुळेच लोक तिला ओळखू लागले. जिद्द आणि प्रचंड मेहनतीमुळेच ती इथपर्यंत पोहोचली. शांत आणि हसतमुख स्वभावाच्या जानकीला आव्हानात्मक भूमिका साकारायला आवडतात. त्यामुळेच अनेकदा नकार मिळूनही ती हिंमत हरली नाही आणि शेवटी यशस्वी झाली. सध्या ती सन मराठी वाहिनीवरील ‘माझी माणसं’ या मालिकेत गिरिजाची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जानकीने वेळात वेळ काढून गृहशोभिकेशी संवाद साधला. सादर आहे त्यातील काही भाग.
तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
लहानपणापासून मला चित्रपट पाहायला आणि तसा अभिनय करायला आवडायचे. त्यामुळेच वयाच्या ५व्या वर्षीच मी अभिनेत्री व्हायचे ठरवले होते. माझ्या आईवडिलांनी लहानपणापासूनच मला संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनय इत्यादी सर्वच शिकवायला सुरुवात केली होती आणि ते मला प्रचंड आवडायचे. लहानपणी बालनाट्यात काम करण्यासोबतच शाळेतही मी अनेक नाटकांमध्ये काम केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी अनुपम खेर यांच्या अॅक्टिंग क्लासेसमधून डिप्लोमा केला. महाविद्यालयातील नाट्य स्पर्धेत भाग घेऊ लागले आणि त्यानंतर हळूहळू व्यावसायिक ऑडिशन देऊ लागले.
तुला पहिला ब्रेक कसा मिळाला?
मी वयाच्या १७व्या वर्षी ‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ या चित्रपटात काम केले. त्यावेळी माझे वडील जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. त्यांनी लिखाणास सुरुवात केली आणि या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले. माझे वडील आणि माझ्यासाठीही तो पहिला मराठी चित्रपट होता. आम्ही दोघांनी मराठी चित्रपट क्षेत्रात एकत्रच पदार्पण केले. आमच्यासाठी हा एक प्रयोग होता, पण समीक्षकांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मला पुरस्कारही मिळाले. त्यावेळी मी १७ वर्षांची आणि थोडी गुबगुबीत होते. त्यामुळे त्या चित्रपटाचा मला फार जास्त फायदा झाला नाही.
कोणत्या मालिकेमुळे तू घराघरात पोहोचलीस?
‘व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ नंतर मी ४ भूमिका केल्या. यातील २ मुख्य भूमिका होत्या. त्यातील एक लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर मला ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट मिळाला. तो माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. तो एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. सध्या मी ‘माझी माणसं’ या मराठी मालिकेत काम करत आहे.
या मालिकेत तू कोणती भूमिका साकारत आहेस?
या मालिकेत मी गिरिजा नावाची मुख्य भूमिका साकारत आहे, जिथे कुटुंबात मी एकमेव कमावती आहे. माझ्याकडे पैसे मागायला सर्व घाबरतात. मी सर्वांना शिस्त लावते. गिरिजा तिच्या कमाईवर खुश आहे आणि सर्वांना चांगले काम करण्यासाठी सतत प्रोत्साहन देते.
वास्तव जीवनात तू गिरिजासारखीच आहेस का?
मी गिरिजासारखी मुळीच नाही. मी खूपच बिनधास्त आहे. फार काळजी करत नाही. गिरिजा मात्र शिस्तप्रिय आहे. पैसे अतिशय विचारपूर्वक खर्च करते. कुठे किती खर्च होणार आहे, तो खर्च किती गरजेचा आहे, याबद्दल ती सतत चर्चा करते. तिच्यातील या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि या मालिकेमुळे मला त्या शिकायला मिळत आहेत.
या भूमिकेचा तुझ्या जीवनावर कसा प्रभाव पडला?
आतापर्यंत प्रेक्षकांनी मला चित्रपटांतून पाहिले होते. आता ते मला या मालिकेतून दररोज पाहात आहेत. मी टीव्ही मालिका करत असल्यामुळे प्रेक्षक खुश आहेत. टीव्हीवर काम केल्यामुळे कलाकार त्यांच्या घरातील सदस्य होतो. तिथे जास्त प्रेम आणि आपलेपणा मिळतो, जे चित्रपटात शक्य नसते.
आतापर्यंतच्या कामांपैकी कोणते काम तुझ्या हृदयाच्या जवळ आहे?
‘एकलव्य’ या नावाने मी एक चित्रपट केला, जो पोस्ट प्रोडक्शनवर आधारित आहे. त्याच्या चित्रिकरणावेळी खूपच मजा आली, कारण त्याची कथा खूपच चांगली आहे.
तुला किती संघर्ष करावा लागला?
संघर्ष खूपच करावा लागला, कारण माझे वडील या इंडस्ट्रीतले नव्हते आणि त्यांच्यासह माझाही तो पहिला चित्रपट होता. त्यांचा संघर्ष हाही माझा संघर्ष होता. त्यावेळी मी जरा जास्त जाड होते, त्यामुळे पुढे अनेक ठिकाणी मला नकार मिळाला. त्यामुळे मला स्वत:वर बरीच मेहनत घ्यावी लागली. मी कधीच व्यावसायिक रंगभूमीवर काम केले नाही.
तू खूपच फॅशनेबल आहेस. फॅशनबद्दल तुला काय वाटते?
माझ्या दृष्टीने आत्मविश्वास हीच फॅशन आहे. तुम्ही जो कोणता ड्रेस घालता, दागिने किंवा मेकअप करता त्या सर्वांतून तुमचा आत्मविश्वास झळकत असेल तर त्यामुळे तुमचे सौंदर्य अधिकच खुलते. माझी स्टाईल नेहमीच बदलत राहते. चित्रिकरणावेळी मी कधी स्कर्ट तर कधी फ्रॅक घालून जाते. डिझायनर्सच्या ब्रँडला मी फारसे महत्त्व देत नाही. हँडलूम कपडे बनवणारे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांच्याकडूनच मी कपडे खरेदी करते. घरबसल्या काही गरीब महिला हे कपडे तयार करतात. असे कपडे टिकाऊ फॅशन ठरतात. यामुळे त्यांनाही घरखर्चासाठी काही पैसे मिळतात आणि कलाही टिकून राहाते. ट्रेंड काय आहे, हे पाहाणे मला आवडत नाही.
पावसाळयात सौंदर्याची काळजी कशा प्रकारे घेतेस?
मला दिवसभर शूटिंग करावे लागते. पावसाळयातही सनस्क्रीन लावते. फोन आणि लॅपटॉपमधूनही अतिनील किरणे बाहेर पडत असल्यामुळेच सनस्क्रीन लावावे लागते. मी घरगुती उपाय करते. जसे की, बेसन, दही आणि त्यात थोडी हळद टाकून पेस्ट तयार करते. ती आठवडयातून एकदा १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवते. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुते.
तू किती खवय्यी आहेस?
मी खवय्यी आहे. मला खायला आवडते, पण त्यातही माझी स्वत:ची अशी आवड आहे.
तुला काही संदेश द्यायचा आहे का?
महिलांना मला हेच सांगायचे आहे की, क्षेत्र कुठलेही असो, लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, पण तुमचा स्वत:वर विश्वास हवा. याशिवाय जे मदत करत नाहीत त्यांच्यावर अवलंबून राहू नका. स्वत:चा मार्ग स्वत: निवडा.
आवडता रंग – गुलाबी.
आवडता पोशाख – पाश्चिमात्य.
आवडते पुस्तक – टू किल अ मॉकिंग बर्ड.
पर्यटन स्थळ – देशात गोवा, कन्याकुमारी आणि परदेशात इटली.
वेळ मिळाल्यास – झोपणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे.
आवडता परफ्यूम – केरोलिना हेरार्स गुड गर्ल.
जीवनातील आदर्श – योग्य गोष्टीवर ठाम राहणे.
सामाजिक कार्य – प्राणी निवारा केंद्रात काम करणे, त्यांना आर्थिक मदत करणे.
स्वप्नातील राजकुमार – करिअरसाठी मदत करणारा.
स्वप्न – खेळ, चित्रपट.