* सुमन बाजपेयी

अहमदाबाद, ज्याला स्थानिक भाषेत अम्दावाद म्हटले जाते ते गुजरातमधील एक महत्त्वाचे शहर आहे. हे भारतातील ७व्या क्रमांकाचे सर्वात मोठे महानगर क्षेत्र असून गुजरात राज्याची जुनी राजकीय राजधानी अशीही त्याची ओळख आहे. पर्यटनासंदर्भात केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळेच सध्या हे एक आवडते पर्यटन स्थळ बनले आहे.

आमच्या भटकंतीची सुरुवात आम्ही गांधी आश्रमापासून केली. आमचा ग्रुप असल्यामुळे आम्ही खासगी गाडी केली होती. त्यामुळे वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ वाचला.

गांधी आश्रम : गुजरात हे जितके अजरामर संस्कृती आणि वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहे तितकेच पर्यटन स्थळांसाठीही लोकप्रिय आहे. पोरबंदरमध्ये जन्मलेल्या गांधीजींना अहमदाबादबाबत विशेष आत्मीयता होती. म्हणूनच तर तेथे साबरमती आश्रमाची स्थापना करण्यात आली. १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांचे निवासस्थान येथेच होते. कस्तुरबाही येथेच राहत. दोघांच्या खोल्या येथे पहायला मिळतात. साबरमती ज्याला आता गांधी आश्रम असे संबोधले जाते त्या आश्रमातील सर्व वातावरण असे काही भारावल्यासारखे आहे की, जणू बापूजी येथेच आपल्या जवळपास असल्यासारखा भास होतो. येथील संग्रहालयात गांधीजींशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध आहे. गांधीजींच्या जीवनाशी जोडली गेलेली दुर्मीळ चित्रे पाहून वाटते की, जणू ते अजूनही आपल्यातच आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी भारतात आपला पहिला आश्रम २५ मे १९१५ रोजी अहमदाबादमधील कोचराब येथे स्थापन केला. या आश्रमाला १७ जून १९१७ रोजी साबरमती नदीच्या किनारी स्थलांतरित करण्यात आले. साबरमती नदी किनारी वसल्याने त्याचे ‘साबरमती आश्रम’ असे नामकरण करण्यात आले. तो ‘हरिजन आश्रम’ आणि ‘सत्याग्रह आश्रम’ या नावानेही ओळखला जातो.

महात्मा गांधीजी १९१७ ते १९३० पर्यंत साबरमती आश्रमात वास्तव्यास होते. १२ मार्च १९३० रोजी मिठाच्या सत्याग्रह आंदोलनासाठी त्यांनी येथूनच दांडी यात्रेची सुरुवात केली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथेच बसून ते ब्रिटिश राजवटीविरोधात योजना आखत. हा आश्रम ३ वेगळयाच ठिकाणांनी वेढला आहे. एकीकडे विशाल साबरमती नदी आहे, दुसरीकडे स्मशानभूमी तर तिसरीकडे कारागृह आहे. गांधीजी येथे राहणाऱ्यांना सत्याग्रही म्हणत. त्यांचे असे मानणे होते की, सत्याग्रहींच्या जीवनात दोनच पर्याय असतात – कारागृहात जाणे किंवा जीवनाचा अंत करून स्मशानभूमीला आपलेसे करणे.

हृदयकुंज हे आश्रमाचे प्रमुख ठिकाण आहे. बापूजी येथेच राहत. त्यांनी वापरलेल्या वस्तू येथे आजही सांभाळून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांनी वापरलेले टेबल, चरखा, चरख्यातून तयार केलेला खादीचा सदरा तसेच गांधीजींनी स्वत: लिहिलेली काही पत्रेही जतन करून ठेवण्यात आली आहेत.

संग्रहालयातील एका दालनाला ‘माय लाईफ इज माय मेसेज गॅलरी’ असे म्हणतात. येथे गांधीजींच्या जीवनाशी संबंधित ८ भलीमोठी चित्रे आहेत. याद्वारे त्यांचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

साबरमती आश्रमासमोरच असलेल्या तोरण या उपहारगृहात सर्वोत्तम गुजराती थाळी मिळते. येथील भाजी, पोळी, पुरी, भाकरी, खिचडी, डाळ, फरसाण, चुरमुऱ्याचे लाडू, खीर आदींची चव इतकी उत्कृष्ट होती की, पोट भरले तरी मन काही केल्या भरत नव्हते.

येथून आम्ही लाला दरवाजाच्या दिशेने निघालो, जेथे प्रसिद्ध सिदी सय्यद मशीद आहे.

सिदी सय्यद मशीद : १५७३ मध्ये अहमदाबाद येथे मुघलांच्या राजवटीत तयार करण्यात आलेली ही शेवटची मशीद आहे. याच्या पश्चिमेकडील खिडकीच्या दगडांवर जगप्रसिद्ध कोरीव काम पहायला मिळते. बाहेरच्या परिसरात दगडांवरच खोदकाम आणि नक्षीकाम करून  एका झाडाचे चित्र रेखाटण्यात आले आहे, जे त्या काळातील शिल्पकलेच्या कौशल्याचा अनोखा नमुना आहे.

येथून आम्ही जवळच असलेल्या बाजाराच्या दिशेने निघालो. तेथे खरेदीसाठी आलेल्यांची गर्दी होती. या स्थानिक बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. मात्र आम्हाला काहीच खरेदी करायचे नव्हते. त्यामुळे आम्ही तेथून पुढे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या झुलता मिनार येथे गेलो.

झुलता मिनार : ही २ हलत्या मिनारची जोडी आहे. यातील एक सिदी बशीर मशिदीसमोरील सारंगपूर दरवाजात आहे तर दुसरी राज बीबी मशिदीसमोरील अहमदाबाद रेल्वे स्टेशनच्या आत आहे. यांचे वैशिष्टय म्हणजे एक मिनार हलू लागताच थोडया वेळाने दुसराही हलतो. सिदी बशीर मशिदीकडील मिनार तीन मजली आहे. यातील बाल्कनीवर बरेच नक्षीकाम करण्यात आले आहे. इतक्या सुंदर शिल्पाला कॅमेऱ्यात कैद करू न देणे हे आमच्यासाठी एखाद्या शिक्षेप्रमाणेच होते.

हथिसिंग जैन मंदिर : १५ वे जैन तीर्थंकर धर्मनाथ यांना समर्पित करण्यात आलेले हे मंदिर अहमदाबादमधील एक व्यावसायिक शेठ हथिसिंग यांच्या पत्नीने त्यांच्या स्मरणार्थ ई. पूर्व १८४८ मध्ये बांधले. सफेद दगडांचे बांधकाम असलेले हे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. यात एक मंडप, टॉवरसह घुमट आणि सुंदर नक्षीकाम केलेले १२ खांब आहेत. येथे जैन तीर्थंकरांची ५२ मंदिर आहेत. मंदिराबाहेर प्रवेशद्वारासमोर कीर्ती स्तंभ आहे. तो ७८ मीटर उंच असून यावर केलेले नक्षीकाम मुघलांच्या नक्षीकामाशी बऱ्याच अंशी मिळतेजुळते आहे. हे दुमजली मंदिर वास्तूकलेच्या एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. याच्या दोन कडांवर नक्षीदार गॅलरी आहेत.

संध्याकाळ झाली होती. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये परतलो. रात्री तेथेच जेवलो. हॉटेलमध्ये गुजराती जेवण मिळेल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे जे दिल्लीत खातात तेच डाळ, भाजी, कोशिंबीर, सॅलड इत्यादी खाल्ले,

सकाळी सर्वात आधी लॉ गार्डनजवळील हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन पाहून आलो. तेथे गुजराती पोशाख, चनियाचोळी आणि आर्टिफिशियल दागिनेच अधिक पाहायला मिळाले. दिल्लीत अशा प्रकारचे दागिने भरपूर मिळतात. त्यामुळे मी काहीच विकत घेतले नाही. हो, पण ज्यांची लहान मुले होती त्यांनी लेंगा खरेदी केला. येथून काही अंतरावरच सरखेज रोजा मशीद आहे.

सरखेज रोजा : सरखेज रोजा परिसर हा अहमदाबादच्या जादूई भूतकाळाची आठवण करून देतो. येथे एक मशीद, मकबरा आणि महाल आहे. जुन्या पण अतिशय देखण्या अशा या इमारतींचा समूह एका छोटया तलावाच्या किनारी वसला आहे. याचा वापर अहमदाबादमधील प्रशासक आश्रय घेण्यासाठी करीत होते. येथे एक मोठा प्रार्थना कक्ष, सुंदर घुमट आहे. विशिष्ट प्रकारच्या भौमितिक जाळया लावल्या आहेत, ज्यामुळे सूर्याची दिशा बदलताच जमिनीवर पडणाऱ्या प्रकाशाची आकृतीही बदलते. मशिदीची वास्तूकला अतिशय देखणी आहे. फ्रान्सिस वास्तूरचनाकार ले कोर्बसर यांनी येथील रचनेची तुलना ग्रीसमधील आर्कोपॉलिससोबत केली होती. त्यामुळेच याला अहमदाबादचे आर्कोपॉलिस असेही म्हणतात.

येथून आम्ही थेट ३२ किलोमीटर दूर असलेल्या गांधी नगरला जाण्यासाठी निघालो. येथे जाण्यासाठीचा रस्ता खूपच स्वच्छ आणि रुंद आहे. तो कधी संपला हे समजलेच नाही. वाटेत आम्ही ढोकळा खाल्ला आणि ताक पीले.

दांडी कुटीर : दांडी कुटीर हे महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित भारतातील सर्वात मोठे आणि एकमेव संग्रहालय आहे. येथे गांधीजींच्या सुरूवातीच्या जीवनातील काही भाग ऑडिओ व्हिज्युअलच्या मदतीने चांगल्या प्रकारे चित्रित करण्यात आला आहे. संग्रहालय विशेष करून गांधीजींच्या जीवनावर आधारित असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे बनविण्यात आले आहे. ज्यात ऑडिओ, व्हिडीओ आणि ३ डी दृश्य, ३६० डिग्री शो तसेच डिस्प्लेचा प्रयोग करण्यात आला आहे.

दांडी कुटीर ४१ मीटर उंच शंकूच्या आकाराच्या घुमटाच्या आत स्थित असून मिठाच्या ढिगाऱ्याचे प्रतीक आहे. हा मिठाचा ढिगारा ब्रिटिश सरकारने मिठावर लावलेल्या कराच्या विरोधात १९३० मध्ये गांधीजींनी काढलेल्या प्रसिद्ध दांडी यात्रेचे प्रतिनिधित्व करतो.

नवीन तंत्रज्ञानानेयुक्त दांडी कुटीरसारखे संग्रहालय अन्यत्र कुठेच नसेल. हे १०,७०० चौरस मीटरपर्यंत पसरलेले असून येथे ४०.५ मीटरचे मिठाचे संग्रहालय आहे. येथून बाहेर पडल्यावर जणू गांधीजींची पोरबंदर ते दिल्लीपर्यंतची संपूर्ण यात्राच पाहून आल्यासारखे वाटते. येथे १४ प्रकारचे मल्टिमीडिया आहेत. या यात्रेची सुरुवात तिसऱ्या मजल्यापासून होते. त्यानंतर आपण दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर येतो. हे एक स्वयं मार्गदर्शक संग्रहालय आहे, कारण येथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सेन्सरशी जोडला गेलेला हेडफोन दिला जातो. यात ऑडिओ गाईड सिस्टिम लावलेली असते. त्यामुळे तुम्ही ज्या चित्रासमोर उभे राहता त्याबद्दलची माहिती तुम्हाला ऐकायला मिळते.

दर अर्ध्या तासाला ५० जणांचा समूह आत जातो. संग्रहालय पाहण्यासाठी एक ते दीड तास लागतो. हे संग्रहालय गांधीजींचा जीवनपट उलगडत असले तरी त्यांचे विचार आणि आदर्श समजून घेणे, हा यामागचा खरा उद्देश आहे.

तिसऱ्या मजल्यावर गांधीजींच्या बालपणापासून ते त्यांच्या लंडनला जाण्यापर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या लंडन ते दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाचे वर्णन आहे. तर पहिल्या मजल्यावर एक ट्रेन आहे, ज्यात बसून ते बनारसला आले होते, जेव्हा बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पाया रचला गेला होता. स्वातंत्र्य लढयाशी जोडले गेलेले अनेक पैलूही येथे पाहायला मिळतात. येथे जाणे हे एखाद्या संस्मरणीय अनुभवापेक्षा कमी नाही.

येथून सुमारे १२ मिनिटांवर अक्षरधाम मंदिर आहे. येथील सुरक्षा व्यवस्था चोख असून कसून तपासणी नंतरच आम्ही आत जाऊ शकलो. हे एवढे मोठे आहे की, आम्ही वाट चुकणे स्वाभाविक होते. कधी आमचा एखादा सहकारी मिळत नसे तर कधी एखाद्या सहकाऱ्याला फोन करून शोधावे लागत असे. संध्याकाळ होऊ लागली होती. दिव्यांच्या प्रकाशात मंदिर झळाळून निघाले होते. गर्दीचा महासागर उसळला होता.

मानेक चौक : अहमदाबादला गेल्यानंतर जर तुम्ही येथील प्रसिद्ध बाजार असलेल्या मानेक चौक येथे गेला नाहीत तर तुमचा प्रवास अपूर्ण राहील आणि रोमांचकही ठरणार नाही. या बाजाराचे रुपडे दिवसातून तीनदा पालटते. सकाळी हा भाजीपाला बाजार असतो, दुपारी दागिने आणि कपडयांचा तर संध्याकाळी तो जेवणाच्या बाजाराच्या रुपात पाहायला मिळतो.

रस्ताच्या कडेला बुद्धिबळ : उत्तरी अहमदाबादहून सुमारे १ किलोमीटर दूर, जुन्या शहराच्या आत मिझापूर हे बुद्धिबळ खेळणाऱ्यांसाठी खेळाचे मैदान आहे. येथे रस्त्याच्या कडेला बसून अतिशय जलदपणे बुद्धिबळाचे डाव खेळले जातात. खेळाची सुरुवात संध्याकाळी होते आणि सकाळपर्यंत खेळ सुरूच राहतो. नियमितपणे येणारे काही लोक मागील ५० वर्षांपासून येथे बुद्धिबळ खेळत आहेत.

कसे पोहोचाल?

विमानाने : बहुतेक देशांतर्गत विमान कंपन्या या राज्याला भारतातील अन्य भागांशी जोडतात.

रेल्वेने : रेल्वेमुळे हे केवळ राज्याशीच नाही तर राज्याबाहेर भारताच्या इतर भागांशीही चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे.

रस्तामार्गे : गुजरातमधील महामार्गांचे जाळे भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत खूपच चांगले आहे. राज्यातील रस्त्यांची एकूण लांबी ६८,९०० किलोमीटर आहे. यापैकी राष्ट्रीय महामार्ग १,५७२ किलोमीटरचा आहे. या मार्गाने गुजरातला जाणे फारच सहज सोपे आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...