* आशिष श्रीवास्तव
नवजात बाळ आणि मोठयांच्या त्वचेत खूप फरक असतो, जसे की, नवजात बाळाची एपिडर्मिस म्हणजे बाह्य त्वचा मोठया माणसांच्या तुलनेत खूपच पातळ असते. त्याच्या घामाच्या ग्रंथी मोठयांच्या तुलनेत कमी काम करतात. यामुळे त्वचा ओलावा लवकर शोषून घेते. याशिवाय नवजात बाळाची त्वचा अतिशय कोमल असते. चला, माहिती करून घेऊया की, बाळाच्या कोमल त्वचेला या समस्यांपासून कसे सुरक्षित ठेवता येईल :
उत्पादनांवरील लेबल अवश्य वाचा : जर लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणाऱ्या एखाद्या उत्पादनावर हायपोअॅलर्जिक लिहिले असेल तर त्या उत्पादनाच्या वापरामुळे कदाचित बाळाला अॅलर्जी होऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ते बाळाच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे, असे सांगता येणार नाही. त्यामुळे नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य द्या. उत्पादनाच्या सामग्रीत थँलेट आणि पेराबिन असेल तर ते खरेदी करू नका.
उन्हाळयात बाळाची मालिश : बाळाच्या त्वचेवर गरमीमुळे व्रण उठू नयेत या भीतीने बाळाची आई उन्हाळयाच्या ऋतूत त्याची मालिश करणे बंद करते. असे मुळीच करू नका, कारण मालिश बाळाची हाडे मजबूत करण्यासोबतच बाळाच्या नर्व्हस यंत्रणेसाठीही फायदेशीर ठरते. पण हो, अशा ऋतूत मालिश करण्यासाठी खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही सौम्य तेल वापरा, सोबतच त्याला अंघोळ घालताना त्याच्या शरीरावरील तेल व्यवस्थित निघून जाईल, याकडेही लक्ष द्या.
बाळाचे कपडे आणि खोलीतील तापमान : तुमच्यासाठी ही गोष्ट नवीन असेल पण ती बाळासाठी सर्वात महत्त्वाची आहे. यासाठी वरचेवर घरातले तापमान तपासण्याची गरज नाही. फक्त त्याला सैलसर, मोकळा श्वास घेता येईल असे कपडे घाला. बाळ डोकं आणि तोंडावाटे उष्णता बाहेर टाकतो. त्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहते. म्हणूनच त्याला झोपवताना त्याचा चेहरा आणि डोकं झोकू नका. अन्यथा त्याच्या शरीरातील उष्णता वाढू शकते. याचा बाळाच्या चेहऱ्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो. कपडे मऊ नसल्यास बाळाच्या त्वचेला अॅलर्जी होते.
त्वचेच्या सुरक्षेसाठी विशेष कापड : बऱ्याच आई स्तनपान करताना, बाळाचे डायपर बदलताना किंवा त्याची शी, शू काढताना साध्या कापडाचा वापर करतात. असे करणे बाळाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असते. शिवाय यामुळे बाळाच्या त्वचेचेही नुकसान होते. अनेकदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाळाच्या गळयाखाली एकच लाळेरे बांधलेले असते. त्याचा वापर दिवसभर बाळाचे तोंड पुसण्यासाठी केला जातो. यामुळे बाळाची त्वचा कोरडी पडू शकते, शिवाय बाळ किटाणूंच्या संपर्कात येऊ शकते. यासाठी बाजारात बाळाला पुसण्यासाठी तयार केलेले खास प्रकारचे कापड उपलब्ध आहे. ते बाळाच्या त्वचेचे नुकसान होऊ न देता त्याला स्वच्छ करते. त्याच्या वापरामुळे बाळाच्या त्वचेवर व्रणही उमटत नाहीत.
लक्षात ठेवा की, बाळाच्या जन्माच्या १ वर्षापर्यंत त्याची त्वचा खूपच नाजूक असते. त्यामुळे त्वचेसंबंधी छोटया-मोठया समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच या काळात बाळाच्या त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर बाळ त्वचेसंबंधी विविध समस्यांचे शिकार ठरू शकते.