* सोमा घोष
मला घडवताना आईची भूमिका काय होती आणि ती मला कधी समजली, याबद्दल मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने काय सांगितले…
कोविड आणि ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यानंतर मराठी इंडस्ट्रीत कलाकारांची मागणी आणि त्यांची विचारसरणीही बरीच बदलली. आता दिसण्यापेक्षा जास्त अभिनय क्षमतेवर भर दिला जातो. माझी उंची कमी आहे, पण माझ्या अभिनयाचे कौतुक सर्वच जण करतात. म्हणूनच कोणीही गॉडफादर नसतानाही मी इंडस्ट्रीत चांगले काम करू शकते, असे मराठी अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकरने हसत सांगितले. अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची तिची इच्छा होती आणि त्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले वडील चंद्रकांत कुलकर्णी आणि आई चारुशीला कुलकर्णी याना तेव्हा आनंद झाला जेव्हा त्यांनी शीतलला छोटया पडद्यावर अभिनय करताना पाहिले. शीतलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोटया भूमिकांद्वारे केली. सोबतच ती लघुपटातही काम करायची. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मराठी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दुपारच्या जेवणावेळी तिने खास ‘गृहशोभिके’शी गप्पा मारल्या. चला, जाणून घेऊया, तिच्या जीवनातील काही गोष्टी ज्या तिने स्वत:हून सांगितल्या.
तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?
शाळेत असताना मला नृत्य आणि अभिनयाची आवड होती, मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईपर्यंत अभिनय क्षेत्रात कारकीर्द घडवण्याबाबत विचार केला नव्हता. महाविद्यालयात आल्यानंतर आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत मी भाग घेऊ लागले. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मराठी व्यावसायिक नाटकात काम करायची संधी मिळाली. ते नाटक केल्यानंतर मला २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्या नाटकातील माझ्या अभिनयासाठी मला अनेक पुरस्कारही मिळाले. येथूनच माझ्या अभिनयातील कारकिर्दीला खऱ्या अर्थी सुरुवात झाली. त्यानंतर एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे काम मिळत गेले. मी मूळची मुंबईची आहे. लग्नानंतर आता सासरी टिटवाळयाला राहाते.
पती संदीप यांच्याशी कशी ओळख झाली?
आमची ओळख महाविद्यालयात असताना झाली. अभिनयातील कारकिर्दीस आम्ही दोघांनीही एकत्रच सुरुवात केली. तोही व्यावसायिक नाटक करतो. याशिवाय मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करतो.
तुला अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवायची आहे, असे पालकांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?
माझे घरचे खूप खुश झाले. कोणाचीही काहीच तक्रार नव्हती, कारण मी लहानपणापासून गुरू राजश्री शिर्के यांच्याकडून कथ्थक शिकत होते आणि कथ्थकमधूनच अभिनयाचा प्रवास सुरू होतो.
तुला छोट्या पडद्यावर पहिला ब्रेक कसा मिळाला?
निर्माता, दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘मधु इथे, चंद्र तिथे’ ही मालिका येणार होती, त्यात मी काम केले. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिले, मात्र कुठे एका दिवसाचे तर कुठे दोन दिवसांचेच काम असायचे. हे करत असतानाच मला चरित्र अभिनेत्रीचे काम मिळू लागले. पुढे मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ ची विजेती ठरले. हा एक विनोदी शो आहे आणि त्यानेच मला सर्वात मोठा ब्रेक मिळवून दिला.
सध्या तू काय करतेस?
सध्या मी स्टार प्रवाहच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत छोटी जाऊबाई असलेल्या अपर्णा कानेटकरची भूमिका साकारत आहे. ही कथा कानेटकर कुटुंबाची आहे, जे नेहमी एकत्र राहतात आणि आनंद असो किंवा दु:ख, कुठल्याही परिस्थितीला मिळून सामोरे जातात. प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडते. त्यामुळे यात भूमिका साकारताना मला फार छान वाटत आहे.
वास्तविक जीवनातही तू हीच भूमिका जगतेस का?
ही भूमिका माझ्या जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी टिटवाळयाच्या माझ्या सासरच्या ११ माणसांच्या कुटुंबात राहते. म्हणूनच ही मालिका मला माझ्या अगदी जवळची वाटते.
इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला किती संघर्ष करावा लागला?
चांगल्या भूमिकेसाठी माझी धडपड सतत सुरूच असते, पण मी नेहमी शांत राहाते. हे खरे आहे की, गॉडफादरशिवाय आणि कोणत्याही गटात सामील झाल्याशिवाय काम होत नाही, पण शेवटी तुमच्यातील प्रतिभेचीच कसोटी लागते. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, माझी उंची कमी आहे, माझा रंग सावळा आहे, त्यामुळेच बरे दिसण्यासाठी मी सतत धडपड करते, कारण प्रत्येक वेळी मला थोडे गोरे आणि सुंदर दिसायचे असते. प्रत्यक्षात मी फारशी ग्लॅमरस नाही. मला आजवर जे काही काम मिळाले ते ग्लॅमरमुळे मिळालेले नाही, तर माझ्यातील प्रतिभेच्या जोरावर मिळाले. याशिवाय विनोदी शो, ज्यामध्ये टायमिंग आवश्यक असते ते मी अचूक साधू शकते.
कुठल्या मालिकेमुळे तुझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा सीझन २’ या शोची मी विजेती आहे. सोनी मराठीवरील या शोमुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. या मालिकेमुळेच मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना लोक मला ओळखू लागले. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, याशिवाय हा शो करताना मी गरोदर राहिले.
आईची जबाबदारी पार पाडताना तू कामाशी कसे जुळवून घेतेस?
माझा मुलगा साकेत आता अडीच वर्षांचा आहे, तो खूप हुशार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात राहात असल्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा खूप आधार मिळतो. माझा मुलगा माझ्यासोबत चित्रिकरणासाठी यायचा हट्ट करायचा. त्यावेळी त्याची समजूत काढली. मला काय काम करावे लागते, हे त्याला सांगितले. आजीला त्रास देउ नको, असेही प्रेमाने समजावले. कोविडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर, मी चित्रिकरणासाठी सिल्वासामध्ये दीड महिने होते. त्यावेळी माझा मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहिला, कारण तेव्हा काम मिळणे कठीण होते आणि गरजेचेही होते. त्यावेळी घरातल्या सदस्यांनी मला पाठिंबा दिला.
आईशी तुझे नाते कसे आहे?
माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. मी आईशी भांडते, पण आई ही आईच असते, हे मी स्वत: आई झाल्यावर चांगल्या प्रकारे अनुभवले. मुलांना ओरडणे, त्यांना एखादा गोष्टीसाठी नकार देण्यामागचे आईचे कारण नेहमीच खास असते, कारण तिला मुलाला चांगल्या प्रकारे घडवायचे असते. आईला माझ्याबद्दल सर्व गोष्टी माहिती असतात. माझ्या मुलासोबतही मला अशाच प्रकारेचे मैत्रीपूर्ण नाते निर्माण करायचे आहे.
तुला खायला किती आवडते? तू किती फॅशनेबल आहेस?
मला खायला प्रचंड आवडते. कथ्थक शोच्या वेळी मी कोलकाता, लखनऊला जायचे, तिथे गेल्यावर तिथले खास पदार्थ शोधून खायचे. याचप्रकारे मला फॅशनही आवडते, पण मला जे घालायला सोयीचे वाटते तीच माझ्यासाठी फॅशन असते, ज्यामध्ये मी साडी जास्त नेसते. याशिवाय जीन्स टी-शर्ट आणि फ्रॉक घालते.
हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अनेक अंतरंग दृश्य असतात. ती तू सहजतेने करू शकतेस का?
कथानकाची गरज असेल तर अशी दृश्य करण्यात काहीच गैर नाही, कारण अनेक अभिनेत्रींनी कथेची हीच गरज पूर्ण करून हिंदीतही खूप चांगले काम केले आहे.
‘मातृदिना’निमित्त काही संदेश द्यायचा आहे का?
माझ्या मते, आई हा एक स्वभाव आहे, जो मी आई झाल्यावर अनुभवला. आई एक सुंदर अनुभव, एक प्रेमळ वर्तन असते. त्याला जपायला हवे. आई कुठल्याही साच्यात चपखल बसते, तिला न सांगता सगळे समजते. निसर्गाने स्त्रीला आई बनण्याची जी क्षमता दिली आहे ती अद्भुत आहे
आवडता रंग – पांढरा आणि निळा.
आवडता पोशाख – भारतीय (साडी).
वेळ मिळेल तेव्हा – कथ्थकचा सराव, पुस्तक वाचणे आणि मित्रांशी बोलणे.
आवडता परफ्यूम – इंगेजचा व्हॅनिला बॉडी मिस्ट.
पर्यटन स्थळे – देशात हिमाचल आणि परदेशात स्वित्झर्लंड.
जीवनातील आदर्श – कोणाचीही फसवणूक न करणे. कोणालाही दु:ख न देणे, मनात अपराधीपणाची भावना नसणे.
सामाजिक कार्य – गरीब मुलींना नृत्य शिकवणे.