* साधना शाह

पावसाळयाचा मौसम उन्हापासून सुटका करत असला तरी यामुळे दुसऱ्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांत डासांमुळे होणारे आजार जसे की, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया इत्यादींचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या बाजारात डास पळवून लावणाऱ्या कॉइलपासून ते कॉर्डपर्यंत आणि स्प्रेपासून ते क्रीमपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत.

याशिवाय डास मारणारे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व अॅप्सही उपलब्ध आहेत. अल्ट्रासाऊंड अँटीमॉस्क्युटो उपकरणेही बाजारात आली आहेत. ही उपकरणे तयार करणाऱ्या कंपनींचा असा दावा आहे की, ही उपकरणे हाय फ्रीक्वेन्सीवर एका विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. हा अल्ट्रासोनिक साऊंड डासांना जवळ येण्यापासून रोखतो.

प्रत्येक घरात विविध कंपन्यांची कॉइल्स, फवारण्या, क्रीम वगैरे वापरले जात आहे. मार्केटमध्ये प्रत्येक वेळी नवीन रिपलेंट्स येत असतात. परंतु याचा वापर करुनही डास पळून जात नाहीत. यावरुन हे स्पष्ट होते की, हा एक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. भारतात हा ५-६ कोटींचा व्यवसाय आहे. एवढेच नव्हे तर दरवर्षी या व्यवसायात ७ ते १० टक्क्यांपर्यंतची वाढ होत आहे. परंतु, रिपलेंटच्या व्यवसायाची जितकी भरभराट होत आहे तितकाच डासांचा प्रादुर्भावही वाढत आहे.

संशोधक असे सांगतात की, बाजारात जितके शक्तिशाली रिपलेंट येते तितकीच डास त्याच्याविरुद्ध लढण्यासाठीची ताकद स्वत:मध्ये निर्माण करतात. जर असे असेल तर याचा असा स्पष्ट अर्थ आहे की, बाजारात जितके अॅडव्हान्स रिपलेंट येते तितकेच माणसासाठी ते जास्त धोकादायक ठरते, कारण डास त्याला न घाबरता सहज हरवतात.

रिपलेंटचा आरोग्यावर परिणाम

रिपलेंट बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडे नोंदणी करावी लागते. पण मंडळाचे काम एवढेच आहे. एकदा नोंदणी प्रक्रिया संपली की आरोग्यावर होणाऱ्या कीटकनाशकांच्या दुष्परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. रिपलेंट्ससोबतच आज बाजारात पर्सनल केअर उत्पादन, रूम फ्रेशनर्सपासून सुगंधी साबण आणि डिटर्जंट पावडरपासून ते कपडे धुऊन देण्यापर्यंतची अनेक उत्पादने उपलब्ध आहेत.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांच्या संशोधनाअंती असे निदर्शनास आले आहे की, उत्पादन एखाद्या सुप्रसिद्ध कंपनीचे असले तरीही त्यात रासायनिक सुगंधाचा वापर केलेला असतो, ज्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

खरेतर यात सुगंधासाठी एसीटोन, लिमोनिन, एसीटालहाइड, बेंझिन, बुटाडीन, बँजो पायरेन इत्यादी वेगवेगळया प्रकारची रसायने वापरली जातात. या सर्वांचा मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो. दमा, फुफ्फुसांचा आजार, अनुवांशिक आजार, रक्ताचा कर्करोग इत्यादींचा धोका यामुळे निर्माण होतो. याशिवाय काही लोकांना अॅलर्जी, डोळयांची जळजळही होते.

आशेचा किरण

डासांमुळे होणारे आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या दरम्यान एक आशादायक बातमी आहे. कोलकाता राजभवनात डास आणि प्रतिबंधात्मक मोहिमेदरम्यान कोलकाता महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाच्या देवाशीष विश्वास यांना असे काही डास आढळले की ते माणसाला इजा करण्याऐवजी जीवघेणा डास नष्ट करतात. सर्वसाधारणपणे, या डासाचे नाव हत्ती डास आहे. या प्रजातीच्या डासांना मानवी रक्त शोषून घेण्याऐवजी त्यांना डेंग्यूच्या एडिस इजिप्ती अळया आवडतात.

असे सांगितले जाते की, डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीन डासांचाच वापर करीत आहे. दक्षिण चीनमध्ये, शास्त्रज्ञांचे एक पथक इंजेक्शनद्वारे डासांच्या अंडयात ओल्वाचिया नावाचा बॅक्टेरिया सोडून या बॅक्टेरियातून संक्रमित डास सोडते.

चिनी शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की जेव्हा हे संसर्गित नर डास असंक्रमित मादी डासाशी संभोग करतात तेव्हा हे जीवाणू मादी डासात प्रवेश करतात आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांच्या जीवाणूंचा नाश करतात.

सिंगापूर आणि थायलंडमध्ये हत्ती डास नावाच्या या विशेष प्रजातीचा वापर मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. म्हणूनच डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या डासांमुळे त्रस्त झालेल्या परिसरात या फायदेशीर डासांच्या अळया सोडण्याचा पालिका प्रयत्न करत आहे.

विशेष म्हणजे कोलकाता डेंग्यूच्या एडिस डासांची राजधानी बनले आहे. यापूर्वी दिल्ली ही एडिस डासांसाठी स्वर्ग होती.

डासांद्वारे होणाऱ्या आजारांवर जर श्रीलंका विजय मिळवू शकत असेल, चीन, सिंगापूर आणि थायलंड डासांवर नियंत्रण ठेवू शकत असतील, तर मग भारत का नाही? देशभरात हत्ती डासांच्या माध्यमातून जीवघेण्या डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.

डास चावल्यास करा काही घरगुती उपचार

* डास चावलेल्या जागेवर लिंबाचा रस लावावा. यामुळे डास चावल्यामुळे होणाऱ्या खाजेपासून त्वरित आराम मिळेल, तसेच संसर्गाचा धोकाही दूर होईल.

* तुळशीची पाने बारीक करुन लिंबाच्या रसात घालून डास चावलेल्या जागेवर लावा.

* अॅलोवेरा जेल १०-१६ मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून त्यानंतर डास चावलेल्या जागेवर लावा. आराम मिळेल.

* लसूण किंवा कांद्याची पेस्ट थेट बाधित भागावर घासून लावा. काही वेळ पेस्ट तशीच तिथे ठेवा. त्यानंतर तो भाग व्यवस्थित धुवा. लसूण किंवा कांद्याच्या वासामुळेही डास पळतात.

* बेकिंग सोडा पाण्यात भिजवून त्यात कापसाचा तुकडा भिजवून तो बाधित भागावर लावा. १०-१२ मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा म्हणजे तुम्हाला आराम मिळेल.

* बाधित भागावर बर्फाचा तुकडा १०-१२ मिनिटे काही वेळाच्या अंतराने ठेवा. बर्फ नसेल तर बाधित भागावर थंड पाण्याची धार सोडा.

* टूथपेस्टही खाज दूर करण्यासाठी परिणामकारक आहे. बोटावर थोडीशी पेस्ट घ्या आणि डास चावलेल्या भागावर चोळा. आराम मिळेल.

* प्रभावित भागावर कॅलामाइन लोशनही लावता येते. कॅलामाइन लोशनमध्ये झिंक ऑक्साईड आणि फेरिक ऑक्साईडसारखे घटक असतात, जे खाज सुटण्यापासून तसेच संक्रमणास प्रतिबंधित करण्यासाठी प्रभावी असतात.

* डिओडरंटचा स्प्रेही खाज सुटणे आणि सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे, कारण यात अॅल्युमिनियम क्लोराईड असते, ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...