* रोचिका अरुण शर्मा
आजही स्त्रियांसमोर सामाजिक तसेच धार्मिक बंधने अशा प्रकारे आवासून उभी आहेत की ती कधीही त्यांना गिळंकृत करतील. अनेक योजना येतात, लेख लिहिले जातात, कथा तयार होतात, स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी ‘महिला दिवस’ही साजरा केला जातो. प्रत्यक्षात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत समाज आणि धर्माच्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे महिला घराच्या चार भिंतींआड उसासे टाकत कशाबशा जगत आहेत.
कुमारी मुलगी आणि विधवा दोष
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. झुणझुणवाला यांच्या २५ वर्षीय मुलीचे लग्न ठरवले जात होते. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही. मिठाई कधी देणार, असे झुणझुणवाला यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मिठाई खाऊ घालायला आम्ही तयार आहोत, पण मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. त्यामुळे कुठलेच स्थळ जमत नाही.’’
कसला दोष? असे विचारताच म्हणाल्या, मुलाकडच्यांनी भटाला मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी सांगितले की, पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार मुलीला वैधव्य योग आहे. लग्नानंतर काही वर्षांतच ती विधवा होईल. असे असताना कोण आपल्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून देईल? त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठया स्पष्ट दिसत होत्या.
अविवाहित मुलीला मंगळ दोष
पुण्यात राहणारी स्मिता सांगते की, तिचे लग्न वय उलटून गेल्यावर झाले, कारण तिच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. असे म्हटले जाते की, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न मंगळ असलेल्या मुलाशीच लावून द्यावे लागते, तरच ते यशस्वी होऊ शकते. तसे न झाल्यास दोघांपैकी एकाचा मृत्यू किंवा घटस्फोट होतो. अशा मुलाच्या शोधात अनेकदा मंगळ असलेल्या मुली वय होऊनही कुमारिकाच राहतात किंवा मंगळ दोष दूर करण्यासाठी पूजा अथवा उपाय सांगितले जातात. ते केल्यानंतरच अशा मुलींचे लग्न होते. शिवाय वय वाढूनही लग्न होत नसेल तर समाजाचे टोमणे ठरलेलेच असतात.
घटस्फोटित स्त्री
हैदराबादमध्ये राहणाऱ्या संजनाचा लग्नाच्या ५ वर्षांनंतर वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना मुलगा होता. मुलाला त्यांनी स्वत:कडे ठेवले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने पुनर्विवाह केला. त्या मात्र ५० वर्षांच्या झाल्या तरी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्या स्वत: आयटी इंडस्ट्रीत कामाला आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.
पुनर्विवाहाबाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आता या वयात माझ्याशी कोण लग्न करणार? जेव्हा तरुण होते तेव्हा एका मुलाची आई असल्यामुळे माझ्याशी कोण लग्न करणार होते? दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी कोण कशाला घेईल?’’
अशा प्रकारची कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील जिथे मुलीच्या पत्रिकेत दोष असल्याचे सांगून तिला नाईलाजाने एकाकी, असहाय जीवन जगायला लावले जाते.
विधवा स्त्री
अशाच प्रकारे एक प्रकरण पाहायला मिळाले जिथे एका सुशिक्षित, सुंदर, स्मार्ट महिलेच्या नवऱ्याचा कमी वयातच मृत्यू झाला. नवरा सरकारी नोकरीत असल्यामुळे तिला त्याच्या मृत्यूपश्चात चांगले पैसे मिळाले. तिला लहान बाळही होते.
काही कारणांमुळे सासरच्या माणसांचा आधार न मिळाल्याने ती माहेरी राहू लागली. माहेरी भाऊ-वहिनीला तिचे तिथे राहणे आवडत नव्हते. आईवडिलांनी सुशिक्षित, चांगला कमावणारा, घटस्फोटित मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. पुढे तिच्या मुलावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला मिळालेल्या पैशांवर तिच्या नव्या सासूचा डोळा होता. विधवा, त्यात एका मुलाची आई तरीही तुझ्याशी लग्न केले, असे टोमणे, भांडण झाल्यावर तिला सतत नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागत होते. रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून अखेर तिने स्वत:च घटस्फोट घेतला.
येथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ती विधवा झाली यात तिचा दोष काय? मुलगा लग्नानंतर झाला होता. दुसरा नवरा मात्र घटस्फोटित होता. त्याचे किंवा त्याच्या घरच्यांचे वागणे चांगले नसेल म्हणून कदाचित त्याच्या बायकोने घटस्फोट घेतला असेल. यात त्याची चूक असू शकते. तरीही महिलेलाच सतत विधवा झाल्याचा दोष देणे कितपत योग्य आहे?
ती सुशिक्षित, हुशार होती म्हणून तिचा पुनर्विवाह होऊ शकला आणि दुसऱ्या नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती घटस्फोट घेऊ शकली. तिच्या जागी गावातली, कमी शिकलेली, आर्थिकदृष्टया असहाय मुलगी असती तर तिला जगणे कठीण झाले असते.
सक्षम वीरांगणा
अशाच प्रकारचे आणखी एका महिलेचे उदाहरण आहे, जिचा नवरा सैन्यात होता आणि शहीद झाला. ती महिला सुशिक्षित आहे. तिला एक मुलगा आहे. तिला तिच्या पतीच्या निधनानंतर सैन्यात नोकरी मिळाली. त्यामुळे ती आर्थिकदृष्टया सक्षम आहे. मुलाला तिने प्रेमाने, चांगले संस्कार देऊन वाढवले.
तिला अनेकदा वाईट वाटते, कारण सर्व काही असूनही तिला एकाकी जीवन जगावे लागत आहे. तिला कुठेतरी छानशा ठिकाणी फिरायला जावेसे वाटते, पण कशी आणि कोणाबरोबर जाणार, कारण कमी वयातच पतीचे निधन झाले होते. सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न तिनेही बघितले होते. पतीच्या हातात हात घालून आणि छानसे कपडे घालून एखाद्या सिने अभिनेत्रीप्रमाणे फिरण्याची तिचीही इच्छा होती. तिलाही तिचे खूप सारे सुंदर फोटो काढायचे होते.
सोशल मीडियाचे युग आहे. स्वत:चे फोटो इतरांसोबत शेअर करावे, असे तिलाही वाटत होते. मात्र पती नसल्यामुळे ती मन मारून जगत होती. वय झाल्यावर पतीचे निधन झाले असते तर कदाचित तिचा या सर्व गोष्टींचा आंनद उपभोगून झाला असता. हौस पूर्ण झाली असती. मुलगा लहान असल्यामुळे ती एकटी पडली. मुलाला घेऊन कोणाबरोबर फिरायला जाणार होती, कारण कोणीही नातेवाईक किंवा मित्राला त्याच्या कुटुंबासोबत फिरायला अशी एखादी स्त्री आलेली आवडत नाही. शिवाय कोणीही तिची जबाबदारी घ्यायला तयार नसते.
परितक्ती स्त्री
असेच एक उदाहरण आहे परितक्त्या स्त्रीचे, जिला तिच्या नवऱ्याने भांडण करून घरातून हाकलून दिले. तिची ५ वर्षांची मुलगीही नाईलाजाने आपल्या आईसोबत आजोळी आली. ती महिला माहेरी आल्यानंतर नोकरी करू लागली. आईवडिलांनी विचार केला की, कधीपर्यंत ते तिला आधार देणार? त्यांचेही वय झाले होते. त्यामुळे त्यांनी नातीला तिच्या वडिलांच्या आईवडिलांकडे पाठवले. त्यांना वाटले की, मुलीला आईची गरज भासेलच तेव्हा सासरची मंडळी सुनेला बोलावून घेतील. पण तसे काहीच झाले नाही. अखेर मुलीच्या आईवडिलांनी तिला घटस्फोट मिळवून दिला आणि एका अशा माणसाशी लग्न लावून दिले ज्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याची २ मुले आणि वृद्ध, आजारी आई होती.
हे लग्न झाले, पण ती महिला तिच्या मुलीला स्वत:सोबत ठेवू शकली नाही. जेव्हा ती दुसऱ्या नवऱ्याच्या दोन मुलांना सांभाळत असेल तेव्हा तिला पोटच्या मुलीची आठवण येत नसेल का? त्या ५ वर्षांच्या मुलीवर अन्याय झाला नाही का?
महिलेचे दोन्ही पती त्यांचे आयुष्य अगदी मनासारखे जगत होते. या प्रकरणात मला असे वाटते की, दुसऱ्या लग्नात त्या महिलेला पत्नीचा नाही तर घर सांभाळणाऱ्या बाईचा दर्जा देण्यात आला होता. असे नसते तर दुसऱ्या नवऱ्याने तिच्या मुलीचा स्वीकार केला असता. आई-मुलींची ताटातूट झाली नसती.
पत्रिकेतील दोष आणि उपाय
अनेकदा असेही पाहायला मिळते की, मुलीच्या पत्रिकेत दोष दाखवला जातो. त्यानंतर एखादी पूजा, यज्ञ, होमहवन करून दोषाचे निवारण केले जाते. त्यानंतरच तिच्या लग्नाची पुढची बोलणी केली जातात.
अशाच प्रकारे विधवा महिलांसाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे त्यांचे जीवन लाचार, दयनीय, नरक बनते. एखाद्या महिलेचे विधवा होणे हा तिच्यासाठी शाप ठरतो.
वैदिक ज्योतिष कुंडलीनुसार, विवाह, वैवाहिक जीवन आणि वैवाहिक स्थितीसाठी सप्तम भावाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार विवाहानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या परिस्थितीची जाणीव स्त्री-पुरुष दोघांनाही करून देण्यात येते. पण डोळयावर अंधश्रद्धेची कापडे लावून बुरसटलेल्या प्रथांच्या जास्त अधीन गेल्यास वैवाहिक जीवनातील सुखाला गालबोट लागते.
सप्तम भावाच्या अभ्यासानुसार, या भावातील मंगळ आणि पाप ग्रह मुलीच्या पत्रिकेत असल्यास विधवा योग येतो.
वेगवेगळे भाव, पत्रिकेतील चंद्र्राचे स्थान आणि राहूच्या दशेनुसार मुलगी विधवा होणार, हे निश्चित होते.
पत्रिकेतील काही दोषांमुळे एखादी स्त्री लग्नानंतर ७-८ वर्षांच्या आतच विधवा होते. लग्न आणि सप्तम या दोन्ही घरात पाप ग्रह असतील तर लग्नानंतर ७ व्या वर्षी नवऱ्याचे निधन होते.
अशा प्रकारचे अनेक योग आणि दशा ज्योतिषांनी वेळोवेळी लिहिले आणि सांगितले. आता तर ही माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.
फक्त एवढेच नाही तर अशा माहितीसोबत वेगवेगळया शहरात राहणाऱ्या महिलांची त्यांच्या नावासह त्यांच्या पत्रिकेतील दोष आणि विधवा होण्याच्या योगाची माहितीही देण्यात आली आहे. जेणेकरून हे सत्य असल्याची लोकांची खात्री होईल आणि पत्रिका पाहण्यावर त्यांचा विश्वास बसेल.
या सर्वांव्यतिरिक्त इंटरनेटवर मेनका गांधी आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेचा उल्लेख करण्यात आलाय. हेदेखील सांगितले आहे की, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानानंतर किती कमी वयात त्यांना वैधव्य येणार हे समजले होते आणि तसेच घडले. सोबतच असेही सांगण्यात आले आहे की, जर शनी, मंगळासाठी उपाय केला तर वैधव्य योग टाळता येऊ शकतो.
विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत
धर्मग्रंथांमध्ये ज्या प्रमाणे स्त्रीसाठी पतिव्रता धर्म आहे त्याचप्रमाणे विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत असते. या व्रतानुसार, विधवा स्त्रीने कशा प्रकारे जीवन जगावे, हे निश्चित करण्यात आले आहे.
* विधवा स्त्रीने पुरुषासोबत किंवा तिच्या माहेरीच रहायला हवे.
* विधवा स्त्रीने साजशृंगार, दागिने घालणे किंवा केस धुणे सोडून द्यायला हवे.
* विधवा स्त्रीने दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस अन्नाचा त्याग करावा.
* विधवा स्त्रीने आंबट-गोड खाऊ नये. फक्त साधे अन्न खावे.
* सार्वजनिक कार्यक्रम, शुभकार्य, विवाह, गृहप्रवेशावेळी तिने हजर राहू नये.
* विधवा स्त्रीने शंकराची उपासना करावी. आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्यासाठी उपवास करावेत.
* विधवेसोबत विवाह करणारा नरकात जातो.
* याशिवाय जर एखादी महिला विधवा नसेल पण तिचा पती परदेशात गेला असेल तर तिनेही विधवा व्रताचेच पालन करावे.
व्हिडीओही उपलब्ध
पत्रिका, ज्योतिष, विधवा व्रत इत्यादींवर लेख उपलब्ध आहेत. सोबतच असे व्हिडीओही आहेत ज्यात विधवा स्त्रीने पुनर्विवाह करावा की नाही, हे सांगितले आहे.
विधवा स्त्रीच्या हातून कोणतेही शुभकार्य का केले जात नाही? विधवा स्त्रीने सफेद साडीच का नेसावी? घरातील दोषांमुळेही स्त्री विधवा कशी होते? इत्यादी माहिती या व्हिडीओतून मिळते.
स्त्रीला आशीर्वाद दिला जातो, ‘अखंड सौभाग्यवती भव’ म्हणजे जोपर्यंत ती जिवंत राहील तिचे सौभाग्य अबाधित रहावे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, असा आशीर्वाद एखाद्या पुरुषाला दिला जात नाही, कारण पत्नी मेल्यास त्या पुरुषाला पुनर्विवाहाचा अधिकार असतो. त्याला २-३ मुले असली तरी एखादी स्त्री त्याच्याशी लग्न करतेच. याउलट जर एखादी स्त्री विधवा झाली तर आपला समाज आणि धर्म तिच्यावर असे काही आघात करतो की, तिचे जगणे जणू नरक होते.
विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, जर पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचा दोष स्त्रीच्या पत्रिकेतील ग्रहांना दिला जातो. प्रत्यक्षात हा आपल्या समाजातील बुरसटलेल्या नियमांचा दोष नाही का? हा दोष निवारण्यासाठी उपाय का असू नयेत?
आज एकीकडे आपण विज्ञानातील नवीन शोध, प्रगतीच्या गप्पा मारतो. मग दुसरीकडे विधवा, परितक्त्या, अविवाहित स्त्रीच्या जीवनातील सुधारणेचा विचार दाबून का टाकला जातो. अशा महिलांवर मन मारून जगण्याची वेळ का येते? प्रत्यक्षात फक्त व्यासपीठांवर कायक्रमांचे आयोजन करून काहीच होणार नाही, तर उदार अंतकरणाने त्यांना चांगल्या प्रकारे जगण्याचा हक्क देणे गरजेचे आहे. कारण त्या जशा आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, पण माणूस तर त्याही आहेत.