* पारुल भटनागर
जशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तशी आपल्या हाता-पायांची घेत नाही. त्यामुळेच ऋतुचक्र बदलताच म्हणजे हिवाळयाला सुरुवात होताच पायांना भेगा पडायला सुरुवात होते. यामागचे कारण म्हणजे पुरेशी काळजी न घेणे आणि दुसरे म्हणजे जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे. कोरडया हवेमुळे हळूहळू शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो.
शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यामुळेही टाचांना भेगा पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय करणेही गरजेचे असते, जेणेकरून टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या होतील आणि भेगांमुळे कोणासमोरही तुम्हाला लाजल्यासारखे वाटणार नाही.
यासंदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव सांगतात की, बाजारात तुम्हाला शेकडो अशा क्रीम मिळतात ज्या टाचांच्या भेगा बऱ्या करण्याचा दावा करतात, पण प्रत्येक महागडी क्रीम आणि केलेला दावा खरा असेलच असे सांगता येत नाही.
त्यामुळेच तुम्ही जेव्हा बाजारातून भेगा पडलेल्या टाचांना बरे करणारे क्रीम खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, त्यात कडुलिंबाचा वापर केलेला असेल. यामुळे तुमच्या टाचा लवकर बऱ्या होऊन तेथील त्वचेला आवश्यक ओलावा मिळेल :
* कापराचे तेल शतकानुशतके त्याच्यातील नैसर्गिक गुणांसाठी ओळखले जाते, कारण ते भेगा पडलेल्या टाचांमुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी प्रभावी असते. सोबतच ते रक्ताभिसरण वाढवून वेदनेपासून सुटका करते.
* काळया मिरीचे तेल जेवणाची चव वाढवते, सोबतच शतकानुशतके याचा वापर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. यात मोठया प्रमाणावर फॉलिक अॅसिड, कॉपर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम असते. ते टाचांच्या जखमा बऱ्या करून वेदनेपासून आराम मिळवून देतात.
* पुदिन्याच्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो, कारण ते त्वचेला तरुण आणि सुंदर ठेवण्याचे काम करते. तणाव दूर करणारे हे सुगंधित तेल भेगा पडलेल्या टाचांची जळजळ दूर करण्यास मदत करते. यातील मिथॉलसारखे घटक टाचांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात.
* लॅव्हेंडर तेलात अँटीसेफ्टिक आणि अँटीइन्फलमेंट्री म्हणजे जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुण असल्यामुळे ते टाचांची भेगा पडलेली त्वचा आणि टाचांनाही बरे करते. ते मृत त्वचा काढून टाकून त्वचेतील निरोगी पेशी वाढवण्याचे काम करते. सोबतच टाचांचा कोरडेपणा दूर करून पायांचे सौंदर्यही परत मिळवून देते.
हेही आहेत प्रभावी उपाय
बादलीत गरम पाणी घेऊन त्यात तीन मोठे चमचे एप्सम मीठ टाका. त्यानंतर त्यात सुमारे अर्धा कप डेटॉल टाका. एप्सम मीठ त्वचेला मुलायम बनवण्याचे काम करते, तर डेटॉल जंतुनाशक असून ते फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य संसर्ग होऊ देत नाही. टाचांना जास्त भेगा पडल्यामुळे बऱ्याचदा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसा. त्यानंतर शॉवर जेलने पाय अलगद पुसून घ्या.
त्यानंतर त्याच बादलीत पुन्हा पाय टाकून धुवा व नंतर टॉवेलने पुसा. नंतर चांगल्या दर्जाचे लोणी पायांना लावून ५ मिनिटे मालिश करा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, लोण्यात दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे ते टाचा लाल होणे, भेगा पडल्यामुळे टाचांची होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. असे तुम्ही आठवडयातून दोनदा रात्री झोपताना करा. टाचांना पडलेल्या भेगा निश्चिंतच बऱ्या होतील.