* गरिमा पंकज
आईवडील जेव्हा आपल्या छोटयाशा बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. बाळाच्या जन्माआधीच छोटया, सुंदर, रंगीबेरंगी कपडयांनी घर भरून जाते. पण त्यांची खरेदी करताना आणि बाळाचे कपडे धुताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते, कारण कपडयांवरच बाळाचे आरोग्य आणि सुरक्षा अवलंबून असते.
कपडे खरेदी करताना सावधान
कापड : लहान मुलांसाठी नेहमी मऊ, आरामदायक कपडे खरेदी करा. ते सहज धुता येतील असे हवे. बाळाच्या त्वचेचे नुकसान होणार नाही, असेच कापड हवे. मुलांसाठी सुती कपडे सर्वात चांगले असतात, पण लक्षात ठेवा की सुती कपडे धुतल्यावर थोडे आकसतात.
लांबी-रुंदी : मुलांचे कपडे ३ महिन्यांच्या फरकाने तयार केलेले असतात. ०-३ महिने, ३-६ महिने, ६-९ महिने आणि ९-१२ महिने अशा प्रकारे शिवलेले असतात. मुलांना खूप मोठे कपडे घालू नका. ते सतत गळा आणि डोक्यावर येतात. यामुळे श्वास कोंडण्याची भीती असते.
सुरक्षा : बी एल कपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नवजात बाळांचे सल्लागार, तज्ज्ञ डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, लहान मुलांसाठी नेहमी साधे कपडे खरेदी करावेत. फॅन्सी, वजनदार कपडे विकत घेणे टाळा. ज्याला बटन, रिबीन, गोंडा नसेल, असे कपडे खरेदी करू नका. मुले बटण गिळू शकतात, ते त्यांच्या घशात अडकू शकते. ज्याला ओढायच्या दोऱ्या असतील, असे कपडेही खरेदी करू नका. त्या दोऱ्या कशात तरी अडकून ताणल्या जाऊ शकतात.
आरामदायी : असे कपडे खरेदी करा, जे मुलाला सहज घालता येतील, जेणेकरून कपडे बदलताना त्रास होणार नाही. पुढून उघडता येणारे सैल कपडे चांगले असतात. असे कपडे खरेदी करा जे स्ट्रेचेबल म्हणजे ताणले जातात. ते मुलाला घालणे आणि काढणे सोपे असते. ज्याला चैन असेल असे कपडे खरेदी करू नका.
कपडे धुण्याच्या टिप्स
डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांचे कपडे धुताना कपडे धुण्याची साधी पावडर वापरू नका. रंगीत आणि सुवासिक पावडर तर अजिबात वापरू नका. लोकरीचे कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी सौम्य पावडर वापरणे जास्त चांगले असते. मुलांचे कपडे खूप वेळा पाण्यातून काढा, जेणेकरून पावडर किंवा साबण पूर्णपणे निघून जाईल. मुलाची त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली पावडरच वापरा.
मुलांचे कपडे लहान आणि मऊ असतात. म्हणूनच ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुणे जास्त चांगले असते. मशीनमध्ये धुणार असाल तर ड्रायर वापरू नका. मोकळया जागेवर, ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात कपडे सुकवा. तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरणार असाल तर खास मुलांसाठी असणाऱ्या सॉफ्टनरचाच वापर करा.
कपडे धुण्याच्या अन्य टिप्स
त्वचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी मुलांचे कपडे कसे स्वच्छ ठेवायचे, हे माहिती करून घेऊया :
* कपडयांवर लावलेले लेबल नीट वाचा. लेबलवर मुलांच्या कपडयांसाठी ज्या सूचना असतील त्यांचे पालन करा.
* बरेचसे कपडे जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. म्हणूनच कपडे धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा.
* रंग, कापड आणि लागलेले डाग पाहून त्यानुसार मुलांचे कपडे वेगवेगळे धुवायला ठेवा. एकसारखे असलेले कपडे एकत्र धुवा. यामुळे कपडे धुणे सोपे होईल आणि ते सुरक्षितही राहतील.
* मुलांच्या कपडयांवर डाग लागले असतील तर बेबी फ्रेंडली सौम्य पावडर लावून हलक्या हातांनी चोळून कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. त्यानंतर व्यवस्थित पाणी वापरून कपडे नीट धुवा.
* मुलांचे कपडे किटाणूमुक्त ठेवण्यासाठी काही महिला कपडे अँटीसेफ्टिक सोल्यूशनमध्ये भिजवतात. हे चुकीचे आहे. यामुळे मुलाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
* कपडे लादीवर ठेवून चोळण्याऐवजी हात किंवा मशीनच्या झाकणावर ठेवून धुवा.
* मुलाचे कपडे घरातील इतरांच्या कपडयांसोबत धुवू नका. बऱ्याचदा मोठयांचे कपडे जास्त मळलेले असतात. सर्व कपडे एकत्र धुतल्यामुळे त्यांच्यातील किटाणू मुलाच्या कपडयांमध्ये जाऊ शकतात.
* कपडे सुकल्यावर ते नीट इस्त्री करा, जेणेकरून उरलेले किटाणूही मरून जातील.
* कपडे नीट घडी करून कव्हरमध्ये किंवा कॉटनच्या कपडयात गुंडाळून ठेवा.