* शाहनवाज

आपण एखाद्यावर नाराज असलो तर ती नाराजी व्यक्त करतो. वेगवेगळया प्रकारे मनातील नाराजीला वाट मोकळी करून देतो. एखाद्यावर नाराज झाल्यास काही लोक त्याच्याशी बोलणे बंद करतात. काही जण बोलतात, पण त्यांचा स्वर नाराजीचा असतो. काही लोक त्या व्यक्तीच्या समोर त्याला भलेबुरे ऐकवून आपल्या मनावरील ओझे कमी करतात. आधुनिक समाजातही लोकांना एकमेकांचे विचार पटतात किंवा पटतही नाहीत, पण ज्या लोकांना धार्मिक कट्टरतावादाच्या आजाराने ग्रासलेले असते ते नाराज झाल्यास आपल्याला स्वत:ला त्यांच्यापासून कसे वाचवता येईल, याचा विचार आपल्याला करावाच लागेल.

होय, कारण धार्मिक कट्टरतावादाचा आजार बळावलेले लोक तुमच्यावर नाराज झाले, रागावले किंवा तुमचे विचार त्यांना पटेनासे झाले तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. कुठल्याही धर्माचे कट्टरपंथी हे मानसिक आजारामुळे वेडयाच्या रुग्णालयात दाखल असलेल्या लोकांपेक्षाही समाजासाठी जास्त धोकादायक असतात.

हल्ल्याचे संपूर्ण प्रकरण

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी असे काही घडले ज्याची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे. एका १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेतील इतिहासाच्या शिक्षकावर हल्ला केला, कारण इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी वर्गात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेस म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधित एक कार्टून अर्थात व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे इस्लाम धर्माला मानणारा हा विद्यार्थी नाराज झाला होता.

१८ वर्षीय या तरुणाने कॉम्प्लेक्स सो होनरी नावाच्या एका शाळेजवळ सॅम्युअल पॅटी या शिक्षकांवर हल्ला केला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाला चहूबाजूंनी घेरले. त्यावेळी खिशातले पिस्तूल काढून तरुण पोलिसांना धमकावू लागला. अखेर पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला.

व्यंगचित्रावरून यापूर्वीही वाद

शार्ली हेब्दो यांनी २००५ मध्ये डेन्मार्कच्या एका वृत्तपत्रात धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावादी विचारधारेवर प्रहार करत पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. ते प्रकाशित होताच संपूर्ण जगभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ मध्ये शार्ली हेब्दो या व्यंगचित्र पत्रिकेत ते व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आणि पुन्हा गोंधळ उडाला.

काही इस्लामी बंदुकधाऱ्यांनी २०१५ मध्ये फ्रान्सच्या शार्ली हेब्दोच्या कार्यालयातील संपादकीय विभागावर हल्ला केला. यात १२ जणांना जीव गमवावा लागला. जीव गमावणाऱ्यांमध्ये ५ व्यंगचित्रकार, १ अर्थशास्त्रज्ञ, २ संपादक, १ साफसफाई करणारा, १ पाहुणा आणि २ पोलीस होते. याशिवाय ११ जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यावेळी हल्लेखोर धार्मिक घोषणा देत होते. ‘आम्ही पैगंबरांचा बदला घेतला’ असे आसुरी आनंदाने बोलत होते.

या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असणारे विद्यार्थी आणि अन्य लोकांनी मिळून ‘मीही शार्ली’ असा नारा देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बळकट केला.

लोकांची सहनशीलता संपत चालली आहे

ही घटना शार्ली हेब्दो यांनी काढलेल्या व्यंगचित्राची होती, पण आपणही आपल्या जीवनात अशा अनेक लोकांना भेटतो जे टीका सहन करू शकत नाहीत. जे अपल्याला सर्वात जास्त जवळचे असतात त्यांच्यावर केलेली टीका बऱ्याचदा लोक सहन करू शकत नाहीत.

धार्मिक लोक सर्वसाधारणपणे लोकांचे प्रश्न टाळतात, कारण त्यांना आपल्या धर्माबद्दल संपूर्ण ज्ञान नसते. असे सखोल ज्ञान कदाचित मशिदीत बसलेल्या मौलवींना किंवा मंदिरात बसलेल्या एखाद्या पूजाऱ्यालाही नसते. डोळे बंद करून ते फक्त त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात जी त्यांना कोणीतरी धर्माच्या नावावर शिकवली किंवा समजावलेली असते.

माझ्या शालेय जीवनातीळ विज्ञानाचे एक शिक्षक त्यांच्या हातातील सर्व बोटांमध्ये अंगठया घालायचे आणि त्यांच्या गळयात रुद्र्राक्षाची एक मोठी माळ असायची. एके दिवशी शाळेत सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्या एका नव्या शिक्षकांसोबत त्यांचा वाद झाला. त्यांच्या हातातली सर्व बोटांमध्ये अंगठया पाहून नवीन शिक्षकांनी फक्त एवढेच विचारले होते की, या अंगठया तुम्ही आवड म्हणून घालता की, एखाद्या बाबा-बुवाने त्या तुम्हाला घालायला सांगितल्या आहेत?

त्यांचा हा प्रश्न ऐकून विज्ञानाचे शिक्षक प्रचंड चिडले. शब्दाला शब्द भिडला आणि रागाच्या भरात विज्ञानाच्या शिक्षकांनी नवीन शिक्षकांवर हात उगारला. .

तरीही लोकांच्या मानगुटीवरून रुढीवादी समाजाचे भूत अजूनही उतरलेले नाही. मग तो कुठल्याही देशाचा आणि कुठल्याही धर्माचा धार्मिक कट्टरतावादी का असेना, त्याच्यासाठी तोच पूर्वीचा, धर्माला कायदा मानणारा समाज अजूनही सर्वोत्तम आहे. म्हणूनच तो त्याच्या धर्माविरोधात उठणारा प्रत्येक आवाज बंद करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो.

हेच कारण आहे की, लोकांना कुठल्याही प्रकारच्या वादात पडायचे नसते. त्यांना टीका करायची नसते किंवा अशा वादाचा त्यांना कुठलाही अर्थ लावायचा नसतो. पॅरिसमध्ये इतिहासाच्या शिक्षकांसोबत घडलेली घटना हेच सांगते की, लोक खूपच असहनशील झाले आहेत. ते तर्कवितर्काना पटेल असे उत्तर द्यायचे सोडून थेट लोकांवर हल्ला करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात.

खरंच धर्म इतका कमकुवत आहे?

पॅरिसमध्ये सॅम्युअल पॅटी यांच्यासोबत घडलेल्या घटनेतून असे निदर्शनास येते की, आधुनिक आणि प्रगत देशांमध्येही धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावाद कायम आहे. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनेचे आपण नव्याने पुनरावलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, सॅम्युअल पॅटी वर्गातील मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्यावर काढलेले व्यंगचित्रच तर दाखवत होते.

जर यात कुठल्याही व्यक्तीला काही आक्षेप होता तर पॅटी यांनाही त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. पण हल्लेखोरांनी याबाबत कुठलाही सारासार विचार न करता सॅम्युअल पॅटी यांना जीवानिशी मारले.

अखेर असे काय झाले होते की, हल्लेखोरांनी हिंसेचा आधार घेतला? धर्मावर टीका केल्यामुळे धर्माचे अस्तित्व धुळीत मिसळते का? स्वत:वर करण्यात आलेली टीका सहन करू न शकण्याइतका लोकांचा देव कमकुवत आहे का? जर खरंच लोकांचा देव कमकुवत असेल तर मग लोक अशा कमकुवत देवाला पूजतातच का?

फ्रान्स जगातील एक असा देश आहे जिथल्या लोकसंख्येतील प्रत्येक पाचवी व्यक्ती पूर्णपणे नास्तिक असते. याचा अर्थ फ्रान्स एक असा देश आहे जिथे लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहातात. ती समजू घेण्यासाठी चर्चा करतात. सारासार विचार करतात.

धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी एकच उपचार

धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती कट्टरपंथीच असतो, असे मुळीच नसते. खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्ती स्वत:ला सर्वात जास्त समजूतदार समजत असतो आणि दुसऱ्या कोणाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. धार्मिक कट्टरतावादाची मुळे तोपर्यंत समाजातून मुळापासून उपटून फेकता येणार नाहीत जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षण अनिवार्य केले जात नाही.

फक्त शिक्षण अनिवार्य करून ही समस्या संपुष्टात येईल, याचीही हमी देता येणार नाही. आपली शिक्षण व्यवस्था वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असणेही तितकेच गरजेचे असते. अशा शिक्षण व्यवस्थेत शिक्षकही असेच हवेत जे वैज्ञानिक विचारधारेला मानणारे प्रगतीशील असतील. आपल्या विज्ञानाच्या शिक्षकांप्रमाणे नसतील जे व्यवसायाने विज्ञान शिकवत असले तरी स्वत:च्या आयुष्यात मात्र ज्यांचा विज्ञानाशी काडीचाही संबंध नसतो.

आपल्या सरकारने असा आदर्श समाजात प्रस्थापित करायला हवा जो तर्काशी सुसंगत, विज्ञानवादी असेल. अंधश्रद्धेला मूठमाती देणारा असेल. मात्र आपण भारताला नजरेसमोर ठेवून असा विचार करतो तेव्हा तो विचार खूपच चुकीचा वाटू शकतो, कारण इथले सरकारच अंधश्रद्धा पसरवण्यात पारंगत आहे.

म्हणूनच आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी. आपण सुशिक्षित, समजूतदार समाज (लोकांचा समूह) म्हणून एक पाऊल पुढे टाकून कमीत कमी आपल्या जीवनात पसरलेल्या अंधश्रद्धेला तरी निर्बंध घालू शकतो. पॅरिसमध्ये कट्टरतावाद्यांनी केलेली सॅम्युअल पॅटी यांच्या मृत्यूची व्याख्या ही मानवतेच्या इतिहासातील सर्वात किळसवाणे कृत्य म्हणून करायला हवी. इतकेच नव्हे तर समाजात पुन्हा कधीच असे घडू नये म्हणून आपल्याला आजपासूनच कट्टरपंथाविरोधात आवाज उठवण्याची सुरुवात करायला हवी.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...