– शैलेंद्र्र सिंह

सेक्स अर्थात संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही. यामागे भावनिक ओढही असते. आर्थिक तणावाचा दुष्परिणाम खास करून भावनांवर होतो. चिंतेने ग्रासलेले मन शरीराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही. याचा परिणाम संभोगावर होतो. फक्त नवरा-बायकोवरच नाही तर घर, कुटुंब, समाजावरही याचा परिणाम होतो. व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते.

प्रत्येक प्रकारचा तणाव सेक्स जीवनावर परिणाम करतोच. आर्थिक तणावाची चिंता स्वत:सोबत जोडीदारालाही असते, कारण पैशांअभावी डॉक्टर आणि औषध, दोन्हीही अवघड होते.

जोडीदाराला पैशांअभावी खुश ठेवण्यासाठी भेटवस्तू घेता येत नाही. जे वर्षानुवर्षे सोबत असतात तेही तुमच्यातील उणिवांचा पाढा वाचू लागतात. कोविड-१९ काळात घरभाडे, नोकरी जाणे, पगार कपात, पगार वेळेवर न मिळणे अशा काही चिंता आपल्याला सतावत आहेत.

कर्मचाऱ्याने नोकरी सोडावी यासाठी कंपन्या त्यांना विविध प्रकारे त्रास देत आहेत. मंदीचे कारण काहीही असले तरी याचा परिणाम सेक्स जीवनावर आहे. यामुळे नवरा-बायकोत दुरावा निर्माण होत आहे.

सामाजिक जीवनावर परिणाम

आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे लोक मोठे शहर, प्रशस्त घर विकून साध्या ठिकाणी राहू लागले आहेत. भरपूर फी, शाळेचा इतर खर्च परवडणारा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना मुलांना साध्या शाळेत प्रवेश घेऊन द्यावा लागत आहे. पैशांअभावी चांगले जगण्याचा स्तर खालावल्यामुळे तणाव वाढत आहे.

आर्थिक तणाव दूर करण्यासाठी लोक जास्त काम करू लागले आहेत. त्यामुळे सेक्स संबंधांसाठी वेळ मिळेनासा झाला आहे. थकवा वाढत आहे. त्यातच सेक्स संबंधातील समस्या जैसे थे आहे.

तणावाचा महिलांवर सर्वाधिक परिणाम

आर्थिक तणावाचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त होतो. त्यांना पैशांची चिंता जास्त सतावत असते. त्यामुळे संभोगात रमणे आणि त्याचा आनंद घेणे त्यांच्यासाठी अवघड होते. आर्थिक तणावाचा सेक्सच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो. काहीच करण्याची इच्छा होत नाही.

तणावामुळे डोकेदुखी, पोट बिघडणे, उच्च रक्तदाब किंवा छातीत दुखणे असे अनेक प्रकारचे रोग बळावतात. या आजारांचा परिणाम सेक्सवर होतो. मेंटल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्य बिघडल्यास तणाव, चिंता, हृदरोगाचा झटका सोबतच भावनिक समस्या यांचाही सेक्स जीवनावर परिणाम होतो.

तणाव वाढल्यामुळे शरिरातील हार्मोन्स मेटाबॉलिज्मवर दुष्परिणाम होतो. तणावामुळे मनात नकारात्मक विचार घर करतात. कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. याचा परिणाम सेक्स जीवनावर होणे स्वाभाविक असते.

मानसिक आरोग्य बिघडते

जेव्हा मन दु:खी असते, काहीच आवडेनासे होते तेव्हा मनाची घालमेल वाढते. संभोगाची इच्छा होत नाही. याचा परिणाम जोडीदाराच्या सेक्स जीवनावरही होतो. आर्थिक तणावाचा परिणाम सर्वात आधी मानसिक आरोग्यावर होतो. डोक्यात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत असतात. मानसिक तणाव वाढतो. आपल्याच माणसांवर संशय घेण्याची वृत्ती बळावते. जोडीदाराचे मन भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल तर त्याच्याकडून सेक्सची अपेक्षा ठेवणे निरर्थक असते.

सेक्स जीवन उत्तम राखण्यासाठी तणावापासून दूर राहणे किंवा नकारात्मक विचारसरणी बदलणे गरजेचे असते. हे सांगायला सोपे आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणे बरेच अवघड असते. म्हणूनच तणावाचा आपल्या आयुष्यावर कमीत कमी परिणाम होईल यासाठी प्रयत्न करायला हवा, जेणेकरून तणाव आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकणार नाही. व्यायाम, समुपदेशनाद्वारे हे शक्य होईल.

यामुळे तणावाची पातळी कमी करता येईल, जेणेकरून त्याचा दुष्परिणाम सेक्स जीवनावर होणार नाही. म्हणूनच असे सांगितले जाते की, जेव्हा तुम्ही जोडीदारासोबत बेडरूममध्ये जाल तेव्हा इतर सर्व चिंता बाहेरच ठेवायला हव्यात.

अडचणींमुळे बिघडते हार्मोन्सचे संतुलन

तणावात असल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते. कोर्टिसोल आणि एपिनेफ्रिनची पातळी वाढल्यामुळे सेक्स जीवन निरोगी राहत नाही. महिलांमधील संभोग क्षमता कमी होते. याचा परिणाम सेक्स जीवनावर होतो.

कोर्टिसोलची पातळी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सेक्स हार्मोनवर होतो. त्यामुळे संभोगाची इच्छा होत नाही. म्हणूनच अस्वस्थ न होता स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

तणावाचा दुष्परिणाम महिलांच्या मासिक पाळीवरही होतो. मासिक पाळीत अनियमितता येते. त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. परिणामी चिडणे, चट्कन रागावणे असे बदल स्वभावात होतात. या बदलांमुळेही तणाव वाढतो.

आर्थिक तणाव शरीराच्या हार्मोनल समतोल बिघडवतो, सोबतच जेव्हा शरीर तणावात असते तेव्हा भावनांवरही त्याचा परिणाम होतो. माणूस कोणाशीही न बोलण्याची, लोकांपासून दूर राहण्याची संधी शोधू लागतो.

वाढत्या तणावामुळे छोटीशी गोष्टही वेदना देते. संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही तर त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. त्यामुळेच आर्थिक तणाव असताना संभोगासाठी स्वत:च्या मनाला तयार करणे अवघड असते. आर्थिक तणावामुळे संभोग करूनही समाधान मिळत नाही. यामुळे नात्यातील प्रेमाची वीण टिकवून ठेवणे अवघड होते.

तणावाचा सामना कसा कराल?

पैशांची अडचण वेळीच सोडवणे, हे आर्थिक तणावापासून दूर राहण्यासाठी गरजेचे असते. जोपर्यंत आर्थिक स्थिती चांगली नसते तोपर्यंत एकमेकांच्या प्रेमळ साथीने परिस्थितीचा सामना करा. मन कणखर बनवा आणि लवकरच काहीतरी तोडगा निघेल, असा सकारात्मक विचार करा. ज्या गोष्टींमुळे तणाव वाढतो त्या गोष्टींपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा. पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.

आपल्या जोडीदाराला वेळ द्या. त्याला प्रेमळ साथ द्या, त्याला विश्वासात घ्या. तुम्हाला परवडणाऱ्या ठिकाणी फिरायला जा, फिरल्यामुळे तणाव कमी होतो. प्रसन्न वाटते. तणावमक्त राहण्यासाठी व्यायाम हा सर्वात चांगला उपाय आहे. शांत, सुमधुर संगीतही मनावरचा ताण कमी करते.

आर्थिक तणावाच्या काळात मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे असते. अशावेळी जोडीदाराचा स्वभाव आणि वागणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे समस्यांचा सामना करणे सोपे होते. आपल्या जोडीदाराशी संवाद साधून त्याला समजवा की, दिवस एकसारखे नसतात. कठीण प्रसंगी तुमच्यासाठी त्याची प्रेमळ सोबत किती गरजेची आहे, हे त्याला पटवून द्या.

तुम्हाला ज्यामुळे आनंद मिळतो ते काम करा. पुस्तक वाचणे, बागकाम, चित्र काढणे, स्वयंपाक करणे, अशा तुमच्या एखाद्या छंदासाठी वेळ द्या. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तणाव जास्तच असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसोपचारतज्ज्ञाला भेटा. समुपदेशन खूपच उपयुक्त ठरते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...