* सुमन बाजपेयी

कोरोना आला आणि एक काळ असा आला की, जीवनाचा वेग कमालीचा मंदावला. भीती, चिंता, भविष्यापेक्षा जास्त वर्तमानाच्या चिंतेने माणसांना ग्रासून टाकले. नोकरी, शिक्षण, काम, फिरणे, मौजमजा, वाटेल तेव्हा घराबाहेर पडणे, एखाद्या मॉलमध्ये खरेदी करणे, हॉटेलमध्ये जेवायला जाणे किंवा काहीही नियोजन न करताच गाडी घेऊन मनाला वाटेल तिथे जाणे, या सर्वांवरच बंधने आली.

पार्टी, मौजमजा, मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा किंवा रात्रीचे फिरायला जाणे, नातेवाईक, परिचितांच्या घरी जाणे, उगाचच रस्त्यावर भटकणे, अशा सगळयांलाच पूर्णविराम लागला.

भलेही आता लॉकडाऊन नाही, पण अजूनही घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा नव्हे तर हजारदा विचार करावा लागतो. गरज असेल तरच पाऊल दरवाजाबाहेर पडते. भीती, तणाव आणि घरात बसून केवळ आभासी जगात जगावे लागत असल्यामुळे सर्वात जास्त दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अशा वेळी विशेष काळजी घेऊन सामाजिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, तो अशा प्रकारे…

लोकांना भेटा

कोरोना संसर्गाच्या या काळात लोक जास्त करून मानसिकदृष्ट्या त्रासले आहेत. शारीरिक आरोग्याची काळजी घेणे जितके गरजेचे आहे तितकंच मानसिक आरोग्यही निरोगी राखणे आवश्यक आहे. कारण याचा परिणाम माणसाच्या सारासार विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि काम करण्याच्या क्षमतेवर होत असतो. जेव्हा तणाव आणि निराशा माणसाला ग्रासून टाकते तेव्हा त्याचा थेट परिणाम नाते आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. जे आधीपासूनच मानसिकदृष्ट्या आजारी होते त्यांना कोरोना संसर्गाच्या या वाढत्या संकट काळात जास्तच समस्यांचा सामना करावा लागत आहे. जे मानसिकदृष्ट्या निरोगी होते त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. घरातल्या चार भिंतीआड कैद होणे आणि घराबाहेरचे सर्व संपर्क तुटणे, हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

व्हिडीओ कॉल करून तुम्ही तुम्हाला वाटेल त्याच्याशी निश्चिंतच बोलू शकता, पण एकत्र बसून आपल्या भावना व्यक्त करण्यात जी मजा येते ती मोबाईल किंवा लॅपटॉपवर बोटं चालवून कशी येईल? अशा वेळी हे गरजेचे असते की, त्रास करून घेण्यापेक्षा स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

काळजी घ्या, सुरक्षित रहा

माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी लोकांना भेटणे त्यांच्याशी बोलणे गरजेचे असते. मात्र कोरोनाने या सर्वांवर निर्बंध लादले आहेत. सर्व मजा आणि आनंद हिरावून घेतला आहे.

याआधी कार्यक्रम आणि समारंभांत कितीतरी माणसांना भेटायची संधी मिळत असे. कौटुंबिक किंवा मित्रत्वाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे बरेच आनंदाचे क्षण सोबत घेऊन माणसे घरी परतायची तेव्हा पुढील कित्येक दिवस त्या आनंदाची थैली उघडून बसत, जो आनंद त्यांनी मिळून साजरा केला होता. आता कार्यक्रम, समारंभात लोकांना बोलवायचे तर मर्यादेचे बंधन आहे. त्यातच मास्क आणि सतत सॅनिटायझेशन करावे लागत असल्याने सर्व बिनधास्तपणा दूर एखाद्या कोपऱ्यात लपून बसला आहे.

एकमेकांपासून खूप दूर बसून आता हातवारे करूनच काहीतरी बोलले आणि ऐकले जाते. स्वत:च्या सुरक्षेच्या कारणास्तव इतरांना मनमोकळेपणाने भेटता येत नसल्याचा त्रास सर्वांनाच होत आहे. लांबूनच का होईना, पण इतरांना भेटण्याची संधी मिळाली तर ती सर्व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून मिळू शकते.

प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर उजाडतेच

ब्रिटिश जर्नल लँसेट साक्रेटीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, कोरोना संसर्ग माणसाला शारीरिक रूपात कमकुवत करतो, सोबतच मानसिकदृष्ट्याही या महामारीचे कितीतरी नकारात्मक दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. अन्य एका संशोधनात असे निदर्शनास आले आहे की, काही लोकांच्या मज्जातंतूवर याचा परिणाम झाला आहे.

प्रदीर्घ काळ उलटूनही मानसिक आरोग्यात सुधारणा होत नाही तेव्हा त्याचा दुष्परिणाम मेंदूवर होतो. फक्त वयस्कर व्यक्तीच नाहीत तर तरुण, प्रौढ, महिला, मुले म्हणजे प्रत्येक वयोगटातील लोकांना सध्या निरोगी आरोग्यासाठी लढावे लागत आहे.

दैनंदिन चक्र बिघडल्यामुळे आणि घरातच कैद होऊन रहावे लागत असल्यामुळे मेंदूला मिळणारे संकेत मिळेनासे होतात. हे संकेत घराच्या बाहेरील वातावरण आणि बाह्य घटकांपासून मिळत असतात. मात्र सतत घरात राहिल्यामुळे असे संकेत मिळणे बंद होते. या सर्व कारणांमुळे निराशा आणि चिंतेने ग्रासून टाकल्याची वाढती प्रकरणे पाहायला मिळत आहेत.

लोकांना आपल्या मुलांच्या भविष्यची चिंता आहे. कोणाला नोकरी गेल्याचं तणाव आहे तर कोणाला आर्थिक स्थितीची बिघडलेली घडी कशी बसवायची, याची काळजी आहे. घरात बराच काळ राहिल्यामुळे कंटाळून गेलेले लोक बाहेर पडून मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे तणावात आहेत.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, याला ‘जीनोफोबिया’ म्हणजे माणसांची भीती असे म्हणतात. यामध्ये लोक कुठलीही व्यक्ती त्यांच्या समोर आल्यास घाबरतात. त्यांना बोलायला भीती वाटते. समोरच्या व्यक्तीच्या डोळयात डोळे घालून ते बोलू शकत नाहीत.

समोर प्रत्यक्ष उभ्या असलेल्या माणसांना मेंदू स्वीकारू शकत नाही आणि व्हिडीओवर बोलणेच त्याला जास्त सोपे वाटते. प्रत्यक्षात त्याच्यावर याचे दुष्परिणाम होत आहेत. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करण्यात काहीच चुकीचे नाही. जीवन पूर्वीसारखे राहिले नाही, हेही तितकेच खरे आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, जीवनात आनंदच उरलेला नाही. अशा वेळी प्रत्येक परिस्थितीत स्वत:ला शांत आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा.

मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या

सुरक्षेच्या सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करून आपल्या मानसिक आरोग्याला योग्य पोषण देण्यासाठी, मग हे पोषण थोडे कमी असेल तरी काहीच हरकत नाही, पण ते मिळावे म्हणून लोकांना अवश्य भेटा. सामाजिक अंतर ठेवून मास्क घालून भेटावे लागले तरी काहीच हरकत नाही, पण लोकांना नक्की भेटा. अन्यथा घरबसल्या येणारा आळस अनेक समस्यांचे कारण ठरू शकतो.

सोशल मीडिया आणि इंटरनेट तुम्हाला कंटाळवाणा वाटत नाही, पण तो प्रत्यक्ष जीवनापासून तुम्हाला पळवून नेऊन दूर घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतो. सध्याच्या काळात कंटाळा येण्याची समस्या सर्वसामान्य झाली आहे. जर तुम्हीही आनंदाच्या शोधात किंवा जीवन नीरस झाले आहे असे वाटून डिजिटल माध्यमांवर नको तेवढा वेळ घालवत असाल तर ही तुमच्यासाठी खूप मोठी समस्या ठरू शकते.

जर फक्त मनोरंजन किंवा कंटाळा घालवण्यासाठी लोक इंटरनेटचा वापर करत असतील तर ही आणखी एक समस्या आहे. यावेळेस गरज आहे ती अशा लोकांना भेटण्याची ज्यांना तुमची काळजी आहे, जे तुमच्यावर प्रेम करतात किंवा ज्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला समाधान किंवा आनंद मिळत असेल.

गरज आहे ती पुन्हा लोकांना भेटण्याची, सामाजिक संबंध मर्यादितच ठेवा, पण आभासी जगापासून दूर राहून स्वत:हून आपल्या माणसांना नक्की भेटा. तुम्हाला स्वत:मध्ये बदल झालेला दिसून येईल. जणू काही खूप वर्षांपूर्वीपासूनचे ओझे मनावरून दूर झाल्यासारखे वाटेल. मनमोकळेपणाने आपुलकीने बोलणे आणि मनसोक्त हसणे यामुळे तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि तणाव दूर निघून जात असल्यासारखा भास होईल.

व्यसनांपासून दूर रहा

मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा नशेच्या गोळयांचा उपयोग अथवा झोपेच्या गोळया खाण्यापेक्षा त्यांना भेटा, ज्यांच्यासोबत वेळ घालवणे तुमच्यात जगण्याची नवी उमेद जागी करेल.

मानसिक आरोग्य पूर्णत : भावनात्मक गोष्टींवर अवलंबून असते. जर तुमचे सामाजिक जीवन निरोगी असेल तरच तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी राहू शकता. सर्व नाती आनंदाने जगू शकता. यामुळेच कठिणातील कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमताही तुमच्यात आपसूकच निर्माण होईल.

कोरोनाचे संकट दीर्घकाळ राहणार आहे. त्यामुळेच या संकटाला कंटाळून निराशेने जगण्याऐवजी स्वत:ला पुन्हा एकदा तयार करा, जेणेकरून सामाजिक जीवन चांगल्या प्रकारे जगता येईल. आपली प्रिय माणसे, मित्र, नातेवाईक, ओळखीतल्या माणसांना भेटा. आपल्या मानसिक आरोग्याला औषधांच्या हातात सोपवण्यापेक्षा मनातले आपल्या माणसांना सांगा. मनसोक्तपणे हसून, आपली सुखदु:खे एकमेकांना सांगून ती हलकी करा आणि कोरोनालाच आव्हान देण्यासाठी सज्ज व्हा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...