* सोमा घोष
मुंबईच्या इतिहासात काळा घोडा कला महोत्सवाचे खूपच महत्वाचे स्थान आहे. विविध कलांचा अनोखा मेळ घालणारा काळा घोडा फोस्टीव्हल पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आणखी भव्य स्वरुपात आणि मोठ्या विस्तारात आयोजित केला जाणार आहे. काळा घोड्यातील रस्त्यांचे रुपांतर एका जत्रेत होईल आणि प्रत्येकाचे मनोरंजन होईल यात शंका नाही. कला, संस्कृती, वारसा, नाटक, गाणे आणि नृत्याची रेलचेल असलेला हा फेस्टीव्हल तुमची वाट पाहाणार आहे. तेव्हा तुम्ही तयार व्हा काळ्या घोड्याच्या पंखावर स्वार होऊन कलेच्या नव्या सफरीचे साक्षीदार होण्यासाठी.
गेल्या वर्षी कोरोनामुळे संपूर्ण जग बंद झाले होते. मात्र काळा घोडा फेस्टीव्हलमध्ये खंड पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जगातील सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) त्याच्या डिजिटल अवतारासह जागतिक झाला होता आणि नऊ दिवसांमध्ये ७० हून अधिक ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आता फेब्रुवारी २०२२ मध्ये काळा घोडा आर्ट फेस्टीव्हल KGAF एका नव्या ‘उडान’ थीमसह समोर येणार आहे. १०० वर्षे जुनी हेरिटेज इमारत – छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) ज्यात बाल संग्रहालय, कुमारस्वामी हॉल, अॅम्फीथिएटर, लॉन आणि काही ठिकाणे आहेत, यासह ९ दिवस मुख्य ठिकाणांवर या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात सुंदर मैदानी जागा; मॅक्स म्युलर भवन – ज्यामध्ये कला आणि वास्तुकला, NGMA ऑडिटोरियम, हॉर्निमन सर्कल गार्डन, किताब खाना, या भागातील रस्ते आणि काळा घोडा परिसरात महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी रस्त्यांवर स्टॉल्स उभारले जाणार नसल्याने ग्राउंड इंस्टॉलेशन्स अत्यल्प आहेत. यात उडान या थीमला अनुसरून, डेकोर लाइटिंगने भरलेले बहुतेक एरियल व्हिज्युअल आर्ट्स इंस्टॉलेशन्स असतील.
काही इमारतींच्या दर्शनी भागावर भित्तीचित्रे रंगवली गेली आहेत. KGAF यावर काम करीत असून ही भित्तीचित्रे या नियमित परिसराच्या पलीकडेही असणार आहेत. कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन, वॉक-इन टाळण्यासाठी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच सामाजिक अंतर कायम ठेवणेही आवश्यक आहे.
दुहेरी लसीकरण प्रमाणपत्रे तपासून प्रवेश दिला जाणार असून पालकांसोबत प्रवास करणाऱ्या मुलांसाठी आरोग्य सेतू अॅप तपासले जाईल. काळा घोडा फेस्टीव्हलमध्ये कार्यशाळा, हेरिटेज वॉक आणि पथनाट्य तसेच व्हिज्युअल आर्ट इन्स्टॉलेशन, साहित्य, नाट्य, सिनेमा, संगीत आणि नृत्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. KGAF ने नेहमीच अभूतपूर्व गर्दी खेचली आहे. या कला महोत्सवात आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत.
कार्यक्रमस्थळी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी केली जाणार आहे.काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलद्वारे उभ्या राहाणाऱ्या निधीतून UNESCO पुरस्कार प्राप्त मुलजी जेठा फाउंटन, K.E सिनेगॉग आणि बोमनजी होर्मर्जी क्लॉक टॉवर यांसारख्या पुनर्संचयित प्रकल्पांसह परिसरातील आणि आसपासच्या इमारती आणि वारसा स्मारकांच्या पुनर्संचयनासाठी अतिरिक्त निधी वापरला जाणार आहे.
काळा घोडा कला महोत्सवाबाबत माहिती देताना KGAF च्या संचालिका वृंदा मिलर यांनी सांगितले, “मुंबईतील काळा घोडा कला महोत्सवाचे हे २३ वे वर्ष आहे. कला आणि संस्कृती त्याच्या उत्कृष्ट स्वरुपात साजरी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे भागीदार आणि सहयोगी पुन्हा एकदा कला महोत्सवाच्या देखण्या सादरीकरणासाठी आमच्याशी हातमिळवणी करत आहेत. कला महोत्सव नेमीप्रमाणेच तेजस्वी राहाणार असून गर्दी टाळण्यासाठी आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी, आम्ही एरियल इन्स्टॉलेशनवर जास्त भर देणार असून ग्राउंड इव्हेंट्सवर कमी लक्ष केंद्रित करणार आहोत. यंदाही काळा घोडा आर्ट कार्ट (KGAK) ने बाजारपेठेला सुरुवात केली जाणार असली तरी यंदाही स्टॉल आभासी असणार आहेत. आर्ट कार्ट १० डिसेंबरपासून वर्षभर सुरू राहाणार आहे.”