* गरिमा पंकज
कौटुंबिक आरोग्य आणि आनंदाचा मार्ग स्वयंपाकघरातून जातो. एका संशोधनानुसार घरात सर्वाधिक बॅक्टेरिया असलेली जागा म्हणजे स्वयंपाकघर. किचन टॉवेल्स, डस्टबिन, स्टोव्ह एवढेच नव्हे तर सिंकमध्येही जीवाणू वाढू शकतात. जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर घर रोगांचे मुख्य केंद्र बनेल.
चला स्वयंपाकघर जंतूमुक्त आणि चमकदार कसे ठेवता येईल ते जाणून घेऊया.
टाईल्स साफ करणे
स्वयंपाक करताना गॅस स्टोव्हभोवती आणि मागच्या बाजूला असलेल्या टाईल्सवर घाण जमा होते. जर या टाईल्स दररोज स्वच्छ केल्या नाहीत तर नंतर त्या साफ करणे थोडे अवघड होते. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब हलक्या ओल्या कपडयाने आजुबाजूच्या टाईल्स पुसायला विसरू नका.
बेकिंग सोडा आठवडयातून दोनदा साफसफाईसाठी वापरू शकता. सुमारे अर्धी बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. आता हे स्पंजवर घेऊन किचन टाईल्स स्वच्छ करा आणि नंतर कोरडया कापडाने पुसून काढा. बेकिंग सोडा स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लीनर म्हणून कामी येतो.
टाईल्स साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापरदेखील करू शकता. दोन कप व्हिनेगर आणि दोन कप पाण्याचे द्रावण बनवून तो स्प्रे बाटलीमध्ये भरा. नंतर टाईल्सवर स्प्रेने फवारणी करा आणि मऊ कापडाच्या मदतीने पुसून काढा.
सिंकची स्वच्छता
सर्वाधिक जीवाणू स्वयंपाकघरातील सिंकमध्ये आढळतात. म्हणून रोज ते स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम त्यात ठेवलेली भांडी बाहेर काढा किंवा धुवून त्यांना योग्य ठिकाणी ठेवा. मग सिंकमधील कचरा स्वच्छ करा. जर सिंकच्या ड्रेन स्टॉपरमध्ये कचरा अडकला असेल तर तोदेखील स्वच्छ करा. नंतर साबण आणि कपडयाच्या मदतीने कोमट पाण्याने सिंक स्वच्छ करा. गरम पाणी सिंकमध्ये असलेले जीवाणू नष्ट करेल.
स्वयंपाकघरातील सिंक घरगुती पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा लिंबाच्या रसाबरोबर अर्धा कप पांढरा व्हिनेगर मिसळा आणि हे मिश्रण सिंकभोवती पसरवा. असे केल्यावर दहा मिनिटांनंतर टूथब्रशने सिंक स्क्रब करा आणि मग गरम पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. पाण्याने साफ केल्यानंतर कोरडया कापडाने सिंक पुसून टाका.
हे देखील लक्षात ठेवावे की सिंकमध्ये नेहमीच भांडी पडून राहू देऊ नका. प्लेट्स, ग्लासेस, वाटया आणि इतर सर्व भांडी वापरल्यानंतर लगेचच स्वच्छ केली पाहिजेत आणि त्यांच्या जागेवर ठेवली पाहिजेत. घाणेरडी भांडी पडून राहिल्यावर त्यांच्यावर जीवाणू वाढू लागतात. भांडी साफ केल्यावर पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल अवश्य ठेवा.
भिंतीची स्वच्छता करणे
स्वयंपाकघराच्या भिंतीवर दोन प्रकारचे डाग असतात. एक तेल-हळदीचे आणि दुसरे वाफेचे व पाण्याच्या शिंतोडयांचे. स्वयंपाकघरातील भिंत स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबणात थोडेसे पाणी घाला. आता या द्रावणात एक कपडा बुडवून तो भिंतीवर फिरवा. सर्व प्रकारचे डाग त्वरित निघून जातील.
फरशी स्वच्छ करण्याची पद्धत
सामान्य फरशी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि कपडयाच्या सहाय्याने फरशी स्वच्छ करा. परंतू जर आपल्या स्वयंपाकघरातील फरशी लाकडाची असेल तर यासाठी आपण एक बादली पाण्यात पांढरा व्हिनेगर मिसळा आणि नंतर त्याने कपडा ओला करून फरशीला चांगल्या प्रकारे रगडून स्वच्छ करा.
डस्टबिन जंतूमुक्त असे करावे
स्वयंपाकघरातील डस्टबिन स्वच्छ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात व्हिनेगर घाला. व्हिनेगर घातल्यानंतर यासह डस्टबिन स्वच्छ करा. जंतुनाशक मल्टीयूज हायजीन लिक्विड क्लीनरसह डस्टबिनमध्ये लावा आणि त्यामध्ये वापरण्यात येणारी पिशवी दररोज बदला.
मायक्रोवेव्ह साफ करण्याचे उपाय
कधीकधी मायक्रोवेव्ह दुर्गंधीयुक्त होतो. पदार्थ बनवल्याने किंवा गरम केल्यामुळे यातून दुर्गंधी येऊ लागते. लिंबू हा मायक्रोवेव्ह साफ करण्याचा एक सोपा व घरगुती उपाय आहे. रात्रभर मायक्रोवेव्हमध्ये लिंबू कापून ठेवा आणि दार उघडे सोडा. सकाळी मायक्रोवेव्हचा दरवाजा बंद करून याला बॉयलरवर चालवा. मायक्रोवेव्ह जंतूमुक्त ठेवण्यासाठी त्याचा बाह्य भाग जंतुनाशक वाइप्सने पुसून घ्या.
गॅस स्टोव्हची सफाई
गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी सर्वप्रथम त्यावर बेकिंग सोडा आणि गरम पाणी शिंपडा. तेलाचे डाग दूर करण्यासाठी तीस मिनिटांनंतर ते स्क्रब करा. यानंतर पिन किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने बर्नरच्या छिद्रांमधील घाण साफ करा. नंतर पाणी आणि डिटर्जंट किंवा बेकिंग सोडयाची पेस्ट बनवून बर्नर स्वच्छ करा.
दगडांचे स्लॅब स्वच्छ करण्याचे उपाय
आजही बऱ्याच घरांच्या स्वयंपाकघरात दगडी स्लॅब असतात. त्यांच्यावर कॉफी, चहा, ज्यूस इत्यादींचे डाग पडण्याबरोबरच स्क्रॅचेसही पडतात. स्लॅब स्वच्छ ठेवण्यासाठी थोडयाशा पाण्यात हायड्रोजन पेरॉक्सॉईड तसेच अमोनियाचे काही थेंब घाला. आता कपडयाच्या मदतीने हे द्रावण स्लॅबवर लावा, स्लॅब नवा दिसू लागेल.
एझ्कॉस्ट फॅनची स्वच्छता
एझ्कॉस्ट फॅनच्या पातींमध्ये तेल गोठल्यामुळे ते कार्य करणे थांबवते. ते साफ करण्यासाठी थोडयाशा पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. आता त्याच्या मदतीने याला स्वच्छ करा.
कपाट स्वच्छ करण्याची पद्धत
कपाट स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा थोडयाशा तेलात मिसळा. यानंतर स्पंज किंवा ब्रशच्या मदतीने हे मिश्रण लाकडी कपाटाच्या ड्रॉव्हर, रॅक आणि दारावर पसरवा. नंतर कोरडया कपडयाने पुसून टाका. काही मिनिटांतच कपाट नवे दिसू लागेल.
फ्रिज साफ करणे
ठराविक काळाने फ्रिजही साफ करणे आवश्यक आहे. ते साफ करण्यासाठी कापसाचे गोळे लिंबाच्या रसात बुडवा आणि काही तास फ्रीजमध्ये ठेवा. फ्रिजमधील डाग साफ करण्यासाठी लिंबाचा अर्धा भाग कापून घ्या. त्यावर थोडे मीठ लावून डागाळलेल्या जागेवर चोळा. अशाप्रकारे डाग तर दूर होतीलच शिवाय लिंबाच्या रसामुळे फ्रिजमधील दुर्गंधीदेखील दूर होईल.
आता फ्रिजच्या आतील कप्ये मऊ कापडाने पुसून घ्या आणि पडलेल्या कोणत्याही चिकट पदार्थाला घासून स्वच्छ करून घ्या. कालबाह्य झालेल्या वस्तू किंवा भाज्या फ्रिजमधून काढा. यांमुळे देखील जंतू सक्रिय होऊ लागतात.
शेल्फची स्वच्छता
आपण स्वयंपाकघरातील वस्तू ठेवण्यासाठी वापरत असलेला शेल्फ काही दिवसांच्या अंतराने साफ करा. आपण यासाठी डिटर्जंट वापरू शकता. शेल्फच्या जागी भिंतीत स्टेनलेस स्टीलचा रॅकदेखील लावू शकता. तो केवळ सुंदरच दिसत नाही तर त्याला स्वच्छ करणेदेखील सोपे असते.