* गरिमा पंकज
कौटुंबिक आरोग्य आणि आनंदाचा मार्ग स्वयंपाकघरातून जातो. एका संशोधनानुसार घरात सर्वाधिक बॅक्टेरिया असलेली जागा म्हणजे स्वयंपाकघर. किचन टॉवेल्स, डस्टबिन, स्टोव्ह एवढेच नव्हे तर सिंकमध्येही जीवाणू वाढू शकतात. जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल तर घर रोगांचे मुख्य केंद्र बनेल.
चला स्वयंपाकघर जंतूमुक्त आणि चमकदार कसे ठेवता येईल ते जाणून घेऊया.
टाईल्स साफ करणे
स्वयंपाक करताना गॅस स्टोव्हभोवती आणि मागच्या बाजूला असलेल्या टाईल्सवर घाण जमा होते. जर या टाईल्स दररोज स्वच्छ केल्या नाहीत तर नंतर त्या साफ करणे थोडे अवघड होते. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब हलक्या ओल्या कपडयाने आजुबाजूच्या टाईल्स पुसायला विसरू नका.
बेकिंग सोडा आठवडयातून दोनदा साफसफाईसाठी वापरू शकता. सुमारे अर्धी बादली पाण्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिसळा. आता हे स्पंजवर घेऊन किचन टाईल्स स्वच्छ करा आणि नंतर कोरडया कापडाने पुसून काढा. बेकिंग सोडा स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी होममेड क्लीनर म्हणून कामी येतो.
टाईल्स साफ करण्यासाठी व्हिनेगरचा वापरदेखील करू शकता. दोन कप व्हिनेगर आणि दोन कप पाण्याचे द्रावण बनवून तो स्प्रे बाटलीमध्ये भरा. नंतर टाईल्सवर स्प्रेने फवारणी करा आणि मऊ कापडाच्या मदतीने पुसून काढा.
सिंकची स्वच्छता
सर्वाधिक जीवाणू स्वयंपाकघरातील सिंकमध्ये आढळतात. म्हणून रोज ते स्वच्छ करा. स्वयंपाकघरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम त्यात ठेवलेली भांडी बाहेर काढा किंवा धुवून त्यांना योग्य ठिकाणी ठेवा. मग सिंकमधील कचरा स्वच्छ करा. जर सिंकच्या ड्रेन स्टॉपरमध्ये कचरा अडकला असेल तर तोदेखील स्वच्छ करा. नंतर साबण आणि कपडयाच्या मदतीने कोमट पाण्याने सिंक स्वच्छ करा. गरम पाणी सिंकमध्ये असलेले जीवाणू नष्ट करेल.
स्वयंपाकघरातील सिंक घरगुती पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा लिंबाच्या रसाबरोबर अर्धा कप पांढरा व्हिनेगर मिसळा आणि हे मिश्रण सिंकभोवती पसरवा. असे केल्यावर दहा मिनिटांनंतर टूथब्रशने सिंक स्क्रब करा आणि मग गरम पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा. पाण्याने साफ केल्यानंतर कोरडया कापडाने सिंक पुसून टाका.