* डॉ. यतीश अग्रवाल
प्रश्न : मी २८ वर्षीय विवाहित महिला आहे. माझा रंग सावळा आहे. मी आता गरोदर आहे. असा काहीतरी उपाय सांगा की बाळ गोऱ्या रंगाचे होईल. आहाराने त्याच्यावर काही प्रभाव पडतो का? दुसरे काही घरगुती उपाय असतील, तर तेही सांगा? गृहशोभिकेच्या याच स्तंभात काही महिन्यांपूर्वी त्वचेच्या रंगामागे मिलेनोसाइटची माहिती दिली होती. असा काही उपाय आहे का की बाळाची मिलेनोसाइट अपरिणामकारक राहील व बाळ गोरेगोमटे होईल?
उत्तर : आपल्या चेहऱ्याची ठेवण आणि इतर शारीरिक गुण उदा. उंचीप्रमाणेच आपल्या त्वचेचा रंग ठरवणाऱ्या मिलेनोसाइट्सच्या घनत्वाचे गणितही आपले जीन्स निश्चित करतात. ते आपल्या आईवडील आणि इतर पूर्वजांशी जुळतात. त्यांना कशाही प्रकारे बदलता येत नाही.
तसेही एखाद्या व्यक्तिचे रूप-सौंदर्य केवळ त्याच्या रंगावरच अवलंबून नसते. अनेक सावळ्या रंगाचे लोकही खूप सुंदर दिसतात आणि अनेक गोरेगोमटे सामाजिक दृष्ट्या सुंदर नसतात. त्यामुळे आपण उगाचच स्वत:च्या व होणाऱ्या बाळाच्या रंगाबाबत एवढा विचार करू नका.
गरोदरपणानुसार उचित प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त आहार घ्या. त्यामध्ये फळे, पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी पुरेशा प्रमाणात असावीत. जेणेकरून आपल्याला व आपल्या बाळाला सर्व पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळू शकतील.
प्रश्न : मी २८ वर्षांची तरुणी आहे. मला पाळी येत नाही. गेल्या काही दिवसात मी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून आपले पेल्विक अल्ट्रासाउंड करून घेतले होते. त्याच्या रिपोर्टनुसार, माझ्या युटेरसची साइज २९ मिलीमीटर १८ मिलीमीटर १३ मिलीमीटर आहे. मला पुढे कधी गर्भधारणा होईल का? मी काय केले पाहिजे, योग्य सल्ला द्या?
उत्तर : तुम्ही तुमच्या अल्ट्रासाउंडचा पूर्ण रिपोर्ट पाठवला असता, तर चांगले झाले असते. त्यामुळे युटेरसबरोबरच ओव्हरीजबाबतही माहिती मिळाली असती. राहिला प्रश्न युटेरसचा, तर युटेरस लहान असून, त्याचा व्यवस्थित विकास झालेला नाहीए. याला हाइपोप्लास्टिक युटेरसचा दर्जा दिला जातो. हा विकार अनेक कारणांनी होतो. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सविस्तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
काही महिलांमध्ये युटेरस सुरुवातीपासूनच लहान असतो आणि ही स्थिती एखाद्या मोठ्या सिंड्रोमचा भाग असते. त्यामध्ये केवळ युटेरसच नव्हे, तर व्हेजाइनाचाही व्यवस्थित विकास होत नाही. काही महिलांमध्ये युटेरसचे लहान असणे त्या मोठ्या क्रोमोझमल विकाराचा भाग असतो, ज्याला टर्नर सिंड्रोम असे नाव दिले गेले आहे. त्यामध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता नसते. एखाद्या मुलीमध्ये हा लैंगिक अवयवांचा विकास अर्धवट राहतो, जेव्हा ती आईच्या गर्भात असते आणि आई सिंथेटिक इस्टरोजेन म्हणजेच डाईइथाइलस्टील्बेस्ट्रो घेते.
काही उदाहरणांत ही संपूर्ण समस्या हार्मोनल पातळीवर निर्माण होते. किशोरावस्थेत जेव्हा शरीर प्यूबर्टीसह होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या देखरेखीत स्वत:ला वाढत्या वयासाठी तयार करते आणि इतर सेक्शुअल गुणांसोबतच लैंगिक अवयवही परिपक्व होऊन मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी विकसित होतात, त्यावेळी अंतर्गत हार्मोनल गडबड झाल्यामुळे युटेरसचा विकास मध्येच अर्धवट राहतो. ही विकारमय स्थिती प्रामुख्याने पिट्युटरी ग्लँडमध्ये बनणाऱ्या प्रोलॅक्टिन हार्मोनच्या अधिकतेमुळे निर्माण होते.
आपला युटेरस का हाइपोप्लास्टिक म्हणजे अल्पविकसित राहिला, याची योग्यप्रकारे डॉक्टरी तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होईल की आपल्या मदतीसाठी काय केले जाऊ शकते? ही तपासणी आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजी विभागामध्ये करू शकता. या तपासणीत बराच काळ लागेल आणि येणाऱ्या खर्चासाठीही आपल्याला तयार राहावे लागेल. कारण स्पष्ट झाल्यानंतरही उपचार यशस्वी होण्याची शक्यता मर्यादित राहील.
जिथे आपली पाळी न येण्याचा प्रश्न आहे, तर त्याचे मूळही युटेरसचे हाइपोप्लास्टिक होणे आहे.
प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला वेळेवर पाळी येत नाही. बहुतेकदा निश्चित वेळे, २-४ दिवस निघून गेल्यानंतर येते. याचे काय कारण आहे? मी या समस्येसाठी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेतली पाहिजे का? माझ्या एका मैत्रिणीचे म्हणणे आहे की हे योग्य नाहीए. त्यामुळे पुढे मला याचा त्रास सहन करावा लागू शकतो. कृपया योग्य सल्ला द्या?
उत्तर : तुम्ही असे काळजी करणे योग्य नाहीए. सत्य हे आहे की ज्या गोष्टीबाबत आपण काळजी करत आहात, ती गोष्ट अगदी सामान्य आहे. हे खरे आहे की बहुतेक महिलांमध्ये मासिकपाळीचे चक्र २८ दिवसांचे असते. पण हे सत्यही तेवढेच मोठे आहे की, बऱ्याचशा स्त्रियांमध्ये हे चक्र २६ दिवस, २७ दिवस, २९ दिवस किंवा मग ३० दिवसांचे असते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात बनणाऱ्या लैंगिक हार्मोनचे वाढणे-कमी होणे, तिच्या शरीराच्या लयीवर अवलंबून असते, जी तिचे विशेष असते. एवढेच नव्हे, हे मासिक चक्र बऱ्याचशा अंतर्गत आणि बाहेरील तत्त्वांनी प्रभावित होऊ शकते. भौगोलिक स्थान परिवर्तन, जलवायू, व्यक्तिगत आरोग्य, मानसिक आरोग्य आणि एवढेच नव्हे, तर घरात किंवा हॉस्टेलमध्ये अन्य महिलांच्या मासिक चक्राचाही यावर प्रभाव पडताना आढळला आहे.
तुमचे मासिक चक्र ३०-३२ दिवसांचे आहे, तर यात काही विशेष गोष्ट नाही. याबाबत ना ही आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे जायची गरज आहे आणि ना ही अशा एखाद्या मैत्रिणीच्या सल्ल्याने काळजीत पडण्याची गरज आहे, जिला मासिकपाळीच्या नियमांबाबत नीट माहिती नाहीए. तपासणीची आवश्यकता तेव्हाच असते, जेव्हा मासिकपाळी उशिरा येण्याबरोबरच अनियमित असेल किंवा त्यात मासिक स्त्राव थोड्याच प्रमाणात होत असेल.