* प्रतिनिधी
- मी २१ वर्षांचा तरूण आहे. माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंसुद्धा माझ्यावर निरतिशय प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. पण जेव्हा मुलीने तिच्या घरी याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या घरात हल्लकल्लोळ माजला. तिच्या घरच्यांनी मुलीला मारहाण केली व तिचा मोबाइल ताब्यात घेतला. एवढंच नाही तर तिचं घराबाहेर येणंजाणं बंद केलं. तिने माझ्याशी संबंध तोडले नाहीत तर ते मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरूंगात पाठवतील वा मला जीवे मारतील अशी तिला धमकी दिली. मुलगी यामुळे खूप घाबरली. तिने खाणंपिणं सोडून दिलं, प्रत्येक वेळी रडत राहते. तिच्यामुळे माझ्या जिवाला धोका पोहोचू नये असं तिला वाटतं.
आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आम्ही मुलीच्या घरच्यांना लग्नासाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काही ऐकत नाही. लग्नाला नकार देण्यामागचं कारण हे आहे की मुलीच्या आजीची जात (गोत्र) आणि आमची जात एक आहे. त्यामुळे नात्याने आम्ही दोघे भाऊबहिण आहोत.
माझ्या घरच्यांचा यावर अजिबात विश्वास नाही. त्यांच्याकडून लग्नासाठी पूर्ण होकार आहे. परंतु मुलीकडच्यांची सहमती नाही. दुसरीकडे कुठे तरी लग्नासाठी ते मुलीवर दबाव आणत आहेत. पण मुलगी मात्र अडून बसली आहे की लग्न करणार तर माझ्याशीच. नाहीतर मरून जाईन असं तिचं म्हणणं आहे. मला काही समजत नाही की काय करू?
मी मुलीच्या आई व मोठ्या बहिणीला भेटलो. आम्ही दोघं एकमेकांबाबत खूप गंभीर आहोत, आम्ही एकमेकांबरोबर खूप सुखी राहू तेव्हा आमच्या लग्नाला परवानगी द्या, असं समजवायचा प्रयत्न केला. परंतु त्या काहीच करू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. समाज आमचं लग्न कधीच स्वीकारणार नाही. शेवटी याच समाजात त्यांना राहायचं आहे. समाजाच्या विरोधात त्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलीचा मी पिच्छा सोडणं योग्य अन्यथा अघटित घडू शकतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन आम्ही लग्न करू शकत नाही. सांगा, आम्ही काय करावं?