* डॉ. शांतनु जरादी, डेंन्टज डेंटल केयरचे चिकित्सक
तोंडाची जळजळ फक्त जास्त मसालेदार आहार खाल्ल्यानेच होत नाही, तर याची इतरही अनेक कारणं आहेत.
मग या जाणून घेऊया तोंडाची जळजळ आणि त्याच्यावरील उपायांबद्दल :
दातांची स्वच्छता : दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तोंडाची जळजळ, कोरडेपणा, तोंडातील अल्सर यासांरखी लक्षणं दिसतात. तोंडाच्या स्वच्छतेसाठी नियमित ब्रशिंग फार जरूरी आहे.
पोषणाचा अभाव : शरीरात व्हिटॅमिन, लोह आणि खनिजांची कमतरताही या समस्येचं कारण ठरू शकते. म्हणून असा आहार घ्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे घटक असतील.
आजार : मधुमेह आणि थायरॉइडने ग्रस्त असलेल्या लोकांनाही ही समस्या असते.
अतिसंवेदनशीलता : एलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांनाही एखाद्या खाद्यपदार्थामुळे या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
हार्मोनल असंतुलन : हार्मोनल समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांमध्येही याची लक्षणे दिसून येतात. रजोनिवृत्त स्त्रियांमध्येही हार्मोनचं असंतुलन आढळून येतं, त्यामुळे त्यांच्या तोंडात लाळेच्या कमीमुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते.
औषधांचं सेवन आणि उपचार : रेडिएशन आणि कीमो थेरेपीसारखे उपचार करणाऱ्यांना या समस्येला सामोरे जावं लागतं. म्हणून कोणतंही औषध घेण्यापूर्वी याविषयी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
व्यसनाची सवय : धूम्रपान आणि व्यसनदेखील तोंडाच्या जळजळीचं कारण ठरतात. विशेष म्हणजे मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. अशा लोकांना तोंडाच्या जळजळीसह पोट आणि छातीतही जळजळ होण्याची समस्या असते.
तोंडाच्या जळजळीवर उपचार
तोंडाच्या जळजळीकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या गोष्टींकडे लक्ष द्या.
* धुम्रपान करू नका.
* आम्लीय पेय आणि मद्य सेवन करू नका.
* आपल्या आहारात पौष्टिक घटक जसं की डाळी, फायबरयुक्त अन्न, मोसमी फळं इत्यादींचा समावेश करा.
* जास्तीत जास्त पातळ पदार्थांचं सेवन करा. लक्षात ठेवा की पातळ पदार्थ गरजेपेक्षा अधिक गार नसावेत.
* ब्रशिंगची योग्य पद्धत जाणून घ्या.
* आपला डेंचर फिक्स ठेवा.
* मसालेदार आणि जास्त गरम खाद्य पदार्थांचं सेवन करणं टाळा.
* विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस बिन मसालेदार आहाराचं सेवन करा.
* आयुष्यभर जर स्वादिष्ट आणि पौष्टिक खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तोंडाच्या आरोग्याशी निगडित या गोष्टींचा आजपासून अवलंब करा.