* प्रतिनिधी

  • मी ३० वर्षीय अविवाहित तरुणी आहे. लहानपणापासूनच माझ्याबरोबरच घरात ३ मोठे भाऊ आहेत. मी एकुलती एक छोटी बहीण होते. त्यामुळे भावांची लाडकी असायला हवे होते, पण लाड तर दूरच राहिले, कोणी माझ्याशी सरळ तोंडी बोलतही नसे. आई सतत आजारी राहात असे. त्यामुळे अभ्यासाबरोबर मी घरातील कामही करू लागले. एवढे करूनही माझा मधला भाऊ कुणास ठाऊक का, माझा द्वेष करत असे. नेहमी भांडण आणि मारझोड करीत असे. एकदा त्याने गळा दाबून मला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आईने मधे पडून मला कसेतरी वाचवले.

माझा भाऊ बहुतेक त्याच्या बेरोजगारीमुळे तणावात राहात असे. इतर कोणावरही त्याची जोरजबरदस्ती चालत नसे. त्यामुळे तो बघावे तेव्हा मला मारझोड करीत असे. कोणीही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला नाही आणि एके दिवशी त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि मग तिचाही मृत्यू झाला. मोठया भावाने लग्न केले. मला वाटले, वहिनी घरात असल्याने आईच्या मृत्यूनंतर घरात आलेले औदासिन्य दूर होईल. मलाही घरातील कामात थोडी मदत मिळेल. माझ्या जीवनात थोडे सुख येईल, पण स्थिती अजून वाईट झाली. वहिनी घरातील कुठल्याही कामाला हात लावत नसे. माझे काम अजून वाढले. ती येताच तिने माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. माझी शाळा तर आईच्या मृत्यूनंतर सुटली होती. मला शिक्षणाची आवड होती. म्हणून मी प्रायव्हेट परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन केले.

मला लग्न करायचे नाहीए. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे, परंतु दोन्ही भाऊ यासाठी परवानगी देत नाहीत. छोटा भाऊ मारहाण करतो आणि सांगतो की लग्न करायचे नसेल, तर घरातून चालती हो. या घरात राहण्याचा तुला काहीही अधिकार नाही. घरावर त्या दोघांचा हक्क आहे.

अनेक वेळा वाटते की विष घेऊन स्वत:चे आयुष्य संपवून टाकावे. लहानपणापासून आतापर्यंत मी केवळ दु:खच पाहात आले आहे. कधीही कोणाकडूनही प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळाले नाहीत.

मी जन्मल्यानंतर काही दिवसांतच माझे वडील वारले. त्यामुळे आई मला अपशकुनी, काळया तोंडाची आणि न जाणो, काय-काय बोलत राहिली आहे. मग भावांचा मार व शिव्या खात राहिले. उरली-सुरली कसर वहिनीने पूर्ण केली.

मला काही कळत नाहीए की मी काय करू? नोकरी ते मला करू देत नाहीत, मला लग्न करायची इच्छा नाहीए. कारण पुरुषांवरील माझा विश्वास उडाला आहे. मला जर माझ्या घरातच माझ्या भावांकडून प्रेम मिळाले नाही, तिथे बाहेरच्यांकडून मी काय अपेक्षा करणार. कधीतरी वाटते, घरातून पळून जावे, तर कधी जीवन संपविण्याची इच्छा होते. तुम्ही सांगा मी काय करू?

हा योगायोगच म्हणावा लागेल की लहानपणापासून आतापर्यंत आपले जीवन त्रासदायक राहिले आहे. यासाठी घरातील सदस्यांपेक्षा जास्त आपल्या कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती जबाबदार राहिली आहे.

वडिलांच्या अचानक जाण्यामुळे ४-४ मुलांची जबाबदारी आपल्या आईच्या शिरावर येऊन पडली. एकटया स्त्रीसाठी हे सर्व सांभाळणे आणि एकटीने संघर्ष करत जगणे सोपे नाही. याबरोबरच ती आजारीही राहात होती. समस्यांनी त्रस्त होऊन ती सगळा राग आपल्यावर काढत असे. यावरून आपण असे समजू नका की तिचे तुमच्यावर प्रेम नव्हते.

राहिला प्रश्न आपल्या भावांच्या आपल्याप्रती व्यवहाराबाबतचा, तर आईवडील नसल्यामुळे आपल्या विवाहाची जबाबदारीही त्यांच्यावर येऊन पडली आहे. म्हणून त्यांची इच्छा आहे की, तुम्ही लग्न करावे. आपल्या भावांचे आपल्यासोबतचे वागणे प्रेमपूर्वक राहिलेले नाही, याचा अर्थ असा काढू नये की, सर्व पुरुष त्यांच्याप्रमाणेच निष्ठूर असतात.

आत्महत्येसारखी भ्याड गोष्ट आपल्याला आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. हे कुठल्या समस्येचे उत्तर नाही. आपला दुसरा पर्याय घरातून पळून जाण्याचा, तर तोही विवेकपूर्ण नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या मोठया संकटात सापडू शकता. त्यामुळे अशी चूक मुळीच करू नका.

आपले विचार सकारात्मक ठेवा आणि घरच्यांचे म्हणणे ऐका आणि लग्न करा. कदाचित, लग्नानंतर आपल्याला ती सर्व सुखे मिळतील, ज्यापासून तुम्ही आतापर्यंत वंचित राहिला आहात. आपले हक्काचे घर असेल, आपले स्वत:चे कुटुंब असेल. तिथे तुम्ही पूर्ण सुरक्षित असाल.

  • मी २७ वर्षीय विवाहिता असून, ७ वर्षीय मुलाची आई आहे. माझे पती व्यावसायिक आहेत. आमचे संपन्न आणि एकत्र कुटुंब आहे. समस्या ही आहे की, संध्याकाळी माझे पती, माझे मोठे दीर आणि सासरे एकत्र बसून दारू पितात. पतीला हरप्रकारे समजावले की, मुलगा मोठा होत आहे. त्याच्यासमोर मोकळेपणाने दारू पिणे योग्य नाही, पण पती समजून घेत नाहीत. मी माझ्या भावाकडे माझी चिंता व्यक्त केली, तेव्हा त्याने सांगितले की, मुलाला बोर्डिंगमध्ये पाठविले पहिजे. कारण घरात अभ्यासाचे वातावरण नाही. पतीला विचारले, तर त्यांचीही काही हरकत नाहीए. पण मला भीती वाटते की, एकटा राहून मुलगा कठोर बनू नये. तुम्हीच सांगा माझी काळजी योग्य आहे की नाही?

जर तुम्हाला वाटते की, घरात मुलासाठी अभ्यासाचे वातावरण नाही, तर तुम्ही त्याला बोर्डिंगमध्ये पाठवू शकता. तिथे शिस्त आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल. अधूनमधून तुम्ही मुलाला भेटत राहाल आणि तोही सुट्टयांमध्ये आपल्याकडे येऊ शकतो. म्हणून आपल्यासाठी त्याचे प्रेम कमी होणार नाही. सुरुवातीला तुम्हाला मुलाबाबत काळजी वाटू शकते, पण त्याच्या उत्तम भविष्यासाठी आपल्याला आपले मन घट्ट करावे लागेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...